Showing posts with label हैदराबाद. Show all posts
Showing posts with label हैदराबाद. Show all posts

Saturday, June 15, 2013

मुसा के डासां भौत हे मगर । गोमती के मच्छर नकूच नकू ॥

दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख दि. १५ जून २०१३

स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद राज्यात निजामाच्या दरबारात दोन गट पडलेले होते. स्थानिक भाष बोलणारे, स्थानिक रिती रिवाज परंपरांचे जतन करणारे लोक यांचा एक गट. आणि हैदराबाद राज्याच्या बाहेरून आलेले, फारसी मिश्रीत उर्दू ही सर्वश्रेष्ठ भाषा मानणारे उत्तरप्रदेशातून आलेले लोक यांचा दुसरा गट. उत्तरप्रदेशातील गोमती नदीच्या काठावरील हे बाहेरचे लोक आणि हैदराबाद मधून वाहणार्‍या मुसा नदीच्या काठचे लोक असा तो सुप्त संघर्ष होता. हैदराबाद राज्यात जी भाषा बोलली जाते तीला दखनी म्हणतात. ही भाषा म्हणून उर्दूची लोकभाषा आहे असा एक गैरसमज आहे. वस्तूत: ही भाषा याच परिसरातील स्वतंत्र भाषा असून तिचे व्याकरण बहुतांश वेळा मर्‍हाठीप्रमाणे चालते हे श्रीधरराव कुलकर्णी यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या भाषेत डासांना डासच म्हणतात मच्छर म्हणत नाहीत. झाडाला झाडच म्हणतात. पेड म्हणत नाहीत. बाहेरून आलेले लोक स्वत:ला जास्त शहाणे समजातात म्हणून त्यांना मारलेला हा टोमणा आहे,
मुसा के डांसा भौत है मगर । गोमती के मच्छर नकूच नकू ॥
या दखनी भाषेबाबत श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांचे एक मोठं सुंदर पुस्तक आहे. ‘दखनी भाषा : मर्‍हाटी संस्कृतीचा एक अविष्कार’ या नावाचे. त्यांच्याच ‘साहित्यसेतू’ या पुस्तकाचा संदर्भ मी मागच्या लेखात दिला होता (मराठी ही हिंदीची उपभाषा नसून हिंदीला समृद्ध करणारी भाषा आहे, 1 जून 2013). दखनी भाषेवरचे हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्थेनेनेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकात श्रीधररावांनी मोठ्या चिकाटीनं संशोधन करून दखनी भाषा ही मर्‍हाटी संस्कृतीचा एक अविष्कार कसा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
आधुनिक भारतीय भाषांचा साहित्यातील प्रारंभ साधुसंतांच्या कवनांनी झालेला आहे. ही भाषा कोणती होती? आपआपल्या परिसरात बोलली जाणारी भाषा समजून घेवून साधुसंतांनी त्या भाषेत रचना केल्या. महाराष्ट्रातील मराठवाडा, कर्नाटकातील बीदर, रायचूर, गुलबर्गा हे तीन जिल्हे आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा विभाग यांचे मिळून हैदराबाद राज्य होते. या प्रदेशात साधुसंतांनी ज्या भाषेत रचना केली त्या भाषेला ‘बैरागी’ भाषा म्हटले जाते. गोरखनाथादी सिद्ध आणि त्यांची ‘बैरागी’ भाषा यांचे उल्लेख ‘लीळाचरित्रात’ आलेले आहे.
या दखनी भाषेला उर्दूची बोलीभाषा म्हणून संबोधले जाणे हे मुळातच चुक आहे. दखनी भाषेत उर्दूच्या तीनशे वर्षे आधी काव्यरचना झालेली आहे. म्हणजे बोली भाषा आधी आणि प्रमाण भाषा नंतर असे कसे होईल? या दखनी साहित्याचा प्रारंभ बहामनी राजवटीत ( 1347 -1527) या काळात झाला. 1707 मध्ये मृत्यू पावलेला वली औरंगाबादी हा दखनीचा शेवटचा कवी. वली औरंगाबादीचे आपल्या दखनी भाषेवर विलक्षण प्रेम होते. त्याचबरोबर त्याचा दक्षिण प्रदेश व या परिसरातील मराठी लोक यांच्यावरही विलक्षण जीव होता. त्याची एक रचना मोठी सुंदर आहे.
आज माशुक लडका मरहटा है ।
मिठाई बंद शकरसूं मीठा है ।
सजन है सांवला सजका सजीला ।
कटीवा होर हटीला लटपटा है ।
दखनी भाषेचा मराठी अनुबंध केवळ वरवरचा नाही. तर साधुसंतांच्या काव्यात जे आध्यात्म मराठी संतांनी सांगितले तीच रचना दखनी भाषेतही करण्यात आली.
संत रामदासांच्या ‘मनाच्या श्लोका’चा अनुवाद शाह तूराब यांनी दखनीत केला ही एक फार महत्त्वाची घटना आहे. शाह तुराब (इ.स.1695 ते 1787) या तामिळनाडूतील वेल्लोर  येथील सूफी संताने (याच सुफी संतांची कबर परभणी येथे आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तिथे मोठा उरूस भरतो. अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या उरूसानंतर याच उरूसाचा नंबर लागतो. या सदराचे नावही मी याच संताच्या फेब्रुवारी महिन्यात भारणार्‍या उरूसावरून ‘उरूस’ ठेवले आहे. )
आत्माराम ओळखावा हे रामदासांच्या श्लोकांचे मर्म शाह तुराब यांनी आपल्या भाषेत मोठे सुंदर मांडले आहे
कही देवपूजे कूं मंदिर बनाते
कंही तोड देवल मशीत उंचाते
जिनके आत्मराम का घर पछाना
अरे मन नको रे नको हो दिवाना
तुराब ने नही झूट ये बात बूजा
महादेव होर राम मे नही है दूजा
आपस तो आपी आप को करता है पूजा
पुछो रामदास और को जा ॥
फक्त संतांच्या रचनेतच दखनी शब्द आहेत असं नाही. तर सगनभाऊ सारख्या शाहिरांच्या लावण्यातही दखनी भाषा आणि शब्द आले आहेत. म्हणजेच ही भाषा जनसामान्यांची या परिसरातील भाषा होती हे सिद्ध होते.
दाद कोई नही देता मै तो जोगिन होउंगी ।
राख लावा माझ्या अंगी ॥
हाल हाल फकीरी लेऊ धूंडत बन बन मे जाऊ ।
सख्याला दृष्टीने पाहू ।
प्रीतम प्यारे हो गये न्यारे  बिडा किसे देऊं ।
कोण्या समजूतीने समजाऊ ।
सगनभाउंच्या या रचनेत तर मराठी आणि दखनी ओळी एकमेकांच्या आड आलेल्या आहेत. दखनीत भाषेत जी शब्दांची रूपं येतात ती रूपं सरळ सरळ मराठीसारखीच आहे. मी काय पाप केले म्हणून असा नवरा मिळाला (दखनी-मै क्या पाप करी बोलके ऐसा शोहर मिल्या.) त्याने मी येत नाही म्हणून सांगितले. (उन्ने मै नई आताउ बोलके कह्या.) त्यांना घोडा मिळाला नाही म्हणे (उनकू घोडा नई मिल्या कते.)
इतकंच काय पण वाक्प्रचारही तसेच आहेत. इकडे आड तिकडे विहीर, (इधर बाई उधर कुवां), गर्भगळित होणे (गरब गलना), नाव टाकणे/सोडणे (नांव छोडना), साटे बुद र्‍हाटे (साठी बुद्धी नाठी). आपल्या पुस्तकात श्रीधररावांनी दखनीमध्ये येणार्‍या मर्‍हाटी शब्दांची प्रचंड मोठी यादीच दिली आहे. म्हणजे दखनीचे व्याकरण मराठीप्रमाणे चालते, शब्दांना प्रत्यय मर्‍हाटीप्रमाणे येतात, वाक्प्रचार, म्हणी मराठीसारख्या आहेत. स्वाभाविकच दखनी ही मर्‍हाटी संस्कृतीचा एक देखणा आविष्कार आहे.
या वर्षी औरंगाबादमधली 20 मुलांना तैवानच्या विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवडले गेले. त्यांच्यातला एक विद्यार्थी आकाश धुमणे माझा मित्र आहे. त्याच्याशी एकदा व्हिडीओवर बोलत असताना अचानक माझ्या कानावर ‘रोडां पे मजाका नही करते रे.’ हे वाक्य आले. मी आकाशला विचारले तूझ्या बाजूला कोण मुलगा आहे? तो कुठला आहे? त्याने सांगितले त्याचे नाव अब्रार असून तो औरंगाबादचाच आहे. त्याची ही भाषा आम्हाला खुप आवडते. इतकंच नाही तर या दखनी भाषेतील ‘अंग्रेज’ हा चित्रपट सध्या आम्हा दोस्तांमध्ये हिट आहे.
बहामनी साम्राज्यात विकसित झालेली दखनी आजच्या काळात परदेशात शिकणार्‍या 19-20 वर्षांच्या मुलांनाही खुप आवडते. इतकंच नाही तर या भाषेत चित्रपटही निघतात. ते लोकप्रियही होतात. अशा एका भाषेत आपल्या मर्‍हाटी भाषेचे मोठे योगदान असते हे आमच्या लक्षातच येत नाही. आजच्या मराठी मुलांनाही या भाषेचे आकर्षण आहे.
मध्यंतरी प्रसिद्ध मर्‍हाटी पटकथाकार अभिनेते अरविंद जगताप याने अभिनेता सयाजी शिंदे सोबत आपला एक फोटो फेसबुकवर टाकला. ‘फलकनुमा पॅलेस मध्ये मी सयाजी सोबत’ असं त्या फोटोखाली लिहीलं होतं. फलकनुमा पॅलेस म्हणजे हैदराबाद हे माझ्या लक्षात आले. मी त्याच्यावर गमतीने दखनी भाषेत एक शेरा टाकला, ‘क्या मियां, सफेद शर्टा, जिन्स के पँटा पहेन के फलकनुमा पॅलेस मे क्या करे? वेटर ने रात की बिर्यानी सुबह गरम करके दी तो नही बोले और वेटरां को फल्ली का सुखा सालन (शेंगदाण्याची कोरडी चटणी) मांग मांग के परेशान किये..’ या शेर्‍यावर बहुतांश मर्‍हाटी तरूण मुलांनी आपल्या आवडीची मोहोर उमटवली.
आज भाषा नविन संपर्काच्या साधनांनी जगभर अतिशय कमी वेळात पोचत आहे. आपल्या मनातील भाव व्यक्त करायला आधुनिक तंत्रज्ञान शिकणार्‍या अब्रारसारख्या विद्यार्थ्यालाही ‘रोडां पे मजाकां नही करते’ हेच शब्द वापरावे वाटत असतील आणि त्याच्या मित्रांनाही ती भावना याच शब्दांतून तंतोतंत समजून येणार असेल तर आपण काय म्हणणार? आपण हे समजून घेणार आहोत की नाही?