Thursday, February 4, 2021

कृष्णजन्म कवितेची जन्मकथा


  
उरूस, 4 फेब्रुवारी 2021 

लॉकडाउनच्या काळात ऑगस्ट महिन्यात श्रावणात नेमकी अशी रात्र आली की जीचे वर्णन कृष्ण जन्माच्या वेळेस करतात तसेच करता आले असते. दिवे नसल्याने अंधार दाटलेला. पाउस जोरदार पडून गेल्याने नदी नाल्यांना पूर आलेला.  रात्रीच्या वेळी संततधार पाउस पडत होता. लॉकडाउनमुळे सगळं काही ठप्प पडलेलं. कुठेच रस्ता काही दिसत नव्हता. 

त्या वातावरणात कृष्ण जन्माच्या वेळची परिस्थिती जाणवली. त्यातून ही कविता स्फुरली. खरं तर कविता लिहील्यावर ती डायरीत लिहून ठेवणे इतकेच मी करतो. त्याप्रमाणे ही कविता लिहून ठेवली आणि विषय संपून गेला.
तुकाराम खिल्लारे हे ज्येष्ठ कवी मित्र. त्यांनी अनुदिन नावाने एक मासिक सुरू केलंय. त्याच्या दुसर्‍याच अंकासाठी त्यांनी कविता मागीतली. मीही कधी नव्हे त्या उत्साहानं नविन लिहीलेली ही कविता पाठवून दिली. मी तो विषय विसरूनही गेलो. पण तुकाराम खिल्लारे यांच्या अंकात आलेली ही कविता संतोष आळंजकर या कविमित्राला आवडली. त्याने तसा आवर्जून मेसेज केला. म्हणून परत हा विषय ऐरणीवर आला. 

कविता लिहीली, ती छापून आली, रसिक मित्राला आवडली त्यानं कळवलं इथे एक वर्तूळ पूर्ण झालं. कविच्या हृदयातील भाव रसिका पर्यंत पोचला. त्याची पावती कविला मिळाी. इथे ही प्रक्रिया पूर्ण झाली. मला ही अनुभूती खूपच वेळी वाटली. मग वाटलं आपण हा आनंद इतर रसिकांपर्यंत पोचवावा. त्याप्रमाणे फेसबुक पोस्ट लिहीली. त्याला मिळालेला प्रतिसाद खुपच उत्साहवर्धक होता. फेसबुक पोस्टची अडचण एकच असते ती एका विशिष्ट काळात फिरत राहते. पण नंतर मागे पडते. पुन्हा कोणी कुठल्या कारणाने त्यावर काही कॉमेंट केली की तेवढ्यापुरती ती पोस्ट परत वर येते.

हे टाळायचं असेल तर ब्लॉगवर लिहून ठेवणे उत्तम. म्हणून ही कविता आणि त्या मागची कथा इथे लिहून ठेवतोय.

कृष्ण जन्म

हा पाऊस पडतो रात्री
हा पाऊस रडतो गात्री
वेदना नदीगत वाहे
तुडूंब भरल्या पात्री

मी औरंगाबादला माझ्या घरात ज्या जागी झोपतो त्या पलंगाला लागून पूर्व दिशेला एक खिडकी आहे. त्यातून अंधारात पडणारा त्या दिवशीचा पाउस मी बघत होतो. माझ्या डोळ्यासमोर मुदगल या माझ्या आवडत्या ठिकाणची गोदावरी तुडूंब भरलेली दिसत होती. पावसाचा जोर ओसरला तसे त्याचा आवाज हळू आवाजात कुणी रडत आहे असा वाटत होता. मूळ कवितेत दु:ख असा शब्द होता. तो परत दुसऱ्या कडव्यात आल्याने इथे वेदना असा शब्द बदलला.   

पण हा आवाज हळू जणू उमटतही नाही असा होता. बाकी तर सगळेच आवाज गप्प झाले होते. पावसाळ्यात असाही एक क्षण येतो तेंव्हा भिजून सगळे आवाज गप्प झाले असतात. अंधारामुळे डोळ्यांना तर काही फारसे दिसत नव्हते. केवळ काही आकार खिडकीबाहेर भासल्या सारखे वाटत होते.  

आवाज उठे ना कोठे
दु:खाची बसली वाचा
दुष्टीस दिसे ना काही
डोळ्यांच्या झाल्या खाचा

या कडव्यांतील ‘डोळ्यांच्या झाल्या खाचा’ ही ओळ किर्तीकुमार मोरे या गंगाखेडच्या प्रध्यापक मित्राला कुठेतरी वाचली आहे असे वाटले. त्याने तसे फेसबुकवर कळवलेही. त्याचे म्हणणे खरे आहे. ही ओळ आरती प्रभुंच्या कवितेत आहे.  असं बर्‍याचदा होतं की काही कविंच्या ओळी शब्द आपल्या डोक्यात घुमत असतात. ते तसेच उमटतात. या कवितेवर ग्रेस आरती प्रभु यांच्या शब्दकळेचा प्रभाव आहे हे मी कबुलच करतो. 

ही काजळ ओली रात्र
किती गुज दडविते ओठी
वेदना कृष्ण जन्माची
सोसते मुक्याने पोटी

कोरोना काळात उत्तरे मिळत नव्हती. केवळ एकच आशा होती की हेही दिवस सरतील आणि काहीतरी रस्ता निघेल. आणि पुढे तसेच घडले. हळू हळू सगळं मार्गी आता लागत आहे. या सगळ्या काळात भारतातील सामान्य लोक शांतपणे सर्व अडचणींवर मात करत होते जगत राहिले. जगात इतरत्र हाहा:कार उडाला होता तिथे आपण इतकी लोकसंख्या असताना हालाखीची परिस्थिती असताना मार्ग काढत होतो. मला यावरून शेवटची ओळ सुचली.

उत्तरास शोधीत जाता
अडकतो जिथे जो प्रश्‍न
जन्मतो अशा जडवेळी
त्याचेच नाव श्रीकृष्ण

‘जन्मतो अशा जडवेळी’ ही ओळ नेमकी कुठून आली सांगता येत नाही. जडवेळ म्हणजे अवघड वेळ. तशीच ही नवप्रसवाचीही वेळ आहे. मला अगदी प्रमाणिकपणे असं वाटतं की कोरोनाने माणसांना जवळ आणलं. आपत्तीत आपण खुप काही नविन शिकलो. जगाला शिकविण्यासाठी आपल्याकडे खुप काही असल्याचे या काळात प्रकर्षाने जाणवले. आमचा एक फ्रेंच मित्र व्हिन्सेंट पास्किनली या काळात भारतात अडकून पडला होता. 27 मार्च 2020 चं त्याचं तिकीट लांबत लांबत शेवटी 19 जानेवारी 2021 ला त्याला त्याच्या मायभूमित जाता आलं. पण या काळात त्यानं भारतात जे पाहिलं त्यानं तो चकित झाला. जगभरात कोरोना थैमान घालत होता. भारतातही परिस्थिती भिषणच होती. पण यावर भारतीयांनी जी आणि ज्या प्रकारे मात केली त्यानं तो थक्क झाला. या पार्श्वभूमीवर मला ही ओळ सुचली.

कविता पूर्ण झाली ती केवळ शब्दांत नाही. संकल्पनेच्या पातळीवरही मला तसे जाणवले. कविता लिहून झाल्यावर ती रसिकांची होत असते. मी ही कविता रसिकांच्या हृदय सागरात सोडून दिली आहे.  

( माझ्या ब्लॉगवर विविध विषयांवर लिखाण असते. असं घडू शकते की सामाजिक राजकीय विषयांच्या चाहत्यांना हा विषय कशाला? असे वाटू शकते. मुर्ती मदिरं बारवा यांच्यावरही मी अलीकडच्या काळात सातत्याने लिहीत आहे. कृषी कायद्याच्या निमित्ताने शेती प्रश्‍नावर लिहीत आहे. त्या वाचकांना कदाचित हे विषय नकोसे वाटतील. किंवा या वाचकांना ते विषय नकोसे वाटतील तरी कृपया त्या त्या वाचकांनी हे समजून घ्यावे. एका चांगल्या कवी मित्राने राजकीय विषयांवरून माझी जाहिर हजेरी घेतली होती. त्यांचा मी काही प्रतिवाद करणार नाही. मला माझे वाचक समजून घेतील ही किमान माफक अपेक्षा.)      

(लेखांवर वापरलेले चित्र सरदार जाधव यांचे आहे. गीत गोपाल ह्या कार्यक्रमात त्यांनी संगीत नृत्य चालू असताना प्रत्यक्ष मंचावर हे चित्र रंगवले) 
          
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

1 comment:

  1. कविता वाचताना आणि आता ती समजून घेताना मनाची एक तरल अवस्था येते....खूप मिश्र भावना निर्माण होतात. तुझ्या एरवीच्या धारधार विवेकी बोलण्यापेक्षा तुझी कविता मला तुझ्यातील संवेदनशील मित्र दाखवते....तुझ्या या काव्यात्मक अभिव्यक्तीशी असलेलं मैत्र जास्त भावते मला ...

    ReplyDelete