Friday, October 22, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६९

 

उरूस, 19 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 205

(कॉंग्रस कार्यकारिणी बैठक पार पडली आणि त्यात परत सोनिया गांधीच एक वर्ष हंगामी अध्यक्ष राहतील असा निर्णय झाला. ऑगस्ट 2022 मध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू होईल. आणि ऑक्टोबरमध्ये अध्यक्ष निवडल्या जाईल आसे ठरविण्यात आले. परत राहुल गांधीच अध्यक्ष होतील असे संकेत अंबिका सोनी यांनी दिले आहेत. )

जुनीच सोनिया । जुनाच राहुल ।
नव्याची चाहूल । नको आम्हा ॥
आम्हा प्रिय भारी । वंश परंपरा ।
अध्यक्ष दुसरा । नाही दूजा ॥
हंगामी अध्यक्ष । ठेवूया कायम ।
हाच तो नियम । प्रिय आम्हा ॥
कुणी म्हणो पप्पु । कुणी म्हणो मठ्ठ ।
चिकटला घट्ट । पदाला जो ॥
जात नाही पीळ । जळो जरी सुंभ ।
तैसाची हा शुंभ । कांगरेसी ॥
भाजपच्या मनी । फुटली उकळी ।
स्पर्धा हो मोकळी । नेतृत्वाची ॥
थुंकलेला थुंका । चाटतो जो पुन्हा ।
कॉंग्रेसी तो जाणा । कांत म्हणे ॥
(17 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 206

(नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार, अनिल देशमुख सर्व राष्ट्रवादीचे मंत्री विविध कारणांनी गोत्यात आले आहेत. देशमुखांना तर राजीनामाच द्यावा लागला.)

हर्बल गांजाची । खिशात ही पुडी ।
राष्ट्रवादी ‘घडी’ । विस्कटली ॥
वझे वझे गेला । एक ‘वाजे’ पायी ।
हर्बलची घाई । दूजा नडे ॥
‘अनंत’ लीलेने । मारला ‘कर्मुसे’ ।
झाले कसेनुसे । अटकेने ॥
‘अजित’ गोत्यात । ईडीच्या धाडीने ।
केंद्राच्या खोडीने । खेळ चाले ॥
जागी थांबलेले । सारे मंत्री काटे ।
शिवलेले फाटे । जागजागी ॥
‘बारामती’ स्तब्ध । मुख्य तास काटा ।
उपहास मोठा । राजकीय ॥
दिल्लीच्या मोहात । निसटे गल्लीही ।
उडते खिल्ली ही । कांत म्हणे ॥
(18 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-207

(दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नव हिंदुत्वाचा मुद्दा मांडून नविन वादाला तोंड फोडले आहे.)

पाळीव वाघोबा । बोलतो तडक ।
हिंदूत्व कडक । आमचेच ॥
नव हिंदुत्वाचा । लाविला जो शोध ।
त्याच्यातुनी बोध । कांही नाही ॥
सेनेच्या हिंदुत्वी । उरला न राम ।
भरे ‘रोम रोम’ । सोनियाचा ॥
सेना हिंदुत्वाचा । सेक्युलर झब्बा ।
‘राज’ घाली बिब्बा । राजकीय ॥
सेना भवनाच्या । समोर पोस्टर ।
हिंदुत्व बुस्टर । डोस जणू ॥
सेनेचे हिंदुत्व । मिठाची मासळी ।
बाहेर वा जळी । जिवंत ना ॥
हिंदुत्व धरता । निसटते खुर्ची ।
सोडताच मिर्ची । कांत म्हणे ॥
(19 ऑक्टोबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment