दैनिक पुण्य नगरी, उरूस, रविवार 19 एप्रिल 2015
घुमान साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम महाराजांचे वंशज असलेले डॉ. सदानंद मोरे हे निवडून आले होते. संमेलन नामदेवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घुमान सारख्य पवित्र स्थळी पार पडले. साहजिकच सामान्य लोकांची अशी अपेक्षा होती की ज्या पद्धतीने तुकारामांसारख्या संतांनी रोखठोकपणे तेंव्हाच्या समाजातील विसंगती सांगितल्या तसे काहीतरी त्यांचे वंशज करती. ही अपेक्षा काही गैरही नव्हती.
घुमान साहित्य संमेलनावर आधीपासूनच टिका सूरू झाली होती. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या कारभारात काहीतरी फरक पडेल अशी एक अंधुक आशा होती. पण प्रत्यक्ष तसं काहीच घडले नाही. आश्चर्य असे की तुकारामांचे वंशज असलेले सदानंद मोरेही अध्यक्षपदाच्या ओझ्याखाली दबून राहिले. ते काही बोललेच नाही.
संमेलन घुमानला घेण्यास प्रकाशकांनी विरोध केला होता. कारण स्पष्ट आहे की त्या ठिकाणी मराठी माणसे नाहीत. शिवाय हे ठिकाण गैरसोयीचे असल्याने तेथे ग्रंथविक्री होणे शक्य नव्हते. प्रकाशकांवर व्यावसायिक म्हणून टिका करणार्यांनी किमान एका तरी संमेलनात दोन्ही हातात पुस्तकांचे गठ्ठे घेवून पायपीट करून दाखवावी. रात्री उघड्या स्टॉलवर पुस्तकांची राखण करत थंडीत झोपून दाखवावे. आणि इतके करून विक्री न झालेली पुस्तके परत आणाताना काय यातना होतात हे अनुभवावे. म्हणजे उंटावर बसून जे शहाणपण शिकविले जाते ते कमी होईल.
प्रकाशकांनी बहिष्कार टाकल्यावर महामंडळाने एक ग्रंथमहोत्सव महाराष्ट्रात घेण्याचे कबूल केले होते. त्याचे काय झाले? याचा जाब सदानंद मोरे यांनी महामंडळास का नाही विचारला? त्यांच्या विजयात मराठी प्रकाशकांचा मोठा वाटा होता. मग गरज सरो आणि ‘प्रकाशक मतदार’ मरो अशी भूमिका मोरे यांची होती का?
संमेलनासाठी खास दोन रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. यातील प्रवाशांचे प्रवासात अतोनात हाल झाले. बरं घुमानला पोचेपर्यंत हाल झाले हे माहित असताना परतीच्या प्रवासात या त्रूटींवर विचार करून काही कारवाई का नाही केल्या गेली? ना.धो.महानोर, सुधीर रसाळ, विठ्ठल वाघ यांच्या सारखे ज्येष्ठ साहित्यीक रेल्वेने इतक्या लांब येवू शकत नाहीत हे माहित असताना त्यांची स्वतंत्र व्यवस्था का नाही केली? आणि अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते तर नागपूरहून पत्रकार, विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, चपराशी यांच्यासाठी विमानाची सोय कशी करण्यात आली होती? सांगा मोरे सर या विमानात कोण कोण गेले हे तूम्ही महामंडळास विचारले का?
प्रत्यक्ष संमेलनात उद्घाटन सत्रात गुरूदयालसिंग (पंजाबी) व समारोपात रहमान राही (काश्मिरी) हे दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आमंत्रित होते. त्यांचा कुठलाही उल्लेख कुठल्याही बातमीत, लेखात नाही. त्यांनी भाषेसंदर्भात काय मते मांडली, त्यांची भाषा आणि मराठी यांची त्यांनी काय तुलना केली हे कोणीच सांगितले नाही. मुळात हे लेखक संमेलनास आले होते की नाही हेही माहित नाही. शरद पवार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांची चिंता सर्वांना होती. त्यांच्या भाषणांची दखल सर्वत्र घेतल्या गेली. मग जे ज्ञानपीठ विजेते साहित्यीक पाहुणे आमंत्रित होते ते कुठे गेले? मोरे सर सांगा का नाही तुम्ही काही याबाबत बोललात?
नामदेवांची गाथा महाराष्ट्र शासनाने प्रकाशीत केली होती. तिची आवृत्ती आता संपली आहे. मग घुमानच्या संमेलनात या गाथेची नविन आवृत्ती का नाही उपलब्ध करून देण्यात आली? शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून एक पुस्तिका गुरूमुखीत प्रकाशीत केल्या गेली. त्यावर महाराष्ट्र शासनाची जाहिरात छापली आहे. मग घुमानला नामदेवांच्या भुमीत नामदेव गाथा छापून प्रकाशीत करण्यात काय अडचण होती? सांगा मोरे सर, केवळ तुकारामांचे वंशज, संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नाही तर तूम्ही संत साहित्याचे अभ्यासक अहात. तुम्ही का नाही जाब विचारलात?
संमेलनात ज्यांना आमंत्रित केले त्यांचा दर्जा सुमार होता यावर आधीच टिका झाली. प्रत्यक्षात हे सुमार लोक जेंव्हा संमेलनात आले आणि त्यांनी आपल्याा कविता सादर केल्या, भाषणे केली, चर्चा केल्या, मुलाखती घेतल्या त्यावरून त्यांचा दर्जा टिका केली त्यापेक्षाही खराब असल्याचे सिद्ध झाले. मोरे सर सुमार दर्जाच्या साहित्यीकांच्या (यातील बरेच महामंडळाचे पदाधिकारीच आहेत) सहभागाबाबत सगळेच मिठाची गुळणी धरून का बसून राहिले?
महाराष्ट्राच्या बाहेर मराठीचा झेंडा फडकवायचा आहे असा आव महामंडळ आणि आयोजक संस्थेने आणला होता. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर पणजी (गोवा), गुलबर्गा (कर्नाटक), बंगळूरू (कर्नाटक), हैदराबाद (तेलंगणा), निजामाबाद (तेलंगणा), आदिलाबाद (तेलंगणा), रायपूर (छत्तीसगढ), इंदूर (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), भोपाळ (मध्यप्रदेश), ग्वाल्हेर (मध्यप्रदेश), दिल्ली या ठिकाणी खूप वर्षांपासून मराठी माणसांच्या विविध संस्था कार्यरत आहेत. मग मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी का नाही भरवले? जसे की इंदोर, हैदराबाद, बडोदा, दिल्ली येथे यापूर्वी भरलेल्या संमेलनांचा अनुभव अतिशय चांगला आहे. त्या ठिकाणी कार्य करणार्या संस्थांना एक नैतिक पाठबळ संमेलनामुळे मिळू शकते. काहीतरी ठाशीव भरीव भाषाविषयक काम त्या ठिकाणी उभे राहू शकते. मोरे सर हा एक साधा प्रश्न महामंडळास संमेलनाच्या व्यसपीठावरून तूम्ही विचारला असता तर त्याचा चांगला परिणाम झाला असता.
साहित्य संमेलनाची निवडणूक असली की सगळे चुप बसतात. निवडणूक संपली की हरलेला आणि विजयी दोघेही महामंडळाची निवडणुकीची पद्धत कशी चुक आहे हे मोठ्याने सांगत बसतात. मोरे सर हे सगळे बदलण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार अहात का? का इतर अध्यक्षांप्रमाणे तुम्हीही शोभेचे बाहुले बनुन वर्षभर फिरत राहणार?
तुमाराम गाथेचा संदर्भ मी तूम्हाला द्यावा इतकी माझी लायकी नाही आणि अधिकारही नाही. तूमचा अभ्यास मोठा, अधिकार मोठा, व्यासंग दांडगा. तरी तुकाराम गाथेतील क्षेपक मानल्या गेलेल्या एका अभंगाची आठवण करून देतो. शिवाजी महाराजांचे तुकारामांना बोलावणे येते त्याला तुकाराम महाराजांनी दिलेले उत्तर असे
तुम्हापाशी आम्ही येऊनिया काय ।
वृथा आहे सीण चालण्याचा ॥१॥
मागावे हे अन्न तरी भिक्षा थोर ।
वस्त्रासी हे थोर चिंध्या बिंदी ॥२॥
निद्रेसी आसन उत्तम पाषाण ।
वरी आवरण आकाशाचे ॥३॥
तेथे काय करणे कवनाची आस ।
वाया होय नाश आयुष्याचा ॥४॥
राजगृहा यावे मानाचिया आसे ।
तेथे काय वसे समाधान ॥५॥
रायाचीये घरी भाग्यवंता मान ।
इतरा सामान्य मान नाही ॥६॥
देखोनिया वस्त्रे भूषणाचे जन ।
तात्काळ मरण येते मज ॥७॥
ऐकोनिया मानाल उदासता जरी ।
तरी आम्हा हरी उपेक्षीना ॥८॥
आता हेची तुम्हा सांगणे कौतूक ।
भिक्षे ऐसे सुख नाही नाही ॥९॥
तप व्रत याग महा भले जन ।
आशाबद्ध हीन वर्तताती ॥१०॥
तुका म्हणे तुम्ही श्रीमंत मानाचे ।
पूर्वीच दैवाचे हरिभक्त ॥११॥
(सार्थ तुकारामाची गाथा, ढवळे प्रकाशन, पृ. 961, क्षेपक अभंग क्र. 82)
साक्षात शिवाजी महाराजांशी बोलण्याची ही भाषा तूमच्या खापरखापर पणजोबांची होती. मग साहित्य महामंडळ किंवा विनोद तावडे किंवा देवेंद्र फडणवीस यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून थोडेफार सुनाविण्यास तूम्हाला कोणी रोकले होते? अहो सदानंद मोरे सध्या सगळीच लाचारी आणि हरामी आहे. तूम्ही थोडा तरी तुकारामी बाणा दाखवा!...
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment