Sunday, August 11, 2013

पुरोगामीत्वाला टांग । कॉम्रेड अण्णा भाऊ फक्त मांग ॥


उरूस, दैनिक पुण्य नगरी   रविवार 11 ऑगस्ट 2013 


अण्णा भाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला सर्वत्र साजरी झाली. त्यांच्यावर विविध वर्तमानपत्रांतून लेख प्रसिद्ध झाले. हे लेख वाचताना मोठी विसंगती मात्र जाणवत राहिली. इतका काळ निघून गेला. उदारीकरणाचे मोठे पर्व त्याचे नाविन्य संपवून इथे रूळले तरी आपली मानसिकता मात्र अजूनही मध्ययुगीनच राहिली आहे.

अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात बहुतांश ठिकाणी पुढाकार घेतला तो त्यांच्या मांग जातीच्या विविध संघटनांनी. अण्णा भाऊंचे लेखन हे फक्त मांगांसाठी होते काय? (मी जाणीवपूर्वक मांग हाच शब्द वापरतो आहे कारण मातंग हा संस्कृत शब्द त्याच जातीचे लोक अग्रहाने नाकारतात. शिवाय शासन दरबारी नोंद मांग अशीच आहे.)

उलट अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्डधारक होते. स्वाभाविकच पक्षाची जी ध्ययेधारेणे त्यांची सर्वोच्च समिती (पॉलिट ब्युरो) ठरवेन ती अण्णा भाऊंना बंधनकारक होती. सर्व कम्युनिस्ट चळवळ वर्गलढ्याच्या सिद्धांतावर उभी आहे. या डाव्या चळवळीनी जातीय प्रश्नांना कधीच हात घातला नाही. अण्णा भाऊंनीही आपली सगळी वाङ्मय निर्मिती सामंतशाहीच्या विरोधात केली. किंवा त्यांच्यावर प्रभाव असलेल्या तमाशाच्या रंजनप्रधान शैलीप्रमाणे केली. 

ज्येष्ठ लेखक बाबूराव बागुल यांनी अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे स्पष्ट शब्दांत विश्लेषण केले आहे. ‘..अण्णा भाऊंच्या कथांत अस्पृश्यतेतून आलेली कथा कमी प्रमाणात होती. त्यांची कादंबरी तर मोठ्या संख्येने मराठावर्गात, श्रीमंत शेतकर्‍यांत घडली गेली. वर्गकलहाचे तत्त्वज्ञान त्यांनी हिंदूंच्या नैतिक मूल्यावर नेले. अन्याय, अत्याचार करणारे आणि त्याचा प्रतिकार करणारे असे त्यांच्या कादंबरीला ‘राम रावण पार्टीचे’ रूप आले. खेडे, खेड्यांची जातीयवादावर असलेली उभारणी आणि अस्पृशतेसंबंधी असंतोष त्यांच्या कथांत कमी होता. सामंतशाहीच्या गुणावगुणावर, त्यांच्या कथेचा लोभ जडलेला होता.’ (मराठवाडा दिवाळी अंक 1969)

कम्युनिस्ट पक्षाने अण्णा भाऊंची जयंती धोरण म्हणून तरी का होईना साजरी करण्याचा निर्णय कधी घेतला नाही. कम्युनिस्टांच्या पोस्टरवर कधी अण्णा भाऊंचा फोटोही दिसत नाही. त्याचे एक कारण असेही असावे की अण्णा भाऊंनी कम्युनिस्ट विचार आपल्या लेखनात मांडले पण स्वतंत्रपणे कुठले विचार प्रकट केले नाहीत. आणि शिवाय आपल्याकडची  कम्युनिस्ट चळवळ तशी व्यक्तीला महत्त्व देणारी नाही. ज्योती बसूंसारख्या ज्येष्ठ नेत्याला पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याच पक्षाने परवानगी नाकारली होती. मग तिसऱ्या आघाडीचे पुढे काय झाले हा इतिहास आहे.   

मग प्रश्न असा पडतो की कम्युनिस्ट असलेले अण्णा भाऊ पूर्णपणे मांग अस्मितेचा विषय बनले कसे? अण्णा भाऊंचे मुळ वाक्य असे होते, ‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तोलली नसून ती कष्टकर्‍यांच्या तळहातावर पेललेली आहे.’ अण्णा भाऊंवर लेख लिहीताना सर्वांनी कष्टकरी हा शब्द काढून तिथे दलित हा शब्द घुसडला. 18 जूलै 1969 ला अण्णा भाऊ गेले त्यावेळी त्यांच्याच मांग समाजाचे बाबुराव भारस्कर हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. मांग समाजाची अस्मिता आणि त्या निमित्ताने दलित जातीत आंबेडकरांशिवाय अजून एक अस्मिता निर्माण करता येवू शकते हे त्यांना जाणवले. 

बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे एक अढी सवर्ण हिंदू समाजात निर्माण झाली. पण आश्चर्य म्हणजे पूर्वाश्रमीच्या महारेतर इतर दलित जातींतही झाली. त्यांनी बाबासाहेबांसोबत बौद्ध होणे नाकारले. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी पूर्वाश्रमीच्या महारांनी गावगाड्याची कामे नाकारली ती त्यावेळी मांगांनी पुढे होऊन स्विकारली. खरे तर सगळी दलित अस्मिता जोरकसपणे बाबासाहेबांच्या प्रतिमेत एकवटली असती तर मोठेच परिवर्तन झाले असते. पण हे घडले नाही. कॉंग्रेसने असे धोरण ठरवले की पूर्वाश्रमीच्या महार जातीतील इतर नेत्यांना पाठबळ द्यायचे त्याप्रमाणेच इतर दलित जातीतील लोक शोधून त्यांनाही मोठे करायचे. 

यात अस्मितेचा विषय म्हणून अण्णा भाऊ हाती लागले. आणि त्यांचे पुतळे गावोगावी उभारण्याचा कार्यक्रम सुरू झाला. बरं हे कॉंग्रसने केले असे नाही तर भाजप-शिवसेनेनेही मांग समाजाच्या नेत्यांना उचलून धरले. युती सरकारच्या काळात तर सर्वात जास्त मांग आमदार निवडून आले होते.

हे सगळं होत असताना अण्णा भाऊंच्या साहित्याचा कोणी विचार केला असेही नाही. त्याची कुणाला गरजही वाटत नाही. काळ बदलला असताना आजही आपला समाज केवळ जातीचा आणि त्यातही परत आरक्षणाची सोय म्हणून अण्णा भाऊंचा वापर करू पहाताना बघणे हे केवळ वेदनादायक आहे.   

मांग समाज हा खरे तर कलाकार समाज. अजय अतूल सारखी आजची आघाडीची संगीतकार जोडी याच मांग जातीतून आलेली आहे. पण तिला कुठेही आपल्या जातीय अस्मितेचा वापर करण्याची गरज वाटत नाही. उलट संगीताच्या मुख्य प्रवाहात मिसळून जात त्यांनी तो प्रवाह समृद्ध केला आहे. आज संगीत कलेची बाजारपेठ मोठ्याप्रमाणात विस्तारली आहे. या विस्तारलेल्या बाजारपेठेत मांग समाज खुप मोठे योगदान देवू शकतो. पण आपण हे विसरून त्याला जातीत अडकून टाकतो. दलित साहित्यात आत्मकथनाशिवाय सकस काही नाही असा जो आरोप केला जातो त्याला नामदेव कांबळे आणि उत्तम बंडू तुपे सारखी दोन महत्त्वाचे अपवाद मांग जातीतूनच आलेले आहेत. 

जागतिकीकरणाचा काळात सगळ्यात जास्त फायदा दीन दुबळ्या दलितांना झाला कारण ते जून्या व्यवस्थेत नाडल्या गेलेले होते. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. ज्या प्रमाणे महात्मा फुले म्हणाले, ‘बरे झाले इंग्रज आले. नसता या भटा बामणांनी आमच्या पोराबाळांना शिकूच दिलं नसतं.’ याच धर्तीवर आता असं म्हणायची पाळी आहे, ‘बरं झालं जागतिकीकरणामुळे मोकळे वारे खेळायला लागले. नसता या जून्या व्यवस्थेनं आम्हाला संधीच दिली नसती.’

आपल्याकडची बरीच तालवाद्ये ही कातड्याची बनवलेली असतात. म्हणून त्यांना स्पर्श करणेही सवर्ण पाप समजायचे. ही वाद्ये मांग समाजाने बनविली, त्यांचा विकास केला व आपल्याकडे संगीत जिवंत ठेवले. आता तर त्याला जगभरातून मागणी येत चालली आहे. म्हणजे ज्या उदारीकरणावर टिका  डाव्या/परिवर्तनवादी/दलित चळवळी करत राहिल्या त्याच उदारीकरणाच्या काळात या वर्गाला मोठी संधी प्राप्त होताना दिसत आहे. 

एकेकाळी ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असे म्हणत जागतिकीकरणाचे समर्थन करणारे आता मात्र ‘जगातील ग्राहकांची एक बाजारपेठ’ अशी धोरणं सुरू झाली की विरोध करायला लागले. कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा भाऊ बदलत्या काळात एक चांगले प्रतिक होवू शकत असताना त्यांना जातीय अस्मितेचे प्रतिक करून आपण काय मिळवत आहोत?

7 comments:

  1. खूपच छान विश्लेषण

    ReplyDelete
  2. वा, खूपच छ्यान लिहिले आहेस. छ्यान म्हणजे वास्तव आणि निर्भीड. खरे म्हणजे काल बाह्य होवू पाह्ण्याऱ्या प्रत्येक बाबी पुन्हा कश्या परंपरागत होतील या कडे जसे लक्ष दिले जाते, तसेच त्या फायद्या साठीही जात, धर्म कसे टिकले पाहिजेत हेही जाणीव पूर्वक पहिले जाते...! यात कोणीही मागे राहिलेले नाहीत. ना सवर्ण ना अवर्ण ....

    ReplyDelete
  3. धन्यवाद खूप चिंतनीय व उद्बोधक लेख आहे हा .

    ReplyDelete
  4. अभ्यासपूर्ण ! अप्रतिम !!

    ReplyDelete
  5. खूप छान , परखड , झणझणीत अंजन घालणारे विश्लेषण आहे..

    ReplyDelete