Sunday, June 7, 2020

हुसेन : सगळ्यांना घेवून फसेन!


उरूस, 6 जून 2020

दिल्लीच्या दंग्यात तपास यंत्रणांनी तब्बल हजार पानांचे आरोपपत्र 2 जून रोजी न्यायालयात दाखल केले आहे. अंकित शर्माच्या हत्येसाठीही सहाशे पानांचे आरोपपत्र दुसर्‍या दिवशी म्हणजे 3 जून रोजी दाखल झाले आहे. यात मुख्य आरोपी म्हणून ताहिर हुसेन या आम आदमी पक्षाच्या नेत्याचे नाव आलेले आहे.

पुरोगामी अस्वस्थ झाले असून त्यांचा तडफडाट यासाठी होतो आहे की या आरोपपत्रात ताहीर हुसेन सोबत उमर खालीद सारखी अजून 15 नावं आलेली आहेत.

हा हुसेन सगळ्यांनाच घेवून बुडणार याची खात्री झाल्यानेच ही अस्वस्थता आहे.

या आरोपपत्राचे एक वैशिष्ट्य आहे. सीसी टीव्ही कॅमेर्‍यांचे व्हिडिओ फुटेज, विविध लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये केलेले शुटिंग, मोबाईल संभाषणं, व्हाट्सअपवरील मेसेज आदींचा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे.

याची अडचण अशी आहे की पूर्वी ‘मी त्या जागेवर हजर नव्हतोच’ असं म्हणून पळवाट शोधायची सोय होती. पण ती आता नाही. ताहेर हुसेन याचे संजय सिंह सोबतचे मोबाईल संभाषण उपलब्ध आहे. हे चालू असताना तो कुठून बोलतो आहे हे पण तपास यंत्रणांनी शोधून काढले आहे. कित्येकांबाबत असाच जागेचा शोध घेता आला आहे. तबलिगी मरकज, शाहिनबाग आंदोलन या सगळ्यांचा धागा दिल्ली दंग्याशी जूळतो आहे. डोनाल्ड ट्रंप भारतात येण्याच्या मूहूर्तावर हा दंगा करण्याची योजना जानेवारी महिन्यातच आखण्यात आली होती. त्यासाठी जी चर्चा झाली त्यात उमर खालीदचे नाव पण आलेले आहे.

या आरोपपत्रात अजून एक वेगळा मुद्दा फार ताकदीने आला आहे. या सर्व आरोपींच्या बँक खात्यांत आलेला पैसा याचाही शोध घेवून त्या संबंधी आरोप ठेवण्यात आले आहेत. 2016 च्या नोटबंदी नंतर कश्मिरमधील पाकप्रेरीत खोट्या नोटांच्या काळ्या उद्योगाला मोठा झटका बसला होता. कश्मिरमधील आतंकवाद्यांचे आर्थिक कंबरडे या नोटबंदीने पार मोडले होते. हुरियतचे नेते किंवा इतर सर्व भारतविरोधी यांच्या खात्यांना गोठवण्यात आले होते. त्यावर कडक कारवाई चालू होतीच. नोटबंदीनंतर अपरिहार्यपणे सर्वांनाच ऑनलाईन व्यवहार करण्यावर भर द्यावा लागला आहे. याचा एक परिणाम असा झाला की आता पैशाचे व्यवहार ट्रेस करणे जास्त सोपे झाले आहे. याचाच वापर करत दिल्ली दंगे, शाहिनबाग, ताहिर हुसेन, ओमर खालीद, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे सर्व आर्थिक धागे शोधून काढता आले आहेत.

विद्यार्थी आहेत त्यांच्यावर कशाला कारवाई करता असा साळसूद प्रश्‍न पुरोगामी विचारत होते. यांची जीभ आता त्यांच्याच दाताखाली आली आहे कारण या विद्यार्थ्यांच्या खात्यात अचानक आलेले पैसे कसे आणि का आले हे यांना सांगता येत नाहीये. शाहिनबाग परिसरांतील ए.टी.एम. मधून आंदोलन काळात कसे पैसे काढले गेल्या, कुठल्या खात्यांतून ही रोकड काढल्या गेली याची सारी कुंडली तपास यंत्रणांनी आरोपपत्रांत मांडली आहे.
या निमित्ताने जे.एन.यु. सारख्या विद्यापिठांत चालू असलेली देशविरोधी कारस्थाने उघडकीस आणण्यात मोठे यश तपास यंत्रणांना मिळत आहे. 

जॉर्ज सरोस या क्रिश्‍चन धर्मांतरणासाठी प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीने आपल्या स्वयंसेवी संस्थेद्वारे भारताचे तुकडे करणार्‍या संस्था आणि व्यक्तींसाठी कसा पैसा पुरवला, कपील सिब्बल-इंदिरा जयसिंह सारखे नामंकीत वकीलही याचे लाभार्थी आहेत, पुरोगामी पत्रकारांची एक लॉबी कशी या देशविघातक कृत्यांत गुंतली आहे याचा भांडाफोड स्ट्रिंज नावाच्या  यु ट्यूब चॅनेलवर करण्यात आला आहे. (त्याची लिंक सोबत दिली आहे.)


जेएनयु मधील आझादीचे नारे आठवून पहा. तिथपासून ठळकपणे भारतविरोधी अजेंडा चालवला जात असल्याचे दिसून येते आहे. पाकिस्तानने काश्मिरमध्ये देशविरोधी कारवाया करणे आपण राजकारण म्हणून समजू शकतो. त्याला साथ देणारे देशद्रोही घटक कोण आहेत हे पण आपल्या इतक्या वर्षांनी लक्षात आलेले आहेच.  ‘अर्बन नक्षल’ हा घटकही आपल्याला चांगलाच माहित आहे. त्या विरोधात तपास यंत्रणांना मोठे यश नजिकच्या काळात मिळालेले आहे.

पण आता एक नवाच घटक समोर येतो आहे. पत्रकार, विचारवंत, कलाकार, फोटोग्राफर यांना हाताशी धरून देशाला आतून पोखरून टाकण्याची एक मोहिम चालवली जाते आहे. सामान्य लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करून त्याद्वारे सामान्य जनजिवन विस्कळीत करून टाकायचे, रस्ते ठप्प करायचे, यासाठी स्त्रिया विद्यार्थी यांना पुढे करायचे हा एक विशिष्ट अजेंडा आहे.

ज्या स्ट्रिंज यु ट्यूब चॅनेलचा मी वर उल्लेख केला आहे त्यावरच जीन शार्प यांच्या ‘पॉलिटिक्स ऑफ नॉन व्हायलंट ऍक्शन’ या पुस्तकाची व त्यानूसार विविध देशांत राजकीय अस्वस्थता कशी निर्माण केली जाते याची माहिती दिली आहे.  ती तूम्ही जरूर ऐका.

https://youtu.be/G1cra3xVEZE

आपल्या अगदी आजूबाजूला कुणाही सीएए विरोधकाला विचारा की यात विरोध करावे असे काय आहे? कुणीही त्याचे उत्तर देवू शकत नाही. मग हे शाहिनबाग आंदोलन का चालवले गेले?

अहिंसक पद्धतीनं आंदोलन उभे करायचे पण त्याचा उपयोग मात्र नेमका हिंसा करणार्‍यांना कसा होईल हे पहायचे हे एक अजब धोरण आहे. अगदी आत्ता अमेरिकेत उसळलेल्या हिंसाचाराचाही संदर्भ घेता येईल. कृष्णवर्णीयांची बाजू घेणारे हे अजूनही सांगू शकत नाही की इतका प्रचंड हिंसाचार का आणि कशासाठी? जे महात्मा गांधी पुरोगाम्यांच्या गळ्यातला ताईत आहेत मग त्यांच्याच पुतळ्याची विटंबना अमेरिकेतील या आंदोलनात का करण्यात आली?

दिल्ली दंग्यात 53 लोकांचा मृत्यू झाला आणि 500 च्या जवळपास लोक जबर जखमी झाले. यातील काही पुढे चालून दवाखान्यात मृत्यू पावले. मग या दंग्यांचा सुत्रधार असलेल्या ताहिर हुसेन याची एक तासाची मुलाखत आजतक सारख्या चॅनेलवर का घेतल्या गेली होती? या देशविरोधी चेहर्‍यांना प्रसिद्धी देण्याचे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे उद्योग नेमक्या कुठल्या प्रकारात मोडतात?

ताहिर हुसेन वरील आरोपपत्राने असे भले भले संशयाच्या घेर्‍यात सापडले आहेत.

जामिया मिलीया किंवा जेएनयु विद्यापीठांत हिंसाचार झाला तेंव्हा पुरोगामी असा आरडा ओरडा करत होते की विद्यार्थी निरागस असून बाहेरच्या लोकांनी दंगा केला. खरोखरच पोलिसांनी बाहेरून येवून दंगा करणार्‍या 20 जणांची नावे आरोपपत्रात घेतली आहेत.

जेएनयु मधील विद्यार्थी तर यात आहेतच. विविध व्हाटसअप मेसेज आणि मोबाईल संभाषणे, शिवाय काही व्हिडिओ फुटेज असे पुरावे यांच्या विरोधातील प्राप्त झाले आहेत.

एक समान्य नागरिक म्हणून आपण डोळसपणे या सगळ्यांकडे पहायला पाहिजे. पुलित्झर पुरस्कार मिळाला म्हणून कुणाचे कौतूक करताना त्यामागाचा हेतू आणि हे कुठले फोटो आहेत हे तपासा एकदा. सामान्य परिस्थितीतला मृत्यूही रेल्वे प्रशासनाने केलेला खुन आहे असं कुणी सांगत असेल तर त्यावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा. अहिंसक वाटणारी ही एक वेगळीच लढाई आहे आणि ती आपल्याला जागरूक राहून लढावी लागणार आहे. 
 
    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

6 comments:

  1. Impartial but critical analysis of the facts! Shared on Facebook!

    ReplyDelete
  2. सुंदर विवेचन

    ReplyDelete
  3. खोट्या बातम्यांच्या गजबजाटात सत्य आत्ता वाचायला मिळाले. भयावह परिस्थिती आहे एकंदरीत.
    धन्यवाद !!!

    ReplyDelete
  4. खर सर आपल्या मुळे सत्य कळते आम्हाला

    ReplyDelete