Tuesday, May 5, 2015

बाबासाहेबांच्या नजरेतून तथागत गौतम बुद्ध


दैनिक पुण्य  नगरी, उरूस, रविवार 3 मे 2015 

सोमवारी बुद्ध पौर्णिमा आहे. वैशाखातील ही पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस (इ.स.पूर्व 563) जातक कथेत बुद्ध जन्माची जी कथा सांगितली आहे ती अशी आहे.  महामायेच्या स्वप्नात चार दिशापुरूषांनी तिला ती झोपेत असताना हिमालयाच्या माथ्यावर नेवून ठेवले. मानसरोवरापाशी तिला स्त्रियांनी स्नान घातले. सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यासमोर येवून म्हणाला, ‘‘माझा शेवटचा जन्म मी पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होशील का?’’ महामायेनं मोठ्या आनंदानं त्याला होकार दिला. तिच्या ह्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शुद्धोदन राजानं आठ ब्राह्मणांना बोलावून घेतलं. त्यांनी या स्वप्नाचा अर्थ असा सांगितला, ‘‘ राजा, तुला असा एक पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल आणि जर त्याने संसारत्याग केला तर संन्यासी होऊन तो विश्वातील अंधार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल.’’

बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते. त्यांनी पुराणातील किंवा जातकातील अशा कथांवर विश्वास ठेवून बौद्ध धम्म नाही स्विकारला. अतिशय चिकित्सक पद्धतीनं त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य धर्मांचा दर्शनांचा अभ्यास केला. आणि विचारपुर्वक बौद्ध धम्म स्विकारला. भारतीय परंपरेत एकूण 9 दर्शनं सांगितली आहेत. त्यातील सहा दर्शनं ज्यांना षड् दर्शनं असं म्हणतात जी वैदिक आहेत (न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पुर्व मिमांसा, उत्तर मिमांसा) त्यांना आस्तिक म्हणतात. म्हणजे या दर्शनांना वेद मान्य आहेत. म्हणजे ते वेदप्रामाण्य मानतात. तर इतर तीन दर्शनं जी आहेत (लोकायत, जैन, बौद्ध) ही नास्तिक आहेत म्हणजेत ते वेद मानत नाहीत. आपण चुकून देव मानणे आणि न मानणे याला आस्तिक किंवा नास्तिक असे म्हणतो.

बुद्ध दर्शनात देव न मानणार्‍या  कपिलमुनींच्या सांख्य दर्शनाचा आधार घेतला आहे. बाबासाहेबांनीही त्याची नोंद आपल्या पुस्तकात केली आहे. बौद्ध धम्म स्विकारताना तो संपूर्णत: बाबासाहेबांनी स्विकारला नाही. विशेषत: कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पना ज्या की बौद्ध धम्मातही आहेत त्यांच्यावर बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

बाबासाहेब नोंदवून ठेवतात, ‘‘बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे; पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म ह्यांबद्दलची तत्त्वे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो. जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थाने वापरले आहेत? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्याने वापरले काय? असे असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांदे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. ’’ (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, आवृत्ती 19 वी)

राजपुत्र गौतमाची भगवान बुद्ध बनण्याची प्रक्रियाही बाबासाहेबांनी अतिशय सोप्या आणि वस्तूनिष्ठ पद्धतीने एखाद्या वकिलाने आपले म्हणणे मुद्देसूद मांडावे अशी मांडली आहे. 

मूळात पहिला प्रश्न बाबासाहेब अतिशय महत्त्वाचा असा उपस्थित करतात की भगवान बुद्धांनी परिव्रज्या(संन्यास) का ग्रहण केली?  राजपुत्र गौतमाला मृत देह, रूग्ण व जराजर्जर मनुष्य यांचे दर्शन झाले व तो उदास बनला असे एक पारंपरिक मत आहे. बाबासाहेबांनी हे सपशेल नाकारले आहे. गौतमाने वयाच्या 29 व्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली मग तोपर्यंत हे काय त्याच्या दृष्टीस कधी पडलेच नव्हते?

बाबासाहेबांनी केलेली मांडणी अशी. तेंव्हाच्या शाक्य राज्यात एक संघ होता. वयाची वीस वर्षे पुर्ण केलेल्या प्रत्येक शाक्य तरूणाला त्या संघात दाखल होवून संघाची दीक्षा घ्यावी लागे. त्याप्रमाणे गौतमाने घेतली. संघाचा सभासद झाल्यापासून आठ वर्षे राजपुत्र गौतम या संघात नियमित जात होता. कामकाजात भाग घेत होता. आठव्या वर्षी जी घटना घडली त्याने एका वेगळ्या दु:खांतिकेला सुरवात झाली. 

रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व बाजूच्या कोलिय राज्यात झगडा उत्पन्न झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना या भांडणात दुखापती झाल्या. शाक्यांच्या सेनापतीने कोलियांवर चढाई करून त्यांना नेस्तनाबूत करावे असा ठराव मांडला. दोष शाक्यांचाही असल्याचे लक्षात आल्यावर गौतमाने या ठरावास विरोध केला. शाक्य संघात हा ठराव गौतमाच्या मताविरूद्ध बहुमतांनी पारित झाला. आता सर्वांना संघाच्या नियमानुसार सैन्यात सामील होऊन युद्ध करणे भाग होते. मात्र गौतमाच्या सद्सद् विवेक बुद्धीला बहुमताचा हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्याच्यापुढे तीन पर्याय होते

1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 
2. देहांत शासन अथवा देशत्याग 
3. आपल्या कुटूंबियांवर सामाजिक बहिष्कार आढवून घेणे किंवा त्यांच्या मामत्तेची जप्ती होवू देणे. 


पहिला आणि तिसरा पर्याय त्याला स्विकारणे शक्य नव्हते. त्याला दुसरा पर्याय योग्य वाटला. सेनापतीने शंका व्यक्त केली. ‘‘तू देहांतशासन किंवा देशत्याग करायला स्वेच्छेने करायला जरी तयार असशील तरी कोशलाधिपती जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना वाटणार की आम्हीच तूझ्यावर अन्याय केला. ते संघाला जाब विचारतील.’’

अशा आणिबाणीच्या परिस्थितीत सर्वांचीच सुटका करण्यासाठी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून राजपुत्र गौतम म्हणाला की, ‘‘मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय.’’

बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक मानवी पातळीवर विचार करून बुद्धाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगाचे विश्लेषण करून दाखवले आहे. पुढचा इतिहास सर्वांना विदीत आहे. बारा वर्षे ज्ञानप्राप्तीसाठी भगवान बुद्धांनी कशी भटकंती केली, किती सायास केले, काय काय सोसले हे सारे सोप्या भाषेत बाबासाहेबांनी सांगितले आहे. 

पुढचा एक प्रसंग तर फार विलक्षण आहे. गौतमाने परिव्रज्या स्विकारल्यानंतर इकडे शाक्य व कोलिय यांच्यात मोठी खळबळ उडाली. त्यांच्यातील युद्धाचा जोर ओसरून शांततेसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले.  झगडा शांततेने मिटविल्या गेला. जेंव्हा सिद्धार्थाला हे विचारल्या गेले की, ‘‘आता तर झगडा मिटला आहे. आता तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुंटूंबाबरोबर का राहत नाही?’’ याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर मोठे महत्त्वाचे आहे, 

‘‘युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.’’

पुढे भगवान बुद्धांनी केलेली ज्ञानसाधना, बौद्ध दर्शनाची केलेली मांडणी, त्याची व्यापकता, देशातच नव्हे तर तेंव्हाच्या  शेजारच्या इतर देशांतही त्याचा वाढत गेलेला प्रभाव हे सगळे सर्वांना माहित आहे. 

आजही जेंव्हा आंबेडकर जयंती असो की बुद्ध जयंती ज्या पद्धतीने बुद्ध आणि आंबेडकरांचे दैवतीकरण त्यातून दिसून येते ते मोठे विचित्र आहे. काहीच विचार न करता आम्ही बाबासाहेबांनाही आता देव करण्यास निघालो आहोत. स्वत: बाबासाहेबांनीच नोंदवून ठेवले आहे ‘बुद्ध होण्यासाठी बोधिसत्त्व आवश्यक अशा दहा जीवनवस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसर्‍या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.’ आपल्या धर्मसंस्थापकाचीही कसोटी पाहणारा धर्म आता कोणा भक्तांच्या हाती आहे? 

आपल्या सारासार विचार शक्तीवर आधारलेला बौद्ध धम्म बाबासाहेबांना हवा होता. भगव्या, हिरव्या, पांढर्‍या रंगात माखलेल्या इतर धर्मासारखा एक नवा निळा बौद्ध धम्म नको होता. पण हे कोण लक्षात घेते? आम्हाला मेंदू बाजूला ठेवून डिजेच्या तालावर भन्नाट नाचायचे आहे. त्याला बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध तरी काय करणार ! 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

1 comment: