Tuesday, September 3, 2013

शरद जोशी तूमचे आता करायचे काय?

उरूस, दैनिक पुण्य नगरी, मंगळवार 3 सप्टेंबर 2013


आदरणीय शरद जोशी, सा.न.
3 सप्टेंबर हा तूमचा 78 वा वाढदिवस. 78 वर्षे पूर्ण करून तूम्ही 79 व्या वर्षात पदार्पण करत अहात. तूम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा ! आज तूमची आठवण होते आहे ती तूमच्या वाढदिवसामुळे तर आहेच पण त्याही पेक्षा तूम्ही वर्तविलेल्या भविष्यामुळे. तूम्ही दहा वर्षांपूर्वीच म्हणाला होता की रूपया डॉलरच्या तूलनेत 60 च्याही पलीकडे घसरेल म्हणून. तेंव्हा स्वाभाविकच सगळ्यांना वाटले या माणसाचे काही खरे नाही. जवळपास सगळ्या राज्यकर्त्यांनी या इशाराकडे दुर्लक्ष केले. 1991 ला मुक्तअर्थव्यवस्था भारताने स्विकारली. त्याचे मन:पूर्वक समर्थन फक्त तीनच नेत्यांनी केले होते. एक पंतप्रधान पी.व्हि.नरसिंहराव, जे की सध्या हयात नाहीत, दुसरे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग,जे की हयात असून आर्थिक प्रश्नावर पूर्णपणे मृतवत झाले आहेत आणि तिसरे तूम्ही. तेंव्हा तर डाव्यांनी असा गहजब केला होता की डंकेल साहेब तूमच्या गायीचे वासरूही ओढून नेईल. पण तसे काही झालेच नाही.
राजकीय पटलावर वारंवार कोलांटउड्या खाण्यात पटाईत असलेले मर्द मराठा राजकारणी शरद पवार तर असं काही सध्या बोलत आहेत की त्यांच्या लिखीत भाषणाखाली शरद पवार या नावातील पवार खोडून जोशी लिहीलं तर ही भाषणं 20 वर्षांपूर्वीच्या तूमच्याच भाषणाच्या कार्बन कॉपी म्हणून खपून जातील.
अन्न सुरक्षा विधेयक नुकतेच मंजूर झाले आहे. तूम्ही अशा प्रकारच्या सर्व ‘भीकमाग्या’ धोरणांचा कडाडून विरोध केला होता आणि आजही करत अहात. अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करताना हे सगळ्यांना माहित आहे की जो पोशिंदा आहे, जो अन्नधान्य पिकवतो त्याच्या उत्पादन खर्चाची सुरक्षा मंजूर केल्याशिवाय हे प्रत्यक्षात येवूच शकत नाही. रडणार्‍या पोराला भूक लागली असताना अन्न तर देता येत नाही. मग खुळखुळा वाजवून त्याचं लक्ष दुसरीकडे वेधावं तसं चालू आहे. हे सगळं तूम्ही ठामपणे केंव्हापासूनच सांगत आला आहात. पण तूम्हाला कसं सांगावं.... हे तूमचे सगळे ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’ राजकारणात परवडत नसतात. भले तूमचं म्हणणं काळाच्या पटावर  खरं ठरो राजकारणाच्या सारीपाटावर या सोंगट्या कामाला येत नाहीत.
आपल्याकडे बरेच नेते कुठलाही विचार न देता भावनेला हात घालतात, गर्दी जमवतात आणि बघता बघता मतांचे भरघोस पीक काढतात. तूम्ही मात्र वेगळेच निघालात. तूम्ही सातत्याने आर्थिक गंभीर विचार अडाणी समजल्या जाणार्‍या शेतकर्‍यांसमोर मांडला. तरी शेतकर्‍यांनी प्रचंड गर्दी करून तूम्हाला दाद दिली. तूम्ही ना शेतकर्‍याच्या जातीत जन्मला, ना तूम्ही शेतकर्‍याचा पोषाख घातला, ना शेतकर्‍याची गावरान भाषा वापरली तरी शेतकरी बाया बापड्यांनी तूम्हावर जीव कुर्बान केला. 31 हुतात्मे तूमच्या आंदोलनात शहीद झाले. तूम्ही कधीही काळजाला हात घालणारी भाषा केली नाही पण  कुणब्याचे वर्षानुवर्षाचे दुखणे शुद्ध आर्थिक परिभाषेत मांडले आणि त्याचे आसु घळा घळा गालावर उतरले.
अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती, बाराशे वर्षांपूर्वी शंकराचार्यांना केदारनाथच्या धवल डोंगराच्या सान्निध्यात ‘निर्वाणषटक’ सुचलं होतं, चारशे वर्षांपूर्वी भामरागडच्या डोंगरावर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणत तुकाराम महाराजांची समाधी लागली होती याच परिसरात आणि याच अवस्थेत तूम्हालाही शेतीच्या दु:खाचे मुळ सापडले. मी तूम्हाला गुरू मानतो. तेंव्हा उगीच हळवी भाषा वापरणार नाही, पण हे खरेच आहे. ’शेतीचा प्रश्न समजण्यासाठी शेतीवर मी माझे पोट ठेवले’ हे तूम्ही म्हणालात हाच तर कृती मार्ग होता आमच्या दार्शनिकांचा.
आपल्याकडे जिवंतपणी मान्यता न मिळण्याची मोठी दुष्ट परंपरा आहे. पण तूमच्या बाबतीत हे घडलं नाही. ही पंरपरा खंडित झाली. तूमच्या डोळ्यांसमोरच लाखो शेतकर्‍यांनी ‘भीक नको घेवू घामाचे दाम’ ही घोषणा दिली आणि आपल्या आपल्या परीने अमलात आणली.
आपले विचार सुत्रबद्ध पद्धतीने लिहून ठेवण्याची आपल्या दार्शनिकांची परंपरा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या परंपरेतले अगदी अलिकडचे उदाहरण. तूम्हीही तूमचे सगळे विचार स्पष्टपणे चार हजार पृष्ठांचा मजकूर भरेल इतके लिहून ठेवले आहेत. आजही कुणी उठून तूमच्यावर बाष्कळपणे टिका करू पाहतो त्याला तूम्ही काहीच उत्तर न देता शांतपणे स्मितहास्य करता. कारण तूम्ही हे सगळं सविस्तर सोप्या शब्दांत मांडून ठेवलं आहे.
तूम्हाला सोडून गेलेल्यांना आजतागायत हे कळले नाही की आपण शरद जोशींना तर सोडून आलो पण त्यांचा विचार आपला पिच्छा सोडायला तयार नाही. आश्चर्य म्हणजे जेंव्हा जेंव्हा तूमच्या विचारांना ते प्रामाणिक राहिले, त्यावर आपल्या थोड्याफार प्रज्ञेने काही मंथन करीत राहिले तोपर्यंत लोकांनी त्यांना अल्प प्रमाणात स्वीकारले, पण तूमच्या विचारांपासून शेतकरी हितापासून ते जेंव्हा दूरावले तेंव्हा क्षणात त्यांना लोकांनीही झिडकारून दिले.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरूजी यांनी सामाजिक चळवळी करत असताना आपला विचार मांडण्यासाठी अतिशय सुबोध भाषा वापरली. चरख्यातून एकसारखे सुत बाहेर यावे अशी भाषा. ही परंपरा तूम्हीही पुढे चालविली. अडाण्यातल्या अडाणी शेतकर्‍यालाही तूमचे शेतीचे अर्थशास्त्र विज्ञापीठातील विद्वानापेक्षा सहज आत्मसात झाले. आमच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालूक्यात अंबरवाडी नावाचे गाव आहे. तिथली एक गरीब महिला चांदवडच्या महिला अधिवेशनासाठी एका टपरीवाल्याकडे वर्गणी मागायला गेली. तो टपरीवाला तीला म्हणाला, ‘म्हातारे, तूझ्या बिल्ल्याशी, शेतीशी माझा काय संबंध? मी कह्याला वर्गणी देवू?’ ही फाटक्या लुगड्यातली म्हातारी त्याला म्हणाली, ‘बाबा तूहा धंदा चालते आमच्या जीवावर. कुणब्याच्या कापसाला नाही भेटला भाव तर तू काय धंदा करशील? पोटात काय तुर्‍हाट्या भरशील का भौ? आडात असलं तर पोहर्‍यात येतं. कुणब्याला भेटलं तर सर्‍या जगाला भेटंल. एका दाण्याचे हजार दाणे आमच्या शेतातच होतेत. तूह्या टपरीत एक कप चहाचा दहा कप नाही होत.’
सांगा शरद जोशी ही भाषा या अडाणी म्हातारीच्या तोंडी कुठून आली. मानवत जवळच्या कोल्हा पाटीचा शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता इंडिया आणि भारत ही तूम्ही केलेली मांडणी समोरच्या अडाणी शेतकर्‍यांसमोर मांडताना असं म्हणाला, ‘तिकडं शहरात मान्सं पहाटे पहाटे फिरायला जातेत. कारन त्याहींच्या अंगात जास्तीचं रगत दाटायलं. आन् हीतं आमचा गडी नांगरामागं फिरू फिरू परेशान. याच्या अंगात रगत आटायलं.’ आता सांगा नं यापेक्षा जास्त चांगल्या सोप्या आणि समर्पक शब्दांत तूमचा विचार काय सांगणार?
शिवाजी महाराजांना कुळवाडीभुषण ही पदवी महात्मा फुल्यांनी बहाल केली. महाराजांचे विश्लेषण शेतकर्‍यांचा राजा शिवाजी म्हणून करताना तूम्हीच फक्त असे निघालात की ज्याने मांडून दाखवले, मिर्झा राजे जयसिंहा सेाबतचा तह हा जून महिन्यातला होता. नांरटीचे दिवस समोर होते. तह केला नसता तर नांगरट झाली नसती. प्रजेला खायला भेटले नसते. तूमची सगळी फौजच मुळात चार महिने शेती आणि आठ महिने मुलूखगिरी अशी होती. सांगा ना शरद जोशी शेतकर्‍याच्या पोटी जन्मून मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर जावून बसणार्‍यांनी शेती विरोधी धोरणंं आखुन आपल्याच बापाचा गळा कापायला कमी केलं नाही असं कसं? नारायण कुलकर्णी कवठेकरांनी लिहीलं तसं ‘टाकांच्या निभांनी तूझी कणसं खुडतील’ असे हे का वागले? महात्मा फुल्यांना वाटलं होतं की भट कारकुनाच्या जागी बहुजन कारकून आला तर सामान्य लोकांचे भले होईल. पण फक्त तूम्हीच निघालात हे सांगणारे की ‘भट कारकून जावून बहुजन कारकून आला किंवा गोरा इंग्रज जावून काळा इंग्रज आला तरी शेतकर्‍याचे शोषण थांबत नाही. ही व्यवस्थाच तशी बनवली गेली आहे.’
सामान्य बायाबापड्यांना हे पटलं म्हणून तर देवघरात त्यांनी तूमचे फोटो लावले. जातीय अस्मितेची टोकं नको तेवढी तीव्र होण्याच्या काळात तूम्ही ठामपणे आपल्या विचारांवर उभे राहिलात आणि सामान्य शेतकरी बायाबापड्यांना शेतीच्या प्रश्नावर विवेकाच्या पातळीवर आणून उभं केलंत, तूमची मांडणी दिवसेंदिवस खरी ठरत चालली आहे. म्हणूनच आता आम्हाला कळेना तूमचं करायचं काय? काळावर खोट्या ठरलेल्या माणसाबाबत काही करावंच लागत नाही. त्यांचा सोक्षमोक्ष काळच लावतो. प्रश्न खरा ठरणार्‍यांचा असतो. सांगा शरद जोशी तूमचे आता करायचे काय?     
प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी तूम्हाला शब्दांत पकडण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय तूम्ही तरी सांगा तूम्हाला शब्दांत तरी पकडायचं कसं?

लोंढा गढूळ पाण्याचा
तुवा बांध बांधलास
तडा तडकला त्याचा
तुवा सांध साधलास

रानभर पांगलेले
पाणी गोळा झाले कसे?
चुकलेल्या हिशोबाचे
आणे सोळा झाले कसे?

शेतकर्‍याच्या हिशोबाचे  सरकारी धोरणाने चुकविलेले आणे तूम्ही नेमके मांडून दाखवले. तूमच्या वाढदिवसा निमित्ता लाख लाख शुभेच्छा !
तुमचा
श्रीकांत

--
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
मो. 9422878575.

5 comments:

  1. माननीय श्री शरद जोशी यांच्याविषयी तुम्ही खूपच छान लिहिले आहे. श्री शरद जोशी यांनी फार मोठा त्याग केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी परिश्रम घेतले. त्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या आजारपणाची पर्वा केली नाही. त्याकाळी शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत प्रभावीपणे चालले. पण राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकले नाहीत. आजही शेतकऱ्यांची तशीच दयनीय अवस्था आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; पण शेतकऱ्यांमधूनच आलेले शासनकर्ते डोळे मिटून आहेत. यात बदल केव्हा होणार, कोण करणार ? सर्व प्रश्नच प्रश्न... ?

    ReplyDelete
  2. श्रीकांतजी ...काळजाला भिडेल असा सुंदर लेख...शरदजी जोशी यांच्याविषयी कमालीचा आदर निर्माण झाला.तुमच्या पुढील लेखनासाठी खुप खुप शुभेच्छा..

    ReplyDelete
  3. श्रीकांतजी खूपच छान लेख आहे. परिस्थिती बदलली नाही. पण बदलायला हवी.

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख. जोशी सरांच्या तत्वज्ञानाविषयी इतके समर्पक विश्लेषण वाचण्यात आले नव्हते. अभिनंदन … असेच लिहित रहा.

    ReplyDelete