Sunday, August 29, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५२



उरूस, 29 ऑगस्ट  2021
 
उसंतवाणी- 154

(सीएए ला विरोध करणारे अकाली दला सारखे पक्ष वैचारिक कोंडीत अडकले आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सर्व धार्मिक अल्पसंख्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यात शिख, हिंदू यांचाही समावेश आहे. भारत सरकारने या सर्व लोकांना परत आणण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार शिखांसाठी पवित्र असलेल्या गुरूग्रंथसाहेब माथ्यावर घेवून धर्मगुरू परतले. त्याचे स्वागत स्वत: केंद्रिय मंत्री हरदिप पुरी यांनी केले.)

गुरूग्रंथ माथी । घेवोनी निघाले ।
स्वदेशी पोचले । शिख बंधू ॥
सी.ए.ए.ला ज्यांनी । केलासे विरोध ।
त्यांसी होय बोध । आता खरा ॥
तालीबानी क्रुर । रानटी धर्मांध ।
सेक्युलर अंध । भक्त त्यांचे ॥
धार्मिक पिडीत । अल्पसंख्य सारे ।
शोधीत आसरे । पळताहे ॥ 4॥
अफगाण झाले । राष्ट्र इस्लामिक ।
इतरांना भीक । स्वातंत्र्यांची ॥
तालिबान्यांसाठी । स्तुतीची कमान ।
भरूनी विमान । धाडा तिथे ॥
कांत जगी मोल । कर्म जाणीवांना ।
धर्म उणीवांना । स्थान नसे ॥
(27 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 155

( भाजप नगरसेवकांना मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यांना जामिन मिळून ते सुटले तेंव्हा सेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांचे स्वागत केले. सत्ताधार्‍यांची ही कृती लोकशाहीला घातक अशी आहे.)

रस्त्यावर राडा । करी मारामार ।
त्याच्या गळा हार । सेना नीती ॥
आमदार बोले । काढतो कोथळा ।
सेनेचा मावळा । कट्टर मी ॥
उद्धव योगीस । हाणा म्हणे जोडे ।
सैनिकांना धडे । बोलण्याचे ॥
थोबाडीत देता । काय चमत्कार ।
झाला खासदार । परभणीत ॥
‘किरकोळ’ नाही । आहे ‘ठोक’ तंत्र ।
हाची गुरूमंत्र । जाणा जरा ॥
पक्ष म्हणू याला । का म्हणावे टोळी ।
लिहिता या ओळी । इजा शक्य ॥
कांत लोकशाही । रसाळ गोमटी ।
त्यापोटी भामटी । उत्पत्ती ही ॥
(28 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 156

(राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगढ येथे कॉंग्रेसची सत्ता आहे. आहे ती सत्ता राखून केंद्रातील सत्ता मिळविण्याचा प्रयास करण्याऐवजी आहे त्या सत्तेतच भांडणे ठळकपणे समोर येत आहेत.)

सुधरण्याची ना । कॉंग्रेसींची बात ।
भांडणाची वात । सुलगली ॥
काय म्हणू याला । शहाणा की बुद्धू ।
कॅप्टन नी सिद्धू । पंजाबात ॥
‘सचिन’ ‘अशोक’ । एकमेका टाळू ।
विखुरली वाळू । राजस्थानी ॥
छत्तीसगडात । ‘भुपेश बघेल’ ।
रूसून बसेल । ‘सिंह देव’ ॥
युपीए बैठक । बोलवी सोनिया ।
आल्हाद सफाया । राहूलचा ॥
ममता नेतृत्व । गाजवे तोर्‍यात ।
घेई कोपर्‍यात । कॉंग्रेसला ॥
कांत डंगरा हो । कॉंग्रेसचा बैल ।
जीभ ज्याची सैल । कृतीहीन ॥
(29 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment