Friday, October 22, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६६



उरूस, 10 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 196

(लखीमपुर हिंसाचारावर मोठे राजकारण करण्यात विरोधी नेते मग्न आहेत. राहुल प्रियंका यांच्या दौर्‍याने अजूनच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.)

बंटी आणि बबली । हौशी पर्यटक ।
होतसे अटक । यु.पी.मध्ये ॥
आंदोलन नावे । नवे टुरिझम ।
चाले झमझम । माध्यमांत ॥
स्वत:च्या राज्यात । दिसेना मुसळ ।
शोधती कुसळ । दुसर्‍यांचे ॥
आपला तुपला । मृत्युमध्ये भेद ।
नितीलाच छेद । जाई यांच्या ॥
गाडीखाली आले । त्यांची करी कीव ।
ठेचले ते जीव । कोण होते? ॥
तपासाच्या अंती । येईल जे सत्य ।
तयाचे अगत्य । ठेवावे जी ॥
कांत आक्रस्ताळी । राजकीय शैली ।
विवेकाची थैली । रिकामीच ॥
(8 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 197

(कश्मिरातील हत्येचा प्रकार अतिशय भयानक असा आहे. लोकांना नाव गाव विचारून त्यातील हिंदू शिख बाजूला काढले आणि त्यांची हत्या केली. मुसलमानांना सोडून दिले. निषेध करत हजारो लोक श्रीनगरात रस्त्यावर उतरले हे दृश्य मोठे विलक्षण होते. कित्येक वर्षांत असा मोर्चा श्रीनगरात निघाला नव्हता. )

कश्मिरात बळी । शीख आणि हिंदू ।
पुरोगामी मेंदू । शांत बसे ॥
धर्माच्या नावाने । चालते ही हिंसा ।
म्हणे गप्प बसा । सामान्यांना ॥
तिरंगा घेवून । जन्ता रस्त्यावर ।
आक्रमक स्वर । निषेधाचा ॥
कडक शब्दांत । बोले तरूणाई ।
भितीचा तो नाही । लवलेश ॥
तिनशे सत्तर । वर्मी घुसे बाण ।
आतंकींचे प्राण । कंठाशी हे ॥
शेवटची चाले । ऐसी तडफड ।
मारिती भेकड । सामान्यांना ॥
कांत विषवल्ली । उपटा समुळ ।
नि:संतान कुळ । आतंकींचे ॥
(9 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-198

(एअर इंडिया टाटांनी बोली लावून खरेदी केली. 68 वर्षांपूर्वी सरकारीकरण केले होते ते चक्र परत ही कंपनी टाटाकडे जावून पूर्ण झाले. हा काळाने उगवलेला सुडच होय. )

नेहरू नितीला । लावुनिया चुड ।
उगवला सुड । काळाने हा ॥
टाटाची कंपनी । घातली घशात ।
परत खिशात । दिली त्यांच्या ॥
एअर इंडिया । पुरी बुडविली ।
विकाया काढली । त्याचमुळे ॥
लायसन कोटा । परमिट राज ।
नियंत्रण खाज । सरकारी ॥
उद्योजक वृत्ती । खच्ची केली पुरी ।
नियमांची सुरी । गळ्यावर ॥
नोकर दावतो । मालकाला धाक ।
प्रगतीचे चाक । थांबलेले ॥
कांत संपो त्वरे । कंट्रोल आजार ।
मुक्त हो बाजार । फळो फुलो ॥
(10 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment