Sunday, June 9, 2013

नांदापुरकर । तूम्हास स्मरणे । मराठी कारणे । अनिवार्य॥

दैनिक महाराष्ट्र टाइम्स दि. ९ जुन २०१३ मधील लेख 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या औरंगाबाद येथील सभागृहास डॉ. नांदापुरकरांचे नाव दिलेले आहे. त्यांचे एक तैलचित्र तिथे लावले आहे. शिवाय ‘माझी मराठी मराठाच मीही’ ही नांदापुरकरांची ओळ मराठवाडा साहित्य परिषदेच्या बोध चिन्हावर बोधवाक्य म्हणून विराजमान आहे. साहित्य परिषदेतील एका कार्यक्रमात एक तरूण पत्रकार मला बाजूला घेवून दबक्या आवाजात म्हणाला, ‘‘सर माफ करा पण हे नांदापुरकर कोण होते हो? मला खरेच माहित नाही.’’ मी त्याला थोडक्यात माहिती दिली. त्याच्याशी बोलताना माझ्या प्रकर्षाने लक्षात आले की नांदापुरकरांनी मराठीसाठी बाळगलेला ध्यास पाहता त्यांची आठवण आजच्या काळात परत तीव्रपणे येते आहे.
डॉ. नारायणराच नांदापुरकर तेंव्हाच्या हैदराबाद राज्यातील मराठीचे पहिले पीएच.डी.मराठी विषयात संशोधन करण्याची सोय तेंव्हा या प्रदेशात नव्हती. नांदापुरकरांनी ही डॉक्टरेट नागपूर विद्यापीठातून मिळवली. नांदापुरकरांच्या या कतृत्वाने संपूर्ण मराठवाड्याला आनंद झाला. त्यांचे सत्कार करण्यात आले. परभणीच्या जनतेने त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना रू. 1000/- ची थैली त्या काळी अर्पण केली.
नांदापुरकरांचा जन्म नांदापुर या गावी (तेंव्हाचा परभणी जिल्हा, ता. कळमनुरी) 14 सप्टेंबर 1901 रोजी झाला. गावातील प्राथमिक शिक्षणानंतर हैदराबाद येथे माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतले. परभणीतून मॅट्रिकची परिक्षा दिली.  आणि हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळवली. नांदापुरकरांचा औरंगाबादशी पहिल्यांदा निकटचा संबंध आला तो त्यांच्या नौकरीच्या निमित्ताने. औरंगाबाद येथे इंटरमिजिएट महाविद्यालयात त्यांनी अध्यापकाची नौकरी काही काळ केली. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. काही काळानंतर त्यांची नियुक्ती मराठी विभाग प्रमुख म्हणून झाली. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते उस्मानिया विद्यापीठाच्या मराठी विभागातच कार्यरत होते.
डिसेंबर 1995 मध्ये परळी वैजनाथ येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. नांदापुरकरांनी भूषविले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप करताना नांदापुरकर म्हणाले होते, ‘...मराठवाडा स्वत:चे कांही वैचारिक, तांत्रिक, साहित्यीक धन एकंदर महाराष्ट्रास देऊ शकतो. एकंदर जनता जरी मागासलेली असली तरी तरुण सुशिक्षित वर्ग एकंदर महाराष्अ्रांतील तरुणांची सर्वच प्रकारांत समानतेने स्पर्धा करणारा दिसून येईल. संधी आणि साधने मिळाल्यास एकंदर महाराष्ट्रीय समाजांत एकरूप होऊन जाण्यास कांहीच अवकाश नाही.’नांदापुरकरांचा हा आशावाद आजही वास्तवात उरतलेला नाही. तो अजूनही आशावादच उरला आहे हे वेगळे सांगायची काही गरजच नाही.
नांदापुरकरांबद्दल सामान्य मराठी जनांना आस्था वाटायची त्याचे कारण त्यांची विद्वत्ता हे तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांनी लोकगीतांसंदर्भात केलेले काम हे आहे. मराठवाड्यात सर्वत्र फिरून नांदापुरकरांनी लोकगीते गोळा केली. जात्यावरच्या ओव्यांमधून आख्खे रामायण उभे करण्याचा त्यांचा प्रकल्प तर केवळ अप्रतिम. जागतिक वाङ्मयातील ही एकमेव घटना आहे. आभिजात वाङ्मय म्हणविल्या गेलेले रामायण, सर्वसामान्य बायकांच्या तोंडी असलेल्या अलिखित ओव्यांमधून पूर्णपणे उभे कसे राहते, त्याचे विविध मानवी पैलू कसे समोर येतात हे थक्क करणारे आहे.
जनाबाईच्या गंगाखेड परिसरात जनाबाई, विठ्ठल आणि रूक्मिणी यांच्यावरील अप्रतिम ओव्या नांदापुरकरांना सापडल्या आहेत. स्त्रीच्या मत्सरग्रस्त स्वभावानुरूप रूक्मिण विठ्ठलाला विचारते, ‘इठ्ठलाचे पाय ।  रूक्मिण दाबी राग । खरं सांगा इठ्ठला । जना तूमची कोन लाग ॥ याला विठ्ठलाने दिलेले उत्तर बायकांनीच ओव्यात सुंदररित्या मांडलं आहे. ‘इठ्ठल मनीती । नको रक्मिनी राग करू । जना धर्माचं लेकरू । आलं थार्‍याला पाखरू ॥
 नांदापुरकरांनी गोळा केलेल्या या ओव्यांतून ‘मराठवाड्यातील स्त्री रचित रामकथा’ हा ग्रंथ डॉ.सौ. उषा जोशींनी संकलीत केला आणि हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने त्याचे 1990 मध्ये प्रकाशन केले. बरं या ओव्या नुस्त्या माहितीपर नाही. तर त्यातून एक कलात्मक जाणिवही नांदापुरकरांनी दाखवून दिली आहे.
दारी मांडव ग घाला । फुलासगट जाईचा । छंद रामाच्या आईचा ॥
या ओवीतील रामाची आई कौसल्या नुसत्या मांडवाचा आग्रह धरत नसून फुलासगट जाईच्या मांडवाचा आग्रह धरते आहे. दशरथाला मिळालेले दान त्याने पायसाचे तीन वाटे करून तीन राण्यांना दिले. त्याचे चार पुत्र कसे झाले याची एक सुंदर कथा बायकांनी रचली आहे.
कैकयी रूसली । मागल्या मानासाठी । पिंड घारीनं झपाटिली । नेली आकाशाच्या पोटी ॥
पिंड घारीनं झपाटिली । पडली अंजनीच्या हाती । त्याचे जन्मले मारोती ॥
कौसल्या सुमित्रानं । पिंड वाटून दिले । येका पिंडा दोघं झाले । भरत शत्रुघ्न ॥
बायकांच्या या रचनांमधील सौंदर्य नांदापुरकरांना सापडले. त्यांनी ते मोठ्या मेहनतीनं गोळा केलं आणि जगाच्या नजरेसमोर आणले. या कामासाठी त्यांच्याबद्दल सामान्य जनांना आस्था वाटत राहिली.
‘मायबोलीची कहाणी’ नावाची एक गद्य कविता नांदापुरकरांनी लिहीली. ती तर केवळ अप्रतिम. आजही मराठी भाषेसंदर्भात असले गद्य काव्य दुसरे निर्माण झाले नाही. गद्य भाषेत जी एक नितांत सुंदर लय असते त्याचा अनुभव नांदापुरकरांच्या या रचनेत येतो. मराठीमध्ये लीळाचरित्राचे गद्यकाव्याचे सगळ्यात मोठे उदाहरण आहे. गद्य काव्याचे प्रयोग फार थोडे झाले आहे. अगदी अलिकडच्या काळात भालचंद्र नेमाडेंच्या हिंदूमध्ये हा प्रयोग नेमाडेंनी मोठ्या ताकदीने केला आहे.
नांदापुरकर मराठी भाषेची जन्म कथा सांगताना लिहीतात,
‘देवाने तिच्यासाठी महाराष्ट्राचा पाळणा केला. त्यावर आपल्या कृपेचा चांदवा केला. त्याला सह्य आणि सातपुड्याची खेळणी लटकाविली. चांदव्याच्या भवती वनश्रीची झालर लाविली. कृष्णा-गोदा यांचा गोफ विणून पाळण्याला हालविण्यासाठी दोरी केली. इकडून मातापुरवासिनी रेणुका आली. तिकडून तुळजापुरची आई भवानी आली. त्यांनी पाळणा म्हटला. साधुसंतांनी तिचे नाव ’मराठी’ असे ठेविले. बाळांनो, हीच तुमची माय मराठी- आमची कहाणी थोडी, तिची अवीट गोडी.
ही कहाणी ऐकल्याने काय होते? अंगीचा आळस जातो, कर्तृत्वाचा कळस होतो. मोठ्यांचा दूरभिमान जातो. लहानाअंगी स्वाभिमान येतो. देशाचे दारिद्य्र दूर होते. काशीची कावड रामेश्वराला जाते. गंगथडीचा हुरडा काबुलात भाजतो. काबूलचा मेवा परसात पिकतो. ’
मराठी भाषेची महती सांगताना विश्वात्म भान नांदापुरकर विसरले नाहीत. गंगथडीचा हुरडा काबुलात भाजतो म्हणत त्यांनी हे धागे जोडले आहेत.
डॉ. ना.गो.नांदापुकरांचे समग्र साहित्य त्यांच्या जन्मशताब्दि वर्षात प्रकाशित करण्याचा प्रकल्प हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने हाती घेतला. त्याला काही अडथळे आले तेंव्हा प्रकल्पाचे मुख्य संपादक प्रा.द.प.जोशी यांनी माझ्यापाशी हे काम पूर्ण होते की नाही याबद्दल खंत व्यक्त केली. मी स्वत: हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो म्हणून त्यांना आश्वासन दिलं व त्याप्रमाणे कामही सुरू केलं. योगायोगाने महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वेगळा निधी मंजूर केला. आम्ही सादर केलेला वेगळा प्रस्ताव मागे घेवून मी त्या प्रकल्पात सह-संपादक म्हणून सामिल झालो. ऑक्टोबर 2004 मध्ये समग्र नांदापुरकरांच्या दोन्ही खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. आज नांदापुरकरांचे सर्व साहित्य अभ्यासकांना उपलब्ध आहेत. वाईट याचेच वाटते नविन पिढीत नांदापुरकरांच्या साहित्याचा अभ्यास करणारे फारसे कुणी आढळत नाहीत.
आम्ही नांदापुकरांच्या नावे सभागृह केले, त्यांच्या नावाची व्याख्यानमाला चालवून साहित्य परिषद आपले कर्तव्य चोखपणे पार पाडते आहे. पण त्यांच्या साहित्याचे काय? त्याचा अभ्यास कोण करणार?
9 जून 1959 रोजी नांदापुरकरांचे निधन झाले. त्यांनी मराठीसाठी बाळगलेला ध्यास, मेहनतीने लोकगीते गोळा करून केलेले काम याचे महत्त्व आजही वाटते. जी ओळ मराठवाडा साहित्य परिषदेचे बोधवाक्य झाली आहे त्या कवितेतील काही ओळी कायमच्या स्मरणात राहणार्‍या आहेत.

माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे

आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळी ना कुणा
आकंठ प्यालो हिचे दुग्ध अंगी पहा रोमारोमांतुनी या खुणा
तोडा चिरा दुग्ध धाराच येती न हे रक्त वाहे शरीरातूनी
‘माझी मराठी मराठाच मी ही’ असे शब्द येतील हो त्यातुनी

मराठीचा द्वेष करणार्‍या निजामी राजवटीच्या काळात नांदापुकरांनी आपले भाषाभान जागते ठेवले आणि भाषेसाठी काम केले. आज कमालीची अनुकूलता असताना आणि स्वभाषा राजभाषा कसताना आम्ही काय करतो हा प्रश्न प्रत्येकालाच पडला पाहिजे. त्यासाठीच म्हणावे वाटते
नांदापुरकर । तूम्हास स्मरणे । मराठी कारणे । अनिवार्य ॥
  
 

No comments:

Post a Comment