Friday, June 26, 2020

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी ग ऽऽ !



काव्यतरंग, शुक्रवार 26 जून  2020 दै. दिव्यमराठी

नदीकिनारी

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी ग ऽ

अवतीभवती नव्हते कोणी
नचत होत्या राजसवाणी
निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी ग ऽ

जरा निळ्या अन् जरा काजळी
ढगांत होती सांज पांगली
ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग ऽ !

दुसरे तिसरे नव्हते कोणी
तुझेच हसले डोळे दोन्ही
अवखळ बिजली भरली माझ्या उरांत सारी ग ऽ !

सळसळली, ग ऽ हिरवी साडी
तिनेच केली तुझी चहाडी
फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी ग ऽ !

वहात होते पिसाट वारे
तशांत मी उडविले फवारे
खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी ग ऽ !

कुजबुजली भवताली राने
रात्र म्हणाली चंचल गाणे
गुडघाभर पाण्यांत दिवाणे दोन फरारी ग ऽ !

-ना.घ.देशपांडे, (शीळ, पृ. 59, मौज प्रकाशन गृह, 4 आ.)

या कवितेला आता जवळपास 90 वर्षे होत आली. ना.घ. यांचा कविता संग्रह प्रकाशीत झाला 1954 ला. पण शीळ या गाण्याची ध्वनीमुद्रीका निघाली होती 1932 ला. म्हणजे त्याच्या जवळपासच ही कविता लिहील्या गेली. आज ही कविता वाचणार्‍याला कुणाही सामान्य रसिकाला यात नेमके काय वेगळेपण आहे हे चटकन लक्षात येणार नाही. पण 80 च्या पुढच्या वयाचे जे हयात असतील त्यांना ही कविता वाचताच/आठवताच त्यांच्या मनावर मोरपिस फिरल्याचा भास होईल.

त्या काळातील इतर कवितांमधून ही कविता शुद्ध प्रेमाच्या आविष्कारामुळे उठून दिसते. म.वि.राजाध्यक्ष यांनी ना.घ.च्या कवितेबद्दल इतकं सुंदर आणि नेमकं लिहून ठेवलं आहे, ‘... तिच्या स्त्रीत्वाला कोणताच आगंतुक गुण चिकटविलेला नसल्यामुळे तिच्याविषयीचे प्रेम ‘शुद्ध’ आहे-म्हणजे ते फक्त प्रेम आहे. त्यात दया, सहानुभूती, उद्धार इत्यादी ‘सामाजिक’ लचांडे नाहीत. या प्रेमात जगाची बाधा नाही तसा अध्यात्माचाही नेहमीचा एखादा आव नाही. अलौकित उत्कटतेचे हे प्रेम सर्वस्वी लौकित आहे; शारीर आहे. त्याला सांकेतिक आडपडदा नाही. कवीला प्रीतीतून मुक्ती नको; प्रीती हीच त्याची मुक्ती.’ (शीळ कविता संग्रहाची प्रस्तावना)

ना.घ. देशपांडे यांच्या कविता भावगीत बनुन गायल्या गेल्या. त्यांना अतिशय लोकप्रियता लाभली. ही कविता आजच्याही तरूण तरूणींच्या प्रेमाचा उत्कट अविष्कार म्हणून शोभून दिसू शकते. ना.घ. यांच्या कवितेतील हे विशुद्ध प्रेम पुढे बी. रघुनाथ, बोरकर, पाडगांवकर, महानोर यांच्या कवितेतही अनुभवास आले.

विंदा करंदीकरांच्या एका कवितेत,

हिरवे हिरवे माळ मोकळे,
ढवळ्या ढवळ्या त्यावर गायी,
प्रेम करावे अशा ठिकाणी,
विसरून भिती विसरून घाई

असे मुक्त विशुद्ध प्रेमाचे चित्र उमटले आहे. पुढच्या या सर्व कविंच्या मुक्त प्रेम अविष्काराची वाट ना.घं.नी प्रशस्त करून ठेवली आहे.

या कवितेत प्रेमासोबत जलरंगातील एक निसर्गचित्रही समोर येते. प्रेमाचा ताजा टवटवीत रंग आपल्याला अनुभवाला मिळतो. ‘जरा निळ्या नि जरा पांढर्‍या’ या कडव्यांत हे निसर्गचित्र फार सुंदर उतरलं आहे.

अजून एका कडव्यांत ‘सळसळी, ग हिरवी साडी’ यात रंगांचा उल्लेख येतो. आता हा जो साडीचा हिरवा रंग आहे तो सळसळणारा आहे कारण माळावर पसरलेल्या हिरव्या पोपटी गवतातून वारा वाहतो तेंव्हा ही सळसळ आपल्याला  अनुभवायला येते. ही रसरशीत सळसळ चितारण्यासाठी हिरवाच रंग हवा. इथे दूसरा रंग चालला नसता.पहिल्याच कडव्यात ‘निळ्या जळावर सोनसळीच्या’ असाच रंगांचा उत्सव समोर येतो. ही कविता म्हणणूनच एक तरल निसर्गचित्र बनून समोर येते.

कवितेच्या शेवटी ‘गुढघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, गऽ ऽ’ असं वर्णन येतं. गुन्हा केल्यावर जो शिक्षेसाठी पात्र आहे आणि आता सापडत नाही तो ‘फरार’. तसं प्रेमाच्या गुन्ह्यात आपण ‘फरार’ आहोत अशी मोक़ळी स्पष्ट कबुली इथे दिलेली आहे. बरं हे पाणी काही गळाभर नाही. गुढघाभरच आहे. प्रेमात बुडून मेलो वगैरे असं काहीच म्हणत नाहीत. तर आपण त्यात कसे डुंबत आहोत, हे सांगितलं आहे. गुढघाभर पाण्यातच आपण कसे आकंठ बुडालो आहोत याचा प्रत्यय कवी वाचकाला देतो. रहिमचा एक दोहा फार प्रसिद्ध आहे

रहिमन नदीया प्रेम की उलटी जिसकी धार
पार हुआ वो डूब गया, डुबा हुआ वो पार

ना.घं.च्या कवितेत उत्कट प्रेमाचा रंग त्यांच्या शेवटच्या शेवटच्या कवितांतूनही दिसून येतो. ते रहायचे त्या मेहकर गावांत एक कंचनीचा महाल आहे. या कंचनीच्या प्रेमावर एक सुंदर असे खंडकाव्य त्यांनी लिहीलं.

ना.घं.वरती दासू वैद्यने फार सुंदर कविता लिहीली आहे. त्याचा शेवट करताना त्यानं लिहीलं आहे

जोपर्यंत कुणाला तरी कुणाची
प्राणातून याद येते
तोपर्यंत उगवत राहील
तुझ्या शब्दांतून पोपटी गवत

दासूने ‘पोपटी’ हा जो रंगाचा उल्लेख केला आहे तो अतिशय समर्पक आहे. तो गवतासाठी केला असल्याने त्यात वेगळं काय कारण गवत पोपटीच असतं असं कुणालाही वाटेल. पण भारतीय रससिद्धांतात विविध रसांसाठी विविध रंग सांगितलेले आहेत. त्यात शृंगार रसाचा रंग हा आपण समजतो किंवा पाश्चात्यांच्या संकेतानुसार वापरतो तो गुलाबी नाहीये. शृंगारासाठी भरताच्या नाट्यशास्त्रात पोपटी रंग सांगितला आहे. पोपटी रंग रसरशीत प्रेमाचे प्रतिक आहे. ना.घं.ची कविता अशीच रसरशीत प्रेमाचे प्रतिक आहे.

ना.घ.च्या कवितांचा अप्रतिम कार्यक्रम ‘अंतरिच्या गुढगर्भी’ जालन्याचे कै. बलवंत धोंगडे यांच्या कल्पनेतून तयार झाला. त्याला अभय अग्निहोत्री यांनी फार सुरेख चाली दिल्या आहेत. हा कार्यक्रम आम्ही परभणीला बी. रघुनाथ सभागृहात घेतला होता.

1995 च्या परभणी येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ना.घ.देशपांडे यांचा मुख्य सत्कार आम्ही केला होता. त्याचे आमंत्रण देण्यासाठी इंद्रजीत भालेराव सोबत मी नाघंना भेटायला मेहकरला गेलो होतो. त्यांनी जिच्यावर कविता लिहीली तो नदीकाठचा कंचनीचा महाल आम्ही बघितला.  तब्येतीमुळे ते बाहेर पडत नसत. पण आमच्या आग्रहाने ना.घ. आवर्जून आले. कुठलेही भाषण करणे त्यांना शक्य नव्हते. कविता म्हणायचा त्यांना आग्रह केल्यावर ‘कुठली म्हणू?’ असं त्यांनी बोळक्या झालेल्या तोंडाने विचारलं. तेंव्हा महानोरांनी त्यांना ‘नदीकिनारी नदीकिनारी’ म्हणा असा आग्रह केला.‘हात्तीच्या !!’  म्हणून निरागस हसत डोक्यावर हात मारून घेतला होता.
 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

7 comments:

  1. आशयघन लिखाण वा

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलं आहेस श्रीकांत! 👌👍

    ReplyDelete
  3. ज्ञानात भर घालणारे लेखन .

    ReplyDelete
  4. अतिशय तलम कविता आणि रसग्रहण दोन्ही छान आहेत

    ReplyDelete
  5. पोपटी रंग प्रेमाचे प्रतिक .. हे आजच कळलं. ज्ञानात भर पडली. पाश्चात्य आक्रमकांनी आपलं सगळंच पार विस्कटून टाकलंय !

    ReplyDelete
    Replies
    1. भरताच्या नाट्यशास्त्रात आहे तसे लिहीलेले. साहित्य संगीत नाट्य यांच्यात ज्या सौंदर्यशास्त्राचे संकेत वापरले जातात एकच आहेत.

      Delete