Showing posts with label साहित्यिक. Show all posts
Showing posts with label साहित्यिक. Show all posts

Saturday, May 18, 2013

कन्नड साहित्यिक - विरोध झुंडशाहीचा! मराठी साहित्यिक - स्वीकार थंडशाहीचा!!


दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख दि. १८ मे २०१३


  • नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांत कन्नड साहित्यिकांनी झुंडशाहीच्या विरोधात रोखठोक आणि स्पष्ट अशी भूमिका घेतली. राजकीय भूमिका घेताना कुठलीही संदिग्धता कन्नड साहित्यिकांच्या मनात नव्हती, प्रसंगी झुंडशाहीचा आधार घेणार्‍या राजकारण्यांना चार कडवे बोल सुनावण्यात ते मागे हटले नाहीत. या पार्श्वभूमीवर मोठी चर्चा मराठी साहित्यिकांच्या संदर्भात माध्यमांमधून चालू आहे. कवियित्री प्रज्ञा पवार यांनी झुंडशाहीच्या विरोधात मराठी साहित्यिक स्पष्ट भूमिका घेत नाहीत, असा आरोपच केला आहे. आता खरे तर प्रज्ञा पवार यांना याचे प्रत्यंतर जानेवारी महिन्यात संपन्न झालेल्या चिपळूणच्या साहित्य संमेलनातच आले होते. कार्यक्रम पत्रिकेवर एकाही साहित्यिकाचे नाव नाही. संपत्तीचे उघड विकृत प्रदर्शन करणारे, भ्रष्टाचार करणारे मंत्री दिमाखात वावरत होते. कवी संमेलनाचे अध्यक्षपद नाकारून प्रज्ञा पवार यांनी आपला बाणेदारपणा दाखवला; पण इतर एकसुद्धा साहित्यिक राजकीय नेत्यांच्या विरोधात काहीएक स्पष्ट भूमिका घेऊन संमेलनाकडे फिरकला नाही, असे घडले नाही. स्वत:ला फुले, शाहू, आंबेडकरांचा वारस मानणारे नागनाथ कोत्तापल्ले मोठ्या उत्साहात स्वत:ला अध्यक्ष म्हणून मिरवून घेत राहिले. मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनीही कुठलीच जाहीर भूमिका घेतली नाही. सांगलीच्या साहित्य संमेलनात राष्ट्रपतींच्या उपस्थितीचा गाजावाजा करत साहित्यिकांना बोलायची संधी नाकारल्या गेली. याबाबत जाहीर भूमिका घेत अरुण साधू यांनी संमेलनास न जाणे पसंत केले. परिणामी, मावळत्या अध्यक्षांकडून उगवत्या अध्यक्षांकडे द्यावयाची सूत्रे कशी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कौतिकराव ठाले पाटलांनी स्वत:च्या हस्ते सूत्रे देऊन हौस भागवून घेतली. अरुण साधूंनी घेतलेली ही भूमिका त्यांच्याच विदर्भाचे पुरोगामी चळवळीत असलेले वसंत आबाजी डहाके यांना मात्र घेता आली नाही. मग प्रज्ञा पवार तुम्हीच सांगा इथे स्वत:ला मिरवण्याच्या जागा आहेत. मंच आहेत- ते या मोठमोठ्या लोकांना नाकारता येत नाहीत, तर झुंडशाहीच्या विरोधात बोलण्याची काय गोष्ट करता?
  • आम्हा मराठी साहित्यिकांचं खरं आणि मूलभूत धोरण हे थंडशाहीचं आहे. म्हणजे काय होतं, कुठून कुठून सन्मान चालून आले, गौरव चालून आले की, आम्हाला अगदी राहावत नाही. नाही कसं म्हणणार? असं म्हणत म्हणत आम्ही भल्या भल्या नेत्यांच्या सोबत सुहास्य वदनाने त्यांच्या हातून मोठमोठे पुरस्कार स्वीकारतो. प्रसंगी त्याच नेत्यांना सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल जाहीर पाठिंबाही देतो, कारण एकच आणि ते म्हणजे आमचे अधिकृत धोरण ‘थंड’शाही.
  • प्रज्ञा पवार तुम्ही आम्हाला हे बंडशाहीचे धडे कशाला शिकवत आहात? ते काही आम्हाला पचणारे नाहीत! खरे तर पुराणातल्या गोष्टी पुराणातच ठेवल्या पाहिजेत त्याप्रमाणे नंतर निर्माण झालेलं संत साहित्य आणि त्यातल्या गोष्टीही अशाच पुस्तकातच ठेऊन दिल्या पाहिजेत, हे आमचं ठाम मत आहे. आता हेच बघा ना, संत तुकाराम यांच्या रचना आम्ही अभ्यासतो, वाचतो, प्रसंगी भाषणं करताना सटा सट तुकारामांची वचने श्रोत्यांच्या तोंडावरती फेकतो, त्यांना चकीत करतो; पण तुम्ही जर आम्हाला तुकाराम महाराजांसारखी कृती करायला सांगाल, तर ते मोठं अवघड आहे. आता हेच बघा ना, असं म्हणतात की, शिवाजी महाराज संत तुकारामांच्या गावी गेले आणि त्यांना गौरविण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला :

तुम्हापाशी आम्ही । येऊनिया काय ।
वृथा आहे सीण । चालण्याचा ॥
मागावे हे अन्न । तरी भिक्षा थोर ।
वस्त्रासी हे थार । चिंध्या बिंदी ॥
निद्रेसी आसन । उत्तम पाषाण ।
वरी आवरण । आकाशाचे ॥
येथे काय करणे । कवनाची आस ।
वाया होय नाश । आयुष्याचा ॥
राजगृहा यावे । मानाचिया आसे ।
तेथे काय वसे । समाधान ॥
रायाचीये घरी । भाग्यवंता मान ।
इतरा सामान्य । मान नाही ॥
देखोनिया वस्त्रे । भूषणाचे जन ।
तात्काळ मरण । येते मज ॥
ऐकोनिया मानाल । उदासता जरी ।
तरी आम्हा हरी । उपेक्षीना ॥
आता हेची तुम्हा । सांगणे कौतूक ।
भिक्षे ऐसे सुख । नाही नाही ॥
तप व्रत याग । महा भले जन ।
आशा बद्ध हीन । वर्तताती ॥
तुका म्हणे तुम्ही । श्रीमंत मनाचे ।
पूर्वीच दैवाचे । हरिभक्त ॥
(सार्थ तुकाराम गाथा, ढवळे प्रकाशन, पृष्ठ 961, क्षेपक अभंग क्र. 82)


  • आता हा अभंग आम्हा साहित्यिकांना किती गैरसोयीचा? बरं आमचा बाणा ‘थंड’शाहीचा! त्यामुळे आम्ही थंड डोक्याने भरपूर (?) अभ्यास केला. भरपूर विद्वानांनी भरपूर डोके लावले आणि सगळ्यांनी मिळून ठरवले हा अभंग प्रक्षिप्त आहे. तेव्हा आम्ही थंडशाहीवादी साहित्यिक सर्वसामान्य वाचकांना हेच सांगू इच्छितो, असले प्रक्षिप्त अभंग आम्ही मानत नाही, परिणामी त्याप्रमाणे आचरण करण्याची आमची जबाबदारी नाही. पारंपारिक गाथांमध्ये हे अभंग क्षेपक अभंग म्हणूनच आम्ही अजूनही ठेवले आहेत. तुमचे नशीब थोर की हे अभंग गाळूनच टाका असे आम्ही म्हटलेले नाही.
  • तेव्हा प्रज्ञा पवार तुम्ही आम्हाला झुंडशाही विरोधात भूमिका घ्यायचा आग्रह करू नका. अहो काय होतं, झुंडशाहीच्या विरोधात भूमिका घेतली की, फार मोठी पंचाईत होऊन बसते. त्या कन्नड साहित्यिकांना काय लागतं? ते आपले झुंडशाहीच्या विरोधात भूमिका घेतात आणि प्रामाणिकपणे साहित्य निर्मिती करत बसतात! मग त्यांच्याकडून मोठमोेठं लिखाण होतं आणि त्यांना ज्ञानपीठ-बिनपीठसारख्या पुरस्कारांच्या लॉटर्‍या लागतात. भैरप्पासारखे कादंबरीकार त्यांच्याकडचे - त्यांच्याकडे तर वाचले जातातच; पण इकडे मराठीत येऊनही त्यांना मोठा वाचकवर्ग मिळत जातो. आता तुम्हीच सांगा, याचा काय बरे उपयोग? साहित्य सेवा म्हणजे कशी तर गल्लीतल्या नगरसेवकापासून ते मुंबईतल्या मंत्र्यांपर्यंत किंवा दिल्लीतल्या केंद्रीय मंत्र्यापर्यंत कोणत्या तरी मोठ्या आमदार मंत्रीपदाची झुल पांघरलेल्या गुंड, भ्रष्टाचारी माणसाला पकडायचे, त्याच्याकडून ‘भव्य’ प्रमाणात संमेलनाचे आयोजन करायचे, सर्व साहित्यिकांची उत्तम ‘बडदास्त’ ठेवायची. प्रत्यक्ष भाषणे किंवा कविता कशाही होवोत, स्मृतिचिन्ह मात्र जोरदार द्यायचं! संमेलन घडवून आणणार्‍या साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची सगळ्यांत चांगली ‘सोय’ ठेवायची हीच खरी साहित्य सेवा! यातले काही त्या कन्नड साहित्यिकांना जमते का? त्यांच्याकडे मोठमोठी साहित्य संमेलने भरतात का? शासनाच्या पैशाने फुकटात विश्‍व संमेलनाला गेल्याशिवाय आणि तिथे ‘मसाज’ करून घेतल्याशिवाय मराठी भाषेला आणि साहित्य संस्कृतीला ‘साज’ चढणार कसा? 
  • आता हे सगळं त्या कन्नड लेखकांना कोण सांगणार? ते बसले आपले बोंबलत झुंडशाहीच्या नावाने! अरे, इकडे बघा जरा, वेगवेगळ्या बँकांमधले घोटाळे, सिंचनाचे घोटाळे, बांधकाम विभागातले घोटाळे याच्या तोडीस तोड आम्हीही आता साहित्य महामंडळात ‘सह्या’जी रावांचे अनोखे प्रयोग सुरू केलेले आहेत. साहित्य संमेलनातल्या बिलांचे आकडे इतरांच्या तुलनेत भले छोटे असोत; पण आमची वृत्ती मात्र मोठमोठे घोटाळे करणार्‍यांपेक्षा थोडीसुद्धा कमी नाही. हे सगळं केल्याशिवाय मराठी साहित्याची सेवा करणार कशी? र्‍हस्व आणि दीर्घचे नियम जराही माहीत नसलेल्या माणसाला मराठी भाषा सल्लागार समितीवर नेमल्याशिवाय मराठी भाषा आणि संस्कृतीला ‘गार’ कसे करता येईल? तेव्हा कन्नड साहित्यिकांनो हे असले झुंडशाहीचे विरोधात बोंब मारून त्रास करून घेणे आम्हाला कदापीही मंजूर नाही.
  • साहित्य संमेलन, साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांना मिळणारा शासकीय व इतर निधी यांचा मलिदा खाऊन सर्व साहित्य सांस्कृतिक संस्था आम्ही ‘गार’ केलेल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच आमचे अधिकृत धोरण हे ‘थंड’शाहीचे आहे. हे तुम्हाला कळत कसे नाही? तुम्हाला जे काही साहित्य-संस्कृतीच्या नावानं बोंबलायचे आहे ते खुशाल वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे यांतून बोंबला, करोडो रुपयांचे घोटाळे करून हसर्‍या चेहर्‍याने, शांतपणे सत्ता भोगणार्‍यांचे ‘आदर्श’ आमच्या समोर आहेत. नव्हे, त्याच ‘आदर्श’मध्ये आम्हालाही कुठे जागा भेटावी म्हणून तरसत आहोत. तेव्हा हे कन्नड साहित्यिकांनो झुंडशाहीच्या विरोधात बोंबलून तुम्ही गरीबच राहा! पुरस्कार आणि वाचकांचे प्रेम मिळवत राहा, चांगली साहित्यनिर्मिती करत राहा, आम्ही मात्र चौथ्या विश्‍व संमेलनासाठी फुकटाचे तिकीट मिळावे म्हणून सज्ज आहोत. 

--
श्रीकांत उमरीकर