उरूस, 16 फेब्रुवारी 2021
कोरोना आपत्तीच्या काळात सारं काही ठप्प होवून बसलं होतं. सांस्कृतिक क्षेत्र तर प्रचंड गारठले होते. विशेषत: मंचावर सादर होणारे सर्वच कार्यक्रम ठप्प झाल्याने कलाकारांचा आणि रसिकांचा प्रचंड हिरेमोड होवून बसला होता. हळू हळू या सगळ्यांतून बाहेर पडून लोक कार्यक्रमांना जाण्याच्या मानसिकतेत आले आहेत.
आयोजकांना सगळ्यांत पहिल्यांदा अडचण जाणवत आहे ती रसिकांच्या नकारात्मक मानसिकतेची. त्यावर मात करून कार्यक्रम करणे हे एक आव्हानच आहे.
14 फेब्रुवारी रोजी नुकतेच दिवंगत झालेले शायर इलाही जमादार यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या गझलांना समर्पित कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने औरंगाबाद शहरात करण्यात आले होते. केंद्राचे विभागीय अध्यक्ष महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि केंद्राचे उत्साही सचिव निलेश राउत व त्यांच्या सहकार्यांनी (सुबोध चव्हाण, गणेश घुले) मोठ्या रसिकतेने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
महात्मा गांधी मिशन संस्थेचा हा परिसरच मोठा रम्य आहे. या परिसरांत अद्ययावत असे रूक्मिणी सभागृह आहे, महागामी संस्थेच्या देखण्या परिसरांत द्यावा पृथिवी हे ऍम्फी थिएटर आणि बंदिस्थ असे लहान संगीत बैठकींसाठीचे शारंगदेव सभागृह आहे, छोट्या भाषणादी कार्यक्रमांसाठी आईन्स्टाईन सभागृह आहे, फिल्म इन्स्टियुटमध्ये व्हि. शांताराम यांच्या नावाने उभारल्या गेलेले सुंदर सभागृह आहे. याच परिसरांत चिंतनिका नावाने खुल्यात एक सभागृह जे.एन.ई.सी. इमारतीच्या भव्य पोर्च समोरच आहे. त्याची रचनाच रसिकतेने केल्या गेली आहे. महात्मा गांधींचा पुतळा, भारत सरकारचे प्रतिक असलेला चार सिंहांचा स्तंभ आणि एक लाल दगडाची चौकट. हा सगळा भागच लाल दगडांत उभारल्या गेला आहे.
या खुल्या मंचावर इलाही जमादार यांच्या स्मृतींना समर्पित ‘गझल इलाही’ हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला.
एरव्ही कार्यक्रमांत इतकी औपचारिकता भरलेली असते की मुळ हेतूच गायब होवून जातो. या कार्यक्रमांत कसलेही प्रास्ताविक, भाषणबाजी करण्यात आली नाही. अंकुशराव कदम यांनी शम्मा प्रज्वलीत करून मैफिलीचे उद्घाटन केले. महेश अचिंतलवार या बहरदार सुत्रसंचालन करणार्या मित्राने नंतर जी सुत्रे हाती घेतली ती कार्यक्रम संपेपर्यंत घट्टपणे आपल्या हाती रसिकतेने सांभाळली. मोजक्या शब्दांत इलाहींच्या आठवणी आणि त्यांच्या गझलांच्या ओळींचा वापर करत कार्यक्रमाची खुमारी वाढवली.
कोरोनामुळे कलाकरांची प्रचंड कुचंबणा झाली होती. त्यांना आपली कला रसिकांसमोर सादर करता आलेली नव्हती. राहूल देव कदम (गायन), जीवन कुलकर्णी (तबला), शांतीभुषण चारठाणकर (संवादिनी) आणि निरंजन भालेराव (बांसरी) या सर्वच तरूण कलाकरांनी जीव ओतून आपली कला सादर केली. जागजागी सांस्कृतिक वातावरण कायम ठेवायचे असेल तर त्या ठिकाणच्या तरूण कलाकारांनी त्यात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. केवळ बाहेरून कलाकार आमंत्रित करून सांस्कृतिक वातावरण पोसले जावू शकत नाही. हे चारही कलाकार याच मराठवाड्याच्या मातीतील.
मराठवाड्यांत गझलेचा जन्म झाला. पहिली उर्दू गझल लिहीणारा वली औरंगाबादी याच मातीतला. याच भूमीवर इलाही जमादार यांना गझलांकित श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हे विशेष. वली नंतरचा मोठा शायर सिराज औरंगबादीही इथलाच. त्याची गझल ‘खबर-ए-तहव्वूरे इश्क सुन’ आजही कव्वाल गातात. मराठवाड्यांत कव्वाली गायनाची मोठी परंपरा आहे. आजही उरूसांत कव्वाली पारंपरिक ढंगात गायली जाते.
इलाही यांच्या गझलांचे अभिवाचनही मोठ्या प्रभावीपणे ज्योती स्वामी, गिरीश जोशी, धम्मापाल जाधव, वैभव देशमुख आणि महेश देशमुख यांनी सादर केले. दोन अडीच तास रसिकांना या इलाहींच्या गझल सादरीकरणांतून कलाकारांनी प्रभावीत केले. कोरोना आपत्तीची काळजी घेत सर्व खुर्च्या अंतर सोडून मांडलेल्या होत्या. सर्वच जण अंतर राखून बसलेले दिसून येत असले तरी एका संगीताच्या सांस्कृतिक रेशमी धाग्यांत सगळे बांधले आहेत आणि एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत असे वाटत होते.
या गझलेच्या कार्यक्रमांत गायन, तबला, संवादिनी, बांसरी इतक्या किमान वाद्यांचा उपयोग केला ही बाबही मला उल्लेखनीय आणि महत्त्वाची वाटते. अन्यथा कि-बोर्डस, मोठ्या आवाजातील ध्वनी यंत्रणा, विविध रंगी प्रकाश यांतून मुळ संगीतच गायब होवू लागले आहे. ऑर्केस्ट्राचा अतिरेकी वापर गाण्याची हानी करतो. पण याचा विचार फारसा होत नाही. गझल इलाही कार्यक्रमांत ही बारीक सांगितिक जाण ठेवल्या गेली या बद्दल संयोजकांना दाद दिली पाहिजे.
बर्फासारखे थंड पडलेल्या सांस्कृतिक क्षेत्रात उर्जा निर्माण करून त्याला प्रवाहीत करण्याचे काम यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्राने केले त्यासाठी त्यांचे खरच मनापासून धन्यवाद.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळा विचार सांस्कृतिक उपक्रमांचा व्हायला पाहिजे. संगीताचे कार्यक्रम शहराच्या विविध भागांत खुल्यांत साजरे झाले पाहिजेत. तसेही कोरोनात मोठ्या सभागृहांत होणार्या कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. शिवाय प्रचंड मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती ही अवघड बनलेली बाब आहे. अशा अडचणीचाच फायदा घेवून लहान कार्यक्रम शहराच्या विविध भागांत खुल्या मंचांवर सादर होण्याबाबत विचार झाला पाहिजे.
काही प्राचीन वास्तु शहरांत आहेत. सातार्यांतील खंडोबा मंदिरांसारखी जूनी सुंदर मंदिरे आहेत. त्यांच्या परिसरांतही असे आयोजन करता येवू शकते. शासन वेरूळ महोत्सव घेत नाही म्हणून बोटं मोडत बसण्यापेक्षा विविध संस्था व्यक्ती रसिकांचे गट यांनी पुढाकार घेवून शहराच्या विविध भागांत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा विचार केला पाहिजे.
अशा खुल्या छोट्या मंचांवर नाटकांचे नाट्य अभिवाचनाचे कार्यक्रमही झाले पाहिजेत. किमान नेपथ्याचा वापर करून कलाकारांनी नाट्याविष्कार घडवला पाहिजे. पूर्वीच्या काळी अगदी लहान अशा प्रेक्षक संख्येत कलाविष्कार घडविल्या जायचा. आता मोठे सभागृह, भव्य मंच, सर्व तांत्रिक बाबी यांचा इतका अतिरेक झाला आहे की लहान मंचावर कला जणू विस्मरणातच गेली आहे. निदान कोरोना आपत्ती मधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून तरी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यातूनच सांस्कृतिक क्षेत्राला मार्ग सापडत जाईल याची खात्री वाटते.
(छायाचित्र सौजन्य सुबोध चव्हाण. छायाचित्रात डावीकडून महेश अचिंतलवार, जीवन कुलकर्णी, राहुल देव कदम, शांतीभूषण चारठाणकर, निरंजन भालेराव)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment