Monday, August 23, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५०



उरूस, 23 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 148

(सोमनाथ मंदिर परिसरांत मोठे चार प्रकल्प सुरू होत आहेत. त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नेमके याच वेळी तालिबान्यांनी हल्ला करून अफगाणिस्तान ताब्यात घेतले. दोन संस्कृतीमधील फरक जगाच्या समोर आला.)

सोमनाथ ज्यांनी । तोडले फोडले ।
त्यांचे बिघडले । सारे कांही ॥
पुन्हा पुन्हा आम्ही । मंदिर बांधले ।
जिवंत ठेवले । श्रद्धा बळे ॥
आजही मंदिर । उभे ते देखणे ।
तिकडे धिंगाणे । अफगाणी ॥
तलवारे धाके । वाढविला धर्म ।
उलटले कर्म । तेची आता ॥ 4॥
चायनात हार । बौद्धांच्या हातांनी ।
ज्यु कापे दातांनी । इस्त्रायली ॥
ख्रिश्‍चन छेडिता । लादेन गाडला ।
धडा शिकवला । कायमचा ॥
कांत नको सल्ला । हिंदू सबुरीचा ।
धडा बाबरीचा । ध्यानी ठेवा ॥
(21 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 149

(नारायण राणे यांनी जन आशिर्वाद यात्रा बाळासाहेबांच्या स्मारकापासून सुरू केली. त्यांच्या स्पर्शाने स्मारक बाटले म्हणून शिवसैनिकांनी ते स्मारक गोमुत्र टाकून पवित्र करून घेतले. )

जन अशिर्वाद । काढितसे यात्रा ।
राजकिय मात्रा । उगाळण्या ॥
‘नारायण’ स्पर्शे । स्मारक बाटले ।
सैनिक पेटले । मुंबईत ॥
गोमुत्र टाकून । जागा केली शुद्ध ।
निष्ठा केली सिद्ध । बोंबलुन ॥
जोरात उठते । बाटग्याची बांग ।
निष्ठावंता टांग । देवोनिया ॥
सैनिक कट्टर । अब्दुल सत्तार ।
त्याच्यापुढे पार । सारे फिके ॥
सेनेत कॉंग्रेस । भाजपात सेना ।
ओळखु येईना । कोण कुठे ॥
कांत सत्ता खेळ । संगीत खुर्चीचा ।
विरोधी मिर्चीचा । झोंबणारा ॥
(22 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 150

(विरोधी पक्षांची एक बैठक सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राहूल गांधींना दूर ठेवत शेवटी परत सोनियांना सुत्रे हाती घ्यावी लागली. याला मायावती, अरविंद केजरीवाल यांना बोलावलेच नव्हते. तर अखिलेश बोलावूनही आले नाहीत.)

विरोधी पक्षांची । जाहली मिटींग ।
लावली सेटींग । चोविसची ॥
वापरून झाला । राहूलचा पत्ता ।
‘हाता’ला न सत्ता । गवसली ॥
सोनियाच्या हाती । पुन्हा येई दोर ।
लावु म्हणे जोर । विरोधाचा ॥
जुन्या बाटलीत । जुनीच ती दारू ।
जागेवर वारू । डुलतसे ॥
केजरू मायाचा । विरोधात सुर ।
चार हात दूर । अखिलेश ॥
सुरू होण्याआधी । संपविती खेळ ।
कुणाचा ना मेळ । कुणाशीच ॥
कांत चघळिते । श्वान हडकाला ।
अशा बैठकीला । तोची दर्जा ॥
(23 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment