उरूस, 20 जून 2020
राहूल गांधींची 50 व्या वाढदिवसाच्या निमित्त विजय चोरमारेंनी महात्मा गांधींशी तूलना केल्यावर आता अजून दोन पत्रकार राहूल चालिसा गाण्यासाठी पुढे आले आहेत.
एक आहेत ‘ दै. दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे. आवटेंनी एक छोटी फेसबुक पोस्ट लिहीली आहे. राहुल गांधी यांच्या घराण्यात जे मृत्यू घडले त्या बाबत आवटेंनी लिहीताना ‘राहुल गांधी असणं खरंच सोपं नाही’असं लिहीलं आहे.
कुमार केतकर यांनी नॅशनल हेरॉल्ड या कॉंग्रेसच्या वृत्तपत्रात जो लेख लिहीला आहे त्याचा मराठी अनुवाद ‘राहुल गांधी- वज्रलेपी मनाचा मागोवा’ या नावाने 19 जून 2020 च्या दै. दिव्य मराठीत जाहिरातीसारखा पानाच्या तळाशी ओळखू न यावा असा छापला आहे.(शिर्षकाचा आणि लेखातील मजकुराचा दुरान्वयेही संबंध वाचकांनी शोधून दाखवावा.)
आवटेंचा तर लेख नाहीच छोटे फेसबुक टीपण आहे. पण केतकरांनीही आपल्या लेखात एकाही वाक्यात राहूल गांधी यांची राजकीय समज कशी किंवा त्यांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये काय या बद्दल एका शब्दानेही काही लिहीले नाही. त्यांनी फक्त 1970 पासून म्हणजे राहुल गांधींच्या जन्मापासूनच्या भारतीय राजकारणात त्यांना सोयीच्या वाटणार्या इंदिरा-राजीव यांची भलावण करणार्या घटना नोंदवल्या आहेत. ज्यांचा राहुल गांधींशी काहीच संबंध नाही.
जयप्रकाश नारायण यांना नेहरूंनी उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली होती पण त्यांनी ती कशी नाकारली आणि मग आणीबाणी आधी मात्र ते कसे अचानक राजकारणात सक्रिय झाले असा उल्लेख केतकर करतात. केतकर आजही या विषयावर बौद्धिक धुळफेक करण्यात गुंग आहेत. आणीबाणीच्या आधीच्या आंदोलनातही जयप्रकाश हे महात्मा गांधींसारखे संपूर्ण आंदोलनामागे एक नैतिक पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणूनच होते. त्यांनी चुकुनही कुठल्या पदाचा कधीही आग्रह तर सोडाच आपल्या भाषणात कधी उल्लेखही केला नाही. आणि जनता पक्ष निवडून आल्यावरही जयप्रकाश पंतप्रधान झाले नाही. पण केतकर मात्र शिंतोंडे उडवून मोकळे.
केतकर लिहीतात, ‘जयप्रकाश यांनी देशातील पोलिस यंत्रणेस आणि लष्करास सरकारचे आदेश धुडकावण्याचे आवाहन केले आणि त्या सार्या खेळातील आंतरराष्ट्रीय कटाच्या सोंगट्या उघड पडल्या.’
आता मुळात या वाक्याचा राहुल गांधी यांच्या वज्रलेपी मनाचा मागोवा घेत असताना काय संदर्भ? केतकरांच्या या भयानक आरोपातून जयप्रकाश नारायण हे देशद्रोही ठरतात. मग याचा एक तरी पुरावा केतकर आज इतक्या वर्षांनी तरी देवू शकतात का? जयप्रकाश नारायण यांचा आदेश लष्कर आणि पोलिस मानत असते तर इतक्या प्रचंड प्रमाणात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड आणीबाणीत झाली असती का? आणि इतकी जर या कटाची इत्थंभूत माहिती केतकरांना होती तर मुळात केतकर आत्तापर्यंत या कटवाल्यांच्या निशाणाच्या टप्प्यात कसे काय नाही सापडले?
केतकर आणि त्यांचे आणीबाणी प्रेम हा स्वतंत्र विषय आहे त्यावर परत कधी लिहीता येईल. आजचा विषय वज्रलेपी मनाचे राहुल गांधी हे आहेत.
पुढे केतकर आणि आवटेही संजय गांधी यांच्या मृत्यूचा उल्लेख करतात.
संजय गांधी विमान अपघातात गेले तेंव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. राहुल गांधी फक्त 10 वर्षांचे होते. एक लहान मुल म्हणून त्यांनी हे दु:ख पचवलं हे सोपं नव्हतं हे बरोबर आहे. पण यात कुठेही राहुल गांधी यांच्यावर घराची काही जबाबदारी नव्हती. असण्याचे काहीच कारण नव्हते. 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाली तेंव्हाही राजीव गांधी यांनी घरातील कर्ता पुरूष म्हणून हे दु:ख पचवले, पक्षाचा आणि देशाचा कारभार धैर्याने हाती घेतला आणि चालवून दाखवला. यात राहुल गांधींचा वैयक्तिक दु:खाशिवाय काय संबंध येतो? याच काळात हजारो शिखांची कत्तल झाली. तेंव्हा राहुल गांधींच्याच वयाच्या कित्येक शीख मुला मुलींनी संपूर्ण घरादाराची कत्तल आपल्या डोळ्यांनी पाहिली. ही मुलं मुली नाही का उभी राहिली आयुष्यात कणखरपणे?
पुढे 1991 ला राजीव गांधी यांचीही हत्या झाली तेंव्हा राहुल गांधी 21 वर्षांचे होते. त्यांच्यावर कोसळलेले दु:ख अपार होते. पण घराची जबाबदारी सोनिया गांधींनी उचलली. त्यांनी राजकारणातून संपूर्णत: बाजूला राहण्याचा निर्णय घेतला. इथेही राहुल गांधींचा काहीच संबंध येत नाही. कुमार केतकर तर त्यांच्या सवयीप्रमाणे सरळ खोटं लिहीतात की राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणात आल्या. प्रत्यक्षात त्या 1998 ला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे आल्या.
ज्या प्रमाणे 1984 ला इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी धैर्याने समोर आले आणि त्यांनी परिस्थिती हाताळली तसं 1991 नंतर सोनिया/राहुल यांनी केलं नाही. उलट ते राजकारणापासून दूर गेले. मग यात त्यांची राजकीय परिपक्वता कशी काय दिसून येते?
खरं तर 2004 पासून राहुल गांधी यांची खासदार म्हणून कारकीर्द सुरू होते. अपेक्षीत असे होते की कुमार केतकर किंवा संजय आवटे तिथपासून ते आजतागायतच्या राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतली. पन्नाशीच्या आतच राजकारणात मोठी पदे सांभाळणार्या नेत्यांशी राहुल गांधींची तुलना करतील. (जगनमोहन रेड्डी, देवेंद्र फडणवीस, अखिलेश यादव, नविन पटनायक इ.) झाले नेमके उलटेच. राहुल गांधींच्या लहानपणातील त्यांच्या कुटुंबांतील मृत्यूंचा उल्लेख करून यांनी उमाळे काढले. केतकरांनी त्या निमित्ताने आपला त्या आणीबाणी समर्थनाचा बडा ख्याल आळवून घेतला. पण राहुल गांधींच्या राजकीय वाटचालीवर भाष्य करण्यापासून पळ काढला.
या दोघांच्या लिखाणातूनच हे सिद्ध होते की राहुल गांधी एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून संपूर्णत: प्रभावहीन ठरले आहेत. कुमार केतकरांनी तर चक्क लिहीलंच आहे, ‘निवडणुकीच्या रिंगणात किंवा राजकारणाच्या गणितांमध्ये ते यशस्वी होतील की नाही माहीत नाही. ते शेवटी काही अंशी त्यांच्या सभोवतालच्या तर काही अंशी नियतीवर अवलंबून आहे. शत्रू बाहेरही आहेत आणि आतही. स्थानिक शत्रूंच्या खांद्यावर बंदून ठेवून ते आंतरराष्ट्रीय कारस्थान्यांचे लक्ष्य असू शकतात. इंदिरा आणि राजीव यांना असेच मित्र लाभले. शत्रूंची गरजच नव्हती.’
आता केतकरांच्या या लेखातील शेवटच्या पॅराचा काय अर्थ काढायचा? मोदी भाजप संघ अमित शहा यांची नावं घ्यायचीच कशाला? राहुल गांधींंना राजकीय दृष्ट्या संपवायला कॉंग्रेसवालेच समर्थ आहेत असाच विश्वास केतकर व्यक्त करत आहेत ना? आणि आंतरराष्ट्रीय कट ही काय भानगड परत परत केतकर उकरून काढतात?
केतकरांच्या या वाक्याचा पुरावा राहुल गांधींना त्यांच्या अगदी जन्मदिवशीच मिळाला. गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड आणि मणिपुर या चार राज्यांमधून कॉग्रेसचे एकूण 4 उमेदवार राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाले. गुजरातमध्ये तर शरद पवारांच्या आमदारानेही कॉंग्रेस उमेदवाराला मतदान केले नाही.
बाबरी मस्जिद पाडली म्हणून याच लेखात केतकरांनी हिंदुत्ववाद्यांच्या नावाने ओरड केली आहे. मग त्याच शिवसेनेला पाठिंबा देताना, ज्या राष्ट्रवादीच्या आमदाराने गुजरातेत कॉंग्रेसला मतदान केले नाही त्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना केतकरांना आपल्याच लेखाचा विसर पडतो की काय? का जाहिरात पुरवणी म्हणून लिहीलेला लेख वेगळा असतो आणि आपली कृती वेगळी असते असे समजायचे?
विधान परिषदेवर 12 आमदार नेमले जाईपर्यंत राहुल गांधींवर अजूनही असे काही लेख येण्याची शक्यता आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
आंतरराष्ट्रीय व्यापक कटाच्या सिद्धांताचे जनक श्री श्री सुमार केतकरांकडून अशाच लाळघोटेपणाची अपेक्षा आहे.
ReplyDeleteकेतकरांच्या परंपरेत श्री श्री श्री असं लिहीलं जात नाही. गांधी गांधी गांधी असं लिहीलं जातं....
ReplyDeleteआता पुन्हा राज्य सभेचि ऊमेदवारी मिळण्याची शक्यता नाहि प्रयत्न चालु ठेवले पाहिजेत!आता या दोन्हि संपादक पत्रकारांना कुणिही गंभिरपणे घेत नाही!अडगळितील बुध्दिवंत आहेत.
ReplyDeleteढोंगी लोकांचा बुरखा फाडला
ReplyDeleteकेतकरांचा लेख काॅमेडी सदरामध्ये धरतात म्हणे.
ReplyDelete