Sunday, February 14, 2021

महिला पत्रकाराच्या स्मृतीत हृद्य सोहळा !


   

उरूस, 14 फेब्रुवारी 2021 

मंगला बर्दापूरकर वहिनींचे दीर्घ आजाराने मागच्या वर्षी निधन झाले. बर्दापूरकरांच्या जवळ असलेल्या सर्वांनाच या काळातील त्यांची घालमेल, अत्यंत हळवी बनलेली मन:स्थिती उमगत होती. अंथरूणाला खिळलेल्या आणि अंतिम प्रवासाला निघालेल्या पत्नीच्या सेवेत मनापासून गुंतलेला हा पती बघून सर्वांच्याच काळजात कालवाकालव होत होती.  वहिनींच्या निधनानंतर बर्दापुरकर कसे सावरतील याची काळजीही वाटत होती.

पण प्रवीण यांनी स्वत:ला सावरलं, आपले लिखाण समाज माध्यमांवर चालू ठेवले. मंगला वहिनी या पत्रकार होत्या आणि त्यांच्या स्मृतीत महात्मा गांधी विद्यापीठांतील पत्रकारिता विषयांत पहिल्या येणार्‍या विद्यार्थ्याला वहिनींच्या नावे एक पारितोषिक द्यावे असा मनोदय त्यांनी विद्यापीठाचे कुलपती श्री. अंकुशराव कदम यांच्यापाशी व्यक्त केला. गेली काही दिवस बर्दापूरकर या विद्यापीठात सल्लागार म्हणून पत्रकार महाविद्यालयासाठी काम करत आहेत.

13 फेब्रुवारी 2021 ला पहिले मंगला विंचूर्णे बर्दापूरकर स्मृती पारितोषिक राखी तांबट हीला प्रदान करण्यात आले. 

वैयक्तिक पातळीवर ज्यांच्याशी बर्दापूरकरांचे वहिनींचे अतिशय जवळचे संबंध होते त्यांच्यासाठी हा एक घरगुती सोहळा होताच. पण याचे महत्त्व त्यापेक्षा जरा वेगळे आहे. एक तर मराठीत महिला पत्रकारांची संख्या आजही कमीच आहे. अशा काळात 80-90 च्या दशकांत पत्रकारिता करणार्‍या संपादक राहिलेल्या मंगलाताईंच्या नावाने हे पारितोषिक आहे हे महत्त्वाचे. स्त्रीयांचे योगदान या क्षेत्रातील दुर्लक्षीत राहिलेले आहे. त्याची दखल घेतली गेली पाहिजे. 

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पत्रकारितेचीच गरज काय? असा उद्धट सवाल समाज माध्यमांतील काही अर्धवट विचारवंत विचारत असतात. म्हणजे त्यांना म्हणायचे असते की आपल्या काय वाटेल ते आपण लिहावे लोक वाचतात. किंवा कसलेही व्हिडिओ करून यु ट्यूबवर टाकावे. की संपली पत्रकारिता. या काळात प्रवीण बर्दापूरकर यांना पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून पत्रकारितेची प्रतिष्ठा अधोरेखीत करावीशी वाटली हे महत्त्वाचे आहे. 

या सोहळ्यात प्रमुख पाहूणे राजीव खांडेकर यांनी समाज मध्यमांनी पत्रकारीतेतील मुखंडांची एकाधिकारशाही मोडून काढली असा एक अतिशय चांगला मुद्दा मांडला. हेही परत ज्यांनी वर्तमानपत्रे आणि आता चॅनेल्स यांत दीर्घकाळ अनुभव घेतला त्यांनी मांडले हे चांगले झाले. राजीव खांडेकर यांच्या परिचयात बर्दापूरकरांनी त्यांची ग्रामीण भागाशी नाळ कशी जूळलेली आहे हे आवर्जून सांगितले. याचीही दखल घेतली पाहिजे. नसता परदेशांत काय घडले याची खडा न्  खडा माहिती असणारे अगदी आपल्या शहराजवळच्या खेड्यांत काय परिस्थिती आहे याबबत अनभिज्ञ असतात अशी स्थिती आहे. 

पत्रकारितेचे अवमुल्यन कसे आणि किती झाले यावर स्वत: प्रवीण बर्दापूरकर सातत्याने बोलत लिहित आले आहेत. संपादक पदावर बसलेल्यांचे सुमार आकलन याने पत्रकारितेचे मोठेच नुकसान झाले आहे. यावर बर्दापूरकर नेहमीच बोट ठेवत आले आहेत. 

राजीव खांडेकर यांनी या निमित्ताने समाज माध्यमे (सोशल मिडिया) आणि त्यांचे आव्हान यावर सविस्तर चर्चा केली.  सोशल मिडियाचा जाहिरात महसुल प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. गेल्या चार पाच वर्षांत जगभरच्या महत्त्वाच्या व्यक्तींनी एखादी महत्त्वाची बातमी किंवा घोषणा ट्विटरवर केली आहे. त्यावरून मग इतर माध्यमांनी बातम्या चालवल्या. फेसबुक व्हॉटसअप, ट्विटर, इन्स्टा यांचा वापर प्रचंड होवू लागला आहे. काय वाट्टेल ते यावर येवून पडत आहे. तेंव्हा या सगळ्याचा सारासार विवेकी बुद्धीने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रस्थापित माध्यमांना या नविन माध्यमाने तडाखे दिले आहेतच. त्यांची मक्तेदारी मोडून काढली आहे. पण सोबतच या माध्यमाच्याही मर्यादा आता समोर येत चालल्या आहेत. त्याचेही सर्वांनी भान ठेवले पाहिजे.

या सोहळ्याच्या निमित्ताने काही गंभीर मुद्दे समोर येतात. त्याचा विचार झाला पाहिजे. पहिली सुचना जी राजीव खांडेकर यांनी आपल्या भाषणात केली. या पारितोषिकासाठी महाराष्ट्रभरच्या पत्रकारिता महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा विचार झाला पाहिजे. हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे. सध्या केवळ महात्मा गांधी मिशन विद्यापीठांपुरती असलेली ही मर्यादा विस्तारायला पाहिजे. प्रवीण-मंगला वहिनी या पत्रकार जोडप्याच्या परिचयांतील बरीच पत्रकार मंडळी यासाठी आनंदाने सहकार्य करू शकतील. तेंव्हा या पारितोषिकासाठी राज्यभरांतील विद्यार्थ्यांचा विचार व्हावा.

दुसरी बाब म्हणजे शिकून पत्रकार होता येतं की नाही याचा उहापोह स्वत: खांडेकर यांनी केला. याच्या थोड्या उलट्या बाजूने विचार झाला पाहिजे. सध्याची जी पत्रकारिता महाविद्यालये आहेत त्यांचा दर्जा वाढवणे, एक संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माध्यमांत काम करायला अभ्यासक्रमात भाग पाडणे, शिकत असतानाच विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष पत्रकारितेशी संबंध येणे  आवश्यक आहे. 

औरंगाबाद शहराच्या पातळीवर तरूण पत्रकारांनी एकत्र येवून दर रविवारी विविध क्षेत्रांती तज्ज्ञांशी अनौपचारिक गप्पा असा एक उपक्रम चालवला होता. पण तो पुढे जावू शकला नाही. प्रवीण बर्दापूरकरांनी या निमित्ताने महात्मा गांधी विद्यापीठाच्या सहकार्याने काही एक उपक्रम तरूण पत्रकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी चालवावा. ग्रामीण भागांतील पत्रकारांच्या एक दिवशीय कार्यशाळा आयोजीत केल्या जाव्यात.

विद्यमान पत्रकारीतेवर केवळ टीका करत न बसता या क्षेत्रातील अडचणींवर मात कशी करायची हे बघितले पाहिजे. यासाठी सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येवून काही एक अनौपचारिक व्यवस्था उभारावी. त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 

पत्नीच्या निधनानंतर तिने काम केलेल्या क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्याचे पारितोषिक देवून कौतूक करावे ही भावना खुप सुंदर आहे. या काळात कुणी कुणासाठी काही करत नाही असा सरधोपट आरोप करायची आपल्याला सवय आहे. त्या काळात या घटनेचे मोल खुप आहे. 

ज्या राखी तांबट हीला हे पारितोषिक मिळाले ती स्वत: शिकत असताना पत्रकारिता करत होती. त्यामुळे हे पारितोषिक तिला देणे जास्त संयुक्तिक ठरते. 

प्रवीण बर्दापूरकरांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील विद्यार्थी आणि प्रत्यक्ष काम करणार्‍या तरूण पत्रकारांसाठी काही एक भरीव  योजना तयार करावी. त्यांचे सर्व स्नेही आप्तजन, पत्रकारितेबाबत आस्था बाळगणारे सर्व त्यांना कामासाठी सर्वतोपरी मदत करतील याची खात्री आहे.  

(छायाचित्रात डावीकडून प्रवीण बर्दापूरकर, डॉ. प्रमोद येवले, अंकुशराव कदम, राजीव खांडेकर, राखी तांबट)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


No comments:

Post a Comment