Saturday, June 1, 2013

मराठी ही हिंदीची उपभाषा नसून हिंदीला समृद्ध करणारी भाषा आहे


दै. कृषिवल, उरूस सदरातील माझा लेख, दि. 1 जून 2013


‘मराठी ही हिंदीची उपभाषा आहे’ अशी चर्चा सध्या माध्यमांमधून सुरू आहे. हिंदीचे मोठेपण ठरवित असताना मराठीला दुय्यम स्थान देण्याची खरे तर काही आवश्यकता नाही. कुठलाही मराठीभाषाप्रेमी हे सहन करू शकत नाही. या संदर्भात काही पुस्तके चाळत असताना मला श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘साहित्यसेतू’ या पुस्तकाची आठवण झाली. मराठी संतांच्या हिंदी काव्याची मीमांसा असे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. मराठी ही हिंदीची उपभाषा तर सोडाच पण हिंदीतील भक्तीसाहित्याची निर्मितीच मुळात नामदेवांपासून झाली असा सिद्धांत श्रीधरराव कुलकर्णी यांनी मांडला आहे. म्हणजे आत्तापर्यंत बचाव करण्याच्या मानसिकतेत मराठी भाषीक होते पण आता तर हे सगळे संदर्भ बचावाचे नसून उलट हिंदीला मराठीने जे योगदान दिले त्याचे आहेत. शिवाय मराठीची परंपरा स्वतंत्र आणि समृद्ध आहे.
12 व्या शतकापर्यंत सिद्धसंप्रदाय भारतभर अस्तित्वात होता. आदीसिद्ध सरहपा हे आठव्या शतकातील. गोरखनाथांनी यांच संप्रदायास लोकाभिमुख करत पुढे नेले. ज्ञानेश्वरांना हीच गुरूपरंपरा लाभली. नामदेव याच परंपरेचे पाईक. त्यांनी सिद्धांच्या भाषेत रचना केली. ते भारतभर फिरले. नामदेवांची हिंदीसदृश्य काव्याची  भाषा व कबीरांची भाषा यात विलक्षण साधर्म्य आहे. पुढे कबीर व नानक यांनी नामदेवांचा केलेला जो गौरव आढळतो त्यावरून हे अधोरेखीत होते.
डॉ. रामकुमार वर्मा यंाच्या ग्रंथातील मत श्रीधररावांनी दिले आहे, ‘इस प्रकार कहा जा सकता है कि उत्तर भारत मे संतसंप्रदाय का जो उत्थान वैष्णव भक्ति को लेकर हुआ उसका पूर्वार्ध महाराष्ट मे विठ्ठल संप्रदाय के संतो द्वारा प्रस्तूत हो चुका था, जिन मे ज्ञानेश्वर और नामदेव प्रमुख थे.’
भारतातीलच नव्हे तर परदेशातील विद्वानांनीही उत्तर भारतातील संत साहित्याचा अभ्यास करताना आपले निष्कर्ष नामदेवाच्या बाजूने मांडले आहेत. कलव्हर्ट यांनी हिंदी पदांची पुरातन हस्तलिखिते गोळा केली. त्यात नामदेवांची 258 पदे असून आपल्या प्रस्तावनेत त्यांनी पंजाब-राजस्थान या भागातील भक्तिसाहित्यातील भाषेच्या तुलनेत या पदांची भाषा पुरातन असल्याचा निर्वाळा दिला आहे.
खुद्द कबीरानेच आपल्या दोह्यात नामदेवांची महती वर्णन केली आहे.
तन मन कौ खोज हु रे भाई, तन तूहे मन कहां समाई ।
सनक सनंदन जैदेव नामा, भगति करि मन उनहूॅन जाना ॥ (कबीरग्रंथावली 77)
बर्‍याच मराठी संतांनी त्यात एकनाथ, रामदास, तुकाराम यांचा समावेश आहे हिंदी रचना केल्या आहेत. आपण ज्याला आज हिंदी भाषा म्हणतो ती तेंव्हा अस्तित्वात नव्हती. नागरी हिंदी म्हणून जी भाषा आहे ती एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी अस्तित्वात आली. हिंदीच्या जवळची ‘खडी बोली’ ही भाषा पूर्वी अस्तित्वात होती. अमीर खुस्रो हा या खडी बोलीचा पहिला कवी समजण्यात येतो. अमीर खुस्रोची भाषादेखील सोळाव्या-सतराव्या शतकानंतरची भाषा आहे. हिंदी भाषेचे प्रादेशिक भेद असलेल्या व्रज, अवधी या भाषांतूनदेखील नामदेवांच्या काळात साहित्यनिर्मिती झाली नव्हती.
आपल्या भाषेसोबत आपल्या गुरूच्याही भाषेत काव्यरचना करण्याची परंपरा फक्त मराठीतच आढळते. इतर भाषांतील संतसाहित्यात अशी द्विधारा आढळत नाही. त्यामुळे नामदेवांनी आपली गुरू परंपरा मानून सिद्धांच्या भाषेत काव्यरचना केली. आपले कार्य आपल्या भाषेपुरतेच मर्यादित न राहता ते विश्वात्मक रहावे ही भावना नामदेवांची होती याचा हा पुरवाच होय.
नामदेवांनी इ.स. 1350 मध्ये समाधी घेतली. नामदेवांनी आयुष्याची जवळपास शेवटची चाळीस वर्षे महाराष्ट्राबाहेर घालवली. राजस्थान आणि पंजाब या भागात त्यांना मोठा शिष्यसंप्रदाय लाभला.
नामदेवांच्या नंतर संत एकनाथांनी या भाषेत मोठी महत्त्वाची रचना करून ठेवली आहे. म्हणजे हिंदी संत साहित्यात मराठी संतांचे मोठे योगदान आहे हेच आम्हाला माहित नसते.
हिंदू तुर्क संवाद नावाची रचना एकनाथांची मोठी प्रसिद्ध आहे
ब्राह्मण म्हणे अहो जी स्वामी । वस्तुत: एक तुम्ही आम्ही ।
विवाद वाढला न्याती धर्मी । जात परब्रह्मी असेना ।
तुरक कहे वो बात सही । खुदा कू तो जात नही ।
बंदे खुदा नही जुदाई, वोक्या रसुलिल्ला हजरत परदे ।
सर्व धर्म ज्याचा निमाला । मनोधर्म तुरक ऐकिला ।
आनंद परम झाला । मंत्र उपदेश केला ॥
गाडगेबाबांच्या एका अशा किर्तनाचे मोठे सुंदर वर्णन गो.नि.दांडेकरांनी केले आहे.
एकनाथांच्यानंतर दासोपंतांनी सिद्धांच्या भाषेत किंवा हिंदीसदृश्य भाषेत रचना केल्या आहेत. न तू जुदा या नावाची त्यांची अद्वैताची मांडणी करणारी रचना तर अप्रतिम आहे.
न तू है जुदा न तुझ मे है जुदाई
जुदाई बुझे तब दिगंबर खुदाई ॥
या ओळी तर नितांत सुंदर आहेत.निर्गूण तत्त्वज्ञान सांगणार्‍या इस्लामला तंतोतंत लागू पडतात. जेंव्हा जुदाई संपते तेंव्हाच खुदाई भेटते हाच अद्वैताचा संदेश आपल्या संतांनी इस्लामच्या परिभाषेत इथल्या सामान्य जनतेलाही समजावून सांगितला. जेंव्हा की इस्लामला अद्वैत मंजूर नाही असा वरवरचा निष्कर्ष काढला जातो.
तुकाराम महारांनी तर ही भाषा वापरलीच पण आपल्या भाषेतील शब्दप्रयोग वापरून मातृभाषेचा गौरवही दुसर्‍या भाषेत नेला आहे.
मेरे राम के नाम जो जो लेवे बराबर ।
त्या के पाऊ मै तन की पैजार ॥
जातन सु मुजे कछू नही प्यार ।
आसते के नहि हिंदू धेड चांभार ॥
कातड्याचे जोडे करून तूमच्या पायी घालेन हा मराठी वाकप्रचार तुकाराम तसाच हिंदीत वापरतात. त्याप्रमाणेच आमच्यात (वारकरी संप्रदायात) जातपात न मानण्याची रीत नाही याचाही स्पष्ट उल्लेख ते करतात. 
रामदासांनी हिंदीसदृश भाषेत रचना करताना रागांचाही विचार केला आहे. म्हणजे तेंव्हा जी परिभाषा प्रचलित होती व्रज भाषेत रागांच्या चीजा रचण्याची त्याचीही जाण रामदासांनी होती. म्हणजे आमचे संत सामाजिक दृष्ट्या तर या रचना करीतच होते पण त्यांना कलेचीही जाण होती.
खमाज रागातील रामदासांनी रचना मोठी सुंदर आहे.
ये भाई काहे कू लडते, लडते सब पडते ॥
एक ही जमीन एक ही पानी एक आतश आसमान ।
येक मे हूं अलम चलाता ये ही चांद सुभाना ।
गैबी सोही एक इलाही पंचभूत भूतखाना ।
अजब महजब इस मे है रे ये तो सब कुफराना ।
अलामिया एक जुदा नही रे गैबी बाट सूं जावे ।
कुफराना म्हणजे पाखंड, अधर्म.हिंदू मुसलमान हा भेद पाळणे म्हणजेच पाखंड आहे असा सणसणीत टोला रामदास मारतात. 
नामदेव सारख्या एका मराठी संताला हिंदी भक्तीकवितेचा आद्य कवी मानण्यात येते. हिंदी भाषेबाबत मराठीचे हे जे मोठे योगदान आहे त्याबाबत आपल्याला जाणीव नसते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्रीधरराव कुलकर्णींचे संशोधन मोलाचे ठरेल असे मला वाटते. श्रीधरराव कुलकर्णींचे ‘साहित्यसेतू’ पुस्तक मराठी ही हिंदीची उपभाषा नसून मराठी ही हिंदीलाही समृद्ध करणारी समर्थ भाषा आहे ही जाणीव करून देते.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.  

No comments:

Post a Comment