Friday, June 19, 2020

राहुल गांधी-महात्मा गांधी तूलना : विजय चोरमारेंचे बौद्धिक अध:पतन!


उरूस, 19 जून 2020 

राहुल गांधींना 50 व्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा!

त्यांना शुभेच्छा देणे, त्यांच्यावर लेख लिहीणे, त्यांच्याकडून राजकीय अपेक्षा व्यक्त करणे  आजच्या दिवशी स्वाभाविक आहे. अगदी कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्तेच कशाला कॉंग्रेसचे विरोधकही असा लेख लिहीतील. पण वाढदिवसानिमित्त एखाद्या जबाबदार पत्रकाराने राहुल गांधींची तूलना सरळ महात्मा गांधींशीच करावी याला काय म्हणावे?

महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार विजय चोरमारे यांनी राहुल गांधींवर एक लेख फेसबुकवर लिहीला आहे. तो वाचल्यावर बौद्धिक अध:पात इतकीच प्रतिक्रिया उमटते. दुसरा एक गावठी शब्द आहे शाब्दिक लाळघोटेपणा. पण विजय चोरमारे हे पण चळवळीतीलच असल्यामुळे तो वापरायचे मी टाळतो.

महात्मा गांधींशी तूलना करताना चोरमारे यांनी असा उल्लेख केला आहे की ज्या प्रमाणे आपले गुरू गोपाल कृष्ण गोखले (चोरमारे यांनी आताच्य तरूण कॉंग्रेसजनांना विचारून पहावं की महात्मा गांधींचे गुरू कोण होते, किती जण बरोबर उत्तर देतात ते त्यांनीच तपासावे.) यांच्या सांगण्यावरून भारतभ्रमण केले. अगदी रेल्वेच्या तृतिय वर्गाने प्रवास केला. भारताच्या कानाकोपर्‍यात गेले आणि त्यांनी भारत समजावून घेतला. आता चोरमारे असं लिहीत आहेत की  ‘‘...त्या नंतर नव्वद वर्षांनंतर राहुल गांधी नावाच्या तरूणानं तोच मार्ग अवलंबला. लोकांमध्ये थेट मिसळण्याचा. लोकांशी बोलण्याचा. तेही सतत मृत्युची टांगती तलवार असताना. त्यांची प्रत्येक कृती महात्मा गांधीजींच्य जवळ जाणारी आहे.’’

राहुल गांधी यांनी भारतात जितकी राज्यं आहेत त्या राज्यांतील कॉंग्रेस प्रदेशाध्यांची नावे एका दमात सांगावीत किंवा कागदावर लिहून दाखवावीत. मोबाईलचा वापर न करता. (मागे त्यांनी अगदी शोकसंदेश लिहीतानाही मोबाईलमधून कसा कॉपी करून लिहीला होता हे रजत शर्मांच्या आप की अदालत मध्ये सर्व भारतीयांनी पाहिलं आहे.) मग आपण मान्य करू की राहुल गांधी यांनी महात्मा गांधींसारखा सर्वत्र फिरून भारत समजून घेतला आहे.

किंवा राहुल गांधी यांनी एक मुलाखत अचानक निवडलेल्या एखाद्या पत्रकाराला द्यावी. त्यात कुठलाही गुंतागुंतीचा प्रश्‍न न विचारता केवळ भारतातील राज्ये, त्यांच्या भाषा, त्यातील प्रमुख नद्या, त्या त्या राज्यातील प्रमुख संत, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, इतरांच्या नसले तरी नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकांतील उल्लेख केलेली प्रमुख राजकीय घराणे इतक्यावरच उत्तरे द्यावीत.

विजय चोरमारे यांच्याच लेखात दिल्याप्रमाणे 2003 पासून राहूल गांधी राजकारणात सक्रिय आहे. त्यांचा राजकीय प्रवास रूढ कॉंग्रेस मानसिकतेला धक्के देणारा आहे असं चोरमारे म्हणतात. आता राजकारणात आल्या आल्या वयाच्या 34 व्या वर्षी ते अमेठीत उभे राहिले. निवडून आले. यात धक्का कसला? इंदिरा गांधी यांनाही नेहरूंनी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद त्यांच्या वयाच्या 40 मध्येच दिले होते. राजीव गांधींनाही इंदिरा गांधींनी 38 व्या वर्षीच आपल्या हयातीत पक्षाचे सरचिटणीस बनवले होते. संजय गांधी तर याहूनही तरूण वयात पक्षात सत्ताकेंद्र बनून राहिले होते. राहूल गांधी 2004 मध्ये खासदार झाले यात कॉंग्रेस संस्कृतीला धक्का कोणता? कुठलीही योग्यता सिद्ध न करता इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी यांच्या सारखेच राहूल गांधी यांनाही पदं मिळाली. अनिर्बंध अधिकार मिळाले. यात धक्का कोणता? हीच तर कॉंग्रेसी संस्कृती राहिली आहे.

तरूणांशी संवादावर राहूल गांधींनी भर दिला असे चोरमारे म्हणतात. तरूणांशी ते जवळीक साधतात. तरूणांना राजकारणाबाबत परकेपणाची भावना येवू नये असा त्यांचा प्रयास असतो. मग हेच राहूल गांधी मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगढ या राज्यात तरूणांच्या हातात राज्याचे नेतृत्व का देवू शकले नाही? या प्रश्‍नांवरून तर मध्यप्रदेशातील सत्ताच गेली. कर्नाटकातही अगदी आत्ता मल्लिकार्जून खडगे सारख्यांना वयोवृद्धांना राज्यसभेत उमेदवारी दिल्याने कर्नाटक युवक कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे. राजस्थानात सचिन पायलट यांना डावलून परत जून्या अशोक गेहलोत सारख्या खोडांनाच मुख्यमंत्री केल्या गेले त्यावरून अस्वथता आहे.

महाराष्ट्रातही युवक कॉंग्रेसला जास्त उमेदवारी दिल्या गेली पाहिजे अशी सतत मागणी केली गेली होती. त्याचे काय झाले? विजय चोरमारे यांनी सध्या अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद कुणाकडे आहे तेच सांगावे. महाराष्ट्रात युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाचे नातेवाईक आहेत? आणि हे राहूल गांधींना माहित नाही काय?  राहूल गांधी तरूणांशी संवाद साधतात म्हणजे कुणाशी? त्यांच्या पक्षातीलच तरूण काय तक्रार करतात हे एकदा चोरमारे यांनीच कान उघडे ठेवून ऐकावे.

आपण काय लिहीतो आणि ते वाचताना समोरच्याची काय प्रतिक्रिया उमटेल याचा तरी चोरमारे यांनी विचार करायला हवा होता. त्यांनीच आपल्या लेखात टीकाकारांसाठी एक कोलीत देवून ठेवले आहे. एका श्रमदान शिबीरात लोखंडी टोपल्यांत दगडमाती भरून डोक्यावरून वाहून टाकण्यासाठी युवकांची रांग लागली होती. या श्रमशिबीरात राहूल गांधीही सामील झाले. इतर सर्वांच्या डोक्यावर लोखंडी टोपली होती पण राहुल गांधींच्या डोक्यावर मात्र प्लास्टिकचे टोपले होते. हे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि त्यावरून राहूल गांधींना भयंकर ट्रोल करण्यात आले. हे कसे चुकीचे आहे असे त्यांनी लिहीले.

आता वाढदिवसाचा लेख लिहीत असताना असली आठवण सांगायची काय गरज होती? आणि ही आठवण सांगितल्यावर वाचणारा काय समज करून घेईल? ज्याला हे माहित नाही तोही आता प्लास्टिकचे टोपले लक्षात ठेवेल ना.

या लेखात एका ठिकाणी चोरमारे यिांनी लिहीले आहे. 10 ऑक्टोबर 2010 ला गोरखपूर लोकमान्य टर्मिनस रेल्वेत स्लिपर क्लासने राहुल गांधी यांनी 36 तास प्रवास केला. स्थलांतरीतांच्या प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रवासाची खबर न प्रसार माध्यमांना होती ना सुरक्ष कर्मींना ना सरकारी यंत्रणेला. तब्बल दहा दिवसानंतर याची खबर प्रसिद्धी माध्यमांना कळाली असल्याचे चोरमारे लिहीतात.

आता चोरमारे यांना हे कळतंय का की राहुल गांधींना तेंव्हा झेड दर्जाच्या वरची एसपीजी  सुरक्षा होती. अशी सुरक्षा असणार्‍या माणसाला असले धाडस महात्मा गांधींचा वारसा सांगत आजच्या काळात करता येत नाही. यातून अनेक प्रशासकीय धोके संभवतात. सुरक्षेसंबंधी धोक संभवतात. तेंव्हा महाराष्ट्रात आणि देशातही कॉंग्रसचेच सरकार होते. चोरमारे लिहीत आहेत ही बातमी खरी असेल तर अनेकांच्या नौकर्‍या जावू शकतात. आणि राहूल गांधींच्या या नादानपणाला शहाणपण कसे म्हणायचे?

महात्मा गांधींनी सांगितलेला हा मार्ग आहे का?

राहुल गांधी तरूणांशी संवाद साधत आहेत डोक्यावर प्लास्टिकचे टोपले घेवून, रेल्वेत 36 तास प्रवास करून, स्थलांतरित मजदूरांशी संवाद साधत आहेत प्लॅटर्फार्मवर बसून. हे जर खरे असेल तर मग हेच राहुल गांधी त्यांच्या घरी जेंव्हा आसामचे त्यांच्याच पक्षाचे नेते हेमंत बिस्वसर्मा भेटायला जातात तेंव्हा त्यांच्याशी न बोलता कुत्र्याला बिस्कीटं खावू घालत बसतात हे कसे काय? केवळ हेमंत बिस्वसर्माच नव्हे तर कित्येक कॉंग्रेस नेते राहूल गांधींची भेट कशी होत नाही व हात हलवत कसे दिल्लीहून कसे परतावे लागते याचे किस्से सांगतात.

आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना न बोलता कुत्र्याला बिस्कीटं खावू घालत संवाद साधावा हा संस्कार राहूल गांधींनी कोणत्या गांधींपासून घेतला हे पण चोरमारे यांनी आपल्या लेखात स्पष्ट करायला हवे होते.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा घोळ चालू होता तेंव्हा राहूल गांधी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी किती आणि कसा संवाद साधत होते? किती तातडीने निर्णय घेतल्या जात होते? शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांपाशी मुुंबईत बसून होते आणि इकडे कॉंग्रेंसकडून पाठिंब्याचे पत्र यायची वाट होती. शेवटी ते आलेच नाही. सरकार स्थापनेचा तो मुहूर्त टळला. ही संवादाची किमया कोणत्या दर्जाची आहे ते विजय चोरमारे यांनी राहूल गांधींनाच विचारून सांगावे. 

आजही कॉंग्रसमध्ये ‘श्रेष्ठी’ संस्कृती जोरावर आहे याचा हा पुरावाच आहे. आणि तरी चोरमारे राज्याराज्यातील सुभेदार्‍यांनी राहूल गांधी व्यथित झाले असं लिहीतात. याला काम म्हणणार?

मावळच्या शेतकर्‍यांवर गोळीबार झाला तेंव्हा राहुल गांधी आले नाहीत म्हणून टीका झाली. यावर चोरमारे असे लिहीतात की सोनिया गांधींची तब्येत खराब होती. अण्णा हजारेंचे आंदोलन दिल्लीत भरात होते. तेंव्हा राहूल गांधींना तत्काळ यायला जमले नाही हे पत्रकार, विरोधकांनी समजून घेतले नाही. पण नंतर राहुल गांधी येवून मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटूंबांना भेटून गेले. पण त्यांनी ही भेट गुप्त ठेवली.

आता परत तीच गोरखपुर मुंबई रेल्वे प्रवासाच्या बातमी सारखीच गुप्तता. राहुल गांधींना सर्वोच्च दर्जाची अव्वल सुरक्षा असताना त्यांच्या भेटी प्रवास विदेश दौरे गुप्त ठेवले जातातच कसे? चोरमारे कुठल्या हेतूने लिहीत आहेत हे मला माहित नाही पण राहुल गांधींची ही अशी गुप्ततेची कृती अनेकांना संकटात टाकणारी ठरू शकते.

राहुल गांधी 2004 पासून संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष असली पदे असो नसो सर्वच अधिकार त्यांच्या मातोश्री आणि ते यांच्यापाशीच एकवटलेले आहेत. महात्मा गांधींना असे सत्तेचे अधिकाराचे कुणा हाती एकवटणे अपेक्षीत होते का? मग विजय चोरमारे महात्मा गांधींशी तुलना का करत आहेत?

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? याचे मुळ कारण लपवून ठेवत चोरमारे असे लिहीतात, ‘कॉंग्रेसमध्ये प्रांतोप्रांतीच्या सुभेदारांच्या सुभेदार्‍या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर या सुभेदार्‍यांचा त्यांना अनुभव आला आणि व्यथित होवून त्यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे टोकाचे पाउल उचलले.’

१९८९  पासून आजतागायत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यात पक्ष दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा नाही. महाराष्ट्रात सत्तेत छोटा वाटा आहे पण स्थान आतिशय नगण्य आहे.  पक्ष संघटनेचे संपूर्णत: बारा वाजले आहेत आणि याची बर्‍याचअंशी जबाबदारी राहूल गांधी यांचीच आहे. कारण ते पक्षाचे तरूण नेतृत्व आहे. त्यांच्यापाशी सर्वाधिकार एकवटलेले आहेत. त्यांच्या मातोश्री या आजारी आहेत आणि वयानेही थकल्या आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी राहूल गांधींचे वडिल राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधानपद सांभाळले होते. यांनी किमान आपला पक्ष आधी सांभाळावा.

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्विकारावे किंवा एरव्ही ते पळ काढतात तसा इटलीत बँकॉंगमध्ये काढावा हा पूर्णत: त्यांचा प्रश्‍न आहे. पण त्यांच्या अध्यक्षपदाच्या त्यागाने संपूर्ण देशाचे नुकसान झाले या विजय चोरमारे यांच्या वाक्याशी मात्र मी मुळीच सहमत नाही. सोनिया-राहूल-प्रियंका यांच्यापासून कॉंग्रेस मुक्त होईल तेंव्हाच कॉंग्रेसचे आणि देशाचेही भले होईल या मताचा मी आहे.   

राहुल गांधी बाबत चोरमारे आशावादी आहेत. त्यांनी तसा आशावाद बाळगावा. पण त्या नादात त्यांची तूलना महात्मा गांधींशी करावी हे तर फारच झाले. चोरमारे अधिकृतरित्या कॉंग्रेसचे सदस्य कार्यकर्ते नाहीत. नसता 'महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे' म्हणणारे यशवंतराव चव्हाण, ‘इंदिरा इज इंडिया’ असे दिव्य उद्गार काढणारे देवकांत बरुआ यांच्यानंतर ‘राहूल गांधी यांच्यात महात्मा गांधींचे गुण दिसतात’ म्हणणारे विजय चोरमारे यांचाच नंबर लागला असता.

पत्रकार परिषदेत सरकारी अध्यादेश फाडून टाकणारे राहूल गांधी यांची तूलना परकीय इंग्रजांचा कायदा सविनय कायदेभंग करून तोडणार्‍या महात्मा गांधींशी जर अशा पद्धतीनं विजय चोरमारे करू लागले तर राहूल गांधींचा विषय राहू द्या बाजूला चोरमारे यांच्याच बौद्धिक अध:पतानाचा पुरावा समोर येतो.

राहूल गांधींना एक व्यक्ती म्हणून 50 व्या वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा!


    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

4 comments:

  1. महात्मा गांधींशी अत्यंत हास्यास्पद तुलना,,,
    पराकोटीची चाटुकारीता ,,,,

    ReplyDelete
  2. राहुल गांधी यांना व्यक्ती म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
    विजय चोरमोरे यांनी युवक काँग्रेस ची स्तिथी सांगितली आहे. युवक काँग्रेस मध्ये राजकीय नेत्यांच्या तरुणांचा भरणा आहे असे राहुल गांधींना जाणवले असे ते म्हणत तर मग पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी त्या बद्दल काय काम केले हे जर विजय चोरमोरे यांनी सांगितले असते तर बरे झाले असते.
    2010 मध्ये स्थलांतरित मजुरांसोबत प्रवास करून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असे विजय चोरमोरे म्हणतात. चांगले आहे समस्या जाणून घेणे ह्यात काहीच गैर नाही पण मग त्याबद्दल त्यांनी आपल्या UPA सरकारला काय सूचना दिल्या? जर त्यासुचना दिल्या असत्या तर हा प्रश्न इतका गंभीर झालाच नसता.
    राहुल गांधींचे गोडवे गाताना तुम्हीच त्यांच्या चुका दाखवत आहात.
    युवक काँग्रेस मधील घराणे शाही बद्दल राहुल गांधींना वाईट वाटत असेल तर मग ते सुद्धा घराणे शाहीमुळेच काँग्रेस अध्यक्ष झाले आहेत.
    बाकी विजय चोरमोरे पत्रकार आहेत तरी सुद्धा काँग्रेस मधील घराणेशाहीबद्दल चकार शब्द काढत नाहीत.
    बाकी आम्ही सरकार कडून बोलले कि लगेच संघी, भाजपवाला असे म्हटले जाते तर मग तुम्ही तर पत्रकार आहात तर मग तुम्हाला काय म्हणायचे विजयजी??
    संजय आवटे यांनी सुद्धा आज राहुल गांधी बद्दल लिहिले आहे. राहुल गांधीजींच्या व्यक्तिगत आयुष्यातील उदाहरणे त्यांनी दिली आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांचे राजकारणातील निकष बदलता येणार नाहीत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हा नेता जनतेवर थोपवावा हे कितपत योग्य आहे?
    विजय चोरमोरे यांच्या पत्रकारितेची पोलखोल केलीत सर तुम्ही..

    ReplyDelete
  3. जबरदस्त श्रीकांतराव.

    ReplyDelete
  4. विजय कृ.जोशी.किन्ही,भुसावळ
    महात्मा गांधी यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही.नुसते उसणे आडनाव घेवून तर नक्कीच नाही.महात्मा गांंधींनी मनात आणले असते तर आपल्यानंतर मुलाला मोठे पद देवू शकले असते.परंतू तो मोह टाळला.आणि इकडे तर पद गेले तर अस्वस्थता पसरते. तुम्ही या लेखात जे लिहिले,सोनिया राहुल प्रियंका यांच्यापासून काँग्रेसमुक्त तेव्हा काँग्रेसचे आणि देशाचे भले होईल.या आपल्या मताशी मी सुध्दा सहमत आहे.

    ReplyDelete