Monday, May 18, 2015

गुर्जर, आम्ही तूमच्या पाठीशी आहोत

उरूस, पुण्य नगरी रविवार 17 मे 2015 

कोण हे गुर्जर? वसंत दत्तात्रय गुर्जर हे कवी आहेत हेच बर्‍याच वाचकांना माहित नाही. ‘गांधी मला भेटला’ या कवितेवर अश्लिलतेचा व महात्मा गांधीसारख्या महापुरूषाच्या बदनामीचा खटला भरला गेला. तब्बल 20 वर्षांनंतर याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. प्रकाशक व मुद्रक यांनी माफी मागितली. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता महापुरूषाची बदनामी झाली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने कवी वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्यावर सोपविली आहे. हा खटला परत लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात चालणार आहे.
आपल्याकडे एक ढोंगीपणा सर्वत्र आढळतो. सगळ्यांना एखादी गोष्ट माहित असते. पण तीचा उल्लेख करायचा नाही असा अलिखित नियम असतो. कोणी त्याबद्दल काही बोलले की मग मात्र सगळे असा काही आव आणतात की बाप रे! हे काय! किती हे गच्चाळ! अश्लिल! बिभत्स!! आपण नाही बाबा असलं काही खपवून घेणार. हा आमच्या संस्कृतीवर हल्ला आहे. म्हणजे हे सारे आपल्याकडे आहे याचे आम्हाला काहीच वाटत नाही. फक्त याचा कोणी उल्लेख केला की मग मात्र सर्वांची डोकी फिरतात. सर्वांना संस्कृती रक्षणाची जाग येते.
वसंत गुर्जर यांची ही कविता 1984 मध्ये प्रास प्रकाशनाने प्रसिद्ध केली. तेंव्हापासून दहा वर्षे ती कित्येकांच्या वाचनात आली. पण कोणालाही त्यावर काही आक्षेप घ्यावा असे वाटले नाही. ही कविता 1994 मध्ये  बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या वार्तापत्रात छापण्यात आली. साहित्याची पुस्तके कधीही न वाचणार्यानी हे वार्तापत्रही वाचले असेल याची शक्यता नाही. पण कोणीतरी कर्मचार्‍याने हे बघितले. त्याच्या डोळ्यात बाकी सगळी कविता सोडून, ‘गांधी मला भेटला, हेमामालिनीच्या नावाने ***** करताना’ ही ओळ नेमकी भरली. झाले लगेच यांची संस्कृती रक्षणाची उर्मी उसळून आली. एरव्ही गांधी कोण हे माहित नसलेले लगेच गांधी प्रेमाने पेटून उठले.
‘अखेर कमाई’ या  कुसूमाग्रजांच्या कवितेत फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याशी  संवाद करताना गांधी म्हणतात,
तरी तूम्ही भाग्यवान 
एकेक जातजमात तरी 
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र 
फक्त सरकारी कचेर्‍यातील भिंती !
(मुक्तायन, पृ.109,पॉप्युलर प्रकाशन)
एरव्ही सरकारी कार्यालयांच्या भिंती पाठीशी असलेल्या गांधींच्या पाठीशी विचारांनी पतित झालेले पावन लोक उभे राहिले. त्यांनी खटला दाखल केला.
सलमान खानला दोन तासात बेल देणार्‍या आपल्या महान न्यायव्यवस्थेने अतिशय गतीने तत्परतेने फक्त 20 वर्षे घेत या खटल्याचा अर्धवट निकाल दिला. आता कवी वसंत दत्तात्रय गुर्जर यांना हे सिद्ध करावयाचे आहे की या ओळींमधून महात्मा गांधींची कुठलीही बदनामी होत नाही.
आपल्याकडे बहुतांश जून्या मंदिरांवर संभोग शिल्पं आहेत. आपल्या भाषेत असंख्य शिव्या आहेत. तुकारामा सारख्या संतांनी त्यांचा भरपूर वापर आपल्या अभंगांमध्ये केला आहे. वामाचारी शाक्त पंथियांचे कित्येक विधी अतिशय बिभत्स आहेत. हे सगळं आपल्याकडे शेकडो वर्षांपासून चालत आले आहे. पण यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या वगैरे असे काही घडले नाही. या गोष्टी चालत राहणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बापाने पोराला सांगितलं नाही किंवा कळू दिलं नाही म्हणून काही पोराला अश्लिल गोष्टी माहीत होत नाहीत असे नाही. फक्त ते आपण संकेत म्हणून बोलत नाही. कामशास्त्र लिहून ठेवणारी आपली उदार खुली भारतीय परंपरा केवळ अशा एखाद्या कविच्या शब्दाने अपमानित होते? आपल्या राज्यकर्त्यांनी किती बायका केल्या, किती नाटकशाळा सांभाळल्या, त्यांच्या पदरी किती किन्नर होते (तृतीयपंथी) यांच्या लिखीत नोंदी सापडलेल्या आहेत. पेशवाईच्या काळात 13 वर्षांच्या कोवळ्या पोरी पुरवाव्यात असे आदेश दिलेले आहेत. इतकंच काय मराठी नाटकाच्या सुरवातीच्या काळात काही नाटककार हे समलिंगी कसे होते. त्यांना संभोगासाठी कोवळी तरूण मुलं कशी लागायची. आणि ही एक मराठी नाट्यसृष्टीची वेगळीच समस्या कशी होवून बसली आहे असे उल्लेख आहेत. हे सगळं आपल्याकडे आहे ही तक्रार नसते. तर ते केवळ कोणी शब्दांत मांडला, चित्र काढले, चित्रपट काढला, सुरात गुंफून गाणे केले की लगेच बोंब मारायला सुरवात. हे काय ढोंग आहे?  
पु.ल.देशपांडे यांनी या सगळ्याबाबत अतिशय साध्या सौम्य शब्दांत पण फार मार्मिकपणे लिहून ठेवलं आहे. ‘महाराष्ट्र कधी चाळामुळे बिघडला नाही आणि टाळामुळे सुधरला नाही.’ चाळ म्हणजे तमाशा आणि टाळ म्हणजे पंढरीची वारी असा सुंदर श्लेष पु.लं.नी केला होता. 
ज्यांनी गुर्जरांच्या कवितेवर आक्षेप घेतला ते कायदेशीर दृष्ट्या बरोबरच आहेत. पण त्यांचे हेतू शुद्ध नाहीत. आणि जर असे आक्षेप घ्यायचे म्हटलं तर आपल्या संतांनी जे जे लिहून ठेवलंय त्याचे काय करायचे? फक्त अश्लिलता जावू द्या. पण संत साहित्यात दलित जातींबद्दल अतिशय वाईट शब्द वापरले गेले आहेत. त्याचे काय करायचे? असे एका एका ओळींवर शब्दांवर खटले भरायचे तर पुढची 100 वर्षे बाकी सारे सोडून हेच काम न्यायव्यवस्थेला करत बसावे लागेल. आणि तरीही ते पूर्ण होणार नाही.
जे कोणी जाणीवपूर्वक असे अश्लिल उल्लेख करतात, ज्यांचे हेतू वाईट असतात, समाजात तेढ निर्माण करणारे असतात त्यांना समाज त्याच्या पद्धतीने शिक्षा देतच असतो. अश्लिलतेचे आता फारसे काही कोणाला उरले नाही.  साध्या शब्दांची चर्चा चालू आहे, कवीला दोषी गृहीत धरल्या जातंय पण तिकडे माहाजालावर (इंटरनेट) सगळ्या प्रकारचे वासनेचे खेळ सगळ्यांना पाहण्यासाठी खुले आहेत. कुठल्याही वयाची पोरं वाट्टेल ते सहज पाहू शकतात. आधी आंबट शौकिनांसाठी पिवळी मासिकं असायची. प्लेबॉय, पुसीकॅट अशी त्यांची नावं असायची. ब्लुफिल्म पाहण्यासाठी आंबट शौकिन मोठी धडपड करून त्या  व्हिडीओ कॅसेट मिळवायचे. हे सगळे आता खूप कमी झाले आहे. कारण असं काही करायची कोणाला गरजच उरली नाही. ज्याला हवे आहे त्याच्यासाठी हे सगळं मोफत सहज उपलब्ध आहेत.
असं घडलं म्हणून समाजातले बलात्कार वाढले का? आईसलँड/तैवान सारख्या देशात नग्नता हा गुन्हा नाही तिथे जगातील सर्वात जास्त बलात्कार होतात का? उलट असे काही होत नाही हेच सिद्ध झाले आहे. आईसलँड हा तर महिलांसाठी सर्वात सुरक्षित देश समजल्या जातो. बंदी घातली की अशा भावना जास्तच उचंबळून येतात. नैतिकता ही सामान्य लोकांच्या मनात असते यावर विश्वास ठेवला पाहिजे. उलट सर्व लोक अनैतिकच आहेत असं गृहीत धरून आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था वागते. त्यामुळे या यंत्रणेवरचा ताण उगीचच वाढतो.
ज्ञानेश्वरांनी ‘जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ॥ असे म्हटले आहे. म्हणजे वाईट विचार वासना कमी होवेा आणि चांगले विचार वाढो. म्हणजेच माणसाच्या मनात हे सगळे असतेच. चांगूलपणा जो आहेच तो वाढो. निर्माण होवो असे ज्ञानेश्वरांनी म्हटले नाही.
वसंत दत्तात्रय गुर्जर एक गंभीर आणि महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी जी कविता लिहीली तिचा वाङमयीन दर्जा अतिशय वरचा आहे. कोणीही ही कविता वाचल्यास त्यांचा उद्देश काय आहे हे सहज कळू शकते. त्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाचे मत विचारायची, न्यायालयाचा अमूल्य वेळ खर्च करायची गरज नाही. ज्यांना हे आवडत नाही त्यांनी हे वाचू नये. नाही तरी ही कविता कालचा निकाल येईपर्यंत किती जणांना माहित होती? 1984 ची कविता 1994 पर्यंत आक्षेप घेणार्‍यांनी तरी कुठे वाचली होती.  या पुढची जी न्यायालयीन लढाई वसंत दत्तात्रय गुर्जर यांना लढायची आहे त्यांच्या पाठीशी सर्व साहित्यीक, चित्रकार, कलाकारांनी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणार्‍यांनी ठामपणे उभे रहावे. कायदा मोडणार्‍या सलमानसाठी रस्त्यावर उतरणार्‍या ढोंगी लोकांपेक्षा ही कृती निश्चितच लोकशाही ला प्रगल्भ करणारी आहे.
गुर्जर आम्ही तुमच्या सोबत, तूमच्या पाठीशी आहोत ! आम्ही अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाजूने आहोत.    
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575




गांधी मला भेटला

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या 10 बाय 12 च्या खोलीत
6 बाय अडीचच्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेंव्हा तो म्हणाला-
सत्यापासुन सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे,
त्या सत्याच्याद्वारा मी सौंदर्य पाहतो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहूनि कठोर आणि
कुसूमाहूनहि कोमल आहे

गांधी मला आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
537.6 किलोसायकलवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेंव्हा तो बोलला-
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या
कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास
त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निविदेकेनं सांगितलं
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
5 वाजून 55 मिनीटं ते 6 वाजून 2 मिनीटांपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत

गांधी मला चार्तुवर्ण्याच्या देवळात भेटला
तेंव्हा तो बनियाच्या धर्माला अनुसरून
पैशाची मोजदाद करत होता
(कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्यानं
कनवटीला निळी लावली)
गांधी मला
बौद्ध मठांत भेटला
तेव्हा तो बीफचिली ओरपत होता

गांधी मला
चर्चमध्ये भेटला
दर आठवड्याला क्षमा करणार्‍या येशूपुढे
तो गुडघे टेकून उभा होता

गांधी
चुकला (नंगा) फकीर
मला मशिदीत भेटला
तेव्हा तो धर्मांतर करत होता

गांधी मला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
प्रबुद्ध भारतात भेटला
तेव्हा तो म्हणाला-
हरिजनांची सेवा माझ्या जीवनाचा
प्राणवायू आहे
मला पुनर्जन्म नको आहे
पण येणारच असेल तर अस्पृश्याचा यावा
म्हणजे येणारी दु:खं, यातना, अपमान
यांचा मला अनुभव येईल
अस्पृश्यता जिवंत राहण्यापेक्षा
अस्पृश्यता असलेला हिंदुधर्म
मेलेला मला चालेल
असं बोलून तो तडक
भारतमातेच्या मंदिरात आंघोळ करून
गंगेच्या पात्रात उतरला

गांधी मला
सानेगुरूजींच्या आंतरभारती  शाळेत
आयला झवून बापाला सलाम करणार्‍या
धडपडणार्‍या मुलांना
श्यामच्या गोड गोष्टी सांगताना भेटला
तेंव्हा श्यामची आई त्याला म्हणाली-
निरोध वापरा बिनविरोध

गांधी मला
भर रस्त्यात हेमालिनीच नावानं
हस्तमैथून करतांना दिसला
देशांतला हा पहिलाच स्ट्रीट प्ले
अहिंसेचा हाहि एक प्रयो

गांधी मला
टागोरांच्या गीतांजलीत भेटला
तेव्हा तो गोलपिठ्यावर
कविता लिहीत होता

गांधी मला
बाबा आमट्यांच्या एकात्म भारतांत
अपंगांच्या महोत्सवात भेटला
तेव्हा तो म्हणाला-
हात हे याचनेसाठी दुसर्‍यापुढे
पसरण्यासाठी नसतात
आणि दान हे माणसाला नादान बनवते
असं म्हणून
त्यानं अमंरिकन डॉलरचा चेक
ऍक्सेप्ट केला

गांधी मला आचार्य रजनीशांकडे
ध्यानधारणेत
संभोगातून समाधीकडे म्हणत
शेळीकडे वळताना दिसला

गांधी मला
मार्क्सच्या टॉऍटोमधून ड्रायव्ह इन
थिएटरमध्ये
जगातील कामगारांनो एक व्हा
हा पिक्चर पहात
टाइम किल करताना भेटला

गांधी मला
माओच्या लॉंगमार्च मध्ये भेटला
तेव्हा तो शेतकर्‍यांच्या वेषांत
खेड्यातून शहरांत स्थायिक व्हायला
निघाला होता

गांधी मला
डांग्यांच्या गिरणीची भिंत
चढून जाताना दिसता
तेव्हा तो ओरडला-
बिर्लाबावटे की जय

गांधी मला
काळा गांधीच्या दवाखान्यात
सावरकरांना
सँपलची बाटली विकताना भेटला
गांधी मला
अटलबिहारी वाजपेयींच्या
पेशवाईत भेटला
तेंव्हा तो गांधीवादी समाजवादाची
जपमाळ ओढत होता.

गांधी मला
चारु मजुमदारच्या नक्षलबाडीत भेटला
तेव्हा तो घोषणा देत होता-
आमारबाडी तोमार बाडी
सकलबाडी नक्षलबाडी
लालकिलेपे लाल निशान
मॉंग रहा है हिंदुस्थान

गांधी मला
क्रेमलिनमध्ये ब्रेझनेवच्या हस्ते
शांततेचे नोबेल पारितोषिक
घेतांना भेटला
गांधी मला
रेगनच्या व्हाईट हाऊसमध्ये
रेगनच्या न्यूट्रॉनची कळ दाबताना भेटला
माणसं मेलेल्या जगांतली
स्थावरजंगम मालमत्ता दाखवून
गांधी रेगनचं सांत्वन करत होता

गांधी मला
छत्रपतीशिवाजी विडीचे झुरके घेत
फोरासरोडला 580 नंबरच्या कमर्‍यांत
रंगरंगोटी केलेल्या लोकशाही नांवाच्या
रांडेकडे भेटला
तेंव्हा ती म्हणाली-
तू कुठली चिकित्सा करणार आहेस?
तू कुठला प्रयोग करणार आहेस?
तू कुठला प्रकाश दाखवणार आहेस?

गांधी मला
परम पूजनीय सरसंघचालक
बाळासाहेब देवरसांच्या संघस्थानावर
अखंड हिंदुस्थानच्या जाघोषात
अर्धी चड्डी सावरत 61-62 उठाबशा
काढत घोषणा देतांना दिसला
मी हिंदू आहे आणि त्याचा मला
अभिमान आहे
वंदे मातरम्
कॉंन्व्हेंटमध्ये शिशूंना शिकवून
इंग्लंड-अमेरिकेत स्थायिक करीन.

गांधी मला
जमाते इस्लामच्या घोगारी मोहल्ल्यात
पेट्रोडॉलरच्या थ्री-इन-वनमध्ये
पाकिस्तानविरूद्ध हिंदुस्थान क्रिकेट
कॉमेंट्री ऐकताना दिसला
पाकिस्तानचा हिंदुस्थानवर
2 गडी राखून विजय
हे ऐकताच तो नमाज पढला
मोहोल्ला मोहोल्ल्यांत जावून त्यानं
ग्रीनबोर्डाला हार घातला

गांधी मला
सदाशिवपेठेतल्या ना.ग.गोर्‍यांच्या
वाड्यांत भेटला
तेंव्हा तो म्हणाला
स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली तरी
आम्हाला
भारत माझा देश आहे
या देशावर माझे प्रेम आहे
इथला विविधतेने नटलेल्या समृद्ध
परंपरांचा मला अभिमान आहे
मी माणसांचा मान ठेवीन
मी माझ्या देशाशी निष्ठा ठेवीन
असं म्हणावं लागतं याची मला खंत वाटते
असं मला लंडनच्या
टेम्स नदीच्या तीरावर सुचलं

गांधी मला
आयर्विनच्या व्हाइसरॉय हाउसमध्ये
भेटला
तेंव्हा तो स्वातंत्र्य सैनिकांच्या
पेन्शनीचा हिशेब करत होता.

गांधी मला
स्वयंघोषित नेताजी राजनारायणच्या
कुटुंबकल्याणकेंद्रात भेटला
तेंव्हा उघडाबंब गाद्यागिरद्यांवर लोळत
मालिश करून घेत
बदामपिस्ते मिठाई खात
भारत मे समाजवाद क्यों नही आता
ह्यावर तो पत्रकार परिषद घेत होता

गांधी मला
अखिल भारती हिजड्यांच्या संमेलनात
कुटुंबनियोजनावर भाषण करताना दिसला
तेंव्हा आशाळभूतपणे चव्हाण
रिकाम्या असलेल्या खुर्चीवर लक्ष ठेवून
संपूर्ण बेरजेचं राजकारण शिजवत होता

गांधी मला
आम जनताकी संपत्ती असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरस-बायकोचा खेळ
करताना भेटला
तेंव्हा तो म्हणाला
निधर्मी देश की क्या पहचान
छोडो चड्डी मारो गांड

गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यात दिसला
तेंव्हा त्यानं चक्क पंजा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधीच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशांतूनहि होतात
हो अगदी कवितेतूनसुद्धा

गांधी मला
बाटाच्या कारखान्यांत
बुटाला शिलाई मारतांना दिसला
तेंव्हा बाबूजी गांधींना म्हणला
इस देश मे चमार कभी प्राइम मिनिस्टर
नही हो सकता

गांधी मला
मोरारजींच्या ओशियानात भेटला
शिवाम्बूच्या तारेत तो म्हणाला
स्त्रिया ह्या मूर्ख आणि विवेकशुन्य असतात
मी हे कोणाच्या संदर्भात म्हटलं-
हे आपल्या लक्षात आलं असेलच

गांधी मला
नियतीशी संकेत करताना
नेहरूंच्या तीन मुर्तीत भेटला
तुम्ही आमच्या विश्वासातले
गादी नंतर इंदिरेच्या हवाली करा

गांधी मला
चरणसिंगांच्या सुरजकुंडात भेटला
तेंव्हा तो राष्ट्राला उद्देशून म्हणाला
मेरे जिंदगीकी तमन्ना पुरी हो गयी

गांधी मला कमलेश्वरच्या
परिक्रमात दिसला
तेव्हा तो म्हणाला-
मनोरंजनाची ए यु साधनं
तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचवायचं
माझं स्वप्न साकार झालं
(कॅमेरामननं कॅमेरा त्याचा आडपंचा
आणि काठी यावर केंद्रीत केला होता)

गांधी मला
रतन खत्रीच्या अड्ड्यावर दिसला
तेंव्हा तो मटक्यातून
राष्ट्रीय एकात्मतेची तीन पानं काढत होता

गांधी मला
सर्व भूमि गोपालकी म्हणणार्‍या
विनोबांच्या धारावीत
टिनपाट घेवून हायवेच्या रांगेत
कुश्चेव्हला
गार्ड ऑफ ऑनर देतांना दिसला

गांधी मला
इंदिरा गांधींच्या 1 सफदरजंग
कारस्थानात भेटला
धटिंगण आयम-माय कार्यकर्त्यानं
त्याच्या गांडीवर लाथ मारली
तेव्हा तो ओरडला-
देश की नेता इंदिरा गांधी
युवको का नेता संजय गांधी
बच्चों का नेता वरूण गांधी
भाड मे गया महात्मा गांधी

गांधी मला
अजितनाथ रेच्या न्यायालयात
आरोपीच्या पिंजर्‍यात दिसला
सत्याचे प्रयोग करून
देश धोक्यात आणल्याबद्दल
राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली
त्याला फांशी दिला

गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधीवर अग्रलेख लिहितांना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षांत आता
ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी रहा- स्वदेशी बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं

गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हाथ ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानाच्या विश्वात
मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
-आणि क्षणार्धात तो समाधीत गेला

-वसंत दत्तात्रेय गुर्जर.






No comments:

Post a Comment