Tuesday, October 5, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६४



उरूस, 4 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 190

(पावसाने शेतीचे आतोनात नुकसान केले आहे. नेहमी ओला असो की सुका दुष्काळाचा फटका ग्रामीण भागालाच का बसतो? शहरी भागाला दुष्काळाने पूर्णत: उद्ध्वस्त व्हावे लागले असे घडत नाही. आणि तशी परिस्थिती आली की लगेच विम्याचे पैसे मिळतात, नुकसान भरपाई मिळते, मदत उभी राहते. शेतकरी मात्र वार्‍यावर सोडला जातो. हे भारत- इंडिया शरद जोशींनी लक्षात आणून दिले. आजही हा सापत्न भाव तसाच आहे.)

पाउस कोसळे । आडवा तिडवा ।
मिटवी गोडवा । जगण्याचा ॥
सर्वदूर रानी । पाणी साचलेले ।
मन खचलेले । कुणब्याचे ॥
कोरडा असो वा । असूदे रे ओला ।
दुष्काळाने डोळा । भरलेला ॥
फायदा घेवुन । ‘इंडिया’ मोकळा ।
‘भारता’च्या गळा । फास दोर ॥
‘इंडिया’च्या साठी । मोकळा बाजार ।
‘भारता’आजार । बंधनाचा ॥
नवे तंत्रज्ञान । ‘इंडिया’च्या साठी ।
फाटक्याच गाठी । ‘भारता’च्या ॥
कुणबी म्हणजे । सावत्र लेकरू ।
धोरणाने मारू । कांत म्हणे ॥
(2 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 191

(30 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर शिवाय गांधींचा संदर्भ येत नाही. ज्या कॉंग्रेसचे गांधी सर्वेसर्वा होते त्या कॉंग्रेसने तर गांधींचे ‘कॉंग्रेस विसर्जीत करा’ हे वक्तव्य प्रत्यक्षात उतरविण्याचा चंग बांधला आहे.)

30 जानेवारी । 2 ऑक्टोबर ।
बापुंची खबर । एवढीच ॥
जनता विसरे । महात्म्याचे धडे ।
पळाली माकडे । जंगलात ॥
अहिंसेचे नको । आम्हाला टिचिंग ।
मॉब हे लिंचिंग । रोज सुरू ॥
कशाला हवी ही । सत्याची झंझट ।
नको ते झेंगट । गळ्यामध्ये ॥
सत्याचे नको हेे । सत्तेचे प्रयोग ।
खुर्चीचा वियोग । सोसवेना ॥
बापु नको आता । जुने उपोषण ।
सत्ता कुपोषण । चालु येथे ॥
बापु तुम्ही आता । आउट डेटेड ।
व्हा अपडेटेड । कांत म्हणे ॥
(3 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-192

(शाहरूख खानचा पोरगा आर्यन खान रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज सेवन करताना सापडला. त्याला एनसीबी ने ताब्यात घेतले व अटक केली. )

दोस्तासंगे मस्त । करी रेव्ह पार्टी ।
अडकली कार्टी । बॉलीवुडी ॥
गांधी जयंतीचा । दिवस हा ड्राय ।
करीती एंजॉय । सुखेनैव ॥
तरंगते सारे । क्रुझ पाण्यावर ।
पोरं नशेवर । मदमस्त ॥
एन्सीबीला कुणी । दिली याची टीप ।
उघडली झीप । इज्जतीची ॥
जरा उचलता । शारूखने डोळा ।
तोंडामध्ये बोळा । मिडियाच्या ॥
सोशल मिडिया । काढतोय पिसे ।
लिब्रांडुंचे हसे । होई पहा ॥
पद वा पदार्थ । नशेला कारण ।
पेटविती रण । कांत म्हणे ॥
(4 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment