Sunday, May 3, 2015

दासू : दोन अक्षरात न मावणारा कविमित्र



(दासू वैद्य यांना  यावर्षीचा केशवराव कोठावळे पुरस्कार ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहासाठी जाहिर झाला असून याचे वितरण दिगंबर पाध्ये यांच्या हस्ते दि. 5 मे रोजी मुंबईत होत आहे. या निमित्ताने दैनिक लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत लिहिलेला लेख दि. ३ मे २०१५ )

एखाद्या माणसाची आपली पहिली भेट होते आणि पुढे त्याच्याशी मैत्री वाढत जाते. पण एखाद्याच्याबाबतीत मात्र असे होते की पहिल्याभेटीतच आपली पूर्वीपासूनची मैत्री आहे असे वाटत राहते. जवळपास पंचेवीस वर्षांपूर्वी औरंगपुर्‍यात सरस्वती भुवन महाविद्यालया जवळच्या चहाच्या टपरीवर कुण्या मित्रानं ‘हा दासू!’ अशी माझी ओळख करून दिली. तेंव्हा ‘हो मी याला ओळखतो’ अशा आशयाची मान हलवत मी त्याच्याशी हात मिळवला. दासूनेही पूर्वीचीच मैत्री असल्याची खुण आपल्या डोळ्यातून दिली.  ‘दासू’ इतकी छोटी ओळख करून देवून चटकन मैत्रीची सलगी साधण्याची किमया दासूने साधली आणि तेंव्हापासून त्याच्याशी मैत्री दाट होत गेली.

अंबाजोगाई हे दासूचे मूळ गाव. पुढे त्याचे आजोबा नांदेडला गेले. नामंकित वैद्य म्हणून नांदेड व परिसरात ते प्रसिद्ध होते. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील सरस्वती देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं गोदावरी काठच्या बासर गवात त्यांना इनाम जमिन मिळाली. त्यांच्या कुटूंबाचा मोठा वाडा तिथे होता.  दासूचे वडिल शिक्षक होते. वडिलांच्या बदलीनिमित्ताने हे कुटूंब नांदेडजवळ मुदखेड या गावी स्थायिक झाले. दासूचे शालेय शिक्षण याच गावात झाले. या छोट्या गावचे, तिथल्या रिती रिवाज परंपरांचे मोठे संस्कार त्याच्या कवितेवर आणि एकूणच लिखाणावर उमटले.

पुढे अंबाजोगाई आणि औरंगाबाद येथे शिक्षणासाठी त्याचे वास्तव्य होते. औरंगाबाद सारख्या महानगरात आता कायमचे वास्तव्य असले तरी गावाकडचा एक मोकळेपणा, नाते जोडण्याची आसोशी, बोलण्यातली अनौपचारिकता त्याच्या स्वभावात टिकून राहिली आहे.

वीस वर्षांपूर्वी मराठीच्या प्राध्यापकासाठी एम.ए. एम.फिल. पुरेसे असायचे. त्या काळातही दासूने नेटची परिक्षा उत्तीर्ण केली. जालन्याच्या बारवाले महाविद्यालयात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून त्याची निवडही झाली. पुढे त्याने पी.एचडी. केले. त्याच्या संशोधनाचा विषय भारत सासणे या गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाचे लिखाण हा होता. पण असं सगळं असूनही त्याची ओळख मा.प्रा.डॉ. दा.ह.वैद्य अशी मात्र बनली नाही. किंबहूना त्याने ती बनू दिली नाही. अजूनही त्याची ओळख ‘दासू’ अशीच आणि इतकीच आहे.

बारवाले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी त्याच्याकडे आली. हे आपल्या प्रकृतीशी जूळणारे नाही हे दासू पूर्ण जाणून होता. त्याने हे पद नाकारले. पण तांत्रिकदृष्ट्या काही दिवस तरी प्राचार्याचा कार्यभार सांभाळणे भाग होते. या कविमित्राने एका सच्च्या कविला शोभावे अशी कृती केली. त्याने प्राचार्यांच्या प्रचंड मोठ्या खुर्चीच्या बाजूला एक साधी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवली. कार्यभाराचा कालावधी संपेपर्यंत त्या छोट्या खुर्चीवर बसून काम केले. त्या पदास पात्र दुसरा उमेदवार रूजू होताच प्राचार्यांचे दालन आणि नि:श्‍वास सोबतच सोडला.

दासूला फार लवकर चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून गीतलेखनाचे काम मिळाले आणि गीतकार म्हणून प्रसिद्धीही मिळाली. यातून दोन धोके संभवत होते. एक तर प्रसिद्धीमूळे हवा डोक्यात जाणे आणि गीत लेखनामूळे गंभीर काव्य लेखनावर परिणाम होणे.

हे दोन्ही घडले नाही याचे ठळक पुरावेच माझ्याजवळ आहेत. 93-94 साली अजिंठ्याच्या डोगरात वसलेल्या उंडणगाव या छोट्या गावात एका कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या गावात कित्येक वर्षांपासून गणपतीच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिक करण्याची चांगली परंपरा आहे. इथल्या रसिकांची तिसरी तरूण पिढी आता या आयोजनात हिरीरीने पुढे आली आहे. त्यांच्या आयोजनास मी कित्येक वर्षांपासून मदत करतो. त्यांनी त्या वर्षी दासूला आमंत्रित केले होते. नेमके त्याच दिवशी औरंगाबादला प्रसिद्ध नट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची मुलाखत दासू वैद्य व चंद्रकांत कुलकर्णी घेणार होते. तशा बातम्याही वर्तमानपत्रांतून झळकल्या होत्या. उंडणगावच्या कार्यकर्त्यांनी दासू  येणार नाही हे गृहीत धरले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ झाली आणि कविसंमेलन सुरू होण्याच्या आधी बरोबर दासू तिथे हजर झाला. मला आश्चर्य वाटले. मी त्याला तसे विचारलेही. त्याने दिलेले उत्तर मोठे सुंदर मार्मिक आणि त्याची मानसिकता दर्शविणारे होते. ‘श्रीकांत तो झगमगाटी कार्यक्रम होता. माझे नाव त्यांनी परस्परच छापले. मी या लोकांना आधीच शब्द दिला होता. कवितेसाठी इतक्या प्रामाणिकपणे काम करणारी ही माणसं मला जास्त मोलाची आहेत. माझ्या कवितेला इथे खरी दाद मिळणार आहे. म्हणून मी तो कार्यक्रम सोडून इथे आलो.’

चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन करताना गंभीर काव्यलेखनावर परिणाम होतो असा समज आहे. तो बर्‍याच कवींच्या बाबत खराही आहे. पण अलिकडच्या काळात किशोर कदम (सौमित्र) आणि दासू वैद्य (दासू) हे दोन कवी याला अपवाद आहेत. गीतकार व कवी अशी कसरत त्यांनी मोठ्या कौशल्याने सांभाळली. दासूचा पहिला कविता संग्रह ‘तूर्तास’ आणि ज्याला आत्ता कोठावळे पुरस्कार जाहिर झाला आहे तो ‘तत्पूर्वी’ हे दोन्ही संग्रह पॉप्युलर सारख्या मान्यवर प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. अनेक मानाचे पुरस्कार पहिल्या कवितासंग्रहाला मिळाले असून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश झाला आहे. दुसर्‍या कवितासंग्रहावरही आता पुरस्काराची मोहर उमटली आहे. ललितच्या जानेवारी 2015 च्या अंकात दशकातील साहित्यीक म्हणून प्रा. मधु जामकर यांनी दासूच्या एकूणच लिखाणावर दीर्घ लेख लिहून त्याची दखल घेतली आहे.

नाटक हे दासूचे आवडीचे क्षेत्र राहिले आहे. त्याच्या एकांकिका खुप गाजल्या. ‘देता आधार की करू अंधार’ सारख्या एकांकिकेतून मकरंद अनासपुरे सारखा नट चित्रपट सृष्टीला मिळाला. त्याच्या ‘रिअल इस्टेट’ या दीर्घांकास मागच्याच वर्षी लिखाणाचे पहिले पारितोषिक मिळाले. पण अजून आपल्या हातून तीन अंकी नाटक लिहून झाले नाही याची खंत त्याला जाणवते.  

बहुतांश साहित्यीक कलाकार हे आपल्या काचेरी महालात बंदिस्त राहतात. त्यांचा समाजाशी संबंध येत नाही असा एक सार्वत्रिक आरोप होतो. दासू त्याला अपवाद राहिला आहे. मी पंधरा वर्षांपूर्वी परभणीला एक सामाजिक संस्था स्थापन करून आरोग्य चळवळ, मराठी शाळा अशी कामं सुरू केली होती. आम्ही या संस्थेसाठी मदतीचे आव्हान केले तेंव्हा तातडीने आम्हाला धनादेश पाठवून त्याने देणगी दिली होती. दासू आपल्या मुलीचा वाढदिवस अनाथाश्रमात जावून त्या मुलांना खेळणी, खाऊ, कपडे वाटून साजरा करतो हे आमच्या सारख्या अगदी जवळच्या मित्रांनाही आत्ता आत्तापर्यंत माहित नव्हते.

औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागात दासू प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ह्या विद्यापीठाचे नामांतर झाले तेंव्हा या प्रदेशातील बहुतांश दलित विद्यार्थ्यांना या विद्यापीठाबद्दल आस्था निर्माण झाली. दासूचा विद्यार्थी असलेल्या एका दलित मुलाने एक आठवण मला सांगितली आणि दासूचा एक वेगळाच पैलू नजरेसमोर आला. या विद्यार्थ्याला शासनाकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीप्रकरणात दलित प्राध्यापकांकडूनच अडथळा येत होता. या विद्यार्थ्याने दासूकडे नोंदणी केली त्याचे एकमेव कारण म्हणजे विद्यार्थ्यांना आणि विशेषत: दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दासूकडून मिळणारी सन्मानाची वागणूक, अडीअडणीला त्यांना मदत करण्याची वृत्ती.

आंबेडकरांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात महात्मा गांधी यांच्या नावाने असलेल्या अध्यासनासाठी काम करण्यास कोणीच तयार नव्हते. प्रा. जयदेव डोळे यांनी या अध्यासनाचे काम सांभाळले. त्यांच्यानंतर सगळ्यांना नकोशी वाटणारी ही खुर्ची दासूने स्विकारली. गांधी विचारांवर विद्यार्थ्यांनी लिहीलेले निबंध एकत्रित करून त्याचे पुस्तक प्रकाशीत करून या अध्यासनाच्या माध्यमातून एक वेगळेच काम करून दाखवले. औरंगाबाद जवळच्या तंटामुक्त गावाच्या सरपंचांना बोलावून त्यांचा सत्कार घडवून आणला. स्वच्छता अभियानात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या गावकर्‍यांना विद्यापीठात बोलावून त्यांचा सन्मान या अध्यासनाद्वारे केला.

तुकाराम चित्रपटाची गाणी दासूने लिहीली आहेत. दासूतील गीतकाराला आणि कविला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट या चित्रपटात घडली. चित्रपटाचा शेवट कसा असावा यावार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी विचार करत होता. तुकारामांच्यावह्या नदीत बुडतात. त्यासाठी तुकाराम महाराज नदीकाठी उपोषणाला बसले आहेत. हळू हळू आजूबाजूला लोक जमा होत जातात. लोकांच्या तोंडी तुकारामाचे अभंग येवू लागतात. कारण लोकांना ते पाठच असतात. अशा पद्धतीने लोकगंगेतून वह्या तरल्या हा आशय दिग्दर्शकाला पोचवायचा होता. या पार्श्वभूमिवर दासूने गीत लिहीले

जगण्याचा पाया । चालण्याचे बळ । 
विचारांची कळ । तुकाराम ॥
खोल पसरतो । पुन्हा उगवतो । 
सांगून उरतो । तुकाराम ॥
या गाण्याचे चित्रण इतके प्रभावी झाले की ठरलेला शेवट बदलून याच प्रसंगावर आणि गाण्यावर चित्रपटाचा शेवट करण्याचा निर्णय चंद्रकांत कुलकर्णीने घेतला. तुकारामावर एक चांगली कविता लिहीली जावी, त्याचे सुंदर गाणे बनावे आणि तो प्रसंग चित्रपटाचा कळस ठरावा ही दासूसाठी फार समाधानाची कुठल्याही पुरस्काराहून मोठी गोष्ट आहे.

गीतकार श्रेष्ठ का कवी असा एक वाद आपल्याकडे केला जातो. त्यावर काहीही न बोलता एक सुंदरशी कविता लिहून दासूने पडदा टाकला आहे.

गाणं म्हणजे असते काय?
शब्दावरची ओली साय !!

कोठावळे पुरस्कारासाठी या कविमित्राला लाख लाख शुभेच्छा !

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
9422878575

     
   

 

2 comments: