Sunday, August 18, 2013

दु:ख 14 आणि 15 ऑगस्टचे

उरूस, दैनिक पुण्य-नगरी,  रविवार 18 ऑगस्ट 2013 


कवी भ.मा.परसवाळे यांनी फाळणीवर अप्रतिम अशा दोन ओळी लिहील्या आहेत. आत्तापर्यंत मराठीत फाळणीवर इतकं नेमकं भाष्य नाही. त्यांच्या ‘जागजागी’ या कवितेत ते लिहीतात
बेसुमार फाडले फाडताना वेडेवाकडे
आता शिवताना चोळ येताहेत जागजागी !

पाच भारतीय जवानांची हत्या नुकतीच करण्यात आली. नुकताच स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर परसवाळेंच्या ओळी तपासून पहा. फाळणी करताना जो काही प्रदेश आम्ही फाडून ठेवला ते सारे शिवताना चोळ येत चालले आहेत जागजागी. फाळणीची जखम बूजतच नाही. त्यावर खपली धरतच नाही.
बोरकरांसारखा ‘आनंदयात्री’ कवी स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या भारतमातेचे वर्णन करताना लिहीतो
सगळा यज्ञ संपल्यानंतर 
उरली हाती राखच कशी
कुंकू भाळी लागताच कशी 
आई झाली वेडीपिशी

खरं तर बोरकरांची भूमिका ही 
मलाही दिसती व्यथा जगाच्या 
परी परिसतो कथा निराळ्या 
कसे उद्याच्या फुलपाखरा 
म्हणून किड्याच्या ओेंगळ आळ्या 

अशी राहिलेली आहे. असे लिहीणार्‍या बोरकरांनाही स्वातंत्र्यमिळाल्यावर आनंदाच्या ओळी नाही सुचल्या.
भीष्म सहानी यांच्या ‘तमस’ कादंबरीतून फाळणीचे दु:ख भळभळत राहिले आहे. दूरदर्शन वर गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका फार मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे काळीज हलवून गेली होती.
1965 च्या पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशातील तणाव कमी व्हावा म्हणून काही सांगितिक कार्यक्रम दोन्ही देशांमध्ये आयोजित केले होते. भारताच्या प्रतिनिधी म्हणून गझल सम्राज्ञी बेगम अख्तर यांचा एक कार्यक्रम वाघा बॉर्डरजवळ पाकिस्तानात आयोजित केला होता. पाकिस्तानी सैनिकांसाठी आयोजिलेल्या या कार्यक्रमांत अख्तरीबाईंनी नियोजीत गझल सोडून दिली व अचानक एक दादरा गायला सुरवात केली. त्यांच्या शब्दांनी आणि सुरांनी  पाकिस्तानी सैन्याची  ती अख्खी बटालीयन रडायलाच लागली. त्या दादर्‍याचे बोल होते,
हमरी अटरीया पे आवो सजनवा
सारा झगडा खतम हो जावे ।

फार जणांना असे वाटत रहाते की पाकिस्तानात जे गेले ते खुप आनंदात होते किंवा आजही आहेत. एखाद्या मोठ्या वाड्यातील भावाभावांची वाटणी झाल्यावर लहाना भाऊ वेगळं घर करतो. तेंव्हा मोठ्या वाड्यातील लोकांना वाटत रहातं की त्यानंच भांडण काढलं होतं, त्यानंच वाटणी मागितली होती, आता तो वेगळा झाला तेंव्हा खुप खुष असेल. पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. तो लहान भाऊही दु:खी होवून बसलेला असतो. एक अपरिहार्य म्हणून वाटणी झालेली असते पण वेदना दोन्ही बाजूला सारखीच असते.
ज्या कवीला वेगळ्या पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक समजण्यात येते त्या अल्लामा इकबाल यांना फार लवकरच धर्मपिसाट लोकांची वृत्ती लक्षात आली आणि त्यांनी आपल्या कवितेतून आपल्या खर्‍या भावनेला वाट करून दिली.
मस्जिद तो बना दी शब भर मे, 
ईमां की हरारत वालों ने ।
मन अपना पुराना पापी है, 
बरसों से नमाजी बन न सका ॥

पुढे इकबाल म्हणतात नुसते बोलण्यापुरते आम्ही धर्मयोद्धे झालो पण प्रत्यक्ष कृतीत काही उतरलंच. आमची कृती ही जून्याच रीतपरंपरांप्रमाणे राहिली.   1875 ला सियालकोट पंजाब इथे जन्मलेले इकबाल हे मुळचे काश्मिरी ब्राह्मण. इकबाल लिहीतात
‘इकबाल’ बडा उपदेशक है 
मन बातों मे मोह लेता है ।
गुफ्तार का यह गाजी तो बना 
किरदार का गाजी बन न सका ॥ 

(गुफ्तार-वार्ता, गाजी-धर्मयोद्धा, किरदार-आचरण, कर्म, चरित्र) 
गालिब नंतरचा उर्दूतला दुसरा मोठा कवी म्हणजे फैज अहमद फैज. फैज यांची जन्मशताब्दि नुकतीच झाली. फैज पाकिस्तानातच राहिले. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. ही पहाट कशी होती? आपण वेगळा पाकिस्तान मिळवला आहे मग तिथल्या सर्वात मोठ्या कवीला काय वाटत होते? फैजच्या ओळी आहेत
ये दाग दाग उजाला ये शब गझिदा सहर
वो इंतिजार था जिसका ये वो सहर तो नही
ये वो सहर तो नही जिसकी आरजू लेकर
चले थे यार की मिलेगी कही ना कही

(शब गझिदा म्हणजे काळोख डसलेली)
एम.जे.अकबर यांची ‘ब्लडब्रदर्स’ नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. तिचा मराठी अनुवाद राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. अकबर आपल्या वडिलांना एकदा विचारतात, ‘तूम्ही तेंव्हा पाकिस्तानात गेला होतात. मग परत कशाला भारतात आलात?’ अकबर यांच्या वडिलांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक आणि भारतीय मुसलमानांच्या मानिकसतेवर नेमके बोट ठेवणारे आहे. अकबर यांचे वडिल म्हणाले, ‘पाकिस्तान फारच मुसलमान झाले होते.’
पाकिस्तानइतकेच मुसलमान भारतात आहेत. भारतातील मुसलमानच नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेश येथील मुसलमानही हे सगळे एका मोठ्या परंपरेचा हिस्सा आहेत. आजही जगात भारतीय उपखंडातील मुसलमान यांची एक वेगळी ओळख आहे. अगदी त्यांची उर्दू ही भाषासुद्धा. ही भाषा दिल्ली आणि अवतीभोवतीच्या प्रदेशात जन्मली वाढली. जी जगात इतर कुठल्याच देशातल्या मुसलमानांची भाषा नाही. कट्टर समजल्या जाणार्‍या या मुसलमानांनी धर्मापेक्षा आपल्या परंपरा, आपली वेगळी भाषा हीच्याशी निष्ठा जपली. बांग्लादेश बांग्ला भाषेच्या आणि संस्कृतिच्या मुद्द्यावर वेगळा झाला. इतकेच नाही तर बांग्लादेशी मुसलमानांनी रविंद्रनाथ टागोरांनी लिहीलेले गीत आपले राष्ट्रगीत म्हणून निवडले. पण आपण हे समजून न घेता ‘हाकलून द्या यांना तिकडे’ वाली भाषा वापरत रहातो. 
कुणाची काय भूमिका असायची ती असो पण लेखक कवींनी मात्र ही फाळणी म्हणजे एक जखम आहे असेच मानले आणि आपल्या साहित्यकृतीतून ही वेदना मांडून ठेवली. 
कबीर प्रोजेक्ट म्हणून बेंगलोरची एक संस्था एक अतिशय अतिशय आगळे वेगळे काम करते. कबीरावरती जिथे कुठे काही आढळते त्याचे चित्रीकरण, त्याची माहिती ते घेवून ठेवतात. त्याचे माहितीपट बनवून ठेवतात. त्यांनी ‘कबीर इन पाकिस्तान’ नावाची एक सुंदर सीडी काढली आहे. कराचीचे सुफी कव्वाल फरिदुद्दीन अय्याज यांनी गायलेला कबीर यात आहे. कबीराने सहाशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले गाताना हे कव्वाल आजच्या सामान्य पाकिस्तानी आणि भारतीय नागरीकांची भावना किती खरी सांगितली आहे
कबीरा कुवा एक है पानी भरे अनेक
भांडा ही मे भेद है पानी सबमे एक. 

याच फरिदूद्दीन अय्याज यांची कव्वाली माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे. 

1 comment:

  1. त्या एकंदर ५ सीडी आहेत. शेवटची सीडी कुमार गंधर्व याम्च्यावर आहे. अजून आहे ती प्रल्हाद तीपनिया नामक मध्यप्रदेशातील गायकावर. पाचही सीडी आवर्जून बघाव्यात.

    ReplyDelete