उरूस, 1 सप्टेंबर 2021
उसंतवाणी- 157
(अनिल परब यांच्यावर ईडीने समन्स बजावले आहे. परबांचे फोनवर बोलणेही रेकॉर्ड झाले. त्यात ते पोलिसांना राणेंना आत टाका असे सांगत आहेत. याच काळात नाना पटोले यांनी पुढचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच असा दावा आत्तापासूनच सुरू केला आहे.)
राणेंची अटक । अनिल परब ।
दाखवे जरब । मुजोरीने ॥
पोलिसांना सांगे । आत घाला त्याला ।
सीएमला सल्ला । मीच देतो ॥
फुकटची केली । भाजपाची काडी ।
मागे लागे ईडी । तातडीने ॥
शंभर कोटींचे । जड झाले ओझे ।
गोत्यामध्ये वाझे । आणणार ॥
देशमुखे दिली । म्हणे क्लीनचीट ।
करी खोटे ट्वीट । सावंत हा ॥
पटोले यातही । वाजवी वाजंत्री ।
म्हणे मुख्यमंत्री । आमचाच ॥
कांत कायद्याची । नाही जरा चाड ।
फुटते थोबाड । वेळोवेळी ॥
(30 ऑगस्ट 2021)
उसंतवाणी- 158
(ज्या केरळा मॉडेलचा गौरव पुरोगामी पत्रकार कंठशोष करून करत होते त्याचे पितळ लगेचच उघडे पडले. सध्या सगळ्यात जास्त केसेस केरळात आढळून येत आहेत. बकरी ईदला मोकळीक देणारे केरळा सरकार आता ओणमवर कोराना वाढीचा ठपका ठेवत आहे. कावड यात्रा आणि कुंभमेळ्याला शिव्या घालणारे आता एकदम चुप आहेत.)
कोराना बापुडा । सेक्युलर फार ।
करी चमत्कार । केरळात ॥
बकरी ईदला । सुट्टीवर जातो ।
ओणमला येतो । कामावर ॥
कावड यात्रा नी । कुंभमेळा मोका ।
ईदमुळे धोका । कधी नाही ॥
केरळात आहे । डावे सरकार ।
बातम्यांची धार । बोथटते ॥
कोरोना आकडे । सारे मनुवादी ।
शहा आणि मोदी । यांच्यामुळे ॥
कोरोनाची बाधा । जाणुनी प्रदेश ।
भाषेचा आवेश । बदलतो ॥
कांत व्हायरस । पुरोगामी नवा ।
मेंदूमध्ये हवा । भरणारा ॥
(31 ऑगस्ट 2021)
उसंतवाणी-159
(जालियानवाला बाग ही जागा शहीद स्मारक म्हणून आतिशय सुंदर पद्धतीने जतन करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आणि पूर्ण केली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावर विनाकारण टीका विरोधकांनी सुरु केली. योजनेला कॉंग्रेस मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पाठींबा देऊन राहुल गांधी यांना घरचा आहेर दिला.)
जालियनवाला । बागेचे स्मरण ।
शहिद मरण । आठवते ॥
पवित्र जागेची । होतसे आबाळ ।
कचरा गबाळ । चोहिकडे ॥
केंद्राची योजना । पालटले रूप ।
सुंदर स्वरूप। त्यासी दिले ॥
राहूल गांधीचा । उठे पोटशुळ ।
टीकाशब्द चुळ । उडवितो ॥
स्वत:स म्हणवी । शहिदाचा पुत्र ।
इतिहास सुत्र । आकळेना ॥
‘कॅप्टन’ गौरवी । केंद्र योजनेला ।
राहूल मताला । जुमानेना ॥
कांत कॉंग्रेसला । शिकवा रे धडा ।
स्वातंत्र्याचा लढा । उमगेना ॥
(1 सप्टेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment