उरूस, 22 ऑक्टोबर 2021
उसंतवाणी- 208
(बांग्ला देशात हिंदुंवर अनन्वीत अत्याचाराच्या घटना समोर आल्या. त्याने सारे जग हादरून गेले. )
बांगला देशात । हिंदुंचा संहार ।
विषारी फुत्कार । धर्मांधांचे ॥
सेक्युलर येथे । वाजते डफली ।
हिंदुंची कापली । मान तिथे ॥
सीएए विरोधी । केला ज्यांनी शंख ।
त्यांना बसे डंख । कट्टरांचा ॥
बांगला देशी हा । ओके द्वेष आग ।
फणा काढी नाग । धर्मवेडा ॥
अडकले होते । पाक जबड्यांत ।
वाचवे भारत । बांग्लादेशा ॥
उपकाराची या । जरा न जाणीव ।
हिंदुंचा घे जीव । नीचपणे ॥
कट्टर इस्लामी । धर्मांधता शाप ।
जगा त्याचा ताप । कांत म्हणे ॥
(20 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी- 209
(आर्यन खानला सत्र न्यायालयात जामिन मिळाला नाही. आता त्यांचे वकिल उच्च न्यायालयात गेले आहेत.)
मागतो ‘मन्नत’ । तरी नाही बेल ।
नशिबात जेल । आर्यनच्या ॥
चर्चा करू करू । थकले लिब्रांडू ।
कायद्याचा दांडू । माथ्यावर ॥
शाहरूख ब्रँड । उतरला भाव ।
बदनामी घाव । कारट्याचा ॥
कायद्याचा कधी । मानतो ना धाक ।
त्याचे आज नाक । ठेचले हे ॥
कायद्यापुढती । सगळे समान ।
परि असमान । कायदाच ॥
अशा नाठाळांना । बसे आज धक्का ।
झाले हक्का बक्का । बॉलीवुड ॥
माज असे ज्याला । दुनिया ‘मुठ्ठी में’ ।
जाई तो ‘मिट्टी में’ । कांत म्हणे ॥
(21 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी-210
(21 ऑक्टोबर रोजी 100 कोटी चा टप्पा कोरोना विरोधी लसीकरणाने गाठला. इकडे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात हप्ते वसुलीचा 100 कोटींचा टप्पा गाठला.)
100 कोटींचा । गाठला हा टप्पा ।
विरोधाच्या गप्पा । तरीसुद्धा ॥
कुणासाठी टप्पा । लसीकरणाचा ।
वशीकरणाचा । हप्त्यांसाठी ॥
100 कोटींच्या । हप्त्यांची वसुली ।
सत्तेची ढोसली । आघाडीने ॥
कोरोना काळात । केली बोंबाबोंब ।
भ्रष्टाचारी कोंब । उगवले ॥
इंजेक्शन असो । असो ऑक्सिजन ।
रडविले जन । व्यवस्थेने ॥
जनता सोशिक । चिवट जिवंत ।
झाली ‘लसवंत’ । अभिमाने ॥
साध्या माणसांचे । झुंजणे हे खास ।
रचे इतिहास । कांत म्हणे ॥
(22 ऑक्टोबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment