Wednesday, June 10, 2020

संजय पवार केवळ लेख लिहून भाजपविरोधी लढा शक्य नाही

     
उरूस, 10 जून 2020

‘अक्षरनामा’ न्यूज़ पोर्टलवर मराठी लेखकांतर्फे एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्याला उत्तर देताना प्रसिद्ध नाटककार स्तंभलेखक संजय पवार यांनी एक लेख ‘अक्षरनामा’वर लिहीला आहे. मराठी लेखकांना मिळणारे मानधन. मराठी ग्रंथव्यवहार, त्याचे अर्थशास्त्र या बाबत अतिशय चांगले विवेचन त्यांनी मांडले. आणि अचानक विषय सोडून त्यांची गाडी मोदीविरोधी रूळांवर धावायला लागली.

2014 नंतर देशाचे वातावरण कसे बदलत गेले, सांस्कृतिक गळचेपी कशी होते आहे, हुकुमशाहीकडे आपण कसे चाललो आहोत, आजचा लढा आणीबाणीपेक्षाही कसा कठिण आहे, विचारांची लढाई विचारांनीच लढायची असते पण अविचाराशी कसे लढायचे असं त्यांनी लिहीलं आहे. लेखाच्या शेवटी सर्वंकष लढ्याची तयारी करायला हवी असे ते म्हणतात.

मी संजय पवारांच्या या लेखातील कसल्याही मुद्द्याच्या विरोधात काहीही प्रतिपादन न करता एक वेगळा मुद्दा संजय पवार आणि त्यांचे समानधर्मा असलेले सर्व लेखक कलावंत पुरोगामी कार्यकर्ते समाजसेवक सर्वांसमोर ठेवतो. कारण प्रतिवाद करत बसलो की सरळ सरळ ‘तूम्ही संघवादी’ असला ठप्पा मारायचा आणि मूळ विषयाला बगल द्यायची असा एक कार्यक्रम जमात-ए-पुरोगामी आजकाल करू लागली आहे. आपण ते सर्वच बाजूला ठेवू. (उदा. म्हणून कुमार केतकरांवरच्या माझ्या लेखावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी कादंबरीकार पुरोगामी लेखक श्रीकांत देशमुख यांची कॉमेंट समाज माध्यमांवर वाचा.)

2014 पासून परिस्थिती बिघडली आहे. तर मग तेंव्हा पासूनच संजय पवारांना जो लढा अपेक्षीत आहे तो सुरू का झाला नाही? आणि तो तसा उभारण्यात कसली अडचण होती?

2014 ते 2019 इतकी संपूर्ण पाच वर्षांची मुदत भाजपने पूर्ण केली. या सर्व काळात केवळ केंद्रातच नव्हे तर विविध राज्यांमध्ये भाजपविरोधी वातावरण तापविण्यात कुणालाही मज्जाव नव्हता. कित्येक राज्यांमध्ये भाजप विरोधी सरकारे सत्तेवर आली आहेत. अगदी ताजे उदाहरण दिल्लीचे आहे. ज्या सीएए विरोधात मोठे रान माजविण्याच्या गोष्टी पुरोगामी करत होते देशभर तर त्याचा काही परिणाम झाला नाही पण किमान दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांत तर भाजपचा पराभव लोकशाही मार्गाने घडवून आणला गेला.

डॉ. गणेश देवी यांनी एक ‘दक्षिणायन’ नावाची चळवळ सुरू केली होती. तिचा उद्देश एम.एस.ए.बी. (मोदी संघ अमितशहा भाजप) ला विरोध असाच होता. मग तिचा परिणाम का काही झाला का 2019 च्या निकालांवर?  पुरस्कार वापसीच्या निमित्तानेही मोठ्या प्रमाणात वातावरण तापवले गेले होते.

2014 ते 2019 सर कालखंडात रोहित वेमुला, गौरी लंकेश, कलबुर्गी, दाभोळकर, कॉ. पानसरे, अखलाख, तबरेज अन्सारी, उनातील दलित विरोधी घटना अशा कितीतरी निमित्ताने देशभर एम.एस.ए.बी. विरोधात हवा तापवण्यात आली होती. मग याचा काहीतरी परिणाम व्हायला हवा होता. उलट भाजप अजूनच जास्त बहुमताने 2019 मध्ये निवडून आला.

अगदी आत्ताही प्रवासी स्थलांतरीत मजूरांचा प्रश्‍न पेटवला गेला होता. पुलित्झर पुरस्काराच्या निमित्ताने कश्मिर कसे अशांत आहे हे सांगण्याचा जोरदार प्रयत्न आंतरराष्ट्रीय पताळीवर कलात्मक रित्या केला गेला होता. हा सगळा एकप्रकारे लढाच उभा करण्याचाच प्रयत्न होता की. मग तो का उभा रहात नाही?

जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनतेने उत्स्फर्तपणे लढा उभारला. विविध राजकीय पक्ष,  सामाजिक संघटना, सुटे सुटे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हे सगळे त्या प्रवाहात सामील झाले ज्याला ‘जनता पक्ष’ असे नाव मिळाले. पण त्यासाठी मुळात लोकांमध्ये तितकी अस्वस्थता असायला हवी. तरच असे लढे उभे राहतात आणि त्यातून निर्णायक राजकीय परिवर्तन घडवून आणता येते.

इंदिरा गांधी विरोधात राजकीय पताळीवर असा एक प्रयोग राम मनोहर लोहिया यांनी केला होता. कॉंग्रेस विरोधात सर्व  विरोधी पक्षांच्या मिळून बनलेल्या संयुक्त विधायक दलाची सरकारे 9 राज्यांत सत्तेवर आली होती. पण तो प्रयोग नंतर फसला. आधी जनता पक्षाचा आणि नंतर जनता दलाचाही प्रयोग फसला. केवळ कुणाला विरोध म्हणून आपसांत विरोध असतानाही कुणी एकत्र येवून संधीसाधू पद्धतीनं काही एक आघाडी उघडत असेल तर त्याला फारकाळ आयुष्य लाभत नाही हा वारंवार आलेला अनुभव आहे.

आताही एम.एस.ए.बी. विरोधात काही एक आघाडी उघडणे आवश्यक वाटत आहे तर केवळ लेख लिहून काही होणार नाही. आधी पण खुप लिहून झाले आहे. अगदी शेखर गुप्तांसारखे तर कॉंग्रेसला झापताना शेवटी असं म्हणाले की कॉंग्रेसने आपली राजकीय लढाई आपली आपणच लढली पाहिजे पत्रकार लेखक कलावंत अभिनेते विचारवंत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नाही. आता शेखर गुप्ता यांच्याच वाक्याचा जरा उलटा विचार करू. संजय पवार यांना जी राजकीय आघाडी उभी करावी वाटते ती करण्यात प्रस्थापित भाजप विरोधी पक्ष त्यांना सक्षम वाटत नाहीत का? या पैकी कुठल्याही एका पक्षात जावून त्यांनी 2014 पासून बिघडलेले वातावरण दुरूस्त करण्यासाठी मन:पूर्वक राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करावेत.

दुसरी शक्यता अशी समजू की सध्याचे भाजप विरोधी पक्षही फार कामाचे नाहीत. तर मग दुसरा पर्याय म्हणून नविन राजकीय पक्ष स्थापन करणे. आणि त्या द्वारे निवडणुका लढवून भाजपचा निर्णायक राजकीय पराभव घडवून आणणे. योगेंद्र यादव यांनी असा पक्ष स्थापन करून प्रयत्न करून पाहिले आहेत. आणि राजकीय पातळीवर लोकांनी बेदखल करत झिडकारण्याचा अनुभव पदरात पाडून घेतला आहे.

परत परत राजकीय लढा हा शब्द मी यासाठी वापरतो आहे की संजय पवार हे राजकीय संघर्षा व्यतिरिक्त इतर मार्गाने 2014 पासून बिघडलेले वातावरण दुरूस्त करता येईल असे कुठेच म्हणत नाहीत. म्हणजे 1977 ला आणीबाणीत जसा राजकीय पक्ष स्थापन करूनच कॉंग्रेसचा पराभव घडवून आणला होता तसेच आता यांना एखादी राजकीय आघाडी उभारूनच भाजपचा पराभव करायचा आहे.

प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांना त्यांचे धोरण बदलविण्यासाठी काही एक दबाव निर्माण करावा हा मार्ग कामाचा नाही असेच संजय पवार यांचे मत आहे. कारण आणीबाणीत सरकार विरोधी असलेला मध्यमवर्ग कसा नव मध्यमवर्ग बनून बाजारवादी व्यवस्थेत भोगवादात फसून बसला आहे असं ते सांगतात.

संजय पवार यांची एक मोठी गोची दिसून येते. आणीबाणीतील सरकार विरोधी राजकीय आंदोलना पाशीच त्यांचा विचार अडकून पडला आहे. 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात तंत्रज्ञानाने आणि जगभरच्या विस्तारलेल्या बाजारपेठेने समोर आणलेली नविन आव्हाने, संधी, विकासाच्या दिशा, जीवनमानात झालेले बदल, संपर्क साधनांची विपूलता, जगभरात कोसळून पडत असलेल्या विविध भेदाच्या भिंती याबाबत हे पूर्णत: अनभिज्ञ बनून जून्याच पठडीत काही मांडू पहात आहेत.

उदा. प्रस्थापित छापिल वर्तमानपत्रे मागे पडून आता नविन डिजिटल पर्याय वाचकांसमोर येतो आहे. तो सर्वांना खुला आहे. स्वस्त आहे. जवळपास फुकटच उपलब्ध आहे. सर्वांना समान संधी आहे. मग संजय पवार भाजप विरोधी अजेंडा राबविण्यासाठी याचा उपयोग करण्याचं का नाही बोलत?

त्यांच्या स्वत:च्या लेखात काही बाबी संशय निर्माण होईल अशा लिहिल्या  आहेत. (उदा. गुजरातची आरोग्य व्यवस्था आणि त्यावर न्यायालयाने ओढलेले ताशेरे) मग या बाबत अधिकृत रित्या काही पुरावे, काही फोटो, काही माहितीचे तक्ते, जबाबदार व्यक्तींचे ट्वीट आदींचा वापर करून ते वाचकांपर्यंत भाजपविरोधी अजेंडा प्रभावीपणे पोचवू शकले असते. पण तसं न करता हे जून्याच भाषेत जून्याच शस्त्रांनी भाजपविरोधी लढा उभा करायची गोष्ट करतात.

एक अतिशय चांगले आशयसंपन्न युट्यूब चॅनेल यांनी आव्हान म्हणून सुरू करावे. त्याला भेटणारा प्रतिसाद पहावा. त्याला एका मोठ्या संघटनेची जोड द्यावी. आत्तापासून प्रयत्न करावे. ज्या भाजपवर ते टिका करत आहेत त्यांनी 1925 पासून चिकाटीने प्रयत्न चालू केले होते. अगदी राजकीय भाषेत बोलायचे तर 1977 चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यावर बाकी समाजवादी आणि पुरोगाम्यांसारखी फाटाफुट करून न घेता त्यांनी ‘भारतीय जनता पक्ष’ नावानं आपला नविन राजकीय अवतार सिद्ध केला. 1980 पासून कष्ट करून 1996 ला 13 दिवस, 1998 ला 13 महिने, 1999 ला पाच वर्षे राजकीय आघाडी करत सत्ता मिळवली. तितक्यावरच समाधान न मानता 2014 ला स्वत:च्या जोरावर स्पष्ट बहुमत मिळवलं. 2019 ला या बहुमतात अजून वाढ करून सत्ता राखली. भाजप संघवाले केवळ लेख लिहीत बसले नाहीत. उलट ते तसं काही करत नाहीत म्हणून सगळे पुरोगामी तेंव्हा त्यांची टिंगल करत होते.

अगदी आताच्या कोरोना महामारीच्या काळात सर्व संघवाले देशभर भुकेल्यांपर्यंत अन्न पोचवत होते, गरजूंना मदत करत होते. संजय पवार यांनी सांगावे की पुरोगामी एकत्र येवून त्यांनी देश पातळीवर असे काही काम या काळात का नाही उभे केले? सोनू सूद सारख्या सामान्य अभिनेत्याला जे सुचलं आणि त्याने ते केलं तेवढं तरी पुरोगाम्यांना का नाही सुचलं?

या संकटाच्या काळात बाकी चर्चा करण्यापेक्षा संजय पवार यांनी लेखक कलावंत अभिनेते पत्रकार बुद्धिजीवी विचारवंत यांची एक फळी महाराष्ट्रभर उभारली असती मदतीसाठी तरी प्रचंड मोठा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोचला असता. महाराष्ट्रात तर पुरोगामी सरकार आहे. वैयक्तिक पातळीवर संजय पवार यांनी कुणाला काय आणि कशी मदत केली त्याबद्दल मी चुकूनही विचारत नाहीये. ती त्यांनी केली असणार हे मी गृहीतच धरतो कारण ते चळवळीतले आहेत हे मला माहित आहे. पण देशभर, राज्यभर ज्या पद्धतीनं संघाने मदतकार्य उभारले ते तसे इतरांना करता आले नाही हे वास्तव आहे. संघाच्या कामाची बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष या पुरोगामी पत्रकारांनी कशी दखल घेतली, मग हे पण कसं मॅनेज केलं होतं वगैरे वगैरे सर्व आपण बाजूला ठेवू. (सामान्य लोकांनी माझ्या घराजवळच्या मंदिरात रोज 1000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था गेली 75 दिवस चालवली आहे त्याचा मी साक्ष आहे सहभागी छोटा घटकही आहे.)

संजय पवार नुसता लेख लिहून भाजप विरोधी राजकीय लढा उभा रहात नाही. 

(छायाचित्र सौजन्य "अक्षरनामा" न्युज पोर्टल)

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

12 comments:

  1. व्वा,,,एकदम झकास 👌
    अगदी मुद्देसूदपणे मिमांसा केली आहे.
    २०१४ पासून सुरू झालेली पोटदुखी इतक्या सहजासहजी जाणार नाही.

    ReplyDelete
  2. व्वा श्रीकांत राव मुद्देसूद आणि प्रभावी पणे आपण मांडले आहे. ह्यावर तत्सम मंडळींच्या योग्य प्रतिक्रिया अपेक्षित आहेत

    ReplyDelete
  3. एकदम सुंदर.
    सध्या ह्या लोकांचे असे झाले आहे की मैदानात प्रत्यक्ष न खेळता फक्त समालोचन करायचे आणि दुसऱ्या संघाला पराभूत करण्याचे स्वप्न पहायचे. ह्या पेक्षा वेगळी अवस्था ह्यालोकांची नाही. तुम्हाला समोरच्याला पराभूत करायचे असेल तर प्रत्यक्ष मैदानात जाउन खेळावे लागेल. पण हे ह्यालोकांना आजून पण समजले नाही.
    बाकी 2014 पासून हे लोक प्रत्यक्ष मैदानात न उतरत मोदींना हरावण्याचे स्वप्न पाहत आहेत. दोन्ही वेळेला स्वतःला पराभव स्वीकारावा लागला तरी पण आजून सुद्धा ह्यांची खेळण्याची तयारी नाही..
    बाकी पुरोगामी म्हणवून घेणारे सध्या कोठे सुद्धा मदत कार्य करताना दिसत नाहीत. ज्या संघाला नावे ठेवून, शिव्या देऊन ह्यांनी आपली पत्रकारिता सफल ठरवून घेतली तोच संघ सध्या सर्वात जास्त मदत कार्य करत आहे. ज्यांचा दिवस संघाला शिव्या देण्यापासून सुरु होत होता आता ते पत्रकार संघ कोणते कोणते चांगले काम करत आहे ते दाखवत आहे.
    तुम्ही एकदम मुद्देसूदपणे हा विषय मांडलात👍👍..

    ReplyDelete
  4. सुंदर लेख मुद्देसुद विश्लेषण.सध्या पुरोगामी मंडळींची उपासमार होते.त्यांच्या गोटात गोंधळात गोंधळ ची स्थिती आहे.सोनु सुदने मदत कार्य केले त्यांत ह्यांना भा ज प दिसतो.गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मुद्दे निकालात निघाल्याने.जनता या मंडळीचे चळवळी/आंदोलनास आता पाठींबा देणार नाही.मग अवाॅर्ड वापसी ज ने वि ची नाटके
    त्या गटाचे हुशार पत्रकार संघ कार्यकर्ते खरेच मदत करतात की नाही पहायला जाणे त्याला प्रसिद्धी न देणे.वगैरे.

    ReplyDelete
  5. अतिशय मुद्देसुद लेख विरोधासाठी विरोध न करता पुरोगामींना तसे कार्य करण्याचे आव्हान दिले हे बरे झाले.👌👍

    ReplyDelete
  6. 👌💐योग्य शब्दात योग्य मुद्दे!
    "उदा. म्हणून कुमार केतकरांवरच्या माझ्या लेखावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी कादंबरीकार पुरोगामी लेखक श्रीकांत देशमुख यांची कॉमेंट"
    ह्याची लिंक पाठवा ना कृपया.

    ReplyDelete
  7. अत्यंत चिकित्सक विवेचन👌.
    कुमार केतकर यांच्या लेखा वरील धागा कृपया शेअर करा.

    ReplyDelete
  8. खुप छान मुद्देसुद,

    ReplyDelete
  9. खूपच मुद्देसूद लेख।नेमका आशय।योग्य मांडणी।अंतर्मुख होऊन पवारांनी आणि एकूणच गणेशदेवींसहीत सर्वांनीच विचार करावा खरं तर।

    ReplyDelete