उरूस, 13 ऑक्टोबर 2021
उसंतवाणी- 199
(लखीमपुर हिंसाचारा विरोधात महाराष्ट्रात आघाडी सरकारने बंद पुकारला.)
युपीसाठी इथे । नौटंकीचा छंद ।
कशासाठी बंद । आघाडीचा ॥
करू म्हणे बंद । बोलतो जोमात ।
आधीच कोमात । महाराष्ट्र ॥
इथे सोयाबीन । गेले पाण्याखाली ।
कुणब्याला वाली । कुणी नाही ॥
जालियनवाला । बाग आठवते ।
मृत्यू विसरते । गोवारींचे ॥
मावळ आठवा । स्मरा सुरेगांव ।
काळजात घांव । कुणब्यांच्या ॥
कृषी कायद्यांत । काय आहे वांधा? ।
दलालांचा धंदा । बसणार ॥
कांत जो जो करी । महाराष्ट्र बंद ।
तोची भाउबंद । दलालांचा ॥
(11 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी- 200
(सलग 200 दिवस ही उसंतवाणी लिहिल्या गेली. आजची हा द्विशतकी अभंग. )
दोन शतकांची । झाली वाटचाल ।
पांघरती शाल । वाचक हे ॥
‘सत्य असत्याशी । मन केले ग्वाही ।
मानियेले नाही । बहुमतां’ ॥
तुकोबांचे शब्द । मानिले प्रमाण ।
जाहले निर्माण । हातून हे ॥
अस्वस्थ जनांची । मिटाया तलखी ।
वाहतो पालखी । शब्दांची ही ॥
संत रचनांचा । लागला जो लळा ।
ऐसी शब्दकळा । प्रकटली ॥
आपण लिहिले । नाही याचा दंभ ।
तुम्हा हाती कुंभ । नम्रतेने ॥
शतकांपासुनी । प्रबोधन वारी ।
त्यात वारकरी । कांत जाणा ॥
(12 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी-201
(महा विकास आघाडी सरकारने बंद केला. ऍटो टॅक्सी वाल्यांना बंदसाठी दमदाटी केली मारहाण केली. दुकाने जबरदस्ती बंद करण्यास भाग पाडले.)
आघाडीने केला । महाराष्ट्र बंद ।
मनमानी छंद । सरकारी ॥
आंदोलन मोर्चा । विरोधी हत्यार ।
केला अंगीकार । सत्ता पक्षे ॥
चालविता न ये । जयासी शासन ।
सोडावे आसन । तातडीने ॥
उतरे रस्त्यात । लावतसे काडी ।
जाळे बसगाडी । आपलीच ॥
तेंव्हा राजीनामे । खेळले खिशात ।
काकांच्या खिशात । पक्ष सारा ॥
सत्ता घोड्यावर । पक्की हवी मांड ।
राघु बोलभांड । कामाचे ना ॥
फुसक्या स्वाराला । लाथ मारी सत्ता ।
कटे त्याचा पत्ता । कांत म्हणे ॥
(13 ऑक्टोबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment