Friday, August 20, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ४९



उरूस, 20 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 145

 (अलीगढचे नामकरण हरिगढ करण्याचा प्रस्ताव तेथील जिल्हा परिषदेने केला. राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव गेला आहे. अधिकृतरित्या हे नामकरण होवून तसे जाहिर केल्या जाईल.)

अलीगढ आता । झाले हरिगढ ।
गळ्यामध्ये कढ । पुरोगामी ॥
आलाहाबादचे । हो प्रयागराज ।
संस्कृतीचा साज । शोभतसे ॥
बदलते वृत्ती । बदलता नाव ।
त्याच्यासाठी घाव । आवश्यक ॥
शिवबांनी हिंदू । केले नेताजीला ।
धडा शिकविला । धर्मांधांना ॥
आहे का हिंमत । सेनेमध्ये आज ।
वाटो जरा लाज । नावाचीच ॥
औरंगाबादचे । संभाजीनगर ।
बसली पाचर । आज इथे ॥
कांत पाळलेला । वाघ करी म्यांव ।
त्याला कोणी भ्याव । कशासाठी ॥
(18 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 146

(माजी गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावर 5 वे समन्स बजावण्यात आले. अजूनही ते ईडी समोर हजर झाले नाहीत. विविध कायदेशीर पळवाटा शोधत सर्वौच्च न्यायालयात वेळकाढूपणा करत आहेत.)


ईडीचे समन्स । पळे देशमुख ।
दाखवेना मुख । जनतेला ॥
‘सर्वौच्च’ मिळेना । जराही दिलासा ।
पडतोय फासा । उलटाच ॥
घड्याळ काकांची । मदत मिळेना ।
एकटे कळेना । काय करू ॥
आठवे कोरोना । वयही आठवे ।
परत पाठवे । समन्सला ॥
शंभर कोटींची । वसुलीची खेळी ।
कोण जातो बळी । कळेचिना ॥
बड्या नेत्यांसाठी । कायदा मजाक ।
सामान्यांना धाक । जोरदार ॥
कांत पकडले । फक्त साथीदार ।
मुख्य सुत्रधार । मोकळाच ॥
(19 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 147

(थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान डुबेरे (ता.सिन्नर, जि. नाशिक) या गावी आहे. त्यांच्या मामांचा बर्वे सरदारांचा मोठा भव्य गढीवजा वाडा तिथे आहे. त्याला 18 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही भेट दिली. वाड्याची अवस्था वाईट आहे. तेथे बाजीरावांचे भव्य असे स्मारक व्हायला हवे. बर्वे वंशजांची तशी इच्छा आहे. आता इतर सर्व देशप्रेमी नागरिकांनी याकामी सहकार्य करायला हवे.)

माफ करा राउ । तुम्हा विसरलो ।
जन्मस्थळी आलो । पश्चातापे ॥
राज्याचे पेशवे । तुम्ही बाजीराव ।
कोरलेत नाव । काळजात ॥
शिवबांचे स्वप्न । पुर्णत्वास नेले ।
राज्य विस्तारले । दूर दूर ॥
अपराजीत हा । थोर सेनापती ।
पेटे ना पणती । जन्मस्थळी ॥
तुमची समाधी । रावेरखेडीला ।
नर्मदा काठाला । मध्यप्रांती ॥
तिथे मोठा होय । उत्सव साजरा ।
जन्मस्थळी सारा । अंधारच ॥
कांत जन्मस्थळी । भव्य हो स्मारक ।
पिढ्यांना प्रेरक । भविष्यात ॥
(20 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





1 comment:

  1. शूर, अपराजित सेनापती च्या जन्म स्थळाची दुरावस्था पाहून वाईट वाटले. येथे भव्य स्मारक होणे आवश्यक आहे.

    ReplyDelete