Thursday, August 5, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- ४४



उरूस, 5 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 130

 (एकीकडे ऑलिंपिक मध्ये भारताला पदके मिळत आहेत. आपले खेळाडू अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत. आणि दुसरीकडे संसदेत गोंधळ चालू आहे. खेळाच्य मैदानावर खुल्यात सुसंस्कृतपणाचे दर्शन होत आहे. संसदेच्या बंदिस्त सभागृहात असभ्यपणा दिसतो आहे.  )

मानकरी कोणी । कास्यपदकाचे ।
हास्यपदकाचे । कुणी इथे ॥
नेत्रदिपक ही । तिथे कामगिरी ।
इथे मारामारी । संसदेत ॥
खिलाडू वृत्तीचे । मैदानी दर्शन ।
इथे प्रदर्शन । मग्रुरीचे ॥
तिथे नियमांत । चाले खेळ-क्रिडा ।
इथे चाले राडा । राजकीय ॥
युद्धाची रानटी । सोडूनी प्रवृत्ती ।
रूजली संस्कृती । खेळाची ही ॥
सोडूनिया मार्ग । संवादाचा सभ्य ।
संसद असभ्य । का बनली? ॥
कांत मैदानात । शांत सभ्य खेळ ।
संसदी गोंधळ । लज्जास्पद ॥
(3 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 131

(राहूल गांधी यांनी विरोधकांना नाष्ट्यासाठी बोलावले. नंतर सर्व सायकल मोर्चा घेवून संसदेकडे गेले. आधी ट्रॅक्टर मार्च, नंतर नाष्टा आणि सायकल मोर्चा असले बालीश चाळे करण्यातच विरोधक वेळ घालवत आहेत.)


चला चला सारे । आधी करू नाष्टा ।
मग धरू रस्ता । संसदेचा ॥
ट्रॅक्टर नंतर । सायकल मोर्चा ।
होवू दे रे चर्चा । खालीपिली ॥
जोशामध्ये घेवू । प्रेस कॉन्फरन्स ।
आत ऍपिरन्स । मात्र नको ॥
‘अरविंद’ ‘माया’ । ‘नविन’ ‘जगन’।
स्व:तात मगन । येईचिना ॥
शाळेच्या बाहेर । उंडारते पोर ।
म्हणते मास्तर । शिकवेना ॥
वर्गात येताच । घालते धिंगाणा ।
शोधते बहाणा । पळण्याचा ॥
संसद सभ्यता । ज्याला नाही जाण ।
सावडा ही घाण । कांत म्हणे ॥
(4 ऑगस्टे 2021)

उसंतवाणी- 132

(पंजाबच्या करोडपती आमदारांच्या खिशात आयकर भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यांचा आयकर पंजाब सरकार भरते. ही बातमी टाईम्स नाउने उजेडात आणली आणि अजून काही राज्यांत आमदार मंत्री यांचा आयकर सरकार भरत असल्याचे समोर आले. )

गरीब बिचारे । मंत्री आमदार ।
कसा भरणार । आयकर ॥
जनतेची सेवा । करूनी थकती ।
किती खर्च होती । पैसे त्यात ॥
पोसावा लागतो । इथे कार्यकर्ता ।
मग कर्ता धर्ता । बनतो तो ॥
सगळीच सोय । ‘खाण्याची’ ‘पिण्याची’।
हमी जिंकण्याची । मिळे मग ॥
नेत्यांच्या कल्याणा । जन्तेची विभुती ।
कर भरताती । म्हणुनीच ॥
मंत्री आमदार । आणि खासदार ।
यांचा सरकार । कर भरे ॥
कांत जनतेच्या । खिशावर डल्ला ।
मारण्याचा सल्ला । कोण देतो? ॥
(5 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment