उरूस, 14 ऑगस्ट 2021
उसंतवाणी- 139
(कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि सेना यांचे नेते प्रवक्ते वारंवार स्वबळाची भाषा बोलत आहेत. प्रत्यक्षात संपूर्ण महाराष्ट्रात या तीनही पक्षांची राजकीय ताकद नाही. सर्व जागी ते उमेदवारही उभे करू शकत नाहीत. पण भाषा मात्र स्वबळाची केली जाते आहे. परभणीचे सेना खासदार यांनी राष्ट्रवादी विरोधात जी भाषा वापरली त्यावरून गरदारोळ चालू आहे.)
कोणाच्या भुजेत । किती ‘भुजबळ’ ।
सेनेचे ‘स्वबळ’ । गरजले ॥
माकडी नी पोर । सेना राष्ट्रवादी ।
सुरू वादावादी । जोरदार ॥
गल्लीत गोंधळ । दिल्लीत मुजरा ।
कॉंग्रेस साजरा । खेळ करी ॥
खालती कशाला । युती नी आघाडी ।
लावू लाडीगोडी । विजेत्याला ॥
विजेत्याचा करा । खुल्यात लिलाव ।
जादा देई भाव । तोच खरा ॥
मतदार तरी । घ्यायचे कशाला ।
बोली बोलायाला । करा सुरू ॥
लोकशाही केली । बाजार बसवी ।
फसावा फसवी । कांत म्हणे ॥
(12 ऑगस्ट 2021)
उसंतवाणी- 140
(संसदेत अतिशय असभ्यपणे महिला मार्शलवर हल्ला झाला. कॉंग्रेसच्या दोन महिला खासदारांनी हे आक्षेपार्ह वर्तन केले. त्याचा व्हिडिओच समोर आला आहे. विरोधकांनी लोकशाहीची केलेली ही अवहेलना अतिशय गंभीर आहे.)
संसदेत हवा । लोखंडी पिंजरा ।
सुरक्षेचा बरा । उपाय तो ॥
खुर्चीत बांधून । ठेवा खासदार ।
शब्दांचा ना मार । कामी येतो ॥
रक्षकां वरती । करिती हे हल्ला ।
पुरोगामी सल्ला । कोण देतो ॥
स्विकारला आम्ही । लोकशाही बुद्ध ।
नको हिंसा युद्ध । म्हणोनिया ॥
रक्तांतूनी तरी । उसळते हिंसा ।
गांधींची अहिंसा । शोभेलाच ॥
नकली गांधीच्या । धूर्त अवलादी ।
सुर विसंवादी । लावतात ॥
गांधीच्या शरीरा । तेंव्हा लागे गोळी ।
विचार खांडोळी । कांत इथे ॥
(13 ऑगस्ट 2021)
उसंतवाणी- 141
(पिडित कुटुंबाचा फोटो ट्विटरवर शेअर करणे राहूल गांधी यांना भलतेच महागात पडले. त्यांचे अकाउंट ट्विटरने लॉक केले. त्यावर चिडून त्यांनी असंख्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांना रिट्विट करायला सांगितले. ती सर्व खाती ट्विटरने तातडीने लॉक केली. )
ट्विटरची बसे । जोरात थप्पड ।
होई तडफड । कॉंग्रेसची ॥
खाते बंद केले । चाळीस हजार ।
चमचे बेजार । राहूलचे ॥
राहूल आदेशे । केले होते ट्विट ।
आता आली झीट । कृतीमुळे ॥
राहूलसी हवे । स्वातंत्र्य गुन्ह्याचे ।
खोटे बोलण्याचे । भारतात ॥
राहूल धोरण । संसदेत दंगा ।
ट्विटरशी पंगा । घेतलेला ॥
लोकशाही मेली । सांगे बोंबलून ।
लक्तरे सोलून । ठेवतो जो ॥
लोकशाही वर । हल्ला पुन्हा पुन्हा ।
करिती हा गुन्हा । कांत म्हणे ॥
(14 ऑगस्ट 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment