तीचा जन्म 1 जून 1929 चा. त्याचा जन्म तिच्या बरोबर पाच दिवसानंतरचा 6 जून 1929 चा. तिचे मूळ गाव रावळपिंडी, पश्चिम पंजाब (आताचा पाकिस्तान) त्याचेही मूळ गाव झेलम पश्चिम पंजाब. तिचे वडिल पंजाबी. तोही पंजाबी. तिचे चित्रपट गाजले ते परत त्याच परिसरातील असलेल्या नटासोबत. ती राज्यसभेवर खासदार होती. तिचा नवराही खासदार होता. केंद्रात मंत्री होता. तिची मुलगीही खासदार होती. तीचे खरे नाव फातिमा राशिद. इतकं सांगितलं तर वाचकांना फारसा उलगडा होणार नाही. पण नर्गीस इतके शब्द उच्चारले की बाकी काही सांगायची गरजच उरत नाही.
अभिनेत्री नर्गिसचा जन्म कोलकत्त्याचा. तिचे कुटूंब मूळचे पाकिस्तानात गेलेल्या पंजाब प्रांतातले. तिने लग्न केले सुनील दत्तशी. त्याचेही गाव त्याच परिसरातले. फाळणी नंतर सुनील दत्तचे कुटूंब भारतात आले. त्यांना आश्रय दिला तो त्यांच्या वडिलांचे मुस्लीम मित्र याकुब यांनी. हरियानातल्या एका छोट्या गावात ते राहिले. पुढे लखनौला स्थलांतरीत झाले.
इकडे आपण हिंदू मुस्लीम एकतेच्या गप्पा मारत राहतो. पण कित्येक कलाकार आपल्याकडे असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्याची किंमत यासाठी मोजली आहे. आपले आयुष्यच या सगळ्याचे उदाहरण म्हणून समोर ठेवले आहे. भारतात कलेला पोषक वातावरण आहे हे हिंदू इतकेच मुस्लीम कलाकारांनाही माहित होते. बडे गुलाम अली असो की साहिर लुधियानवी असो असे कित्येक कलाकार इथेच राहिले. आणि त्यांनी आयुष्यभर भारतातील कला रसिकांच्या पोटी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
नर्गीसने 1935 पासूनच चित्रपटात काम करायला सुरवात केली. पण तिचा खरा बोलबाला झाला तो राज कपुर सोबतच. राज कपुर परत त्याच पंजाब प्रांतातला. फाळणीचे चटके त्याच्याही कुटूंबाला भोगावे लागले. पाकिस्तानात गेलेल्या पंजाबच्या मातीतच काहीतरी कलेचे गुण असावेत.
नर्गीसचे चित्रपट गाजले ते राज कपुर सोबत. ‘आह’ मध्ये लताचा कोवळा सुर नर्गीसला मिळाला आणि ‘आजा रे अब मेरा दिल पुकारा’ हे आर्त अवीट गोडीचं गाणं रसिकांच्या कानावर पडलं. तिथेच लता-नर्गीस-शंकर/जयकिशन-राजकपुर हे समिकरण जूऴून आलं. नंतर राज कपुरच्या चित्रपटात इतरही नायिका आल्या. नर्गीसनेही इतर ठिकाणी काम केलं. पण जी प्रतिमा राज-नर्गीस या जोडीची तयार झाली ती कधीच पुसली गेली नाही. आर के बॅनरचे बोधचिन्ह मोठे सुचक आहे. एका हातात व्हायोलिन व एका हातावर नायिका घेवून उभा असलेला नायक. यात नायक अर्थातच राज कपुर तर नायिका नर्गीस आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही.
'आह' मधील ‘जाने न जिगर पहचाने नजर’ किंवा ‘आवारा’ मधील ‘मै तूमसे प्यार कर लूंगी’ किंवा ‘श्री 420’ मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ किंवा ‘चोरी चोरी’ मधील ‘ये रात भिगी भिगी’ अशी कितीतरी सुंदर गाणी राजकपुर-नर्गीस यांच्यावर चित्रीत झालेली आहे. भारतीय चित्रपटात प्रेम करणार्या जोडप्याचे प्रतिक म्हणून राज-नर्गीस यांचेच नाव घ्यावे लागते. देखण्या देव आनंद आणि स्वरूप सुंदरी मधुबालाचे चाहते खुप आहेत. पण त्यांचे एकत्र चित्रपट मात्र लोकांना तेवढे भावले नाहीत.
नर्गीसला सुरैय्या किंवा नुरजहां सारखा गोड गळा नव्हता. वैजयंती माला किंवा वहिदा रहमान सारखी नृत्यनिपुणता नव्हती. मधुबाला सारखे सौंदर्य नव्हते. पण गीता बाली, नुतन यांच्यासारखी एक सहजता तिच्यात होती. खाली गुडघ्यापर्यंत येणारी काळी पँट, वरती पांढरा अर्ध्या बाह्यांचा शर्ट, छोट्या केसांच्या दोन सुंदर वेण्या, त्याला लावलेल्या रिबीनी आणि समोरच्या तरूण देखण्या राजकपुरला ‘मै तूमसे प्यार करू लूंगी’ असं म्हणणारी नर्गीस. 1952 मध्ये एखादी नायिका नायकाला सरळ सरळ प्रेमाची कबूली देते आहे. हे अतिशय वेगळं होतं. तिचा वेशही वेगळा होता. तिचे आविर्भावही वेगळे होते.
स्वातंत्र्यानंतर सारंच बदललं होतं. 1950 नंतर जगाचे संदर्भ बदलले. जगभरातील अर्ध्याहून अधिक देश नेमके याच काळात स्वतंत्र झाले. मोकळेपणाचे वारे सगळीकडे वाहू लागले. मग स्वाभाविकच नायक आणि नायिकाही आपल्या प्रेमाची उघड उघड कबूली द्यायला लागले. आपले प्रेम जाहिर व्यक्त करू लागले. याच काळात वैजयंतीमालाचे गाणे ‘सैय्या दिल मे आना रे’ बघणार्या एैकणार्या प्रेक्षकांना राज-नर्गीस जोडीच्या गाण्यांमधून वेगळं आपल्या जवळचं असे काही मिळत होतं. ‘सैय्या दिल मे आना रे’ हे शमशादचे गाणे. राज कपुरच्या पहिल्या चित्रपटात ‘आग’मध्ये नर्गीस साठी शमशादचाच आवाज वापरला होता. पण नर्गीस, मधुबाला, वैजयंतीमाला, गीताबाली, वहिदा रहमान यांच्यासाठी शमशादचा आवाज शोभत नव्हता. आता लता, गीता, आशा यांचे सुर त्यांच्या तोंडी असलेले लोकांना जास्त भावत होते.
नर्गीसने पडद्यावर राजकपुर सोबत भूमिका निभावल्या पण पडद्यामागे सुनील दत्त सोबत संसार रंगवला. 1958 ते मृत्यूपर्यंत सुनील दत्त सोबत एकनिष्ठ राहून तिनं पत्नीची भूमिका निभावली. पण पडद्यावर मात्र या दोघांची जोडी जमली नाही.
सुनील दत्तचे चित्रपट नर्गीसची कारकीर्द संपल्यावरच्या काळात जास्त गाजत गेले. विशेषत: बी. आर. चोप्रा सोबत ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘हमराज’ हे चित्रपट जास्त लोकप्रिय झाले. साहिर सारखा गीतकार, रवी सारखा संगीतकार असल्याने महेंद्रकपुरचा पडेल निर्जीव आवाजही लोकांनी सहन केला. इतकेच नाही तर या गाण्यांना लोकप्रियता लाभली. ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’, ‘इन हवाओ मे इन फिजाओ मे’ (गुमराह), किंवा वक्त मधील गद्य कविता वाटावी असे गाणे ‘मैने देखा है फुलो की वादी मे’ किंवा हमराज मधील ‘तुम अगर साथ देने का वादा करो’ हे गाणे. ही सगळी सुनील दत्तची गाणी लोकांना आजही आठवतात.
मदर इंडिया मध्ये नर्गीसने सुनील दत्तच्या आईची भूमिका केली होती. त्यासाठी तिला अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले. मदर इंडियाची गाणीही विलक्षण गाजली. पण या दोन कलाकारांची पडद्यावरची कारकीर्द रेल्वेच्या रूळांसारखी स्वतंत्रपणे समांतरपणे चालत राहिली. आणि उलट संसारिक आयुष्यात मात्र ते एकरूप होवून गेले होते.
सुनील दत्तने एक वेगळाच चित्रपट रसिकांना दिला. एकपात्री प्रयोग नाटकात केलेला आपणांस माहित असेल. पण एकपात्री सिनेमा असू शकतो का? सुनील दत्तचा ‘यादे’ नावाचा असा चित्रपट आहे. त्यात त्याने एकपात्री भूमिका केली आहे. अजूनही असे धाडस कोणी केले नाही.
सुनील दत्त यांचा 1961 मध्ये ‘छाया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलिल चौधरी यांनी यात एक सुंदर गाणे दिले आहे. ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा के मै एक बादल आवारा’. तलत महमुद/लता यांच्या आवाजतील या गाण्याचे शब्द आहेत राजेंद्रकृष्ण यांचे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध संगीतकार मोझार्टच्या 40 नंच्या सिंफनीचे संगीत या गाण्याच्या सुरवातीला वापरले आहे. भारतीय वा पाश्चिमात्य संगीताचा असा सुंदर संगम फार कमी ठिकाणी ऐकायला मिळतो. हे गाणे सुनील दत्त व आशा पारेख यांच्यावर चित्रित आहे.
नर्गीस-सुनील दत्त यांच्या आयुष्यातील एक शोकांतिका मोठी विलक्षण आहे. नर्गीस-सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त. त्याचा पहिला चित्रपट रॉकी 1981 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचा प्रिमिअर 7 मे रोजी होता. नर्गीस कॅन्सरन आजारी होती. 2 मेला ती कोमात गेली. आणि 3 मे 1981 ला तिचे निधन झाले. मुलाच्या पहिल्या चित्रपटाचा प्रिमिअर तिला पाहता आलाच नाही. या प्रिमिअर साठी सुनील दत्तच्या बाजूची एक सीट नर्गीस साठी रिकामी ठेवण्यात आली.
सुनील दत्त यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. कॉंग्रेसच्या वतीने ते मुंबई मधून खासदार म्हणून निवडून आले. मनमोहनसिंग यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही राहिले. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त ही पण खासदार म्हणून निवडून आली होती.
‘प्यार हुआ एकरार हुआ’ या गाण्यात शैलेंद्रने याने असे लिहीले आहे
रातो दशोदिशाओसे कहेगी अपनी कहानिया
गीत हमारे प्यार की दोहरायेगी जवानीया
हम ना रहेंगे तूम ना रहेंगे फिर भी रहेंगी निशानिया...
हे गाणे चित्रित करतान राज कपुर-नर्गीस हे पावसात भिजत आहेत. आणि रस्त्यावरून तीन लहान मुले एकमेकांचा हात धरून जात आहेत. लहानपणीचे शशी कपूर, रणधीर कपूर आणि ऋषी कपुर अशी ही लहान मुले आहेत.
पण याचा ढोबळ अर्थ आपले वारस असा नाही. रहेंगी अपनी निशानिया म्हणजे या कलाकारांनी मागे ठेवलेल्या कलाकृती. नर्गीस-सुनील दत्त यांनी आपल्या मागे कितीतरी सुंदर गाणी, चित्रपट ठेवून दिले आहेत. शिवाय दोघांनी धर्मापलिकडे जाणारी प्रेमाची एक सुंदर निखळ गोष्ट आपल्यासाठी मागे ठेवून दिली आहे हे विशेष. नर्गीस आणि सुनील दत्त या दोघांच्याही जयंती निमित्त त्यांची ही आठवण.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575