Tuesday, October 5, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६३



उरूस, 4 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 187

(कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यासाठी भगतसिंग जयंतीचा मुहूर्त निवडला होता. पण नेमकं त्याच दिवशी सिद्धूनी राजीनामा देवून सर्व उत्साहावर पाणी फिरवले.)

बुडवाया पार । कॉंग्रेसची नैय्या ।
जिग्नेश कन्हैय्या । प्रवेशती ॥
देतो राजीनामा । नवज्योत सिद्धु ।
कॉंग्रेसला बुद्धु । बनवुनी ॥
सोनिया राहूल । मस्त सुट्टीवर ।
नेते कट्टीवर । राज्योराज्यी ॥
गांधी जयंतीला । स्वप्न करू पुरे ।
पक्ष संपवु रे । आपुलाची ॥
मुख्यमंत्रीपदी । दलित चेहरा ।
कावरा बावरा । सिद्धुपायी ॥
देती राजीनामा । पाठोपाठ मंत्री ।
नाराज वाजंत्री । अंगणात ॥
कांत ढासळतो । कॉंग्रेसचा किल्ला ।
राहुलला सल्ला । कोण देतो ॥
(29 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 188

(कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, मनिष तिवारी सर्वच ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात सुर लावला आहे. राज्यांराज्यांतील भांडणी संपायला तयार नाहीत.)

आम्ही जी-तेवीस । नाही जी-हुजूर ।
सिब्बलचा सुर । आक्रमक ॥
‘आझाद’ होवुनी । ‘गुलाम’ बोलतो ।
शब्दांनी सोलतो । चिठ्ठीतुनी ॥
व्याकुळ ‘तिवारी’ । विचारतो प्रश्‍न ।
पाकमध्ये जश्‍न । कशासाठी ॥
कार्यकर्ता सच्चा । पंजाबात दु:खी ।
शिवी त्याच्या मुखी । नेत्यांसाठी ॥
छत्तीसगडात । अस्वस्थ ‘बघेल’ ।
किती ही टिकेल । खुर्ची माझी ॥
‘पायलट’ विना । ‘अशोक’ विमान ।
चाले घमासान । राजस्थानी ॥
मतदारे दिले । सत्तापद ओटी ।
त्याची करी माती । कांत म्हणे ॥
(30 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-189

(माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर फरार घोषित करावे लागले. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महा संचालक यांना सीबीआय ने नोटिसा पाठवल्या आहेत.)

कुठे गेला शोधा । मंत्री देशमुख ।
लपवे श्रीमुख । कोण्या घरी ॥
सीबीआय पुसे । मुख्य सचिवाला ।
कुठे लपविला । माजी मंत्री ॥
नोटिस जाताच । उतरे जरब ।
हबके ‘परब’ । मनोमनी ॥
बोलके प्रवक्ते । आता गप्प कसे ।
काकांचीही बसे । दातखीळ ॥
‘परम’ पळाला । लावुनिया काडी ।
अडके आघाडी । कायद्यांत ॥
सेनेची ‘भावना’ । जाहला ‘आनंद’ ।
सीबीआय छंद । छापामारी ॥
घोटाळ्यांची धुणी । बडवे परीट ।
सोमय्या किरीट । कांत म्हणे ॥
(1 ऑक्टोबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment