Monday, July 29, 2013

आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....

दैनिक कृषीवल च्या उरूस सदरातील माझा शेवटचा लेख. १४ मार्च २०१२ पासून ते २७ जुलै २०१३ पर्यंत मी हे सदर लिहिले. कृषीवल चे संपादक संजय अवटे, त्यांचे सर्व सहकारी आणि या लिखाणाला प्रतिसाद देणारे सर्व वाचक या सर्वांचे मनपुर्वक आभार! हे सदर याच नावाने दैनिक "पुण्य नगरी" मध्ये ४ ऑगस्ट पासून चालू होते आहे.

आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....


वसंत बापटांची मोठी सुंदर कविता आहे
तूमी जीव लावला मैत्र आपुलं जूनं
तूमी माफ केल्याती शंभर आमूचं गुन्हं
ही मैफल तूमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....
एखाद्या मैफिलीचा शेवट करताना मी आवर्जून ही कविता सांगायचो. समोरच्या श्रोत्यांकडे पाहून ‘ही मैफल तुमची अखंड चालो अशी...’ असं म्हणायचं.  मंचावर बसलेले सर्व कवी किंवा गायक वादक त्यांच्याकडे बोट दाखवून ‘आम्ही जाणारच कवातरी पट्दिशी’ असं म्हणायचं. फार जणांना ही कविता आवडते.
मग ग.दि.माडगुळकरांची एक कविता सापडली. म्हणजे चारच ओळी माहित झाल्या. मैफल संपल्यानंतरचे वातावरण त्यात सुचित केले होते.
कोन्यात झोपली सतार सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग
गालिच्या दुमडला तक्के झुकले खाली
तबकात राहिल्या देठ लवंगा साली.
या ओळींना तर श्रोत्यांची दाद हमखास ठरलेली असायची. मला या ओळी एखाद्या कवितेच्या शेवटच्या ओळी आहेत असं वाटायचं. नंतर कळालं की ग.दि.माडगुळकरांच्या ‘जोगिया’ या सुंदर कवितेच्या या सुरवातीच्या ओळी आहेत.
कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात गायक वादकांना शेवटची भैरवी म्हणायचा आग्रह मी करायचो. सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान औरंगाबादला जवाहरलाला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात 20 वर्षांपूर्वी कार्यक्रमासाठी  आलेले होते. त्यांनी त्यांचे वादन अतिशय सुंदररित्या सादर करून कार्यक्रम संपवत असल्याची घोषणा केली. त्यांची सुंदर भटियाली धून मी कॅसेटवर ऐकली होती. ती ऐकायची इच्छा होती. वाद्य संगीतात भैरवीच्या सुरावटीच्या धुनने समारोप केला जातो. बर्‍याचजणांना कार्यक्रम संपवू नये असे मनोमन वाटत होते. पण इतक्या मोठ्या कलाकाराला कोण सांगणार? मी मोठ्या धैर्याने उठून उभा राहिलो आणि त्यांना भटियाली धून वाजविण्याची विनंती केली. आश्चर्य म्हणजे अमजद अलींनी ती मान्यही केली. आणि 45 मिनीटे अप्रतिम अशी भटियाली धून वाजवली. त्या निरोपाच्या सुरावटीत श्रोते अक्षरश: नाचत होते.
भैरवीचा महिमाच मोठा विलक्षण. माझा अधिक्षक अभियंता मित्र शशांक जेवळीकर शास्त्रीय संगीताचा मोठा दिवाना. नुसताच दिवाना नाही तर त्याचा त्या विषयावरचा अभ्यास अतिशय चांगला व नेमका. त्याचा वाढदिवस होता त्या दिवशी मी त्याच्या घरी जावून रात्री उशीरा गप्पा मारत  बसलो होतो. किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगल यांचा अप्रतिम बागेश्री त्यानं ऐकलवला. गंगुबाईंचा आवाज अप्रतिम लागलेला. कुठल्याही सप्तकात स्थिर लागलेले स्वर. त्यांच्या गाण्यानंतर काय ऐकावं तेच कळेना. किशोरी अमोणकरांची भैरवी त्यानं ऐकवली. त्या भैरवीच्या सुरावटीतच आधीच्या गाण्यातून आम्हाला बाहेर काढण्याची ताकद होती. 
अशा भैरवीच्या कितीतरी सुंदर आठवणी आहेत. ‘उरूस’ या सदराची आज भैरवी सादर करताना माझ्याही मनात आर्त सुर दाटून आले आहेत. मे महिन्यात माझे जवळचे स्नेही असलेल्या दिवाकर कुलकर्णींच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नात मला अलिबागचे डॉ. कुमठेकर भेटले. ‘उरूस’ सदरातील माझ्या लेखनाची आठवण करून देऊन, ते सदर लिहीणार्‍याशी माझी प्रत्यक्ष भेट झाली याचा किती आनंद वाटतो आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची पत्नी जया ही मला लहानपणापासून ओळखते. अनोळखी अशा वाचकांनीही खुप चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
माझे हे लिखाण मी सातत्याने माझ्या ब्लॉगवर देत आलो. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकांची संख्या 7000 चा टप्पा पार करून गेली. त्यात मोठा वाटा ‘उरूस’ सदरातील लेखांचा आहे. सहित्य-संस्कृती-कला या क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करावं अशी अपेक्षा संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार विविध विषयांवरील लेख या सदरात मी लिहीले. बर्‍याचदा ‘सदर’ लिखाण हे मोठी अडचण किंवा अवघड जबाबदारी वाटते असं मत माझ्या काही लेखक मित्रांनी व्यक्त केलं आहे. काही मित्रांनी यामूळे  चालू असलेली सदरं बंदही केली आहेत. किंवा काही जणांची सदरं रखडत चालली. माझ्याबाबत मात्र हे घडलं नाही. या लिखाणातून मला खुप आनंद  मिळाला. मला कुठलाही त्रास या लिखाणाचा झाला नाही. मनात विषयाची जूळणी तयार असायची. लिहीताना हे सगळं जुळून यायचं. आणि सलग कागदावर उमटायचं.
साहित्य संस्कृती कला यांचं जीवनात काय स्थान आहे? या गोष्टी हव्यातच कशाला? असे प्रश्न व्यवहारिक पातळीवर काहीजणांना पडत असतात. कशाला लिहायचं? कोण वाचणार आहे? काही अडलं आहे का? अशी भावना  बळावताना दिसते. पण याचं अतिशय सुंदर उत्तर ज्ञानेश्वरांनी दिले आहे
जैसे भ्रमर भेदी कोडे । छेदी कठीण काष्ट कोरडे ।
पै कलिकेमाजी सापडे । कोवळीया ॥
अतिशय कठीण लाकूड पोखरणारा भुंगा कोवळ्या कमळाच्या कळीत मात्र अडकून पडतो. त्याला काय ती कळी पोखरून बाहेर पडता येत नाही? पण ती पोखरायीच नसते. कलेचे तसेच आहे. हे जे आपल्या भोवती कोवळं सुंदर जग कला तयार करते त्यात अडकूनच त्याचा आनंद घ्यायचा असतो. असा आनंद मला स्वत:लाही घेता आला आणि मला खात्री आहे माझ्या वाचकांनीही तो घेतला असावा.
जयपूर घराण्याचे महान गायक पंडित मल्लिकार्जून मन्सूर हे बसवेश्वरराचे एक सुंदर भजन गायचे. त्यात गायकाने देवाकडे एक अपेक्षा व्यक्त केली आहे. माझ्या मस्तकाचा भोपळा बनू दे, देहाचा दांडा बनव, शिरांच्या तारा बनवून आपल्या बोटांनी त्या छेडत हे परमेश्वरा तू मला हृदयी जवळ घेवून गा. या ओळींचा अर्थ ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते साहित्यीक विनय हर्डीकर यांनी त्यांच्या लेखात दिला होता. मला कानडी येत नाही. या अर्थावरून मी त्याचा मराठीत भावानुवाद केला
मस्तक भोपळा । शिरा जणू तारा ।
दांडी या शरिरा । बनव गा ॥
बोटांनी छेडित । अशी एकतारी ।
लावुनिया उरी । गा तू देवा ॥
ही झाली एका गायकाने व्यक्त केलेली भावना. एक लेखक काय भावना व्यक्त करेल? मी आज या भैरवीत माझ्या वाचकांप्रती ही भावना व्यक्त करतो आणि तूम्हा सर्वांचा निरोप घेतो.
जगण्याचा आशय
शब्दांत मांडून ठेवला आहे तूमच्या समोर
डोळ्यांतून तो शिरो तूमच्या मेंदूत
   माझ्या शब्दांतील कंपने जुळू देत
   तूमच्या हृदयातील कंपनांशी
आणि उमटू देत झंकारांचा पदन्यास
तरच पूर्ण होईल
माझ्या काळजापासून
तूमच्या काळजापर्यंतचा हा प्रवास

2 comments:

  1. wa chan lihila aahes shrikant.....abhinandan

    ReplyDelete
  2. khup manavedhak... as lihayla aantarik urja milayala pn bhagy lagt dada..

    ReplyDelete