Saturday, February 13, 2021

राहुल गांधींची देशविघातक बेताल बडबड


उरूस, 13 फेब्रुवारी 2021 

व्हॅलेंटाईन डे उद्या आहे. त्या निमित्ताने पूर्वी प्रेमालाच वाहिलेला एक हिंदी चित्रपट आठवला ‘दिल है के मानता नही’. आज राहूल गांधी यांची अवस्था अशी झाली आहे की ‘राहूल है के मानेगाही नही’.

कॉंग्रेसचे माजी आणि भावी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर सलग तीन दिवस टिकात्मक लिहावे लागेल असे मलाच वाटले नव्हते. आधी लोकसभेत कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला, दुसर्‍या दिवशी अर्थसंकल्पावर बोलताना आधी बोलले नव्हते तेच बरे असे म्हणायची पाळी आली. त्याच लेखात मी शेवटी असं लिहीलं होतं की राहूल गांधी यांनी संसदेत बोलण्यापेक्षा पत्रकार परिषद घेवून वाट्टेल ती बडबड करावी. 

जणू माझा लेख महाराष्ट्रातील कुण्या कॉंग्रेस नेत्याने खरेच वाचून राहूल गांधींना तशी सुचना केली असावी असेच घडले. राहूल गांधी यांनी काल (दि. 12 फेब्रुवारी 2021) पत्रकार परिषद घेवून अकलेचे तारे तोडले. त्यांनी केवळ बेताल बडबड केली असती तर त्याची दखल घेण्याची काहीच गरज नव्हती. पण लदाख मधील चीनी सैन्याच्या हालचाली, सीमा प्रश्‍न आणि भारतीय सैन्याची धोरणे यावर विनाकारण कुठलाही आधार नसताना वक्तव्ये केली. देशाच्या पंतप्रधानांना गद्दार, कायर असे अपशब्द वापरले. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेणे भाग आहे. 

यापूर्वी नेमके गलवान खोर्‍यांतील चीनी सैन्यांच्या कारवाया चालू असतानाही नेमके असेच आरोप राहूल गांधींनी केले होते. त्यावर अतिशय सविस्तर खुलासे सैन्याच्या प्रवक्त्यांनी, इतरही जबाबदार अधिकार्‍यांनी, सेना प्रमुखांनी केले होते. प्रत्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावर संसदेत बोलले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी युद्धभूमीवर प्रत्यक्ष जावून आपल्या सैन्याला नैतिक पाठबळ देवून आले होते. देशभरच्या पत्रकारांना या सर्व प्रकरणांत देशाची भूमिका विस्ताराने विषद केल्या गेली. त्या वेळी बहुतांश वाहिन्यांच्या पत्रकारांनी चीन सोबतच्या धुसफुशीवर विविध माहिती मालिका सादर केल्या.  अतिशय सखोल अशी चर्चा देशभरात कोरोना काळात घडून आली. 

असं सगळं असतानाही राहूल गांधी आज परत एकदा बेताल असे आरोप करतात. ही दुर्लक्ष करण्याजोगी बाब नाही. या मागे कुमार केतकर म्हणतात तसा एक आंतर राष्ट्रीय कटच असावा असा संशय आता बळावत चालला आहे. राहूल गांधी यांनी देशाच्या काळजीपोटी असे काही आरोप सत्ताधार्‍यांवर केले असते तर ते आपण समजू शकलो असतो. पण नेमका जेंव्हा चीन अडचणीत सापडतो त्या वेळी राहूल गांधी अशी बेताल बडबड करून गोंधळ निर्माण करतात. या संशयाचा फायदाच जणू चीनला व्हावा अशी त्यांचे आणि कॉंग्रेस पक्षाचे धोरण आहे का? 

तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांचे भर संसदेतील भाषण सर्वांच्या समोर आहे. त्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांची 12 फेब्रुवारी 2021 ची पत्रकार परिषद तपासून पाहिली पाहिजे. 

एक तर वारंवार ते ज्या भूमीचा उल्लेख करत आहेत ती कुणाच्या काळात चीनच्या ताब्यात गेली? अधिकृतरित्या 2014 पासून आजपर्यंत भारताची एक इंचही जमिन चीनच्या ताब्यात गेलेली नाही. जी भूमी चीनने बळकावली आहे ती 1962 पासून बळकावलेली आहे. त्याबाबत राहूल गांधी हे अस्वस्थ असतील तर ही देशहितासाठी चांगली बाब आहे. मग त्यांच्या पक्षाची 2004 ते 2014 या काळात सत्ता होती तेंव्हा असली विधानं राहूल गांधी यांनी कधी केली का? त्या पंतप्रधानांना कायर, गद्दार अशी विशेषणं लावली का? ते पंतप्रधान चीनला घाबरतात असं वक्तव्य केलं का? प्रत्यक्षात देशाचा संरक्षणमंत्री भर संसदेत जे काय सीमा प्रदेशाबाबत कबुल करतो ते राहूल गांधी यांच्या कानावर आलं नाही का? का त्यांनी तेंव्हा कान बंद करून घेतले होते? 

हे राहूल गांधी स्वत: चीनी राजदूताला गुप्तपणे भेटतात, राजीव गांधी फाउंडेशनसाठी चीनी देणग्या स्वीकारतात ही त्यांची कृती नेमकी देशप्रेमाच्या कुठल्या व्याख्येत बसते? 

संसदेचे अधिवेशन चालू असताना, दिल्ली कृषी आंदोलन पेटलेले असताना, विविध राज्यांत निवडणुकां चालू असताना अशा कितीतरी वेळा अचानक उठून राहूल गांधी परदेशात निघून गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्यावर एक खासदार म्हणून, एका मोठ्या 5 महत्त्वाच्या राज्यांत सत्ताधारी असलेल्या सर्वात जून्या पक्षाचा नेता म्हणून काही एक जबाबदारी आहे की नाही? 

संसदेत, पत्रकार परिषदेत, जाहिर सभांमधून काहीही बरळणे हे काय दर्शविते? त्यातही जेंव्हा देशाच्या संरक्षणविषयक गंभीर मुद्दे गुंतलेले असतात त्यावर वक्तव्य करताना सर्वांनाच जबाबदारीने बोलावे लागते. संरक्षण विषयक तर काही बाबी बाहेर वाच्यता करताच येत नाहीत अशा असतात. त्या केवळ समजून घ्यायच्या असतात. मग तो पक्ष सत्तेवर असो किंवा नसो. लोकनियुक्त खासदार तर सोडाच पण एक सामान्य नागरिक म्हणूनही ही आपली जबाबदारी असते की देशाच्या संरक्षणविषयक बाबींत गांभीर्य पाळावे. 

राहूल गांधींच्याच पक्षाचे नेते माजी मंत्री मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जावून तिथल्या सरकारची मदत मागतात कशासाठी तर मोदींचा पराभव करण्यासाठी. हे देशप्रेमाची नेमकी कोणती तर्‍हा राहूल गांधींच्या पक्षाची आहे? 

बरं राहूल गांधींना सीमाप्रश्‍न किंवा संरक्षण व्यवस्था या विषयांत काही एक गती आहे, त्यांचा अभ्यास आहे तरी आपण समजून घेवू शकलो असतो की देशप्रेमातून तळमळीनं ते बोलत आहेत. हेच राहूल गांधी उद्या अचानक वेगळ्यात विषयावर तारे तोडतील. ते विसरूनही जातील की आपण आत्ताच चीनच्याबाबत आपल्याच देशाच्या पंतप्रधानावर काय आरोप केला होता.  आणि वेगळीच बडबड करत राहतील.

कॉंग्रेस पक्ष बहुतांश राज्यांतून हद्दपार झाला आहे. केवळ पराभव झाला असे नाही तर दुसर्‍या तिसर्‍या स्थानावरही तो पक्ष राहिलेला नाही. उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, असम, ओडिसा या एकेकाळी कॉंग्रेसची सत्ता असलेल्या प्रदेशांतून पक्षाची हकालपट्टी तिसर्‍या चौथ्या स्थानावर झालेली आहे. ही मोठी राज्ये आहेत म्हणून यांची नावं घेतली. जिथे कॉंग्रेसचे म्हणून काही आवाहन आहे अशी मोठी पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीस गढ, झारखंड, गुजरात, कर्नाटक इतकीच राज्ये शिल्लक आहेत.

ज्या कश्मिरचा एकेकाळी भाग असलेल्या लदाखबद्दल राहूल गांधी यांनी वक्तव्य केले आहे तिथे कॉंग्रेस पक्ष कुठल्या स्थानावर आहे? गुलाम नबी आझाद कॉंग्रेसचे कश्मिरमधील नेते आहेत. माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना आजच नव्हे तर पूर्वीही तिथून निवडून येता यायचे नाही. महाराष्ट्रातील वाशिम मतदारसंघातून ते निवडून यायचे. आता ते राज्यसभेत विरोधी पक्ष नेता होते. नुकताच त्यांचा कार्यकाल संपला आहे. मग राहूल गांधी यांनी त्यांना परत कुठून निवडून आणायचे याचा  विचार केला का? कश्मिरमधून तर निवडून आणता येतच नाही. एकेकाळी असेच असममधून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निवडून आणले जायचे. राहूल गांधी आज असम मधून आपल्या पक्षाचा खासदार राज्यसभेत निवडून आणू शकतात का?

याचे काहीही कसलेही भान राहूल गांधी यांना नसते. उचलली जीभ की लावली टाळ्याला अशा अविर्भावात ते सत्ताधारी पक्षावर आणि विशेषत: मोदींवर शेरेबाजी करत असतात. कॉंग्रेस कार्यकारिणीतच हा विषय निघाला की मोदींवर वैयक्तिक टीका करण्यात काही हशील नाही. त्याचा उलट पक्षाला तोटा होतो. आणि याच टीकेचा उपयोग मोदी स्वत:च्या पक्षासाठी करून घेतात. तर उलट असा आक्षेप घेणार्‍यांवरच राहूल आणि प्रियंका बरसल्या. 

संसदेत राहूल गांधी पूर्णत: नि:संदर्भ होवून बसले आहेतच. कालच्या पत्रकार परिषदेने त्यांना राष्ट्रीय सुरक्षा प्रश्‍नांचे काडीचेही ज्ञान नाही हे सिद्ध होते आहे. त्यांनी देशविघातक अशा बाबींवर बेताल बडबड केली म्हणून त्यांची इतकी तरी दखल घ्यावी लागली. अन्यथा त्यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याशिवाय काहीच पर्याय दिसत नाही.      

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


No comments:

Post a Comment