Saturday, June 15, 2013

मुसा के डासां भौत हे मगर । गोमती के मच्छर नकूच नकू ॥

दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख दि. १५ जून २०१३

स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद राज्यात निजामाच्या दरबारात दोन गट पडलेले होते. स्थानिक भाष बोलणारे, स्थानिक रिती रिवाज परंपरांचे जतन करणारे लोक यांचा एक गट. आणि हैदराबाद राज्याच्या बाहेरून आलेले, फारसी मिश्रीत उर्दू ही सर्वश्रेष्ठ भाषा मानणारे उत्तरप्रदेशातून आलेले लोक यांचा दुसरा गट. उत्तरप्रदेशातील गोमती नदीच्या काठावरील हे बाहेरचे लोक आणि हैदराबाद मधून वाहणार्‍या मुसा नदीच्या काठचे लोक असा तो सुप्त संघर्ष होता. हैदराबाद राज्यात जी भाषा बोलली जाते तीला दखनी म्हणतात. ही भाषा म्हणून उर्दूची लोकभाषा आहे असा एक गैरसमज आहे. वस्तूत: ही भाषा याच परिसरातील स्वतंत्र भाषा असून तिचे व्याकरण बहुतांश वेळा मर्‍हाठीप्रमाणे चालते हे श्रीधरराव कुलकर्णी यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या भाषेत डासांना डासच म्हणतात मच्छर म्हणत नाहीत. झाडाला झाडच म्हणतात. पेड म्हणत नाहीत. बाहेरून आलेले लोक स्वत:ला जास्त शहाणे समजातात म्हणून त्यांना मारलेला हा टोमणा आहे,
मुसा के डांसा भौत है मगर । गोमती के मच्छर नकूच नकू ॥
या दखनी भाषेबाबत श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांचे एक मोठं सुंदर पुस्तक आहे. ‘दखनी भाषा : मर्‍हाटी संस्कृतीचा एक अविष्कार’ या नावाचे. त्यांच्याच ‘साहित्यसेतू’ या पुस्तकाचा संदर्भ मी मागच्या लेखात दिला होता (मराठी ही हिंदीची उपभाषा नसून हिंदीला समृद्ध करणारी भाषा आहे, 1 जून 2013). दखनी भाषेवरचे हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्थेनेनेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकात श्रीधररावांनी मोठ्या चिकाटीनं संशोधन करून दखनी भाषा ही मर्‍हाटी संस्कृतीचा एक अविष्कार कसा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
आधुनिक भारतीय भाषांचा साहित्यातील प्रारंभ साधुसंतांच्या कवनांनी झालेला आहे. ही भाषा कोणती होती? आपआपल्या परिसरात बोलली जाणारी भाषा समजून घेवून साधुसंतांनी त्या भाषेत रचना केल्या. महाराष्ट्रातील मराठवाडा, कर्नाटकातील बीदर, रायचूर, गुलबर्गा हे तीन जिल्हे आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा विभाग यांचे मिळून हैदराबाद राज्य होते. या प्रदेशात साधुसंतांनी ज्या भाषेत रचना केली त्या भाषेला ‘बैरागी’ भाषा म्हटले जाते. गोरखनाथादी सिद्ध आणि त्यांची ‘बैरागी’ भाषा यांचे उल्लेख ‘लीळाचरित्रात’ आलेले आहे.
या दखनी भाषेला उर्दूची बोलीभाषा म्हणून संबोधले जाणे हे मुळातच चुक आहे. दखनी भाषेत उर्दूच्या तीनशे वर्षे आधी काव्यरचना झालेली आहे. म्हणजे बोली भाषा आधी आणि प्रमाण भाषा नंतर असे कसे होईल? या दखनी साहित्याचा प्रारंभ बहामनी राजवटीत ( 1347 -1527) या काळात झाला. 1707 मध्ये मृत्यू पावलेला वली औरंगाबादी हा दखनीचा शेवटचा कवी. वली औरंगाबादीचे आपल्या दखनी भाषेवर विलक्षण प्रेम होते. त्याचबरोबर त्याचा दक्षिण प्रदेश व या परिसरातील मराठी लोक यांच्यावरही विलक्षण जीव होता. त्याची एक रचना मोठी सुंदर आहे.
आज माशुक लडका मरहटा है ।
मिठाई बंद शकरसूं मीठा है ।
सजन है सांवला सजका सजीला ।
कटीवा होर हटीला लटपटा है ।
दखनी भाषेचा मराठी अनुबंध केवळ वरवरचा नाही. तर साधुसंतांच्या काव्यात जे आध्यात्म मराठी संतांनी सांगितले तीच रचना दखनी भाषेतही करण्यात आली.
संत रामदासांच्या ‘मनाच्या श्लोका’चा अनुवाद शाह तूराब यांनी दखनीत केला ही एक फार महत्त्वाची घटना आहे. शाह तुराब (इ.स.1695 ते 1787) या तामिळनाडूतील वेल्लोर  येथील सूफी संताने (याच सुफी संतांची कबर परभणी येथे आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तिथे मोठा उरूस भरतो. अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या उरूसानंतर याच उरूसाचा नंबर लागतो. या सदराचे नावही मी याच संताच्या फेब्रुवारी महिन्यात भारणार्‍या उरूसावरून ‘उरूस’ ठेवले आहे. )
आत्माराम ओळखावा हे रामदासांच्या श्लोकांचे मर्म शाह तुराब यांनी आपल्या भाषेत मोठे सुंदर मांडले आहे
कही देवपूजे कूं मंदिर बनाते
कंही तोड देवल मशीत उंचाते
जिनके आत्मराम का घर पछाना
अरे मन नको रे नको हो दिवाना
तुराब ने नही झूट ये बात बूजा
महादेव होर राम मे नही है दूजा
आपस तो आपी आप को करता है पूजा
पुछो रामदास और को जा ॥
फक्त संतांच्या रचनेतच दखनी शब्द आहेत असं नाही. तर सगनभाऊ सारख्या शाहिरांच्या लावण्यातही दखनी भाषा आणि शब्द आले आहेत. म्हणजेच ही भाषा जनसामान्यांची या परिसरातील भाषा होती हे सिद्ध होते.
दाद कोई नही देता मै तो जोगिन होउंगी ।
राख लावा माझ्या अंगी ॥
हाल हाल फकीरी लेऊ धूंडत बन बन मे जाऊ ।
सख्याला दृष्टीने पाहू ।
प्रीतम प्यारे हो गये न्यारे  बिडा किसे देऊं ।
कोण्या समजूतीने समजाऊ ।
सगनभाउंच्या या रचनेत तर मराठी आणि दखनी ओळी एकमेकांच्या आड आलेल्या आहेत. दखनीत भाषेत जी शब्दांची रूपं येतात ती रूपं सरळ सरळ मराठीसारखीच आहे. मी काय पाप केले म्हणून असा नवरा मिळाला (दखनी-मै क्या पाप करी बोलके ऐसा शोहर मिल्या.) त्याने मी येत नाही म्हणून सांगितले. (उन्ने मै नई आताउ बोलके कह्या.) त्यांना घोडा मिळाला नाही म्हणे (उनकू घोडा नई मिल्या कते.)
इतकंच काय पण वाक्प्रचारही तसेच आहेत. इकडे आड तिकडे विहीर, (इधर बाई उधर कुवां), गर्भगळित होणे (गरब गलना), नाव टाकणे/सोडणे (नांव छोडना), साटे बुद र्‍हाटे (साठी बुद्धी नाठी). आपल्या पुस्तकात श्रीधररावांनी दखनीमध्ये येणार्‍या मर्‍हाटी शब्दांची प्रचंड मोठी यादीच दिली आहे. म्हणजे दखनीचे व्याकरण मराठीप्रमाणे चालते, शब्दांना प्रत्यय मर्‍हाटीप्रमाणे येतात, वाक्प्रचार, म्हणी मराठीसारख्या आहेत. स्वाभाविकच दखनी ही मर्‍हाटी संस्कृतीचा एक देखणा आविष्कार आहे.
या वर्षी औरंगाबादमधली 20 मुलांना तैवानच्या विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवडले गेले. त्यांच्यातला एक विद्यार्थी आकाश धुमणे माझा मित्र आहे. त्याच्याशी एकदा व्हिडीओवर बोलत असताना अचानक माझ्या कानावर ‘रोडां पे मजाका नही करते रे.’ हे वाक्य आले. मी आकाशला विचारले तूझ्या बाजूला कोण मुलगा आहे? तो कुठला आहे? त्याने सांगितले त्याचे नाव अब्रार असून तो औरंगाबादचाच आहे. त्याची ही भाषा आम्हाला खुप आवडते. इतकंच नाही तर या दखनी भाषेतील ‘अंग्रेज’ हा चित्रपट सध्या आम्हा दोस्तांमध्ये हिट आहे.
बहामनी साम्राज्यात विकसित झालेली दखनी आजच्या काळात परदेशात शिकणार्‍या 19-20 वर्षांच्या मुलांनाही खुप आवडते. इतकंच नाही तर या भाषेत चित्रपटही निघतात. ते लोकप्रियही होतात. अशा एका भाषेत आपल्या मर्‍हाटी भाषेचे मोठे योगदान असते हे आमच्या लक्षातच येत नाही. आजच्या मराठी मुलांनाही या भाषेचे आकर्षण आहे.
मध्यंतरी प्रसिद्ध मर्‍हाटी पटकथाकार अभिनेते अरविंद जगताप याने अभिनेता सयाजी शिंदे सोबत आपला एक फोटो फेसबुकवर टाकला. ‘फलकनुमा पॅलेस मध्ये मी सयाजी सोबत’ असं त्या फोटोखाली लिहीलं होतं. फलकनुमा पॅलेस म्हणजे हैदराबाद हे माझ्या लक्षात आले. मी त्याच्यावर गमतीने दखनी भाषेत एक शेरा टाकला, ‘क्या मियां, सफेद शर्टा, जिन्स के पँटा पहेन के फलकनुमा पॅलेस मे क्या करे? वेटर ने रात की बिर्यानी सुबह गरम करके दी तो नही बोले और वेटरां को फल्ली का सुखा सालन (शेंगदाण्याची कोरडी चटणी) मांग मांग के परेशान किये..’ या शेर्‍यावर बहुतांश मर्‍हाटी तरूण मुलांनी आपल्या आवडीची मोहोर उमटवली.
आज भाषा नविन संपर्काच्या साधनांनी जगभर अतिशय कमी वेळात पोचत आहे. आपल्या मनातील भाव व्यक्त करायला आधुनिक तंत्रज्ञान शिकणार्‍या अब्रारसारख्या विद्यार्थ्यालाही ‘रोडां पे मजाकां नही करते’ हेच शब्द वापरावे वाटत असतील आणि त्याच्या मित्रांनाही ती भावना याच शब्दांतून तंतोतंत समजून येणार असेल तर आपण काय म्हणणार? आपण हे समजून घेणार आहोत की नाही?

Sunday, June 9, 2013

नांदापुरकर । तूम्हास स्मरणे । मराठी कारणे । अनिवार्य॥

दैनिक महाराष्ट्र टाइम्स दि. ९ जुन २०१३ मधील लेख 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या औरंगाबाद येथील सभागृहास डॉ. नांदापुरकरांचे नाव दिलेले आहे. त्यांचे एक तैलचित्र तिथे लावले आहे. शिवाय ‘माझी मराठी मराठाच मीही’ ही नांदापुरकरांची ओळ मराठवाडा साहित्य परिषदेच्या बोध चिन्हावर बोधवाक्य म्हणून विराजमान आहे. साहित्य परिषदेतील एका कार्यक्रमात एक तरूण पत्रकार मला बाजूला घेवून दबक्या आवाजात म्हणाला, ‘‘सर माफ करा पण हे नांदापुरकर कोण होते हो? मला खरेच माहित नाही.’’ मी त्याला थोडक्यात माहिती दिली. त्याच्याशी बोलताना माझ्या प्रकर्षाने लक्षात आले की नांदापुरकरांनी मराठीसाठी बाळगलेला ध्यास पाहता त्यांची आठवण आजच्या काळात परत तीव्रपणे येते आहे.
डॉ. नारायणराच नांदापुरकर तेंव्हाच्या हैदराबाद राज्यातील मराठीचे पहिले पीएच.डी.मराठी विषयात संशोधन करण्याची सोय तेंव्हा या प्रदेशात नव्हती. नांदापुरकरांनी ही डॉक्टरेट नागपूर विद्यापीठातून मिळवली. नांदापुरकरांच्या या कतृत्वाने संपूर्ण मराठवाड्याला आनंद झाला. त्यांचे सत्कार करण्यात आले. परभणीच्या जनतेने त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना रू. 1000/- ची थैली त्या काळी अर्पण केली.
नांदापुरकरांचा जन्म नांदापुर या गावी (तेंव्हाचा परभणी जिल्हा, ता. कळमनुरी) 14 सप्टेंबर 1901 रोजी झाला. गावातील प्राथमिक शिक्षणानंतर हैदराबाद येथे माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतले. परभणीतून मॅट्रिकची परिक्षा दिली.  आणि हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळवली. नांदापुरकरांचा औरंगाबादशी पहिल्यांदा निकटचा संबंध आला तो त्यांच्या नौकरीच्या निमित्ताने. औरंगाबाद येथे इंटरमिजिएट महाविद्यालयात त्यांनी अध्यापकाची नौकरी काही काळ केली. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. काही काळानंतर त्यांची नियुक्ती मराठी विभाग प्रमुख म्हणून झाली. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते उस्मानिया विद्यापीठाच्या मराठी विभागातच कार्यरत होते.
डिसेंबर 1995 मध्ये परळी वैजनाथ येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. नांदापुरकरांनी भूषविले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप करताना नांदापुरकर म्हणाले होते, ‘...मराठवाडा स्वत:चे कांही वैचारिक, तांत्रिक, साहित्यीक धन एकंदर महाराष्ट्रास देऊ शकतो. एकंदर जनता जरी मागासलेली असली तरी तरुण सुशिक्षित वर्ग एकंदर महाराष्अ्रांतील तरुणांची सर्वच प्रकारांत समानतेने स्पर्धा करणारा दिसून येईल. संधी आणि साधने मिळाल्यास एकंदर महाराष्ट्रीय समाजांत एकरूप होऊन जाण्यास कांहीच अवकाश नाही.’नांदापुरकरांचा हा आशावाद आजही वास्तवात उरतलेला नाही. तो अजूनही आशावादच उरला आहे हे वेगळे सांगायची काही गरजच नाही.
नांदापुरकरांबद्दल सामान्य मराठी जनांना आस्था वाटायची त्याचे कारण त्यांची विद्वत्ता हे तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांनी लोकगीतांसंदर्भात केलेले काम हे आहे. मराठवाड्यात सर्वत्र फिरून नांदापुरकरांनी लोकगीते गोळा केली. जात्यावरच्या ओव्यांमधून आख्खे रामायण उभे करण्याचा त्यांचा प्रकल्प तर केवळ अप्रतिम. जागतिक वाङ्मयातील ही एकमेव घटना आहे. आभिजात वाङ्मय म्हणविल्या गेलेले रामायण, सर्वसामान्य बायकांच्या तोंडी असलेल्या अलिखित ओव्यांमधून पूर्णपणे उभे कसे राहते, त्याचे विविध मानवी पैलू कसे समोर येतात हे थक्क करणारे आहे.
जनाबाईच्या गंगाखेड परिसरात जनाबाई, विठ्ठल आणि रूक्मिणी यांच्यावरील अप्रतिम ओव्या नांदापुरकरांना सापडल्या आहेत. स्त्रीच्या मत्सरग्रस्त स्वभावानुरूप रूक्मिण विठ्ठलाला विचारते, ‘इठ्ठलाचे पाय ।  रूक्मिण दाबी राग । खरं सांगा इठ्ठला । जना तूमची कोन लाग ॥ याला विठ्ठलाने दिलेले उत्तर बायकांनीच ओव्यात सुंदररित्या मांडलं आहे. ‘इठ्ठल मनीती । नको रक्मिनी राग करू । जना धर्माचं लेकरू । आलं थार्‍याला पाखरू ॥
 नांदापुरकरांनी गोळा केलेल्या या ओव्यांतून ‘मराठवाड्यातील स्त्री रचित रामकथा’ हा ग्रंथ डॉ.सौ. उषा जोशींनी संकलीत केला आणि हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने त्याचे 1990 मध्ये प्रकाशन केले. बरं या ओव्या नुस्त्या माहितीपर नाही. तर त्यातून एक कलात्मक जाणिवही नांदापुरकरांनी दाखवून दिली आहे.
दारी मांडव ग घाला । फुलासगट जाईचा । छंद रामाच्या आईचा ॥
या ओवीतील रामाची आई कौसल्या नुसत्या मांडवाचा आग्रह धरत नसून फुलासगट जाईच्या मांडवाचा आग्रह धरते आहे. दशरथाला मिळालेले दान त्याने पायसाचे तीन वाटे करून तीन राण्यांना दिले. त्याचे चार पुत्र कसे झाले याची एक सुंदर कथा बायकांनी रचली आहे.
कैकयी रूसली । मागल्या मानासाठी । पिंड घारीनं झपाटिली । नेली आकाशाच्या पोटी ॥
पिंड घारीनं झपाटिली । पडली अंजनीच्या हाती । त्याचे जन्मले मारोती ॥
कौसल्या सुमित्रानं । पिंड वाटून दिले । येका पिंडा दोघं झाले । भरत शत्रुघ्न ॥
बायकांच्या या रचनांमधील सौंदर्य नांदापुरकरांना सापडले. त्यांनी ते मोठ्या मेहनतीनं गोळा केलं आणि जगाच्या नजरेसमोर आणले. या कामासाठी त्यांच्याबद्दल सामान्य जनांना आस्था वाटत राहिली.
‘मायबोलीची कहाणी’ नावाची एक गद्य कविता नांदापुरकरांनी लिहीली. ती तर केवळ अप्रतिम. आजही मराठी भाषेसंदर्भात असले गद्य काव्य दुसरे निर्माण झाले नाही. गद्य भाषेत जी एक नितांत सुंदर लय असते त्याचा अनुभव नांदापुरकरांच्या या रचनेत येतो. मराठीमध्ये लीळाचरित्राचे गद्यकाव्याचे सगळ्यात मोठे उदाहरण आहे. गद्य काव्याचे प्रयोग फार थोडे झाले आहे. अगदी अलिकडच्या काळात भालचंद्र नेमाडेंच्या हिंदूमध्ये हा प्रयोग नेमाडेंनी मोठ्या ताकदीने केला आहे.
नांदापुरकर मराठी भाषेची जन्म कथा सांगताना लिहीतात,
‘देवाने तिच्यासाठी महाराष्ट्राचा पाळणा केला. त्यावर आपल्या कृपेचा चांदवा केला. त्याला सह्य आणि सातपुड्याची खेळणी लटकाविली. चांदव्याच्या भवती वनश्रीची झालर लाविली. कृष्णा-गोदा यांचा गोफ विणून पाळण्याला हालविण्यासाठी दोरी केली. इकडून मातापुरवासिनी रेणुका आली. तिकडून तुळजापुरची आई भवानी आली. त्यांनी पाळणा म्हटला. साधुसंतांनी तिचे नाव ’मराठी’ असे ठेविले. बाळांनो, हीच तुमची माय मराठी- आमची कहाणी थोडी, तिची अवीट गोडी.
ही कहाणी ऐकल्याने काय होते? अंगीचा आळस जातो, कर्तृत्वाचा कळस होतो. मोठ्यांचा दूरभिमान जातो. लहानाअंगी स्वाभिमान येतो. देशाचे दारिद्य्र दूर होते. काशीची कावड रामेश्वराला जाते. गंगथडीचा हुरडा काबुलात भाजतो. काबूलचा मेवा परसात पिकतो. ’
मराठी भाषेची महती सांगताना विश्वात्म भान नांदापुरकर विसरले नाहीत. गंगथडीचा हुरडा काबुलात भाजतो म्हणत त्यांनी हे धागे जोडले आहेत.
डॉ. ना.गो.नांदापुकरांचे समग्र साहित्य त्यांच्या जन्मशताब्दि वर्षात प्रकाशित करण्याचा प्रकल्प हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने हाती घेतला. त्याला काही अडथळे आले तेंव्हा प्रकल्पाचे मुख्य संपादक प्रा.द.प.जोशी यांनी माझ्यापाशी हे काम पूर्ण होते की नाही याबद्दल खंत व्यक्त केली. मी स्वत: हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो म्हणून त्यांना आश्वासन दिलं व त्याप्रमाणे कामही सुरू केलं. योगायोगाने महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वेगळा निधी मंजूर केला. आम्ही सादर केलेला वेगळा प्रस्ताव मागे घेवून मी त्या प्रकल्पात सह-संपादक म्हणून सामिल झालो. ऑक्टोबर 2004 मध्ये समग्र नांदापुरकरांच्या दोन्ही खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. आज नांदापुरकरांचे सर्व साहित्य अभ्यासकांना उपलब्ध आहेत. वाईट याचेच वाटते नविन पिढीत नांदापुरकरांच्या साहित्याचा अभ्यास करणारे फारसे कुणी आढळत नाहीत.
आम्ही नांदापुकरांच्या नावे सभागृह केले, त्यांच्या नावाची व्याख्यानमाला चालवून साहित्य परिषद आपले कर्तव्य चोखपणे पार पाडते आहे. पण त्यांच्या साहित्याचे काय? त्याचा अभ्यास कोण करणार?
9 जून 1959 रोजी नांदापुरकरांचे निधन झाले. त्यांनी मराठीसाठी बाळगलेला ध्यास, मेहनतीने लोकगीते गोळा करून केलेले काम याचे महत्त्व आजही वाटते. जी ओळ मराठवाडा साहित्य परिषदेचे बोधवाक्य झाली आहे त्या कवितेतील काही ओळी कायमच्या स्मरणात राहणार्‍या आहेत.

माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे

आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळी ना कुणा
आकंठ प्यालो हिचे दुग्ध अंगी पहा रोमारोमांतुनी या खुणा
तोडा चिरा दुग्ध धाराच येती न हे रक्त वाहे शरीरातूनी
‘माझी मराठी मराठाच मी ही’ असे शब्द येतील हो त्यातुनी

मराठीचा द्वेष करणार्‍या निजामी राजवटीच्या काळात नांदापुकरांनी आपले भाषाभान जागते ठेवले आणि भाषेसाठी काम केले. आज कमालीची अनुकूलता असताना आणि स्वभाषा राजभाषा कसताना आम्ही काय करतो हा प्रश्न प्रत्येकालाच पडला पाहिजे. त्यासाठीच म्हणावे वाटते
नांदापुरकर । तूम्हास स्मरणे । मराठी कारणे । अनिवार्य ॥
  
 

Saturday, June 1, 2013

मराठी ही हिंदीची उपभाषा नसून हिंदीला समृद्ध करणारी भाषा आहे


दै. कृषिवल, उरूस सदरातील माझा लेख, दि. 1 जून 2013


‘मराठी ही हिंदीची उपभाषा आहे’ अशी चर्चा सध्या माध्यमांमधून सुरू आहे. हिंदीचे मोठेपण ठरवित असताना मराठीला दुय्यम स्थान देण्याची खरे तर काही आवश्यकता नाही. कुठलाही मराठीभाषाप्रेमी हे सहन करू शकत नाही. या संदर्भात काही पुस्तके चाळत असताना मला श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘साहित्यसेतू’ या पुस्तकाची आठवण झाली. मराठी संतांच्या हिंदी काव्याची मीमांसा असे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. मराठी ही हिंदीची उपभाषा तर सोडाच पण हिंदीतील भक्तीसाहित्याची निर्मितीच मुळात नामदेवांपासून झाली असा सिद्धांत श्रीधरराव कुलकर्णी यांनी मांडला आहे. म्हणजे आत्तापर्यंत बचाव करण्याच्या मानसिकतेत मराठी भाषीक होते पण आता तर हे सगळे संदर्भ बचावाचे नसून उलट हिंदीला मराठीने जे योगदान दिले त्याचे आहेत. शिवाय मराठीची परंपरा स्वतंत्र आणि समृद्ध आहे.
12 व्या शतकापर्यंत सिद्धसंप्रदाय भारतभर अस्तित्वात होता. आदीसिद्ध सरहपा हे आठव्या शतकातील. गोरखनाथांनी यांच संप्रदायास लोकाभिमुख करत पुढे नेले. ज्ञानेश्वरांना हीच गुरूपरंपरा लाभली. नामदेव याच परंपरेचे पाईक. त्यांनी सिद्धांच्या भाषेत रचना केली. ते भारतभर फिरले. नामदेवांची हिंदीसदृश्य काव्याची  भाषा व कबीरांची भाषा यात विलक्षण साधर्म्य आहे. पुढे कबीर व नानक यांनी नामदेवांचा केलेला जो गौरव आढळतो त्यावरून हे अधोरेखीत होते.
डॉ. रामकुमार वर्मा यंाच्या ग्रंथातील मत श्रीधररावांनी दिले आहे, ‘इस प्रकार कहा जा सकता है कि उत्तर भारत मे संतसंप्रदाय का जो उत्थान वैष्णव भक्ति को लेकर हुआ उसका पूर्वार्ध महाराष्ट मे विठ्ठल संप्रदाय के संतो द्वारा प्रस्तूत हो चुका था, जिन मे ज्ञानेश्वर और नामदेव प्रमुख थे.’
भारतातीलच नव्हे तर परदेशातील विद्वानांनीही उत्तर भारतातील संत साहित्याचा अभ्यास करताना आपले निष्कर्ष नामदेवाच्या बाजूने मांडले आहेत. कलव्हर्ट यांनी हिंदी पदांची पुरातन हस्तलिखिते गोळा केली. त्यात नामदेवांची 258 पदे असून आपल्या प्रस्तावनेत त्यांनी पंजाब-राजस्थान या भागातील भक्तिसाहित्यातील भाषेच्या तुलनेत या पदांची भाषा पुरातन असल्याचा निर्वाळा दिला आहे.
खुद्द कबीरानेच आपल्या दोह्यात नामदेवांची महती वर्णन केली आहे.
तन मन कौ खोज हु रे भाई, तन तूहे मन कहां समाई ।
सनक सनंदन जैदेव नामा, भगति करि मन उनहूॅन जाना ॥ (कबीरग्रंथावली 77)
बर्‍याच मराठी संतांनी त्यात एकनाथ, रामदास, तुकाराम यांचा समावेश आहे हिंदी रचना केल्या आहेत. आपण ज्याला आज हिंदी भाषा म्हणतो ती तेंव्हा अस्तित्वात नव्हती. नागरी हिंदी म्हणून जी भाषा आहे ती एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी अस्तित्वात आली. हिंदीच्या जवळची ‘खडी बोली’ ही भाषा पूर्वी अस्तित्वात होती. अमीर खुस्रो हा या खडी बोलीचा पहिला कवी समजण्यात येतो. अमीर खुस्रोची भाषादेखील सोळाव्या-सतराव्या शतकानंतरची भाषा आहे. हिंदी भाषेचे प्रादेशिक भेद असलेल्या व्रज, अवधी या भाषांतूनदेखील नामदेवांच्या काळात साहित्यनिर्मिती झाली नव्हती.
आपल्या भाषेसोबत आपल्या गुरूच्याही भाषेत काव्यरचना करण्याची परंपरा फक्त मराठीतच आढळते. इतर भाषांतील संतसाहित्यात अशी द्विधारा आढळत नाही. त्यामुळे नामदेवांनी आपली गुरू परंपरा मानून सिद्धांच्या भाषेत काव्यरचना केली. आपले कार्य आपल्या भाषेपुरतेच मर्यादित न राहता ते विश्वात्मक रहावे ही भावना नामदेवांची होती याचा हा पुरवाच होय.
नामदेवांनी इ.स. 1350 मध्ये समाधी घेतली. नामदेवांनी आयुष्याची जवळपास शेवटची चाळीस वर्षे महाराष्ट्राबाहेर घालवली. राजस्थान आणि पंजाब या भागात त्यांना मोठा शिष्यसंप्रदाय लाभला.
नामदेवांच्या नंतर संत एकनाथांनी या भाषेत मोठी महत्त्वाची रचना करून ठेवली आहे. म्हणजे हिंदी संत साहित्यात मराठी संतांचे मोठे योगदान आहे हेच आम्हाला माहित नसते.
हिंदू तुर्क संवाद नावाची रचना एकनाथांची मोठी प्रसिद्ध आहे
ब्राह्मण म्हणे अहो जी स्वामी । वस्तुत: एक तुम्ही आम्ही ।
विवाद वाढला न्याती धर्मी । जात परब्रह्मी असेना ।
तुरक कहे वो बात सही । खुदा कू तो जात नही ।
बंदे खुदा नही जुदाई, वोक्या रसुलिल्ला हजरत परदे ।
सर्व धर्म ज्याचा निमाला । मनोधर्म तुरक ऐकिला ।
आनंद परम झाला । मंत्र उपदेश केला ॥
गाडगेबाबांच्या एका अशा किर्तनाचे मोठे सुंदर वर्णन गो.नि.दांडेकरांनी केले आहे.
एकनाथांच्यानंतर दासोपंतांनी सिद्धांच्या भाषेत किंवा हिंदीसदृश्य भाषेत रचना केल्या आहेत. न तू जुदा या नावाची त्यांची अद्वैताची मांडणी करणारी रचना तर अप्रतिम आहे.
न तू है जुदा न तुझ मे है जुदाई
जुदाई बुझे तब दिगंबर खुदाई ॥
या ओळी तर नितांत सुंदर आहेत.निर्गूण तत्त्वज्ञान सांगणार्‍या इस्लामला तंतोतंत लागू पडतात. जेंव्हा जुदाई संपते तेंव्हाच खुदाई भेटते हाच अद्वैताचा संदेश आपल्या संतांनी इस्लामच्या परिभाषेत इथल्या सामान्य जनतेलाही समजावून सांगितला. जेंव्हा की इस्लामला अद्वैत मंजूर नाही असा वरवरचा निष्कर्ष काढला जातो.
तुकाराम महारांनी तर ही भाषा वापरलीच पण आपल्या भाषेतील शब्दप्रयोग वापरून मातृभाषेचा गौरवही दुसर्‍या भाषेत नेला आहे.
मेरे राम के नाम जो जो लेवे बराबर ।
त्या के पाऊ मै तन की पैजार ॥
जातन सु मुजे कछू नही प्यार ।
आसते के नहि हिंदू धेड चांभार ॥
कातड्याचे जोडे करून तूमच्या पायी घालेन हा मराठी वाकप्रचार तुकाराम तसाच हिंदीत वापरतात. त्याप्रमाणेच आमच्यात (वारकरी संप्रदायात) जातपात न मानण्याची रीत नाही याचाही स्पष्ट उल्लेख ते करतात. 
रामदासांनी हिंदीसदृश भाषेत रचना करताना रागांचाही विचार केला आहे. म्हणजे तेंव्हा जी परिभाषा प्रचलित होती व्रज भाषेत रागांच्या चीजा रचण्याची त्याचीही जाण रामदासांनी होती. म्हणजे आमचे संत सामाजिक दृष्ट्या तर या रचना करीतच होते पण त्यांना कलेचीही जाण होती.
खमाज रागातील रामदासांनी रचना मोठी सुंदर आहे.
ये भाई काहे कू लडते, लडते सब पडते ॥
एक ही जमीन एक ही पानी एक आतश आसमान ।
येक मे हूं अलम चलाता ये ही चांद सुभाना ।
गैबी सोही एक इलाही पंचभूत भूतखाना ।
अजब महजब इस मे है रे ये तो सब कुफराना ।
अलामिया एक जुदा नही रे गैबी बाट सूं जावे ।
कुफराना म्हणजे पाखंड, अधर्म.हिंदू मुसलमान हा भेद पाळणे म्हणजेच पाखंड आहे असा सणसणीत टोला रामदास मारतात. 
नामदेव सारख्या एका मराठी संताला हिंदी भक्तीकवितेचा आद्य कवी मानण्यात येते. हिंदी भाषेबाबत मराठीचे हे जे मोठे योगदान आहे त्याबाबत आपल्याला जाणीव नसते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्रीधरराव कुलकर्णींचे संशोधन मोलाचे ठरेल असे मला वाटते. श्रीधरराव कुलकर्णींचे ‘साहित्यसेतू’ पुस्तक मराठी ही हिंदीची उपभाषा नसून मराठी ही हिंदीलाही समृद्ध करणारी समर्थ भाषा आहे ही जाणीव करून देते.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.  

Saturday, May 18, 2013

कन्नड साहित्यिक - विरोध झुंडशाहीचा! मराठी साहित्यिक - स्वीकार थंडशाहीचा!!


दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख दि. १८ मे २०१३


  • नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांत कन्नड साहित्यिकांनी झुंडशाहीच्या विरोधात रोखठोक आणि स्पष्ट अशी भूमिका घेतली. राजकीय भूमिका घेताना कुठलीही संदिग्धता कन्नड साहित्यिकांच्या मनात नव्हती, प्रसंगी झुंडशाहीचा आधार घेणार्‍या राजकारण्यांना चार कडवे बोल सुनावण्यात ते मागे हटले नाहीत. या पार्श्वभूमीवर मोठी चर्चा मराठी साहित्यिकांच्या संदर्भात माध्यमांमधून चालू आहे. कवियित्री प्रज्ञा पवार यांनी झुंडशाहीच्या विरोधात मराठी साहित्यिक स्पष्ट भूमिका घेत नाहीत, असा आरोपच केला आहे. आता खरे तर प्रज्ञा पवार यांना याचे प्रत्यंतर जानेवारी महिन्यात संपन्न झालेल्या चिपळूणच्या साहित्य संमेलनातच आले होते. कार्यक्रम पत्रिकेवर एकाही साहित्यिकाचे नाव नाही. संपत्तीचे उघड विकृत प्रदर्शन करणारे, भ्रष्टाचार करणारे मंत्री दिमाखात वावरत होते. कवी संमेलनाचे अध्यक्षपद नाकारून प्रज्ञा पवार यांनी आपला बाणेदारपणा दाखवला; पण इतर एकसुद्धा साहित्यिक राजकीय नेत्यांच्या विरोधात काहीएक स्पष्ट भूमिका घेऊन संमेलनाकडे फिरकला नाही, असे घडले नाही. स्वत:ला फुले, शाहू, आंबेडकरांचा वारस मानणारे नागनाथ कोत्तापल्ले मोठ्या उत्साहात स्वत:ला अध्यक्ष म्हणून मिरवून घेत राहिले. मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनीही कुठलीच जाहीर भूमिका घेतली नाही. सांगलीच्या साहित्य संमेलनात राष्ट्रपतींच्या उपस्थितीचा गाजावाजा करत साहित्यिकांना बोलायची संधी नाकारल्या गेली. याबाबत जाहीर भूमिका घेत अरुण साधू यांनी संमेलनास न जाणे पसंत केले. परिणामी, मावळत्या अध्यक्षांकडून उगवत्या अध्यक्षांकडे द्यावयाची सूत्रे कशी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कौतिकराव ठाले पाटलांनी स्वत:च्या हस्ते सूत्रे देऊन हौस भागवून घेतली. अरुण साधूंनी घेतलेली ही भूमिका त्यांच्याच विदर्भाचे पुरोगामी चळवळीत असलेले वसंत आबाजी डहाके यांना मात्र घेता आली नाही. मग प्रज्ञा पवार तुम्हीच सांगा इथे स्वत:ला मिरवण्याच्या जागा आहेत. मंच आहेत- ते या मोठमोठ्या लोकांना नाकारता येत नाहीत, तर झुंडशाहीच्या विरोधात बोलण्याची काय गोष्ट करता?
  • आम्हा मराठी साहित्यिकांचं खरं आणि मूलभूत धोरण हे थंडशाहीचं आहे. म्हणजे काय होतं, कुठून कुठून सन्मान चालून आले, गौरव चालून आले की, आम्हाला अगदी राहावत नाही. नाही कसं म्हणणार? असं म्हणत म्हणत आम्ही भल्या भल्या नेत्यांच्या सोबत सुहास्य वदनाने त्यांच्या हातून मोठमोठे पुरस्कार स्वीकारतो. प्रसंगी त्याच नेत्यांना सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल जाहीर पाठिंबाही देतो, कारण एकच आणि ते म्हणजे आमचे अधिकृत धोरण ‘थंड’शाही.
  • प्रज्ञा पवार तुम्ही आम्हाला हे बंडशाहीचे धडे कशाला शिकवत आहात? ते काही आम्हाला पचणारे नाहीत! खरे तर पुराणातल्या गोष्टी पुराणातच ठेवल्या पाहिजेत त्याप्रमाणे नंतर निर्माण झालेलं संत साहित्य आणि त्यातल्या गोष्टीही अशाच पुस्तकातच ठेऊन दिल्या पाहिजेत, हे आमचं ठाम मत आहे. आता हेच बघा ना, संत तुकाराम यांच्या रचना आम्ही अभ्यासतो, वाचतो, प्रसंगी भाषणं करताना सटा सट तुकारामांची वचने श्रोत्यांच्या तोंडावरती फेकतो, त्यांना चकीत करतो; पण तुम्ही जर आम्हाला तुकाराम महाराजांसारखी कृती करायला सांगाल, तर ते मोठं अवघड आहे. आता हेच बघा ना, असं म्हणतात की, शिवाजी महाराज संत तुकारामांच्या गावी गेले आणि त्यांना गौरविण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला :

तुम्हापाशी आम्ही । येऊनिया काय ।
वृथा आहे सीण । चालण्याचा ॥
मागावे हे अन्न । तरी भिक्षा थोर ।
वस्त्रासी हे थार । चिंध्या बिंदी ॥
निद्रेसी आसन । उत्तम पाषाण ।
वरी आवरण । आकाशाचे ॥
येथे काय करणे । कवनाची आस ।
वाया होय नाश । आयुष्याचा ॥
राजगृहा यावे । मानाचिया आसे ।
तेथे काय वसे । समाधान ॥
रायाचीये घरी । भाग्यवंता मान ।
इतरा सामान्य । मान नाही ॥
देखोनिया वस्त्रे । भूषणाचे जन ।
तात्काळ मरण । येते मज ॥
ऐकोनिया मानाल । उदासता जरी ।
तरी आम्हा हरी । उपेक्षीना ॥
आता हेची तुम्हा । सांगणे कौतूक ।
भिक्षे ऐसे सुख । नाही नाही ॥
तप व्रत याग । महा भले जन ।
आशा बद्ध हीन । वर्तताती ॥
तुका म्हणे तुम्ही । श्रीमंत मनाचे ।
पूर्वीच दैवाचे । हरिभक्त ॥
(सार्थ तुकाराम गाथा, ढवळे प्रकाशन, पृष्ठ 961, क्षेपक अभंग क्र. 82)


  • आता हा अभंग आम्हा साहित्यिकांना किती गैरसोयीचा? बरं आमचा बाणा ‘थंड’शाहीचा! त्यामुळे आम्ही थंड डोक्याने भरपूर (?) अभ्यास केला. भरपूर विद्वानांनी भरपूर डोके लावले आणि सगळ्यांनी मिळून ठरवले हा अभंग प्रक्षिप्त आहे. तेव्हा आम्ही थंडशाहीवादी साहित्यिक सर्वसामान्य वाचकांना हेच सांगू इच्छितो, असले प्रक्षिप्त अभंग आम्ही मानत नाही, परिणामी त्याप्रमाणे आचरण करण्याची आमची जबाबदारी नाही. पारंपारिक गाथांमध्ये हे अभंग क्षेपक अभंग म्हणूनच आम्ही अजूनही ठेवले आहेत. तुमचे नशीब थोर की हे अभंग गाळूनच टाका असे आम्ही म्हटलेले नाही.
  • तेव्हा प्रज्ञा पवार तुम्ही आम्हाला झुंडशाही विरोधात भूमिका घ्यायचा आग्रह करू नका. अहो काय होतं, झुंडशाहीच्या विरोधात भूमिका घेतली की, फार मोठी पंचाईत होऊन बसते. त्या कन्नड साहित्यिकांना काय लागतं? ते आपले झुंडशाहीच्या विरोधात भूमिका घेतात आणि प्रामाणिकपणे साहित्य निर्मिती करत बसतात! मग त्यांच्याकडून मोठमोेठं लिखाण होतं आणि त्यांना ज्ञानपीठ-बिनपीठसारख्या पुरस्कारांच्या लॉटर्‍या लागतात. भैरप्पासारखे कादंबरीकार त्यांच्याकडचे - त्यांच्याकडे तर वाचले जातातच; पण इकडे मराठीत येऊनही त्यांना मोठा वाचकवर्ग मिळत जातो. आता तुम्हीच सांगा, याचा काय बरे उपयोग? साहित्य सेवा म्हणजे कशी तर गल्लीतल्या नगरसेवकापासून ते मुंबईतल्या मंत्र्यांपर्यंत किंवा दिल्लीतल्या केंद्रीय मंत्र्यापर्यंत कोणत्या तरी मोठ्या आमदार मंत्रीपदाची झुल पांघरलेल्या गुंड, भ्रष्टाचारी माणसाला पकडायचे, त्याच्याकडून ‘भव्य’ प्रमाणात संमेलनाचे आयोजन करायचे, सर्व साहित्यिकांची उत्तम ‘बडदास्त’ ठेवायची. प्रत्यक्ष भाषणे किंवा कविता कशाही होवोत, स्मृतिचिन्ह मात्र जोरदार द्यायचं! संमेलन घडवून आणणार्‍या साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची सगळ्यांत चांगली ‘सोय’ ठेवायची हीच खरी साहित्य सेवा! यातले काही त्या कन्नड साहित्यिकांना जमते का? त्यांच्याकडे मोठमोठी साहित्य संमेलने भरतात का? शासनाच्या पैशाने फुकटात विश्‍व संमेलनाला गेल्याशिवाय आणि तिथे ‘मसाज’ करून घेतल्याशिवाय मराठी भाषेला आणि साहित्य संस्कृतीला ‘साज’ चढणार कसा? 
  • आता हे सगळं त्या कन्नड लेखकांना कोण सांगणार? ते बसले आपले बोंबलत झुंडशाहीच्या नावाने! अरे, इकडे बघा जरा, वेगवेगळ्या बँकांमधले घोटाळे, सिंचनाचे घोटाळे, बांधकाम विभागातले घोटाळे याच्या तोडीस तोड आम्हीही आता साहित्य महामंडळात ‘सह्या’जी रावांचे अनोखे प्रयोग सुरू केलेले आहेत. साहित्य संमेलनातल्या बिलांचे आकडे इतरांच्या तुलनेत भले छोटे असोत; पण आमची वृत्ती मात्र मोठमोठे घोटाळे करणार्‍यांपेक्षा थोडीसुद्धा कमी नाही. हे सगळं केल्याशिवाय मराठी साहित्याची सेवा करणार कशी? र्‍हस्व आणि दीर्घचे नियम जराही माहीत नसलेल्या माणसाला मराठी भाषा सल्लागार समितीवर नेमल्याशिवाय मराठी भाषा आणि संस्कृतीला ‘गार’ कसे करता येईल? तेव्हा कन्नड साहित्यिकांनो हे असले झुंडशाहीचे विरोधात बोंब मारून त्रास करून घेणे आम्हाला कदापीही मंजूर नाही.
  • साहित्य संमेलन, साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांना मिळणारा शासकीय व इतर निधी यांचा मलिदा खाऊन सर्व साहित्य सांस्कृतिक संस्था आम्ही ‘गार’ केलेल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच आमचे अधिकृत धोरण हे ‘थंड’शाहीचे आहे. हे तुम्हाला कळत कसे नाही? तुम्हाला जे काही साहित्य-संस्कृतीच्या नावानं बोंबलायचे आहे ते खुशाल वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे यांतून बोंबला, करोडो रुपयांचे घोटाळे करून हसर्‍या चेहर्‍याने, शांतपणे सत्ता भोगणार्‍यांचे ‘आदर्श’ आमच्या समोर आहेत. नव्हे, त्याच ‘आदर्श’मध्ये आम्हालाही कुठे जागा भेटावी म्हणून तरसत आहोत. तेव्हा हे कन्नड साहित्यिकांनो झुंडशाहीच्या विरोधात बोंबलून तुम्ही गरीबच राहा! पुरस्कार आणि वाचकांचे प्रेम मिळवत राहा, चांगली साहित्यनिर्मिती करत राहा, आम्ही मात्र चौथ्या विश्‍व संमेलनासाठी फुकटाचे तिकीट मिळावे म्हणून सज्ज आहोत. 

--
श्रीकांत उमरीकर

Tuesday, May 7, 2013

साहित्य संस्था... की संस्थाने?

दै. महाराष्ट्र टाइम्स दि. ७ मे २०१३ मधील संपादकीय पानावरील माझं लेख



सध्या पुण्याच्या वातावरणात हलचल आहे. अजितदादा यांचे ते अतिशय सु प्रसिद्ध विधान मग आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सचे गेल भांडला गेल भांडला हे गाणे. हे सगळे पाहून मराठी साहित्य महामंडळावर निवड होण्यासाठी तेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह असलेले मिलिंद जोशी यांना आपणही काहीतरी योगदान द्यावे असे मनापासून वाटले असावे असे गेल्या काही आठवड्यातल्या घडामोडींकडं पाहून म्हणावेसे वाटते! 

महामंडळाचे अध्यक्षपद प्राप्त करण्यासाठी जोशींनी जोरदार तयारी केली होती. गोव्याच्या रम्य वातावरणात महामंडळाची बैठक पार पडली. त्यात त्यांनी साहित्य परिषदेचे नामधारी अध्यक्ष शेजवलकर यांचे त्यांना पठिंबा देणारे पत्रच सादर केले. पण एवढा बंदोबस्त करूनही माधवी वैद्यबाईंनी अशी काही मात्रा चालवली की महामंडळाच्या नेतेपदाच्या (अध्यक्ष) निवडणुकीतून जोशींनी सपशेल माघार घेतली. खरे तर प्रकरण तेथेच मिटलेपण ते पत्र... ते महामंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या नोंदीत राहिलेच! 

या पत्राचा कसून शोध घेतला गेला तेव्हा ते पत्र आपण लिहिलेच नसल्याचा खुलासा शेजवलकरांना करावा लागला. त्यामुळे खळबळ माजली. खरे तर शेजवलकरांची प्रकृती नामधारी अध्यक्षाची. त्यांना काम फक्त सह्या करण्याचे. पण त्या पत्रावरील शेजवलकरांची सही त्यांनी केलेली नसून जोशींनी केल्याचे उघड झाले. यातून जो गदारोळ झाला त्यामुळे जोशींचा राजीनामा तर घेतलाच गेला शिवाय हे सगळं प्रकरण पत्रकारांपुढंही उघड झालं. माध्यमांच्या दृष्टीने ही खळबळजनकच बातमी होती. हे प्रकरण सार्वत्रिक झाल्यानंतर हा सही रे सही फार्स टाळता नसता का आला इथपासून व्यक्तिगत दोषारोपांपर्यंत त्यावर चर्चा होणं स्वाभाविकच होतं. साहित्यिक वर्तुळात ती अद्यापही चालू आहे. हे काय चाललं आहे काय अखिल भारतीय साहित्य महामंडळ या नावाची ही नौटंकी आता पाहिजेच कशाला मुळात या महामंडळाची रचनाच सदोष आहे. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद नावाची संस्था काम करत होती. मुंबईला साहित्य संघ कार्यरत होता. विदर्भात विदर्भ साहित्य संघ आणि मराठवाड्यात मराठवाडा साहित्य परिषद या संस्था होत्या. सोयीच्या राजकीय तडजोडीप्रमाणे या चार संस्थांचे मिळून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्यात आले.कुणालाही प्रश्न पडेल की या चार संस्था ज्या विभागांचे प्रतिनिधित्व करतात ते विभाग समान आहेत का ?त्यांची लोकसंख्या किती किती साहित्यिक या संस्थांचे सभासद आहेत पण हे प्रश्न तेव्हा कुणाला पडले नव्हते. महामंडळाची सध्याची रचना खालील प्रमाणे आहे- (अ. भा. संमेलनासाठी) 

संस्था- मराठी साहित्य संघ (मुंबई) कार्यक्षेत्र- बृहन्मुंबई आजीव सभासद- २००० मतदारसंख्या- १७५. संस्था- महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्यक्षेत्र- १४ जिल्हे , ( कोकण प. महाराष्ट्र खान्देश) आजीव सभासद- ९०००मतदारसंख्या- १७५. संस्था- मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) कार्यक्षेत्र- आठ जिल्हे , ( मराठवाडा विभाग) आजीव सभासद- २४०० मतदारसंख्या- १७५. संस्था- विदर्भ साहित्य संघ , ( नागपूर) कार्यक्षेत्र- ११ जिल्हे , ( विदर्भ विभाग) आजीव सभासद- ६००० मतदारसंख्या- १७५. 

या रचनेकडे पाहिल्यास लक्षात येते की ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर ,सातारा पुणे अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अशा १४ जिल्ह्यांना सामावणाऱ्या पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र खूप मोठे असून त्यांना इतरांप्रमाणेच १७५ मतांचा अधिकार आहे. म्हणजेच बहुतांश आजीव सभासदांना मतदार होण्याची संधी आयुष्यात जवळपास एकदाही मिळत नाही.माझी सूचना आहे की विदर्भ साहित्य संघ व मराठवाडा साहित्य परिषद यांच्यात कुठलाही बदल करण्याची गरज नाही. कोकण विभागातील चार जिल्हे मुंबई साहित्य संघाला जोडून त्यांची एक घटक संस्था करण्यात यावी. पुणे महसूल विभागातील पुणे सोलापूर सांगली सातारा व कोल्हापूर यांची सध्या आहे ती महाराष्ट्र साहित्य परिषद ठेवावी. नाशिक महसूल विभागातील नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार यांची मिळून उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषद बनविण्यात यावी. म्हणजे पुणे व मुंबई यांच्यात मिळून तीन घटक संस्था तयार होतील.दुसराही एक विचार असा आहे की जर आपण सरकारचे पैसे स्वीकारतो तर सरकारच्या सहा महसुली विभागांप्रमाणेच सहा घटक संस्था तयार कराव्यात. म्हणजे फक्त अजून एक अमरावती महसूल विभाग म्हणजेच विदर्भ साहित्य संघाचे विभाजन करून वऱ्हाड साहित्य परिषद तयार करावी लागेल. 

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांप्रमाणेही साहित्य महामंडळाची विभागणी करता येईल किंवा जिल्ह्याच्या पातळीवर काम करणाऱ्या साहित्य संस्थांचा महासंघ करता येईल. विभागीय केंद्रे हवीतच कशाला विभागवार साहित्याचे प्रश्न वेगळे असतात की काय या घटक संस्थांचे आजीव सभासद नेमके कोण आहेत आम्हाला का हे सभासदत्व घेता येत नाही अशी नेहमी ओरड होते. तेव्हा या सर्व घटक संस्थांनी पारदर्शीपणे याबाबत वर्तमानपत्रे प्रसिद्धी माध्यमे यांच्या सहाय्याने खुली मोहीम राबवावी व इच्छुक साहित्यप्रेमींना सशुल्क आजीव सभासदत्व घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. (हे होणार नाही हे मला माहीत आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेने मुदत उलटून एक वर्षे झाले तरी निवडणूक घेतलीच नाही. गेले एक वर्ष घटनादुरुस्तीच्या नावाखाली पावतीपुस्तकेही कपाटात बंद करून ठेवली आहेत. मागच्या तारखांमध्ये सोयीच्या माणसांना अजूनही सभासदत्व बहाल केले जात असेल तर त्याचा शोधही घेता येत नाही.)साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदार हा फार कळीचा मुद्दा आहे. कोणाला मतदार करावे व कोणाला करू नये हा पूर्णपणे घटक संस्थांच्या कार्यकारिणीचा अधिकार आहे. त्यावरच अधिकतर आक्षेप घेतला जातो. तेव्हा जे अजीव सभासद आहेत त्या सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा. 

आधुनिक काळात २५ हजार मतदार म्हणजे काही फार नाहीत. तेव्हा सगळ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी खळखळ करण्यात काही अर्थ नाही. जर काही आक्षेप असेलच तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीसारखे त्या-त्या घटक संस्थांच्या मतांचे मूल्य ठरविण्यात यावे. कितीही आव आणला तरी साहित्य महामंडळात प्रत्यक्षात लोकशाहीचा पूर्णपणे अभाव आहे. ज्या घटक संस्था त्या-त्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करीत होत्या त्या आज पूर्णपणे संदर्भहीन झाल्या आहेत. त्यांच्यात अमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे. जर लोकसभा/विधानसभा मतदारसंघांची रचना बदलून निवडणुका घेता येतात तर त्यामानाने हे बदल किरकोळ आहेत. मराठी प्रकाशक परिषद राज्य ग्रंथालय संघ यांना सहभागी करून घेऊन जिल्हा पातळीवर साहित्यिक संस्था बळकट करता येतील. त्यातून पुढे साहित्य महामंडळ तयार होऊ शकेल. हे करण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी जोपर्यंत तयार होणार नाहीत तोपर्यंत सही प्रताप होतच राहणार.

Saturday, May 4, 2013

हनी सिंग-बलात्कारी मानसिकतेचा गायक । ‘सखिमंच’वाला ‘लोकमत’ त्याचा प्रयोजक ॥

दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख 4 मे 2013

हनी सिंग हा पंजाबी पॉप गायक सध्या फार गाजतो आहे. तरूण-तरूणींमध्ये त्याची लोकप्रियता फार जास्त आहे. गाण्याच्या बाबत नेहमी असं होतं की त्याच्या ठेक्याकडे, सुरांकडे सगळ्यांचे लक्ष जाते पण त्यामानाने शब्दांकडे लक्ष जात नाही. हनी सिंग याच्या गाण्यातून स्त्रीचे दुय्यम स्थान स्पष्टपणे दिसत असते. ब्रेक अप पार्टी सारख्या गाण्यात ही प्रेयसी दुसर्‍यासोबत संसार करते. पोरं वाढवते. नवर्‍याला खाउ पिउ घालते. काही कामधंदा नसल्यामुळे सास-बहूच्या सिरीअल्स टीव्हीवर पहात बसते. त्यावर हनी सिंगचे गाणे लागले की पोरांना सांगते, ‘‘तेंव्हाच याचे ऐकले असते तर हाच तूमचा बाप असला असता’’. वगैरे वगैरे....
निदान अशा गाण्यात स्त्रीला दिलेलं दुय्यम स्थान अस्पष्ट तरी आहे. नविन काही गाण्यांमध्ये तर फारच विकृत पद्धतीनं स्त्रीचं वर्णन केल्या गेलेलं आहे. गाणी अश्लिल आहेत हा तर आक्षेप आहेच. पण आजकाल अश्लिलतेवर फार टिका करण्यातही अर्थ उरलेला नाही कारण इंटरनेटवर सगळंच खुलं झालेलं आहे. अश्लिल चित्रफिती सर्रास उपलब्ध आहेत. लहान मुलंही हे सगळं पहात असतात. त्या पार्श्वभूमीवर हनी सिंगच्या अश्लिल गाण्यावर काय आक्षेप घेणार. आक्षेप आहे तो त्यात स्त्रीवर अत्याचार करण्याची जी मानसिकता वर्णन केली आहे त्यावर आहे.
सोळा सतरा वर्षाच्या मुलीला हा म्हणतो की तूझे आत्तापर्यंत हजारो जणांशी शरिरि संबंध आले असतील. आता थोडा जरी गणिती हिशोब लावला तर हजार जण म्हणजे हजार दिवस. म्हणजे ही मुलगी वयाच्या 13व्या वर्षांपासून शरिर संबंध ठेवते आहे असं हनी सिंगला म्हणायचे आहे की काय? बरं या ‘हजारो’शी यमक जुळवायला पुढचे शब्द आहेत ‘महंगी महेंगी कमरोंमे, बडी कारोंमे, बॉलिवुडके बडे बडे सितारोंने’.
यातला आक्षेपार्ह भाग लक्षात घ्या. दिल्ली आणि भारतभरच्या महिलांवरील अत्याचारासंदर्भात असं निदर्शनास आले आहे की हे अत्याचार अलिशान गाड्यांमध्ये झाले आहेत. परिणामी या गाड्यांच्या काचा पारदर्शकच असाव्यात, त्यांना आतील काही दिसू नसे अशा गडद फिल्म लावू नयेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आणि हनी सिंग मोठ्या गाड्यांमधील शरिर संबंधांचे वर्णन मिटक्या मारत करतो आहे. महेंगी महेंगी कमरोंमे म्हणजे पंचतारांकित हॉटेलांमध्ये. यावरही परत आक्षेप आहे. विजय मल्या सारख्या उद्योगपतींनी आपल्या मोठ्या कंपन्या बुडवल्या व पैसे अय्याशी सारखे नग्न पोरींच्या कॅलेंडरवर, आयपीएल मध्ये नाचणार्‍या चिअर गर्ल्सवर आणि पंचतारांकित हॉटेलांवर उडवले असा आरोपच वित्तीय संस्थांनी लावला आहे. बॉलिवुडके बडे बडे सितारोंमे यावर काय बोलणार? बॉलिवुडचं चारित्र्य शेंबड्या पोरांनाही माहित असतं. हनी सिंग या सगळ्याचं समर्थन आपल्या गाण्यातून करतो आहे.
शरिर संबंध झाल्यानंतर ‘तूझको जूतोंसे मारू’ अशी भावना या गाण्यांमधून येते आहे. परत दिल्लीच्या अत्याचारांचा संदर्भ इथे आहे. ज्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले त्यांच्यावर नुस्ता बलात्कारच झाला असे नाही तर त्यांच्यावर शारिरीक अत्याचार केले गेले. या सगळ्या विकृतींचे चविष्ट वर्णन हनी सिंगच्या गाण्यातून येते याला काय म्हणायचं?
माणसाच्या संस्कृतिचा विकास मारून खाण्यापासून (शिकार) पेरून खाण्यापर्यंत (शेती) झाला. या संस्कृतीचा कळस म्हणजे माणसाला कला अवगत झाली. म्हणजे आहार निद्रा भय मैथून या भावनांवर नियंत्रण मिळवून माणूस जनावराचा ‘माणूस’ झाला आणि त्याचा सर्वोच्च पुरावा म्हणजे कला. आणि याच कलेचा आधार घेवून परत हनी सिंग सारखा गायक हजारो वर्षे मागे जावून माणसाला परत पशुच्या पातळीवर नेउन त्याचं समर्थन करतो आहे.
याच हनी सिंग याच्या गाण्याचा कार्यक्रम मोठा गाजावाजा करून ‘लोकमत’ वृत्तपत्रसमुहाने औरंगाबादच्या गरवारे स्टेडियम वर ठेवला होता. हा तर मोठाच विरोधाभास झाला. इकडे महिलांसाठी ‘सखीमंच’ सारखे उपक्रम चालवायचे आणि दुसरीकडे बलात्कारी मानसिकतेच्या हनी सिंगचे कार्यक्रम ठेवायचे. याला काय म्हणावं? या वृत्तपत्र समुहाचे प्रमुख विजय दर्डा हे कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्यांचे बंधु राजेंद्र दर्डा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जबाबदार मंत्री आहेत. विजय दर्डा यांच्या पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी ‘सखीमंच’ च्या माध्यमातून स्त्रीयांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख बर्‍याच मान्यवरांनी आणि ‘लोकमत’च्या लाभार्थी विद्वानांनी केला. पण या कुणालाही असा प्रश्न पडला नाही की नुकतंच बलात्कारी मानसिकतेच्या हनी सिंगचा कार्यक्रम याच लोकमत समुहाने आयोजित केला होता. त्याची मोठी जाहिरात महिनोंन महिने शहरात झळकत होती.
हा विषय फक्त हनी सिंगपाशीच थांबत नाही. आता तर इंटरनेटवर हनी सिंगपासून प्रेरणा घेवून अशा गाण्यांची लाटच आली आहे. अगदी उघडपणे ‘मै हू बलात्कारी’ सारखी गाणी येत आहेत.
स्त्रीभृ्रणहत्या आणि त्यानंतरचे महिलांवरील भयानक अत्याचार यांनी वातावरण दुषित झालेलं असताना संगीताच्या माध्यमातून या सगळ्या विकृतीला चालना देण्याचं काम अशी गाणी करत आहेत. आणि बरेच तरूण या गाण्यांना प्रतिसाद देत आहेत. यातील सगळ्यात भयानक बाब म्हणजे मुलांसोबतच मुलीही मोठ्या प्रमाणात हनी सिंग यांच्या चाहत्या आहेत. औरंगाबादच्या कार्यक्रमात बर्‍यापैकी संख्येने तरूण मुली उपस्थित होत्या हे समजल्यावर माझ्यासारख्याला धक्काच पोंचला. एरव्ही महिला संघटना अशा घटनांसंदर्भात फार जागरूकता दाखवतात. मग त्यांनी हनी सिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुलींबाबत काय धोरण स्विकारले? का जे शाब्दिक बलात्कार हनी सिंग आपल्या गाण्यातून करतो आहे त्याला त्यांची संमती आहे. काय समजायचं काय?
1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिन होता. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला 53 वर्षे पुर्ण झाली. या वर्षांत आम्ही पंजाबी हनी सिंगला बोलवून त्याच्या विकृत गाण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रात करतो आहोत, त्याला ‘लोकमत’ सारखा सगळ्यात मोठा म्हणवून घेणारा वृत्तपत्र समुह प्रयोजकत्व देतो आहे ही कोणती मानसिकता आहे?
हनी सिंगच्या अश्लिल गाण्यातील शरिराची भाषा ही जागतिक भाषा असते तीला प्रदेशाचे बंधन नसते असले ‘उदात्त’ विचार लोकमतच्या धोरण ठरविणार्‍यांनी केले की काय?
5 मे 1911 रोजी महाराष्ट्रातील एक तरूण तेंव्हाच्या अखंड भारतातील पंजाबात जातो. लाहोर मध्ये ‘गांधर्व महाविद्यालया’ची स्थापना करतो. ‘हिंदूस्थानी संगीता’च्या शिक्षणाची गंगोत्री म्हणजे हे गांधर्व महाविद्यालय. त्या तरूणाचे नाव पं. विष्णू दिगंबर पलूस्कर. सगळ्या भारतभर फिरून संगीताचा अभ्यास करून दुसरा एक महाराष्ट्रीय तरूण ‘हिंदुस्थानी गायन पद्धती’ या प्रचंड ग्रंथाचे लेखन करतो. त्याचे नाव पं. विष्णू नारायण भातखंडे.
1 मेला संयुक्त महाराष्ट्राचा वर्धापन दिन साजरा होत असताना, मराठी वृत्तपत्र सृष्टीत नं.1 चे बिरूद मिरवणारा ‘लोकमत’ याच पंजाबमधील बलात्कारी मानसिकतेच्या गायकाचे कार्यक्रम आयोजित करतो आहे. ज्यांच्या सांगितीक पुण्याईवर उभं राहून हा हिडीसपणा करतो आहोत आणि प्रचंड प्रमाणात पैसा कमावतो आहोत त्या पलूस्कर भातखंडेचे नाव तरी हनी सिंगला माहित असेल का? हनी सिंग तर सोडा, तो तर पंजाबी आहे, स्वत:ला महाराष्ट्रीय म्हणवून घेणार्‍या ‘दर्डा’ बंधूंना तरी असं वाटलं का गांधर्व महाविद्यालयाच्या 112 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपण काही कार्यक्रम साजरा करावा?
शंभर वर्षांपूर्वी मराठी माणूस पंजाबात जावून संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. आणि 100 वर्षांनंतर पंजाबी माणूस भरपूर मानधन घेवून महाराष्ट्रात येवून याच संगीताच्या आडून बलात्कारी मानसिकता महाराष्ट्राला दाखवतो.
दिलीपकुमारच्या चित्रपटातील गाणे आहे, महम्मद रफीने गायलेले
रामचंद्र कह गये सिया से ।ऐसा कलयुग आयेगा।
हंस चुनेगा दाना दुनका । कौव्वा मोती खायेगा॥
सगळ्या जागरूक नागरिकांनी, संघटनांनी हनी सिंग यांच्या गाण्यावर बहिष्कार टाकावा, तसेच त्यांना प्रयोजकत्व देणार्‍या ‘लोकमत’लाही लोकांचे मत नेमके कशाच्यामागे आहे हे दाखवून आपली कलाविषयक जाण प्रगल्भ असल्याचा पुरावा द्यावा.

श्रीकांत उमरीकर, मो. 9422878575.

Saturday, April 20, 2013

मराठी भाषा (सल्ला) गार समिती, मंडळ : निवृत्त मराठी प्राध्यापकांचे पांजरपोळ!


 दैनिक कृषीवल दि. २० एप्रिल २०१३ मधील माझ्या "उरूस" या सदरातील लेख
......................................................................................................................

अकबर आणि बिरबलाची गोष्ट आजच्या संदर्भात अशी नव्याने सांगता येईल.
एकदा अकबर नेहमीप्रमाणे वेष पालटून राज्याच्या दौर्‍यावर निघाला होता. साहित्य परिषदेच्या जवळून जाताना त्याला मराठी भाषाविषयकमोठमोठ्याने गळे काढलेलं ऐकू आलं. त्यानं डोकावून बघितलं तर काही वयस्कर माणसे मराठी भाषेची चिंता दाखवत मोठ्या आवाजात आणि आवेशात भाषणं करीत होती. त्यांच्या समोर बसलेली बहुतांश माणसेही वयस्करच दिसत होती. अर्ध्याच्यावर खुर्च्या रिकाम्याच होत्या. 
दुसर्‍या दिवशी अकबराने बिरबलाला बोलावले आणि विचारले की, ‘अरे बिरबल मराठी भाषेची परिस्थिती फार भयंकर आहे असं दिसतं आहे. काय करायला पाहिजे?’ बिरबल तातडीने उच्चारला, ‘जहापन्हा, आपण काल साहित्य परिषदेत भाषणं ऐकायला गेला होतात की काय?’ अकबर एकदम चपापला. आपलं वेष पालटून जाणं इतकं गुप्त ठेवलं जात असताना बिरबलाला ते कसे कळाले? आपली सुरक्षा व्यवस्था, हेरखाते एकदम नालायक झाले आहे की काय, ‘बिरबल ही अतिशय गुप्त अशी गोष्ट अगदी आमच्या जनान्यालाही माहीत नसलेली तुला कशी काय कळाली?’ तेव्हा बिरबल उद्गारला, ‘जहापन्हा तुम्ही नाराज होऊ नका आणि आपल्या संरक्षण व्यवस्थेलाही दोष देऊ नका. मी अंदाज  केला तो केवळ आपण काढलेल्या विषयावरुन. मराठीची चिंता करतो म्हणजे तो मराठीचा निवृत्त प्राध्यापकच असणार, शिवाय त्याची मुलं परदेशात किंवा महानगरातच असणार शिवाय नातवंडं मराठी सोडून इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच शिकत असणार, ग्रामीण/दलित साहित्यिक प्राध्यापकाचे घर महानगरातच असणार हे समजायला फार हुशारीची गरज नाही जहापन्हा.’
बादशहा अकबर थोडा निवांत झाला व त्याने बिरबलाला परत विचारले, ‘म्हणजे मराठीची स्थिती फार वाईट नाही? किंवा तसं असेल तर काय करायला पाहिजे?’ बिरबल उच्चारला, ‘महाराज, मराठी भाषेची स्थिती फार वाईट नाही हे खरं आहे. पण भाषेपुढे संकटं हे लोकं समजतात तशी नाहीत. यांना काळजी आहे ती त्यांना स्वत:ला मिळणार्‍या मानमरातबाची.’ ‘मग काय करायला पाहिजे?’, ‘जहापन्हा या सगळ्या मराठीच्या प्राध्यापकांना भाषाविषयक सल्लागार समित्या, संस्कृती मंडळं, साहित्य महामंडळं काढून द्या. त्यांच्या प्रवासखर्चाची, भत्त्यांची सोय करा, बघा मग कसे हे पोपटासारखे शासनाचे गुणगान करत फिरतील. मराठीबाबत काय करायचे ते आपण स्वतंत्रपणे यांचा कुठलाही सहभाग न घेता करु. म्हणजेच ती योजना यशस्वी ठरेल.’
अकबर बिरबलाची ही गोष्ट आज सांगायचं कारण म्हणजे अशीच स्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे. मराठी भाषा सल्लागार समिती, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विकास संस्था, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, विश्‍वकोश निर्मिती मंडळ, शब्दकोश मंडळ, बालभारती या सगळ्यांवरच्या नेमणुका बघा. सगळ्यांच्या वयाची सरासरी काढली तर ती ६० च्याही वर जाईल. बरं या एवढ्या मोठ्या संस्था करतात तरी काय?
कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. मराठी भाषा विकास संस्था व शासनाच्या माहिती विभागाने या वेळेस या दिवशी साहित्य पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रम मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरात घेतला. विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्या डिजीटल अध्यक्षा मराठी भाषेच्या महान विद्वान विजया वाड यांनी आपल्या भाषणात, ‘बघा या आमच्या विभागातील सर्व स्त्री कर्मचारी, सर्व कशा आज नटून थटून साड्या घालून आल्या आहेत. बघा ना मुख्यमंत्री महोदय कशी अगदी मराठी संस्कृती वाटते आहे.’
अशा शब्दात विभागातील कर्मचार्‍यांचे गुणगान करीत होत्या. साड्या घालण्याने मराठी भाषा कशी जपली जाणार आहे, तिचे संवर्धन कसे होणार आहे आणि हे सगळे करताना विश्‍वकोशाच्या कामात काय मौलिक भर पडणार आहे हे विजया वाडच जाणे. ही आमच्या विश्‍वकोश मंडळाच्या ६५ वर्षे वयाच्या अध्यक्षांची भाषाविषयक समज. 
विश्‍वकोशाचा पुढचा खंड इंटरनेटवर या निमित्ताने उपलब्ध करुन दिला गेला. शिवाय दासबोध, ज्ञानेश्‍वरीची ऑडिओ आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. बाहेर मांडलेल्या स्टॉलवर पुस्तक स्वरुपातील ज्ञानेश्‍वरी, नामदेव गाथा, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा यांच्या आवृत्त्या उपलब्ध आहेत का याची चौकशी केली तर हे काहीच उपलब्ध नाही. ज्या पुस्तकांच्या काही थोड्या प्रती उपलब्ध आहेत त्याही फक्त देखाव्यासाठी मांडलेल्या. 
वर्षानुवर्षे विश्‍वकोशाचे सर्व खंड उपलब्ध व्हावे म्हणून मागणी होत आहे. पण अजूनही या निवृत्त मराठी प्राध्यापकांच्या वृद्धाश्रमाने ही पुस्तके उपलब्ध करुन दिली नाहीत. साहित्य संस्कृती मंडळाने रा.रं.बोराडे अध्यक्ष असताना महाराष्ट्राचे शिल्पकार ही ग्रंथमालिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. ५० पुस्तके प्रकाशितही झाली. आज तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही शासकीय भांडारात जाऊन याची प्रत मागा. एकाही पुस्तकाची एकही प्रत उपलब्ध नाही. वयाची पंचाहत्तरी गाठलेले साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष थोर साहित्यिक, कोकणरत्न, कोमसापचे सर्वेसर्वा मधु मंगेश कर्णिक उर्फ मधुभाई यांना हे माहीतच नाही असे समजायचे की काय?
मराठी भाषा शब्दकोश निर्मिती मंडळाचे ८० वर्षे ओलांडलेले अध्यक्ष प्राचार्य रामदास डांगे यांनी मराठी शब्दकोशाचे ४ खंड प्रकाशित केले. त्यांच्या हाताशी आजही काम करणारा तरुण सहकारी वर्ग नाही. शब्दकोशातील चुका दुरुस्त करायचं काम उतारवयाचे डोळे अधु झालेले, फारसं वाचू न शकणारे हे सगळे महाभाग कसं करणार आहेत?या सर्व संस्थांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे वितरण महाराष्ट्रभर होण्यासाठी त्यांना कोणी आडकाठी केली आहे? आणि जर पुस्तकं पोहोचवायची नसतील तर या सगळ्या संस्था करतात तरी काय? ‘समग्र महात्मा फुले’ हा ग्रंथ साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. नोव्हेंबर २००६ ला त्याची सुधारित सहावी आवृत्ती ३०,००० प्रतींची काढण्यात आली. सध्या याच्या प्रती उपलब्ध नाहीत. फुले-शाहू-आंबेडकरांचे उठता बसता नाव घेणार्‍या या महाराष्ट्रात ‘समग्र महात्मा फुले’, ‘राजर्षी शाहू गौरव ग्रंथ’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर-समग्र लिखाण व भाषणे’ या पुस्तकांच्या प्रती सध्या मिळत नाहीत. 
मग शासनाच्या विविध समित्यांवर बसलेली ही सगळी वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध प्राध्यापक माणसे करताततरी काय? 
आजपर्यंत असं घडलेलं नाही की साहित्य संस्कृती मंडळाकडे पुस्तकाच्या प्रती उपलब्ध नसल्यामुळे सध्या साहित्य संस्कृती मंडळाची बैठक होऊ शकणार नाही. तरी सर्व सभासदांना प्रवासखर्च, भत्ते देता येत नाहीत. पुस्तकं उपलब्ध नाहीत. दोन दोन वर्षे शासनाचे पुरस्कार जाहीर होत नाहीत. जाहीर झाले तरी त्यांचे वितरण होत नाही. आणि या संबंधातील समित्या, मंडळे यांच्या बैठका मात्र होत राहतात. यांच्या सभासदांवर प्रवासखर्च व भत्त्यांची खैरात होत राहते? याला काय म्हणणार?
बरं आश्‍चर्य म्हणजे काही सभासद हे एकापेक्षा जास्त समित्यांवर आहेत. म्हणजे जर साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, विश्‍वकोश मंडळ यांच्यावर एकच सभासद असेल व त्याने या तिन्हींच्या सलग होणार्‍या बैठकांसाठी मुंबईला मुक्काम ठोकला असेल तर त्याला प्रवासखर्च व भत्ता हा वेगवेगळा देणार?
बरं ही सगळी महामंडळे, समित्या यांची कार्यालये मुंबईतच कशासाठी? मंत्रालयात काय मोठं काम या मंडळांचे अडले आहे? शासकीय पातळीवर जी अधिकारी मंडळी यासाठी काम करतात त्यांना विभागीय पातळीवर काम करणे सहज शक्य आहे. पण सगळ्यांचा अट्टाहास शासनाच्या पैशाने जिवाची मुंबई करण्याचा.
मुंबईला शासनाच्या पुरस्कारासाठी एका एका पुरस्कर्त्यावर अधिकृतपणे झालेला प्रवासखर्च व निवासखर्च १०,००० इतका आहे. (पुरस्काराच्या रकमेशिवाय). दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात हा कार्यक्रम मुंबईत घेऊन खर्च वाढविण्याचे कारण काय?   
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या चार घटक संस्था महाराष्ट्रात काम करतात. त्यातील एक घटक संस्था औरंगाबादला आहे. या साहित्य परिषदेच्या विश्‍वस्त मंडळावर एक सदस्य नेमायचा होता. कारण एक सभासद माजी खासदार बापू काळदाते यांचे निधन झाले होते. त्यांच्या जागी नेमणूक केली ७४ वर्षांच्या रा.रं.बोराडे यांची. या विश्‍वस्त मंडळाच्या सदस्यांचे सरासरी वय सध्या ७० वर्षे इतके झाले आहे. बरं ही नेमणूकच आहे. निवडणूक नाही. म्हणजे या विश्‍वस्तांनी मनात आणलं असतं तर तुलनेने तरुण रक्ताला संधी देता आली असती. 
या समित्यांवर मंडळावर नियुक्ती झाली की हेच प्राध्यापक शाळकरी पोरांच्या उत्साहात वर्तमानपत्रांमधून बातम्य छापून आणतात. शिवाय आपण अजून कुठल्या कुठल्या समित्यांवर आहोत हे आवर्जून त्या बातम्यात नमूद करायला लावतात.मराठी भाषाविषयक या समित्या ‘सल्लागार’ उरल्या नसून वय आणि कार्यक्षमतेने ‘गार’ पडल्या आहेत. मराठीच्या निवृत्त प्राध्यापकांची सोय लावणारे हे पांजरपोळ झाले आहेत. ‘मराठी शब्दरत्नाकर’मध्ये पांजरपोळ शब्दाचा अर्थ दिला आहे-म्हातार्‍या किंवा लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे स्थान. या वयस्कर माणसांपोटी सर्व आदर बाळगून असं आता अपरिहार्यपणे म्हणावं वाटतं की तरुण मराठी साहित्यिकांनी/कार्यकर्त्यांनी धक्के मारून बाहेर काढल्याशिवाय ही पदाला चिकटून बसलेली  म्हातारी माणसं जातील असे वाटत नाही.