उरूस, 8 ऑगस्ट 2021
उसंतवाणी- 133
(मान्सुन सर्वत्र चांगला कोसळत आहे. देशाच्या बहुतांश भागात खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पीकं चांगली वाढत आहेत. ऑलिंपिक मधून खुषखबर आलेली आहे. हॉकीत भारताला कास्य पदक प्राप्त झाले आहे. 41 वर्षांनी भारताला हॉकित पदक मिळाले आहे. महिलांचा संघही शेवटपर्यंत जावून धडकला होता.)
पहिल्या सारखा । पाउस पडतो ।
जरा ना रडतो । कोरोनात ॥
पहिल्या सारखे । वाहतसे पाणी ।
ओठांवर गाणी । खेळवीत ॥
पहिल्या सारखे । कडेवर मुल ।
वेलीवर फुल । हसतसे ॥
पहिल्या सारखी । शेती नांगरणी ।
स्वप्नांची पेरणी । होत असे ॥
हॉकीला ये पुन्हा । सोन्याचे दिवस ।
नैराश्य अवस । टाळूनिया ॥
समाज ओढतो । जग्गनाथ रथ ।
आनंदाची नथ । घालुनिया ॥
कांत माणसाची । मोठी जिद्दी जात ।
आपत्तीला मात । देत असे ॥
(6 ऑगस्ट 2021)
उसंतवाणी- 134
(क्रिडा क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणारा सर्वौच्च खेलरत्न पुरस्कार राजीव गांधींच्या नावाने दिला जात होता. त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावर अपेक्षेप्रमाणे गदारोळ उठला. कॉंग्रेस आणि इतर पुरोगामी चाटुकार यांनी ओरड करायला सुरवात केली. )
ध्यानचंद नावे । मोठी आली आंधी ।
त्यात बुडे गांधी । राजीव हा ॥
परिवार नामे । जिथे तिथे यत्न ।
त्यात खेलरत्न । सापडले ॥
कुटूंब नावाचा । झाला पोरखेळ ।
म्हणून ही वेळ । आली असे ॥
आधी जवाहर । इंदिरा राजीव ।
संजय सजीव । गल्लो गल्ली ॥
मोदींनी मारली । पेनॉल्टीची किक ।
झटका हा क्विक । बसतसे ॥
नाम बदलाने । ओरडती श्वान ।
बुद्धिने गहाण । स्वार्थापोटी ॥
हवा तो सोडला । नको तो जपला ।
गांधी वापरला । कांत म्हणे ॥
(7 ऑगस्टे 2021)
उसंतवाणी- 135
(नीरज चोपरा याला टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक प्राप्त झाले. सर्वच भारतीयांसाठी हा सोन्याचा दिवस होता. )
सोन्याचा दिवस । उगवला आज ।
पदकाचा साज । शोभतसे ॥
निरजे फेकला । भाला हा खच्चून ।
आणले टिच्चुन । सुवर्णच ॥
क्रीडा उदासीला । अचुक भेदले ।
प्रेमे आनंदले । देशवासी ॥
चालीतच होता । विजेत्याचा डौल।
हमी जिंकण्याची । मिळे मग ॥
बावनकशी ही । तुझी मेहनत ।
विजय हसत । कवळितो ॥
तुझ्या कौतुकाचे । वाजती चौघडे ।
रांगोळ्या नी सडे । गंधमयी ॥
कांत लखलख । सोनेरी हा क्षण ।
करू औक्षवण । डोळ्यांनीच ॥
(8 ऑगस्ट 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment