Thursday, February 25, 2021

भाजपला जडला व्यक्तीपुजेचा रोग !

    


उरूस, 25 फेब्रुवारी 2021 

नेहरू आणि तूमच्यात नेमके काय मतभेद आहेत असं एकदा महात्मा गांधींना पत्रकारांनी विचारले होते. त्याचे अतिशय मार्मिक असे उत्तर महात्मा गांधींनी दिले होते. गांधीजी म्हणाले होते, ‘माझं म्हणणं आहे की भारतात इंग्रज राहिले तरी चालतील पण इंग्रजांची निती गेली पाहिजे. जवाहरच्या मताने इंग्रजांची निती राहिली तरी हरकत नाही फक्त इंग्रज गेले पाहिजेत. इतकाच मतभेद आहे आमच्यात.’

कालपर्यंत नरेंद्र मोदी संघ भाजप कॉंग्रेसवर टिका करत असताना त्यांच्या घराणेशाहीवर तोंडसुख घेत होते. कॉंग्रेसने नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या नावाचा वापर अमर्यादपणे कसा देशभरात केला यावर आक्षेप नोंदवत होते. जिवंतपणी नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी स्वत: पदावर असताना स्वत:ला भारतरत्न कसे देवून घेतले यावर शेकडो ‘मिम’ समाज माध्यमांत आजही फिरताना आढळून येतात. 

अशा पार्श्वभूमीवर गुजरातमधील मोटेरा क्रिकेट क्रिडांगणाला (स्टेडियम) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले. तेंव्हा आता यावर टिका होणारच. म्हणजे नेहरूंवर टिका करता करता आपणही नेहरूंसारखेच वागायचे असे काही नविन धोरण मोदी भाजपने सुरू केले आहे का? 

जिवंतपणी आपले पुतळे उभारण्याचा उद्धटपणा मायावतींनी उत्तरप्रदेशात केला होता. तेंव्हा त्यांच्यावर टीका करण्यात भाजप आघाडीवर होता. मग आता भाजप पण याच दिशेने पुंढे जाणार आहे का? 

संघ परिवारात व्यक्ती पूजा केली जात नाही असा सर्वसाधारण समज आहे. तसे सकृतदर्शनी पुरावेही आहेत. व्यक्तीपेक्षा संघटना मोठी मानली जाते. असे निदान भाजप संघवाले सांगत असतात. मग आता हा जो नामाभिदान सोहळा पार पडला त्यावर काय प्रतिक्रिया संघाकडून व्यक्त केली जाणार आहे?

मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच मुळात एक आक्षेपार्ह प्रकार भाजपात सुरू झाला होता. या सरकारला ‘मोदी सरकार’ असेच सर्रास संबोधले गेले. वस्तूत: टिकाकारांनी त्यांच्या सोयीसाठी म्हणून हा शब्दप्रयोग केला होता. पण मोदी सरकार म्हणजे जणू काही भूषणार्ह संबोधन आहे असे समजून भाजप संघवालेही तोच शब्दप्रयोग करायला लागले. चार पावले जमिनीपासून उंच चालणारा धर्मराजाचा रथ असल्या भूमिकेमुळे जमिनीवर आदळला असे दिसते आहे. 

संघ भाजपची ही नेमकी काय मजबूरी आहे? त्यांना व्यक्तीपूजेला असणारा विरोध गुंडाळून एकाच माणसाचा उदो उदो करावा लागतो आहे? 

कुठलीही निवडणुक असली की मोदींनाच प्रचार सभा घेत फिरावं लागतं. याचं आत्तापर्यंत कौतूक होत होतं. पण आता सलग दुसर्‍या वेळी सत्ता मिळूनही परत राज्यांराज्यांत प्रचारासाठी मोदींनाच फिरवावं लागत असेल तर याला सुचिन्ह म्हणावं का? 

एक पळवाट भाजप प्रवक्त्यांकडून शोधली जात आहे. हे क्रिडांगण (स्टेडियम) क्रिकेट नियामक मंडळाचे आहे. त्यांच्या अखत्यारीतील वास्तूला काय नाव द्यावे हा पूर्णत: त्यांचा प्रश्‍न आहे. हे काही सरकारी क्रिडांगण नाही. तेंव्हा आम्ही काय करणार? भारत सरकार किंवा गुजरात राज्य सरकारने तर हा निर्णय घेतला नाही. 

अगदी शेंबड्या शाळकरी पोरालाही हा युक्तीवाद पटणार नाही. असे निर्णय का आणि कसे होतात हे सर्वांना माहित आहे. मोदींना खुष करण्यासाठी त्यांची चापलुसी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला हे उघड आहे. पण यात सर्वात जास्त आक्षेपार्ह आहे ते म्हणजे स्वत: मोदींनी याला मान्यता दिली. आपल्या घरचे कसे साधारण स्थितीत जगतात. आपली आई कशी साध्या घरात राहते याचे भांडवल अप्रत्यक्षरित्या मोदी आणि प्रत्यक्षरित्या भाजप सतत करत आला आहे. मोदींची आई रिक्शात कशी फिरते असे दाखवले जाते. फकिर अशी स्वत:ची प्रतिमा तयार करू पाहणारे मोदी आपल्याच नावाच्या क्रिडांगणाला मंजूरी देतातच कसे? आणि मग जर असे करणार असाल तर इतरांवर टिका करण्याचा नैतिक हक्क तूम्ही गमावून बसता हे लक्षात घ्यायला पाहिजे. 

यातून भाजपची सरंजामी मानसिकता समोर येते आहे. सत्तेवर असताना आणि तूम्हाला सक्षम राजकीय पर्याय नाही तोपर्यंत  लोक हे खपवून घेतील. पण एकदा का जनमत फिरले तर मात्र हे सर्व कुठल्या कुठे उडून जाईल. इंदिरा गांधींची चापलूसी करणारे नेते बघता बघता लोकांनी बेदखल करून टाकले. राजीव गांधींच्या चपला उचलणारे राजकारणांतून हद्दपार झाले. 

दिनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने विविध योजना आणि वास्तू उभारल्या गेले ते आपण समजू शकतो. हे भाजप (पूर्वीचा जनसंघ)चे मोठे नेते होते. उत्तूंग व्यक्तीमत्वं होती. अटल बिहारी यांच्या निधनानंतर त्यांचे नाव लदाखमधील बोगद्याला दिल्या गेले. जिवंतपणी अटलबिहारींनी सत्तेवर असताना आपले नाव नाही कुठे देवू दिले. 

याला उत्तर म्हणून शरद पवार किंवा कॉंग्रेसच्या विविध नेत्यांची नावे कशी दिल्या गेली याची उदाहरण समोर आणली जातील. पण याला काही अर्थ नाही. त्यांच्यावर टिका झाली म्हणून तर तूम्हाला जनतेने निवडून दिले होते. आता तूम्ही पण तेच करणार असाल तर मग प्रश्‍नच मिटला. 

या घटनेचा दुसरा एक गंभीर अर्थ समोर येतो आहे. जर 7 वर्षांच्या दिल्लीतील मजबूत सत्तेनंतर भाजपला व्यक्तीपूजेचाच मार्ग अवलंबावा लागणार असेल तर मग तूम्ही नेमका कोणता राजकीय पर्याय समोर आणला? महात्मा गांधींनी जवाहरलाल नेहरूंवर टिका केली तसेच घडत आहे. गोरा इंग्रज जावून काळा इंग्रज आला तसे कॉंग्रेस जावून भाजप आला. बाकी फरक काहीच नाही. 

ल्युटन्स दिल्लीतील  वर्षानूवर्षे ठाण मांडून बसलेली नौकरशहांची कंपूबाजी तूम्ही मोडून काढली म्हणून कौतूक करावं तर काही दिवसांतच तूमची पण एक वेगळी ‘लॉबी’ तयार होईल. त्याचे काय? मग त्यावर परत काय उपाय शोधायचा?

भाजपचा जो कट्टर भक्तवर्ग आहे, त्यांचा जो हक्काचा मतदार आहे त्यापेक्षा एक अतिशय वेगळा आणि संख्येने खुप प्रचंड असलेला सामान्य मतदार भाजपकडे वळला आहे तो त्यांच्या वेगळेपणामुळे. लाल दिव्यांची संस्कृती मोदींनी संपूष्टात आणली, घराणेशाहीला थारा दिला नाही, सामान्य कार्यकर्त्यांना पद मिळण्याची संधी निर्माण झाली, अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत विविध योजनांचे लाभ पोचताना दिसू लागले, मधल्या माणसांची दलालांची कॉंग्रेसी संस्कृती कमी झाली यासाठी सामान्य भारतीय मतदारांना जे की कुठल्याच पक्षाला विचारसरणीला बांधलेले नव्हते त्यांची फार मोठी साथ मोदींना भाजपला राहिलेली आहे. 

जर अशा सामान्य मतदारांना भाजपही परत त्याच मार्गाने जाताना दिसू लागला तर ते समोर येणारा अन्य पर्याय निवडतील. भारतीय मतदार कधीच लाचारीने एकाच पक्षाला मतदान करत आलेला नाही. पर्याय नव्हता म्हणून गुजरात मध्ये भाजपला यश मिळाले. नसता पंजाबातील मतदारांनी दाखवून दिले आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग सारखा पर्याय असेल तर ते भाजप-अकाली-आम आदमी पक्षाची धूळधाण करायला कमी पडत नाहीत.

जिवंतपणी वास्तूला नाव देणे, पुतळे उभं करणे, प्रतिकं तयार करणं ही हिंदू परंपरा नाही. मोदी भाजप संघाला जर इतकाच हिंदू परंपरेचा अभिमान असेल तर त्यांनी याचा गांभिर्याने विचार करावा.

या निर्णयाने विरोधकांना एक वेगळेच कोलीत मिळाले आहे. संपूण क्रिडा संकुलाचे नाव सरदार पटेल असे आहे. त्याला कुठेही बदलले नाही. या संपूर्ण क्रिडा संकुलातील केवळ एका मोठ्या क्रिडांगणाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवण्यात आले आहे. पण आता जितेंद्र आव्हाडांसारखे बुद्धीमान मंत्री यावर टिका करताना खोटे ट्विट करण्यात कमी पडणार कसे? त्यांना तर संधीच उपब्ध करून दिली आहे भाजपने. तेंव्हा त्यांना काय बोलणार?

         

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


1 comment:

  1. अगदी योग्य विश्लेषण.मोदीजी अम्हा सर्वांना प्रिय आहेत यात वादच नाही. मोदींनी मागेही एके ठिकानी त्यांच्या मंदिराला(ज्यात त्मूयांची मूर्ती बसविली होतीअ) आक्षेप घेतला होता.त्याचप्रमाणे या नामकरणाला विरोध करायला हवा होता

    ReplyDelete