उसंतवाणी- 202
(सावरकरांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या पत्राचा हवाला दिला आणि मोठा गदारोळ पुरोगाम्यांत उठला. वास्तविक हे पत्र खरे असल्याचे विक्रम संपत आणि उदय माहुरकर या लेखकांनी सप्रमाण सिद्ध केल्यावरही पुरोगामी ते मानायला तयार नाहीत.)
सावरकरांना । घातल्या ज्या शिव्या ।
त्याच्या झाल्या ओव्या । काळावर ॥
देशासाठी वीर । भोगे काळे पाणी ।
गौरवाची गाणी । त्यांच्यासाठी ॥
तरी पुरोगामी । काढितसे शका ।
बदनामी डंका । वाजतो हा ॥
अभ्यासक सत्य । मांडती निखळ ।
पुरोगामी मळ । जाईचना ॥
गांधीहत्या केस । निर्दोष सुटका ।
तरी दे फटका । आरोपांचा ॥
माफीपत्रांसाठी । फुकाचा गोंधळ ।
उलगडे घोळ । अभ्यासात ॥
कांत थुंकणे हे । सूर्यावरी जैसे ।
आपुल्याच बैसे । तोंडावरी ॥
(14 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी- 203
(आपला जावाई समीर खान हर्बल तंबाखु खातो त्याला विनाकारण एनसीबी ने पकडले असा अजब युक्तीवाद मंत्री राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आर्यन खानचा असा काही बचाव केला जातो आहे की तो निरागस मुलगा असून खिशात आईने दिलेल्या सातुच्या पिठाच्या गोळ्या घेवून फिरतो. )
दगडांत जैसा । शोभतो मार्बल ।
नशेत हर्बल । तंबाखू ही ॥
नवाबी थाटाने । बोलती मलिक ।
जावाई खारिक । खातो जणू ॥
आर्यन बाळाच्या । खिशामध्ये पीठ ।
तपासून नीट । पहा जरा ॥
सातू पीठ गोळ्या । देते गौरी आई ।
नका करू घाई । आरोपांची ॥
खावा गुपचुप । गायछाप जर्दा ।
कशासाठी गर्दा । करिता हा ॥
तुमची ती दारू । नाही जोरकस ।
थोर सोमरस । मोठ्यांचा हा ॥
कटला पतंग । तुटलेला मांजा ।
हर्बल हा गांजा । कांत म्हणे ॥
(15 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी-204
(दरवर्षी शिवसेनेच्या वतीने दसरा मेळावा घेतला जातो. या वर्षी यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना जे तारे तोडले त्यावरून मुख्यमंत्री म्हणून आपण अपात्र आहोतच पण पक्ष प्रमुख म्हणूनही आपण अपात्र आहोत हेच उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले.)
दसरा मेळावा । काय ते भाषण ।
सीमा उल्लंघन । घरातून ॥
शोधून शत्रूस । म्हणे आम्ही ठेचू ।
गोवर्या या वेचू । काकां घरी ॥
शिवसैनिकाला । करू मुख्यमंत्री ।
परि आधी मंत्री । पोरगा हा ॥
हे करू ते करू । स्वप्नांवर साय ।
झाले किती काय । सांगेचना ॥
सांगितली गोष्ट । कासव नी ससा ।
मनसोक्त हसा । श्रोते जन ॥
केंद्र तसे राज्य । म्हणे सार्वभौम ।
पसरला भ्रम । मेंदूमध्ये ॥
पाळीव वाघ हा । बोलतो जोशात ।
काकांच्या खिशात । कांत म्हणे ॥
(16 ऑक्टोबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment