Monday, February 15, 2021

डॉ. सुधीर रसाळ : भाषेसाठी तळमळणारा व्यासंगी !



उरूस, 15 फेब्रुवारी 2021 

महाराष्ट्र शासनाचा भाषा संवर्धनासाठी असलेला डॉ. अशोक केळकर पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना घोषित झाला. रसाळ सरांचा एक अनौपचारिक सत्कार सोहळा संडे क्लबच्या वतीने घेण्यात आला.

रसाळ सरांना या पूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराचे नाविन्य तसे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही फारसे नाही. या निमित्त सत्कार सोहळा हा अगदी मोजक्या लोकांमध्ये होता. काहीतरी थोडेफार बोलून आठवणी सांगून हलके फुलके प्रसंग रंगवून सरांना वेळ मारून नेणे सहज शक्य होते. 

पण गेली किमान साठ वर्षे सातत्याने मराठी भाषा आणि वाङ्मयाचे अध्ययन अध्यापन करणार्‍या रसाळ सरांच्या वेळ मारून नेणारे बोलणे हे रक्तातच नाही. सहज साध्या गप्पांमधूनही सरळ एखादा विषय असा काही मांडतात की आपण खुपकाळ विचार करत राहतो. अगदी साध्या वाटणार्‍या एखाद्या वाक्याच्या पाठीमागे त्यांचे भाषा विषयक चिंतन जाणवत राहतंं.

सर बोलताना कधीच घाईत नसतात. अगदी विचार करून एक एक शब्द तोलून मापून बोलणं हे त्यांचे वैशिष्ट्य. उस्ताद अमीर खान यांच्या संथ ख्यालासारखं त्यांच वक्तव्य हळू हळू ऐकणार्‍याचा ठाव घेतं. जयपुर घराण्याचे ज्येष्ठ गायक तालमित असे काही तयार झालेले असतात की त्यांच्या एखाद्या तानेत रागाचे संपूर्ण रूप उलगडते आणि आपण ऐकताना थक्क होवून जातो. तसंच रसाळ सरांच्या एखाद्या वाक्यात असा काही भाषेच्या वाङ्मयाच्या चिंतनाचा पट उलगडतो की आपल्याला साधं सोपं वाटणारं वाक्य तसं उरत नाही.

रविवारी संडे क्लबच्या सत्काराला उत्तर देताना सरांनी आपल्या छोट्या पण सुंदर भाषणांत भाषेविषयी अतिशय साधे वाटणारे पण सखोल गहन अर्थ दडलेली वाक्यं वापरली. सरांचे एक निरीक्षण तर इतकं मार्मिक होतं, ‘मराठी माणसांनी कुठल्याही परक्या माणसाशी बोलताना पहिल्यांदा आपल्याच मातृभाषेत संवाद सुरू केला पाहिजे. त्याच्याकडून जो काही प्रतिसाद येईल त्याप्रमाणे गरज भासल्यास इतर भाषेचा वापर करावा. पण सुरवात आपण मराठीत करायला पाहिजे.’

खरंच किती साधं वाक्य आहे हे. पण तूम्ही विचार कराल तेंव्हा लक्षात येईल की यात किती गहन अर्थ लपलेला आहे. मराठी माणूस आपण होवून आधीच आपली भाषा सोडून देतो. सरांनी सांगितलेली उदाहरणं अगदी रोजच्या जीवनातली आहे. भाजीवाली मराठी आणि ग्राहक मराठी. रिक्शावाला मराठी आपण मराठी. दुकानदार मराठी ग्राहक मराठी. हॉटेलमध्ये वेटर मराठी ग्राहक मराठी. या सर्व ठिकाणी संवादाची सुरवात काहीच कारण नसताना न्युनगंडातून हिंदीत केली जाते.

सरांची सुचना साधी आहे. सुरवात आपण मातृभाषेतून करा. शक्यता आहे की संभाषण पुढे मराठीत सुरू राहिल. इतरांसारखा कुठलाही आक्रस्ताळा आग्रही मुद्दा सरांनी मांडला नाही. दुकानांच्या पाट्या मराठीत नसतील तर फोडा अशी ही अतिरेकी विचारसरणी नाही. एकदम साधेपणाने भाषेचे एक तत्व त्यांनी मांडले. 

जीवनाच्या विविध क्षेत्रात मराठीचा वापर करण्याचा एक मुद्दा त्यांची उपस्थित केला. आता वस्तूत: मराठी वाचवायची म्हटलं तर जवळपास सर्व यच्चयावत विद्वान प्राध्यापक सरकारी अधिकारी समाजवादी पद्धतीच्या भीकमाग्या योजना समोर ठेवतात. यात वारंवार सरकारने हे करावे आणि सरकारने ते करावे अशी यादी असते. सरकारने मराठी भाषा अनिवार्य करावी, सरकारने मराठीसाठी विद्यापीठ स्थापन करावे, सरकारी पारितोषिकांची संख्या वाढावी, त्याची रक्कम वाढावी, मराठी शिक्षकांना पगार जास्त मिळावा वगैरे वगैरे. मराठी भाषा तज्ज्ञांची नेमणुक प्रत्येक सरकारी कार्यालयात केली जावी. अशी सगळी सरकार पुढे झोळी पसरण्याची वृत्ती दिसून येते. 

पण रसाळ सर मात्र या सगळ्याला टाळून जीवनाच्या विविध क्षेत्रात मराठीचा वापर कसा सामान्य लोकांनी वाढवला पाहिजे हे प्रतिपादन आग्रहाने करतात. आणि इथे त्यांचे वेगळेपण दिसून येते. त्यांची धारणा अस्सल भारतीय परंपरेतील समाज पुरूषाने जबाबदारी समजून कसे काम करावे अशी दिसून येते. औरंगाबादला बलवंत मोफत वाचनालय सुरू झाले. या काळात (इ.स.1919) सरांचे वडील न.मा.कुलकर्णी यांनी आपल्या बोटांतील सोन्याची अंगठी मोडून त्याला देणगी दिल्याचे उदाहरण सरांनी सांगितले. त्यातून समाजतील सर्व घटकांची भाषा साहित्य ग्रंथ व्यवहार या बाबतची जबाबदारी दिसून येते. 

निजामी राजवटीत उर्दू भाषेचे आक्रमण मराठी तसेच कानडी तेलगू यांच्यावर कसे होते हे सांगताना ही भाषा लोकांनी कशी जपली हेही लक्षात घ्यायला हवे. हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे. आज सर्व काही सरकारने करावे आणि आम्ही मात्र काहीच करणार नाही ही वृत्ती दिसून येते. मुंबईतही मराठी वातावरण कसे होते, लीला चिटणीस यांच्या आत्मचरित्रांतील एक मार्मिक उदाहरण सरांनी आपल्या भाषणांत सांगितले. पृथ्वीराज कपुर यांचे एक उत्कृष्ठ मराठीतील  पत्र या पुस्तकांत देण्यात आले आहे. त्याच मुंबईत आता आयुष्यभर मराठी न बोलताही राहता येते. आपला उत्कर्ष साधता येतो.

देशांतील इतर कुठल्याही प्रदेशांत तिथली भाषा न येता आयुष्य कंठीत करणे कठीण आहे. पण हे महाराष्ट्रात मात्र सहज शक्य आहे. ही खंत अतिशय साध्या वाटणार्‍या पण अस्वस्थ करणार्‍या शब्दांत सरांनी व्यक्त केली. 

रसाळ सरांसारख्या तपस्वींबाबत  केवळ आपल्या विषयांत मग्न आणि इतर घडामोडींची जाण नाही असे होत नाही. त्यांचा व्यासंग अष्टपैलू असतो. भाषा ही स्वतंत्र सुटा विचार करावी अशी बाब नाही. एकूणच संस्कृतीचा ती हिस्सा असल्याने सर्वच समाज पैलूंचा विचार सरांच्या बोलण्यांतून डोकावत राहतो. 

औरंगाबाद आकाशवाणी अर्काईव्ह साठी सरांची एक प्रदीर्घ मुलाखत मी घेत होतो त्यावेळचा एक प्रसंग आवर्जून सांगण्यासारखा आहे. साडेतीन तासांची ही दीर्घ मुलाखत दोन दिवसांत मिळून आम्ही रेकॉर्ड केली. कुठेच रिटेक घेण्याची वेळ आली नाही. केवळ एकच प्रसंग असा घडला की सरांनी थांबण्याची खुण केली. मला कळेना नेमके चुकले काय? माईक बंद झाल्यावर सरांनी माझ्या प्रश्‍नांतील तांत्रिक चुक दाखवून दिली. हैदराबाद संस्थान आणि या प्रदेशाच्या इतिहासाबाबत प्रश्‍न विचारताना चुक माझ्याकडूनच झाली होती. मीर कमरूद्दीन हा मोगलांचा सरदार ज्याने पुढे चालून आपल्या स्वतंत्र राज्याची घोषणा केली. माझ्या बोलण्यात हा मीर कमरूद्दीन कुतूबशाहीचा सरदार असा शब्द आला होता. 

आजही अगदी या विषयांतील अभ्यासकांनाही निजामशाही आणि निजामी राजवट यांतील फरक कळत नाही. अजूनही बोलण्यात लिहिण्यात या चुका होत राहतात. कोण मीर कमरूद्दीन त्याची कबर कुठे आहे (जी की खुलताबादला औरंगजेबाच्या कबरी समोरच बुर्‍हानोद्दीन गरीब दर्ग्यात आहे) हेही कुणाला माहित नाही. आणि इथे मराठीचा एक गाढा अभ्यासक व्यासंगी आपल्या प्रदेशांतील इतिहासाचा अगदी बारीक सारीक अभ्यास करतो हे मला फार मोलाचे महत्त्वाचे वाटते.

लोभस या सरांच्या पुस्तकांत औरंगाबादवरचा एक नितांत सुंदर लेख आहे. त्यातून सरांची आपल्या भाषेसोबतच आपला प्रदेश संस्कृती आपल्या अगदी आजूबाजूच्या  सांस्कृतिक सामाजिक घडामोडींकडे पाहण्याची दृष्टी दिसून येते.

कोरड्या विद्वांनांची महती आपल्याला असते. पण आपल्या आजूबाजूच्या सर्व घडामोडींत समरसून जाणारा आणि शांतपणे या सगळ्याचा अंतर्भाव आपल्या आपल्या भाषाविषयक चिंतनात मांडणारा सरांसारखा व्यासंगी विरळाच. 

रसाळ सरांना शास्त्रीय संगीताची नितांत आवड आहे हे फार थोड्या लोकांना माहित असेल. सर गाणं ऐकताना अगदी तल्लीन होतात. इतर रसिकांसारखी दिखावू दाद ते देत नाहीत. चपळगांवकर काका काकुंच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने कसलीही भाषणबाजी न करता अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम आप्तस्वकियांच्या उपस्थित संपन्न झाला. त्या कार्यक्रमात अश्विनीताई समरसून गात असताना अचानक माझं लक्ष रसाळ सरांकडे गेले. त्या छोट्या हॉलमध्ये सगळ्या खुर्च्या भरल्या होत्या. जवळून गाणं ऐकावं म्हणून अगदी समोरच्या मोकळ्या जागेत खाली मांडी घालून सायली भक्तीसोबत मी बसलो होतो. नेमक्या समेवर एखाद्या अप्रतिम तानेवर सरांची मान हलायची. बोटांची हातांची हालचाल व्हायची. जणू अश्विनी ताईंच्या गाण्याशी त्या हालचालींची जूगलबंदीच चालू होती. कुठेही अगदी शब्दही न उच्चारता सरांची दाद देण्याची ही पद्धत अफलातूनच. 

त्या प्रसंगातून त्यांची विचार करण्याची पद्धत माझ्या जराशी लक्षात आली. शास्त्रीय संगीतासारखं एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचे विविध पैलू लक्षात घेवून तो विषय मोजक्या शब्दांत मांडण्याचे कसब त्यांनी आत्मसात केलं आहे. ख्यालासारखा त्यांच्या लिखाणाचा विस्तार असतो.

सरांची 75 साजरी झाली ती सुहासिनी कोरटकर यांच्या गायनाच्या मैफलिनेच. सरांकडे एकदा गेलो असताना काकूंनी सांगितले की ते वरच्या मजल्यावर काम करत बसले आहेत. तूम्ही वरतीच जा. मी आपला हळू आवाज न करता पायर्‍या चढत वर गेलो. हळू जाण्याचे कारण म्हणजे जीन्यातूनच किशोरी आमोणकरांच्या मालकंसचे सूर ऐकू येत होते. उघड्या दरवाजातून जे दृश्य दिसले ते मोठे विलक्षण होते. दरवाज्याकडे सरांची पाठ होती. ते संगणकावर बसून लेख लिहीत होते. पार्श्वभूमीवर किशोरीबाईंचा मालकंस रंगला होता. किशोरीबाईंसारखीच सरांचीही तंद्री लागली होती. मला त्यांच्या तंद्रीचा भंग न करता तसंच परतावं वाटलं. पण आवाजाची चाहूल  लागून सरांनीच मागे मान वळवली.

मी काही सरांचा अधिकृत विद्यार्थी नाही. शालेय शिक्षणानंतर अभ्यासक्रम म्हणून माझा मराठीशी संबंध आला नाही. पण कधीही सरांकडे गेलो की त्यांच्या गप्पा मला मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा छानसा तासच वाटत राहतो. सरांना भाषा संवर्धनासाठी पुरस्कार देताना शासनाची काय भूमिका आहे कोण जाणे. पण मला मात्र रसाळ सर हे एक खुले विद्यापीठ वाटते. कुणालाही या विद्यापीठांत मुक्त प्रवेश आहे. हा भाषा प्रेमाचा झरा अखंड वहातो आहे. कुणीही आपली ओंजळ भरून घ्यावी. तूमच्या ओंजळीत काही कमी आले तर तो दोष तूमच्या ओंजळीच्या अकाराचा आहे. 

सरांना खुप शुभेच्छा ! त्यांना दीर्घायुष्य लाभो. 

(छायाचित्र सौजन्य दै. लोकमत. छायाचित्रात  डावीकडून श्याम देशपांडे, कौतिकराव ठाले, सुधीर रसाळ, सुमती रसाळ)

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


3 comments:

  1. सुंदर....
    मी पण पहिल्यापासून कुणाशीही बोलताना मराठीतूनच सुरवात करतो. नंतर त्या व्यक्तीच्या भाषेप्रमाणे हिंदी नाहीतर इंग्रजीतुन बोलतो. एकदम बरोबर सांगितलंय सरांनी...👌👍

    ReplyDelete
  2. व्वा . मस्त जमली आहे भट्टी लेखाची !

    ReplyDelete