उरूस, 27 फेब्रुवारी 2021
दिल्ली उच्च न्यायालयात समलिंगी विवाहांना मान्यता देण्याबाबत याचिका सुनावणीस आलेली आहे. भारत सरकारच्या वतीने महाभियोक्ता तुषार मेहता यांनी असे शपथपत्र दाखल केले की या विवाहांना परवानगी देण्यास सरकारची तयारी नाही. असे विवाह भारतीय परंपरेत कुटूंब संस्थेच्या चौकटीत बसत नाहीत. हे आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे.
एक तर मूळात हा विषय आलाच कुठून ते समजून घ्या. आपपीसी 377 कलमामुळे समलिंगी संबंध गुन्हा ठरविण्यात आले होते. हे कलम रद्दबादल ठरविण्यात आले. आता अशा संबंधांना गुन्हा समजला जात नाही. याचीच पुढची पायरी म्हणजे अशा संबंधी व्यक्तींना एकमेकांसोबत राहण्यासाठी कायदेशीर अधिकार हवे आहेत. त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.
खरं तर कुणी आपण होवून विवाह संबंधात अडकण्याची मागणी करत असेल तर त्याचे भारतीय परंपरेचे जे समर्थक आहेत रक्षक आहेत त्यांनी स्वागतच करायला पाहिजे. आपली कुटूंब संस्था जगभरांत गौरविली गेलेली आहे. या कुटूंब संस्थेचे गुणगान ऐकून आजही शेकडो परदेशी नागरिक वाराणशी येवून गंगेकाठी सनातन पद्धतीनं विवाह विधी करतात. ही लग्नं टिकतात अशी त्यांची समजूत आहे.
ज्या संबंधांना पूर्वी मान्यता नव्हती ती आज आपण दिली आहे. मग त्याचीच पुढची पायरी म्हणजे या व्यक्तींना विवाहाचीही मान्यता दिली पाहिजे. त्यात अडकाठी आणण्याचे कारणच काय?
समजातील कुठल्याही प्रौढ व्यक्तींनी एकमेकांशी परस्पर संमतीने शारिरीक संबंध ठेवले तर त्याला नाही म्हणणणार कसे? आणि म्हणायचे तरी का? आपला समाज तर सध्या इतका पुढारला आहे की लोकनियुक्त प्रतिनिधी आमदार मंत्री बनतो, आपल्या विवाहबाह्य संबंधांची उघड कबुली देतो. या विवाहबाह्य संबंधापासून झालेली मुलं आपलीच आहे असं सांगतो. आपण त्या मंत्र्याचे जंगी स्वागत करतो. त्याच्या मिरवणुका काढतो. त्याच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाला राजकुमार म्हणून संबोधतो. इतकी तर आपले पुढारलेपण समोर मिरवताना दिसत आहे.
आणि दुसरीकडे समलिंगी प्रौढ न्यायालयात जावून अशी मागणी करत आहेत की आमच्या संबंधांना कायद्याची मान्यता द्या. आम्हाला तुमच्या परंपरेतील उदात्त अशी बंधंनं मंजूर आहेत. आम्ही केवळ शारिरीक पातळीवर एकत्र आलेलो नसून आम्ही समाजाचे नातेबंधन मानायला तयार आहोत. आम्हाला पण एक कुटूंब म्हणून आमची ओळख प्रस्थापित करायची आहे. मग अशावेळी आपण त्याला विरोध का करत आहोत?
म्हणजे एकीकडे अशी तक्रार करायीच की असे संबंध ही विकृती आहे. शारिरीक भुके पलिकडे यात काही नाही. ही नुसती वासना आहे. या लोकांचे नसते चाळे आहेत. हे पाश्चात्य खुळ आहे. आपल्याकडे असे काहीच नाही.
मग दुसरीकडे अशी टीका केलेली जोडपी आपण होवून समाज मान्यतेसाठी विवाह बंधन स्विकारत असतील तर त्यांना विरोध करायचा. हे तर आपले ढोंग झाले.
भारतीय परंपरेत समलिंगी संबंधांचे कितीतरी दाखले आढळून आलेले आहेत. 377 कलम रद्द करताना जी काही चर्चा सर्वौच्च न्यायालयात झाली त्यात हे सर्व मुद्दे सप्रमाण समोर आलेले आहेत. सर्व बाजूने चर्चिल्या गेले आहेत.
आता त्याच्या पुढची पायरी भारतीय समाजाने गाठण्याची गरज आहे. समलिंगी विवाहांना मान्यता देवून आपले पुरोगामित्व सिद्ध केले पाहिजे. विवाह म्हणजे केवळ दोन शरिरांचे मिलन नसून दोन घराण्यांचे मिलन आहे असे आपण संवाद कितीतरी ठिकाणी वापरत असतो. मग आता हेच या नविन मागणीलाही लागू होत नाही का?
दोन पुरूष किंवा दोन स्त्रिया जेंव्हा एकमेकांशी लग्न करून एकत्र राहू पहात असतील तर दोन घराण्यांचे एकमेकांशी घट्ट धागे जूळून आले असे का नाही समजायचे? आधीच तर आपल्याकडे कुटूंबव्यवस्था कोसळून पडते की काय अशी भिती काही जणांना वाटते आहे. नविन पिढी लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहणे पसंत करते आहे म्हणून टिका होते आहे. नको ते संसाराचे झंझट म्हणून तरूण पिढी मोकळे सडाफटिंग राहणे पसंद करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर जर समलिंगी आपण होवून पुढे येवून आम्हाला लग्नाच्या बंधनात अडकायचे म्हणत आहेत तर त्याला विरोध करण्यात काय अर्थ आहे?
तूषार मेहता यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली. माध्यमांतून भाजपचे प्रवक्ते आपली संस्कृती धोक्यात येण्याचा मुद्दा समोर करत आहेत. मुळात भारतीय संस्कृती इतकी लेचीपेची नाही. जगभरांत इतकी दीर्घकाळ टिकलेली आणि आजही कार्यरत असलेली दुसरी जीवनपद्धती नाही. तेंव्हा समलिंगी संबंधांना मान्यता दिल्याने संस्कृती धोक्यात येईल असे समजणे चुक आहे. उलट आपल्या संस्कृतीची बलस्थाने आपल्यालाच न कळाल्याचे हे लक्षण आहे.
आणि तसेही कायद्याने मान्यता दिली नाही तरी अशा व्यक्ती आता समाजात एकत्र वावरत आहेतच. उलट मान्यता दिल्याने त्यांचा नाही उलट आपलाच म्हणजे इतर समाजाचाच प्रश्न सुटणार आहे. भारतीय परंपरेत सर्वांना सामावून घेण्याची एक उदार अशी परंपरा सतत राहिलेली आहे. तृतिय पंथीयांना किन्नर म्हणून आम्ही सन्मानाने समावून घेतले आहे. यश गंधर्व किन्नर असे गौरवाने उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात आढळतात. आपल्या प्राचीन शिल्पांमधूनही समलिंगी संबंधांचे संदर्भ मिळतात.
सावरकरांची जयंती कालच आपण साजरी केली. गाय कापून खाल्ली तरी हिंदूत्वाला बाधा येत नाही असा प्रखर विचार मानणारा प्रखर सुधारणावादी आपल्यात जन्मला. अशा हिंदू प्रदेशांत समलिंगी विवाह ही विरोध करण्याची बाब कशी काय होवू शकते?
एक तर आधुनिक काळात तसेही कुणी खासगी बाबीत फार काही कायद्याचा हस्तक्षेप होवू द्यायला तयार नाही. आज जर अशी समलिंगी जोडपी सोबत रहायला लागली (ती एव्हाना रहात आहेतच) तर तूम्ही काय करणार अहात?
हा भावनिक मुद्दा बनवूनही काय मिळणार आहे? ज्या व्यक्ती असे आयुष्य जगू पहात आहेत त्यांना तर काहीच फरक पडणार नाही. तेंव्हा आपण सर्वांनी मिळून समलिंगीयांना आपले मानुया. त्यांच्या विवाहांना मान्यता देवूया. त्यांच्यातील सकारात्मक बाबी जाणून त्याची पाठराखण करू या. त्यांच्या ज्या बाबी आपल्याला रूचत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करूया. जोपर्यंत समाजिक पातळीवर त्यांचे वर्तन आक्षेपार्ह असत नाही तो पर्यंत त्यावर टीकेला काही अर्थ नाही.
(औरंगाबाद शहरात अशा समलिंगीयांना पाठबळ देण्याचे काम आम्ही गेली 6 वर्षे करत आहोत. हे वाचणारे कुणी जर समलिंगी असतील तर त्यांनी नि:संकोच संपर्क करा. त्यांची समलिंगी ओळख गुप्त राखली जाईल. त्यांच्या भावभावनांचा सन्मान राखला जाईल.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575