दै. लोकसत्ता 16 नोव्हेंबर 2020 दिवाळी मराठवाडा पुरवणी
विविध सणांना विविध धार्मिक अर्थ चिकटलेले आहेत. परंपरेचा एक भाग म्हणून आपण हे सण साजरे करतो पण काही सण असेही आहेत की त्यांना नात्यांच्या सुंदरतेचा एक अर्थ चिकटलेला आहे. दिवाळीतली भाऊबीज हा सण असाच बहिण भावाच्या नितळ नाजूक सुंदर प्रेमाचे प्रतिक आहे. या दिवशी कसलेही धार्मिक कर्मकांड फारसे नसते. कसली महत्त्वाची पुजाही या दिवशी नसते. असतो तो केवळ बहिण भावाच्या नात्याचा उत्कट संदर्भ.
जात्यावरच्या ओव्यांमधून या सणाचे फार सुंदर संदर्भ आलेले आहेत. आपल्या नवर्याचे, लेकरांचे, आई बापांचे गुण गाणारी ही स्त्री नकळतपणे आपल्या भावा बाबत ओवी गाते तेंव्हा त्यातून तिची भावापोटी असलेली माया प्रकट होते.
बरोबरीचे असलेले बहिण भाउ त्यातील बहिणीचे लग्न आधी होते. मग साहजिकच बहिणीला मुलबाळ आधी होते. यावरची जात्यावरची ओवी फार सुंदर आहे. शेतीच्या पेरणीची सुरवात मृगाच्या पावसानंतर होते. त्या बाबत जात्यावरची ओवी अशी आहे
मृगा आधी पाउस
पडतो राहिणीचा ।
भावाआधी पाळणा
हलतो बहिणीचा ॥
ही बहिण लग्न होवून माहेरी गेलेली आहे. तिला दिवाळीला भाबीजेला माहेरी आणायचं आहे. तिच्या मनाची दिवाळी खरी सुरू होते ती भाउबीजेला. भाऊ किंवा भावाचा पोरगा म्हणजे आपला भाचा आपल्याला नेण्यासाठी यावा अशी तिची मनात घालमेल सुरू आहे.
नवस बोलते । माझ्या माहेरच्या देवा
दिवाळी सणासाठी । भाचा मुळ यावा ॥
दसर्यापरीस । दिवाळी आनंदाची
भाईराजसाची माझ्या । वाट पहाते गोईंदाची ॥
दसर्या पासून । दिवाळी महिना
माझा ग भाईराजा । सखा अजून येईना ॥
भावाची वाट पहाताना ही बहिण व्याकूळ झालेली आहे. तीला सोबतच्या आसपासच्या बायकांना नेण्यासाठी त्यांचे भाउ आलेले दिसत आहेत.
दिवाळीच्या दिवशी। शेजीचा आला भाउ
सोयर्या भाईराजा । किती तुझी वाट पाहू ॥
आपल्या आजूबाजूला लेकी सणासाठी आलेल्या आहेत. त्यांच्या भावांनी त्यांना तातडीने आणून घेतलं आहे. त्यांच्या हसण्यानं घर भरून गेलेलं मी पाहते आहे. त्यांच्या घरातल्या वेलीवर सुंदर फुलं फुलली आहेत. दारात रांगोळ्या सजल्या आहेत. दारावर तोरणं आहेत. पण मी मात्र व्याकूळ झाले आहे. भाऊराया तू अजून मला घ्यायला आला नाहीस.
दिवाळीच्या सनासाटी । लोकाच्या लेकी येती
भाईराजसा माझ्या । तूझ्या बहिनी वाट पाहती ॥
अशी खुप वाट पाह्याल्यावर तो भाउराजा येतो. त्याचा तो थाट पाहूनच बहिण हरखून जाते.
सनामध्ये सन । दिवाळी सन मोठा
बहीण भावंडाच्या । चालती चारी वाटा॥
दसर्या पासून । दिवाळी तीन वार
भाईराजस माझा । झाला घोड्यावरी स्वार ॥
असा हा प्रिय भाऊ बहिणीला घेवून आता निघाला आहे. जेंव्हा तो आपल्या घरी म्हणजे बहिणीच्या माहेरी येतो तेंव्हा तिला झालेला आनंद अपरिमित असतो. आई दारातच तुकडा ओवाळून टाकते. पायावर पाणी घालते.
अंबारीचा हत्ती । रस्त्यावरी उभा
दिवाळीच्या सणाला । मला लुटायाची मुभा ॥
भाच्यांचे कौतूक मामाला असतेच. या पोरांनाही मामाकडून आपले लाड करून घ्यायचे असतात. आजोळावर त्यांना हक्क वाटतो. प्रत्यक्ष भाउबीजेच्या दिवशीचेही मोठे सुंदर वर्णन जात्यावरच्या ओव्यांत आलेले आहे.
भाऊबीजेच्या दिवशी । तबकी चंद्रहार
भाईराजस माझे । वोवाळीले सावकार ॥
दिवाळीच्या दिवशी । ताटामध्ये मोहरा
भाई माझ्या राजसाला । ववाळीले सावकारा ॥
भावाला ओवाळताना बहिण हक्कानं त्याला ओवाळणी मागून घेते. त्यानं दिलेली ओवाळली तिला विशेष महत्त्वाची असते. त्यानं दिलेलं लुगडं त्याची उब तिला आयुष्यभर पुरते.
बाई लुगडं घेतलं । पदरावर मासा
मोल भाउराया पुसा ॥
इतकंच नाही तर तीला जेंव्हा जेंव्हा दारावर आलेल्या चाट्याकडून (विक्रेत्याकडून) काही स्वत:साठी खरेदी करते तेंव्हाही ती त्याच्याशी नाते भावाचे र्जोडते. कारण तीची आवड निवड जाणून जसा भाउ तिला लुगडं घेतो तसे या चाट्यानं तिची आवड लक्षात ठेवावी.
बाई लुगडं घेतलं । पदरावर राघुमैना
चाट्यासंगं भाउपना ॥
जात्यावरच्या ओव्यांत काही ठिकाणी संदर्भ फार खोल अर्थाचे आलेले आहेत. बहिण भावाकडे मागायला जाते ती हक्कानं. त्यात बापाच्या जायदादीत आपला वाटा आहे अशी व्यवहारीक भावनाच केवळ नाहीये. तिला भावाचे भक्कम बळ आपल्या संसाराला हवे आहे. त्याच्याशी तीचे नाते असे विलक्षण आहे. महाभारतात कृष्णाला द्रौपदीचा ‘सखा’ मानले गेले आहे. पण जात्यावरच्या ओव्यात मात्र हा कृष्ण सरळ सरळ भाउच मानला गेला आहे. कारण आमच्या जात्यावरच्या ओव्यांत भावाला ‘सखा माझा भाउराया’ असाच शब्द येतो. त्यामुळे जून्या कवितेत जी ओळ आलेली आहे ती
भरजरी पितांबर दिला फाडून
द्रौपदीचे बंधू शोभे नारायण
अशीच आहे.
या भावाला केवळ साडीचोळीच मागून बहिण समाधानी होत नाही. त्याच्याकडे त्यामुळेच हक्कानं ती अजून भक्कम काही मागत आहे.
दिवाळीची चोळी । जाईल फाटून
भाईराजसा माझ्या । द्यावा दागिना धाडून ॥
दिवाळीची ओवाळनी । काय करावे साडीला
भाईराजसा माझ्या । नंदी होतेल गाडीला ॥
दिवाळीची ववाळनी । काय करावं नथाला ।
भाईराजसा माझ्या । नंदी होतेल रथाला ॥
भावानं आपल्याला बैल द्यावे जेणे करून आपल्या शेतीचे कामे होतील आणि आपल्याही संसारात मोत्याच्या राशी येतील. भावानं आपल्या संसाराचा गाडा रेटण्यासाठी बळ द्यावे. अशी एक भावना या ओव्यांतून व्यक्त होते.
भावा बहिणीच्या नात्यातला एक संदर्भ फारच हृदयद्रावक डोळ्यात पाणी आणणारा आहे. आयुष्यभर नवर्याच्या घरात राबलेली ही बहिण, सासराच्या घराचा ती उद्धार करते, घराला भरभराटीला आणते. तिचा शेवट होतो, तेंव्हा तीची शेवटची इच्छा काय असते? तर आपल्या देहाला माहेरच्या लुगड्यात गुंडाळावं. भावानं शेवटचं वस्त्र आपल्या देहावर पांघरावे.
आधी अंगावं घाला । भावाचं लुगडं
मग उचला तिरडी । मसनात लाकडं ॥
भावा बहिणीच्या उत्कट प्रेमाचे प्रतिक असा हा भाऊबीजेचा सण. याला खुप अनोखे संदर्भ आहेत. प्राचीन काळापासून आयाबायांनी जात्यावरच्या ओव्यांतून या नात्याचे पदर कलात्मकतेने उलगडून दाखवले आहेत.
(या लेखातील जात्यावरच्या ओव्या ‘समग्र डॉ. ना.गो.नांदापुरकर खंड दुसरा’ या ग्रंथातील आहेत. छाया चित्र सौजन्य आंतरजाल)
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575