उरूस, 7 ऑक्टोबर 2021
उसंतवाणी- 193
(उत्तर प्रदेशात लखीमपुर येथे मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. गाडीचे नियंत्रण सुटले. गार्डी गर्दीत घुसली. पाच लोकांचा मृत्यू झाला. जमावाने चार लोकांना बाहेर काढून ठेचून मारले. एकूण 9 मृत्यू झाले. यावरही विरोधी पक्ष मृत्यूचे भांडवल करून राजकारण करत आहेत.)
लखीमपुरात । हिंसेचे तांडव ।
मृत्युचा मांडव । घातला हा ॥
कृषी आंदोलन । पूर्ण भरकटे ।
हिंसा खरकटे । सांडलेले ॥
कराया बसले । लोकशाही खुन ।
घ्यावी ओळखून । चाल ऐसी ॥
शेतकरी सच्चा । राबतो शेतात ।
कुणाच्या हातात । दंडुके हे ॥
आंदोलनजीवी । घेतात हे जीव ।
माणसे सजीव । का म्हणावे ॥
विरोधी पक्षांचे । बबली नी बंटी ।
नौटंकीची घंटी । वाजविती ॥
मेलेल्या जीवांवे । लावुनी कातडे ।
वाजते डफडे । कांत म्हणे ॥
(5 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी- 194
(4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली. दीड वर्षांनंतर शाळेची घंटा वाजली. मुला मुलींच्या डोळ्यांत अतोनात आनंद दिसून आला. सांग सांग भोलानाथ शाळा भरेल का? असं म्हणायची पाळी आली होती. )
वाजतसे घंटा । सुरू झाली शाळा ।
पोरं झाली गोळा । उत्साहाने ॥
घरी बसुनिया । सुट्टीचे अजीर्ण ।
मन हे विदीर्ण । निराशेने ॥
जुने भेटताच । मैत्रिणी व मित्र ।
डोळ्यामध्ये चित्र । फुललेले ॥
ऑनलाईनचा । सुका ज्ञान घास ।
लाभो सहवास । गुरूजींचा ॥
पोरांच्या मनीचा । भाव जाणा भोळा ।
मनातुन शाळा । हवी वाटे ॥
भोलानाथ भरो । नियमित शाळा ।
गळ्यामध्ये गळा । मित्र मित्र ॥
कांत माणसाचा । माणसांत जीव ।
तयावीण कीव । स्वत:चीच ॥
(6 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी-195
(आज घटस्थापना. देवीने महिषासुराचा वध केला तसाच आपण सगळे मिळून कोरोनासूराचा वध करूया. )
देवीने वधिले । महिषासूराला ।
कोरोनासूराला । गाडू तैसे ॥
सार्या देवता दे । आपापले शस्त्र ।
मंत्रुनिया अस्त्र । देवी हाती ॥
सगळे मिळून । लावू शक्ती आता ।
सारी बद्धीमत्ता । पणाला ही ॥
कोरोनासूराचा । करण्या नि:पात ।
सारे देवू साथ । अभियाना ॥
करू ‘जागरण’ । घालूया ‘गोंधळ’ ।
वाजवू ‘संबळ’ । मनोभावे ॥
आपत्ती विरूद्ध । लढण्याचे मात्र ।
आहे नवरात्र । प्रतिक हे ॥
कांत निवारण्या । कोरोना आपत्ती ।
बुद्धी आणि शक्ती । आई तू दे ॥
(7 ऑक्टोबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment