Wednesday, February 24, 2021

सूफीवाद : डॉ. मुहम्मद आजम यांचा त्रिखंडी ग्रंथराज


उरूस, 24 फेब्रुवारी 2021
 

मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी सूफीवादावर प्रचंड मोठी आणि मोलाची ग्रंथरचना डॉ. मुहम्मद आजम यांनी केली आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळचे खुलताबाद हे गांव फार पूर्वीपासून सूफींचे एक मोठे आणि महत्त्वाचे केंद्र राहिलेले आहे. सूफींच्या चिश्ती परंपरेतील 22 महत्त्वाचे संत आहेत आणि जगभर त्यांचे दर्गे आहेत. यातील ख्वाजा बुर्‍हानोद्दीन गरीब (क्र.21) आणि औरंगजेबाचे गुरू असलेले ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती (क्र.22) हे दोन दर्गे समोरा समोर खुलताबादलाच आहेत. कादरी, सुर्‍हावर्दी आणि नक्षबंदी परंपरेचे दर्गेही खुलाबाद औरंगाबाद परिसरांत आहेत. 

या संतांसोबतच तत्त्वज्ञान विषयक चर्चेची एक मोठी परंपरा याच परिसरांत फुलली. औरंगाबादच्या पाणचक्की परिसरांत नक्षबंदी परेपरेचा दर्गा आहे आणि तिथेच एक मोठे प्राचीन असे ग्रंथालय आहे. तत्त्वज्ञान विषयक अतिशय मोलाचे ग्रंथ तिथे ठेवलेले आहेत. 

डॉ. मुहम्मद आजम सरांच्या ग्रंथाच्या निमित्ताने मराठीत सूफी चर्चेची जी एक महान परंपरा आहे तिची परत आठवण आली. मुसलमान संत कवींची एक यादीच डॉ. यु.म.पठाण यांनी दिली आहे. वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, नागेश संप्रदाय, रामदासी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वीरशैव या सर्वच संप्रदायांमध्ये मुसलमान कवींनी रचना केलेल्या आहेत. त्यांच्यावर हा प्रभाव पडलेला आहे. यातील सर्वात लोकप्रिय ठरलेलं नाव शेख महंमद यांचे आहे. श्रीगोंद्याला त्यांचे समाधीस्थळ धाकटे पंढरपुर म्हणूनच ओळखले जाते. 

डॉ. मुहम्मद आजम यांनी ‘सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’ हा ग्रंथ 2009 मध्ये लिहून पूर्ण केला. पद्मगंधा प्रकाशनाच्या अरूण जाखडे यांनी तो प्रसिद्ध केला. त्याची मोठी चांगली चर्चा महाराष्ट्रात झाली. प्रा. फक्रुद्दीन बेनूर यांनी आजम सरांचे लक्ष त्यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे वेधले. आजम सरांनी 2012 ते 2014 या दोन वर्षांत प्रचंड मेहनत घेवून ‘सूफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ या ग्रंथाचे काम पूर्णत्वास नेले. 

हा ग्रंथ 2000 हजार पृष्ठांचा मोठा झालेला असल्या कारणाने त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाकडे त्यासाठी काही एक अनुदान मिळू शकेल का याची चौकशी केली. पण हे महत्त्वाचे काम केवळ अनुदान देवून होणार नाही त्यासाठी त्याची संपूर्ण जबाबदारीच कुणीतरी घेण्याची गरज साहित्य संस्कृती मंडळाच्या लक्षात आली. अध्यक्ष बाबा भांड यांनी साहित्य संस्कृती मंडळानेच हा ग्रंथ प्रसिद्ध करावा असा प्रस्ताव मंडळासमोर ठेवला. त्याला मंजूरी मिळून अखेरीस 2019 मध्ये हा ग्रंथ तीन खंडात प्रसिद्ध झाला. 

‘सूफीवाद’ हा भारतासाठी एक फार महत्त्वाचा असा वैचारिक ठेवा राहिलेला आहे. जगभरात इस्लामची ही एका अर्थाने शाखा म्हणूयात भारतीय उपखंडात फार मोठ्या प्रमाणात वाढली फोफावली त्याचा विकास झाला. तत्त्वज्ञान, साहित्य, वास्तूकला, संगीत अशा विविध रूपांत इस्लामचा प्रभाव भारतीय उपखंडांत आढळून येतो. सूफीसारखे अद्वैत तत्त्वज्ञान किंवा संगीत आणि साहित्यातील बंडखोरी ही इथल्या दर्शन विचारांशी जूळणारी होती. 

पहिल्या खंडातच आजम यांनी सूफी हिंदू परंपरेत का मिसळून गेले याची अतिशय साध्या पण योग्य शब्दांत मांडणी केली आहे. सातव्या शतकापासून ते 13 व्या शतकापर्यंत सूफी द्वारे इस्लामचा प्रचार शांततेच्या मार्गाने भारतात झाला. यावर टिपण्णी करताना आजम सर लिहितात, ‘शास्त्र अंतर्गत (बा-शरा) असलेले मुसलमान हिंदू धर्माच्या धर्मस्थानावर आघात करू शकत नव्हते. ते केवळ त्याच्या शरिरास ओरबडून केवळ दु:खी करू शकत, मात्र सूफींनी भारताच्या हृदयावर आपली छाप टाकली. याचे कारण असे होते की सूफीवाद हा भारतीय साधनापद्धतीशी अ-विरोधी होता.

सूफींमध्ये इस्लामी कट्टरतेचा तीव्र गंध नव्हता. म्हणून ते सहजतेने हिंदू समाजाच्या बर्‍याचशा गोष्टी स्वीकारत आणि  मोठ्या प्रेमळपणे ते आपल्या सिद्धांताचे प्रतिपादन करत, बाह्य आणि आंतरिक आचरणामध्ये ‘सूफ’ (लोकर) सारखी निर्मलता आणि पवित्रता असल्याकारणाने त्यांना ‘सूफी’ असे म्हटले जाते.

आजम सरांनी या ग्रंथात सूफीवादाची तुलना इतर धर्मशास्त्रांशी करून अतिशय मौलिक असे प्रतिपादन केले आहे. सूफीवादाचा धागा शंकराचार्यांच्या अद्वैताशी जोडून त्यांनी एक मोठीच वैचारिक परंपरा अभ्यासासाठी समोर ठेवली आहे. सिद्धांत आणि साधना या शीर्षकाखाली आजम सर लिहीतात, ‘सूफीवादाचे सिद्धांत मूलत: शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे होते. वेदांती आणि योगी यांच्यासारखे सूफी पण ब्रह्म आणि जीव यांच्यामधील अद्वैतभावामध्ये पूर्ण विश्वास ठेवतो. तो योग्यांमध्ये पिंडामध्ये सुद्धा ब्रह्मांडाची झलक पाहतो आणि अशाप्रकार आपल्या निर्मळ आचरणांनी शरीरास पवित्र बनवून शरीराच्या आतच अद्वैतानुभूतीचा आनंद प्राप्त करतो."

दुसर्‍या खंडात 7 प्रकरणं आहेत. त्यात सर्वांसाठी नेहमीच आकर्षणाचा आवडीचा विषय असलेल्या सूफी संगीत व नृत्यावर पण लिहीले आहे.  आजम सर लिहीतात, ‘11 व्या 12 व्याा शतकात मध्य अशियात उदयास आलेला सूफी पंथ, बहरला मात्र भारतात. भारतातील संमिश्र सांस्कृतिक पर्यावरणाचा मध्य अशियातील प्रतिभावंतांवर मोठा प्रभाव पडला. येथहील विद्या, कला, तत्त्वज्ञानाची उसनवारी करता-करता त्यांनी त्यात स्वत:च्या ज्ञानाची व प्रतिभेची भर घालून भारतीय विद्या, कला व तत्त्वज्ञान समृद्धही केले. इतकेच नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या संमिश्र वारशाचे ते वाहकही बनले. यात सूफीचे उल्लेखनीय असे योगदान आहे. संगीत हा सूफींसाठी एक वारसा आहे.’

तिसर्‍या खंडाच्या पहिल्या परिशिष्टात ‘सूफी कोण?’ असे एक छोटे टिपण लिहून डॉ. मुहम्मद आजम यांनी अगदी साध्या सोप्या शब्दांत सूफीचे सार सांगितले आहे.

‘सूफीवाद एक जीवन-प्रणाली आहे. ते ना एक धर्मा आहे ना एक तत्त्वज्ञान. मुस्लिम सूफींप्रमाणेच हिंदू सूफी आणि ख्रिश्‍चन सूफी पण आहेत. ‘सूफ’ म्हणजे लोकर. लोकर गरम असत. जर अंत:करण प्रेमळ असेल तर त्यामध्ये प्रेम वसते. प्रेमळ अंत:करणाचा सत हा एक सूफी असतो. गूढवादाशी निगडित असल्याने लोकांमध्ये सूफीवादाविषयी आपुलकी जागृत होते. सूफींच्या ज्ञानाचे गूज फार कमी प्रमाणात ज्ञज्ञत आहे. अनेक वेळा लोक सूफीवादाशी संबंधित कर्मकांडे आचरणात आणतात, परंतु अनेकदा त्यांना त्याचा अर्थ अवगत नसतो. सूफीवादाचे सैद्धांतिकपणे स्पष्टीकरण करता येऊ शकत नाही; प्रत्यक्ष सहभाग आणि सरावामुळेच त्याची जाण होऊ शकते.’

मोठ्या आकाराची 1648 पृष्ठे इतका प्रचंड मोठा विस्तार या ग्रंथाचा आहे. हे तीन खंड सूफी विषयक अभ्यास करणार्‍यांची जरूर वाचावेत. त्याचे चिंतन मनन करावे. 

मराठीत ही इतकी मोठी आणि महत्त्वाची ग्रंथ निर्मिती करून ठेवली म्हणून मराठी भाषिक डॉ. मुहम्मद आजम यांचे कायम ऋणी राहतील. एक फार मोठे वैचारिक काम त्यांनी करून ठेवले आहे. त्यासाठी अक्षरश: आख्खे आयुष्य मोजले आहे. आज 90 ला पोचलेले डॉ. मुहम्मद आजम सर तप करणार्‍या ऋषीसारखेच भासतात. त्यांच्या या ग्रंथाची चांगली दखल घेतली जावो ही अपेक्षा. पुस्तकाचे मुखपृष्ठ हिंगोलीचे सुप्रसिद्ध चित्रकार कवी भ.मा.परसवाळे यांनी चितारले आहे. त्यांची शैली गेली कित्येक वर्षे मराठी वाचकांना परिचित आहे. अगदी अलिकडच्या काळातील अकबर ग्रंथाच्या त्यांच्या मुखपृष्ठाची विशेष दखल रसिकांनी घेतली होती. 

सूफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र, खंड 1. पृ.क्र. 1-556. मुल्य रू. 685/-

सूफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र, खंड 2. पृ.क्र. 557-1162 मुल्य रू. 756/-

सूफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र, खंड 3. पृ.क्र. 1163-1648. मुल्य रू. 623/-  

लेखक : डॉ. मुहम्मद आजम, प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

प्रकाशन : आवृत्ती पहिली 2019

(हा लेख या ग्रंथाची केवळ ओळख आहे. मी स्वत: या विषयांतील जाणकार नसल्याने त्यावर कसलीही टिपणी करू शकत नाही. या विषयांतील अभ्यासकांनी विनंती की त्यांनी या ग्रंथांचे सविस्तर परिशीलन करून वाचकांसाठी मांडावे.)

  

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


No comments:

Post a Comment