उरूस, 29 जून 2020
कॉंग्रेस ‘महात्मा गांधीं’ नावाचे चलनी नाणे आपल्या हक्काचे म्हणून आपल्या सोयीने वापरत आली आहे. अगदी कॉंग्रेस नेतृत्वाने महात्मा गांधींचे आडनावही वापरले. आता तर प्रियंका यांचा मुलगा रेहान हा पण वाड्रा हे आडनाव न लावता गांधी आडनाव लावतो आहे. (पाकिस्तानात असिफ अली झरदारी यांचा मुलगा बिलावल याने आपल्या आईचे आडनाव भुट्टो लावले कारण त्यात एक मोठी राजकीय सोय आहे.)
कॉंग्रेस मध्ये गांधीवाद विरूद्ध नेहरूवाद असा काही संघर्ष होता का? का उगाच आज काहीतरी शब्दचमत्कृती म्हणून वरील शीर्षक वापरतो आहे?
हा वाद आधीपासून होता याचा पुरावा स्वत: महात्मा गांधी यांनीच दिलेला आहे. पत्रकारांनी त्यांना नेहरूं सोबत तूमचे नेमके कोणते वैचारिक मतभेद आहेत असे विचारले असता गांधींनी स्वच्छपणे साध्या सोप्या शब्दांत उत्तर दिले, ‘इंग्रज भारतात राहिले तरी मला चालतील पण त्यांची धोरणे मात्र गेलीच पाहिजे हा माझा आग्रह आहे. उलट जवाहर मात्र इंग्रज जावा यासाठी आग्रही आहे इंग्रजांची धोरणं राहिली तरी चालतील या मताचा आहे.’
महात्मा गांधींच्या हत्येनंतर पुढे कॉंग्रेसचा सत्तातूर सत्तालंपट इतिहास सर्वांसमोर आहे. गांधींच्या शरिराची हत्या जरी नथुराम गोडसेंनी केली तरी विचारांची हत्या मात्र नेहरू आणि पुढे इंदिरा-राजीव गांधी यांच्या कॉंग्रेसनेच केली.
विश्वंभर चौधरी हे गांधी मानणार्या, पदाची अपेक्षा न बाळगणार्या सच्च्या सेवादली कॉंग्रेसी कार्यकर्त्याचे प्रतिनिधी आहेत. (कॉंग्रेसचा पण सेवादल होता हे बहुतांश लोकांना माहितही नसेल). त्यांनी आपली व्यथा 27 जूनला समाजमाध्यमांत फेसबुक पोस्टवरून व्यक्त केली. आण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिडियाने ‘हाईप’ केलेले आंदोलन म्हणून हिणवल्या गेले. शिवाय अण्णा हे संघी आहेत असा आरोपही केला गेला. वारंवार होणार्या या आरोपांनी व्यथित होवून विश्वंभर यांनी लिहीले.
नेमके त्याच काळात 20 जूनच्या साप्ताहिक साधनाच्या अंकात कॉंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी ‘कॉंग्रेस विरोध म्हणजे नेहरू विचार विरोध..’ असा लेख लिहिला. यात त्यांनी भाजप-संघेतर पुरोगामी पक्षही कसे नेहरूंच्या विचारांना विरोध करत राहिले. कॉंग्रेस विरोधी राजकीय शक्तींना याच पुरोगाम्यांनी ताकद पुरवली. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकांना या पुरोगामी पक्षांनी कशी मदत केली. परिणामी हे सगळे नेहरू विचार विरोधी आहेत.
केतकरांनी ही मांडणी केवळ पत्रकार विचारवंत अभ्यासक म्हणून केली असती तर तीचा वेगळा विचार झाला असता. पण आता केतकर काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आहेत. पक्षासमोर भीषण राजकीय संकट उभे आहे. अशावेळी भाजपेतर इतर पुरोगामी पक्षांना विरोध करायचे काय कारण? बरं ते भलावण कुणाची करतात? सेानिया-राहूल-प्रियंका या नकली गांधींची. ज्यांनी अस्सल सच्च्या कॉंग्रेसी कार्यकर्त्यांची वाट लावली आहे.
यातही परत एक वैचारिक जमालगोटा केतकरांनी देवून ठेवला आहे. महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यानंतरही पुढे 16 वर्षे नेहरू कसे पंतप्रधान होते असं लिहीताना केतकर राजरोसपणे गांधींचा वारसा नेहरू कसे पुढे चालवित होते हे सांगू पहात आहेत. प्रत्यक्षात नेहरूंची धोरणे गांधीवादी नव्हती. नेहरू नियोजनाचे पुरस्कर्ते, गांधी विकेंद्रिकरण मानणारे, नेहरू अती सरकारवादी, गांधी अ-सरकारवादी, नेहरू उद्योग केंद्री शहर केंद्री (इंडिया) तर गांधी ग्रामकेंद्री (भारत). मग गांधींचा वारसा नेहरू आणि पुढचे त्यांचे सत्ताधारी वारस यांनी कुठे चालवला?
केतकर कौतुक करतात ती सोनियांच्या काळात राबवल्या गेलेली अन्नसुरक्षा, शिक्षणाचा हक्क, मनरेगा, महिला सबलीकरण ही धोरणं कुणाची होती? ही डाव्या चळवळींची आग्रही मागणी होती.
मुळात जे या सर्व डाव्यांचे (कम्युनिस्टां शिवायचे पुरोगामी समाजवादी डावे) कुलगुरू डॉ. राम मनोहर लोहिया यांनी फार पूर्वीच नेहरूंच्या समाजवादी ढोंगाचे पितळ उघडे पाडले होते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर 1948 ला नाशिक येथे अधिवेशन भरवून समाजवादी विचारांची मंडळी कॉंग्रेसमधून बाहेर पडली आणि त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला. गांधी जिवंत होते तोपर्यंत कॉंग्रेस अंतर्गत समाजवाद्यांना नैतिक आधार वाटत होता. पण त्यांच्या हत्येनंतर मात्र हा आधार संपला. कारण नेहरूंची सत्तालालसा कॉंग्रेस पक्षाला समाजवादी धोरणे राबवू देणार नाही म्हणून कॉंग्रेस अंतर्गत राहून काही उपयोग होणार नाही अशी आग्रही मांडणी लोहियांनी केली.
इतकेच नाही तर नेहरूंच्या समाजवादाच्या कृत्रिम प्रेमात अशोक मेहतांसारखे मोठे नेते अडकू पहात आहेत, जयप्रकाश नारायण मऊ पडत आहेत हे पाहून समाजवादी पक्षात फुट पाडत लोहिया यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. पुढे त्यांनी नेहरूंच्या विरोधात 1962 मध्ये निवडणुकही लढवली. त्यात लोहियांचा पराभव झाला. पण 1963 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यांनी लोसभेत प्रवेश घेतला. संसदेत नेहरूंचा समाजवाद कसा नकली आहे हे ते जोरदारपणे मांडत राहिले.
केतकर एकीकडे भाजप सोबतच लोहियांच्या पुरोगामी शिष्याना नेहरूंच्या विचारांचे विरोधक म्हणत आहेत पण दुसरीकडे त्यांचीच धोरणे राबवू पाहणार्या सोनियांची तळी उचलत आहेत.
विश्वंभर चौधरी यांनी आग्रह धरला त्याप्रमाणे कॉंग्रेसने रस्त्यावर उतरून भाजप सरकार विरूद्ध आंदोलनं केली पाहिजेत. जनसामान्यांपर्यंत पोचले पाहिजे. आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधात हाक देताच उभा देश आणि विशेषत: तरूणाई पाठिशी उभी राहिली. ही तळमळ म्हणजेच गांधी विचारांशी जूळणारा खादीचा धागा आहे. हे आत्ताच्या कॉंग्रेसने समजून घेतले पाहिजे. उलट आताची कॉंग्रेस म्हणजेच भ्रष्टाचाराच्या ‘खादी’ विचारांची झाली आहे.
विश्वंभर चौधरी यांची खंत असली (महात्मा) गांधींची रामराज्य वाली कॉंग्रेस उरली नसून नकली (सोनिया) गांधींची रोमराज्य वाली कॉंग्रेस उरली अशी आहे (हे शब्द माझे आहेत त्याचे खापर विश्वंभर यांच्यावर नको). तिने आत्मपरिक्षण करावे अशी प्रमाणिक तळमळ मांडत आहेत.
केतकर मात्र कुठलेही आत्मपरिक्षण करण्यास तयार नाहीत. उलट आजही आणीबाणीचे समर्थन करत जयप्रकाश नारायण यांच्यावर आंतरराष्ट्रीय कटाचा आरोप करत आहेत. भाजप सोबतच भाजपेतर पक्षांवर कॉंग्रेस विरोधाचा ठप्पा मारत आहेत.
नुकतीच बिहार मधून बातमी आली आहे की राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली भाजप-नितिश कुमार विरोधी जी आघाडी बनते आहेत त्यातून कॉंग्रेस हद्दपार केली जात आहे. म्हणजे इकडे केतकर नेहरू विचार विरोध म्हणून ज्या पुरोगाम्यांना हिणवत आहेत तेच आता राजकीय तडजोड म्हणून कॉंग्रेसला सोबत घ्यायला तयार नाहीत. मग कॉंग्रेसचे राजकीय अस्तित्व बिहारात शिल्लक राहिल काय? विश्वंभर चौधरी यांची तळमळ किती खरी आहे याचा लगेच पुरावा बिहार मधील राजकीय घडामोडीं मधून येतो आहे.
हा अंतर्विरोध नेहरूवाद गांधीवाद असा केवळ वैचारिक नाही. जनसामान्यांचा पाठिंबा नसलेले दरबारी राजकारणी आणि जनसामान्यांत मिळसळणारे त्यांचे प्रश्न समजून घेणारा सच्चा कार्यकर्ता असापण आहे. हेच विश्वंभर चौधरी यांना सुचवायचे आहे.
‘येथे समस्त बहिरे बसतात लोक, का मधुर भाषणे तू करिशी अनेक’ अशी परिस्थिती असताना विश्वंभर चौधरी यांचे तळमळीचे म्हणणे कोण ऐकणार? त्यांची अपेक्षा फोलच ठरण्याची शक्यता जास्त. त्यांच्यातल्या सच्च्या गांधीवाद्याला यामुळे वेदना होणार. पण जोपर्यंत नकली गांधी (सोनिया-राहूल-प्रियंका-रेहान) कॉंग्रेसला विळखा घालून बसलेले आहेत तोपर्यंत काही इलाज नाही. या नकली गांधींची चापलुसी करून खासदारकी पदरात पाडून घेणार्यांकडून तर कसल्याच अपेक्षा ठेवता येत नाहीत.
(छायाचित्रातील गांधी नेहरू यांचे कपडेही हा विरोध सांगायला प्रतिक म्हणून पुरेसे आहेत)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
'नकली' गांधींचा असली समाचार घेतलाय सर आपण,,,👍🌹
ReplyDeleteसुंदर विश्लेषण !
ReplyDelete