Tuesday, July 27, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- ४०

 

उरूस, 24 जूलै  2021 

उसंतवाणी- 118

 (मुंबई आणि कोकणांत पावसाने आतंक माजवला आहे. चिपळून तर पूर्ण पाण्याखाली गेले. ज्या शिवसेनेचा बालेकिल्ला मुंबई आहे त्यांना पंढरपुरला गाडी चालवत जायला वेळ आहे पण मुंबई कोकणाच्या पूरग्रस्तांकडे पहायला वेळ नाही. सवड नाही. )

पावसाने मेले । मुंबईत लोक ।
त्याचा नाही शोक । आघाडीला ॥
पावसाची मिळो । जनतेला सजा ।
सरकारी पुजा । महत्त्वाची ॥
गाडी चालवीत । गाठली पंढरी ।
आषाढीची वारी । इव्हेंट तो ॥
विठ्ठलाची पुजा । देखणे ते दृश्य ।
समस्य अदृश्य । राज्यातील ॥
युगे अठ्ठावीस । विठु विटेवरी ।
दीड वर्षे घरी । मुख्यमंत्री ॥
ओळखून भाव । विठ्ठल दे मार ।
आमदार गार । आघाडीचा ॥
कांत म्हणे घ्यावा । कांहीतरी धडा ।
नीट हाका गाडा । आघाडीचा ॥
(22 जूलै 2021)

उसंतवाणी- 119

(फोन टॅपिंगचा बहाणा करून संसदेत गोंधळ घातला गेला. तृणमुलचे राज्यसभेतील खासदार सुशांत सेन यांनी मंत्री उत्तर देत असताना त्यांच्या हातातील कागद हिसकावून फाडले आणि तुकडे अध्यक्षांच्या दिशेने उडवून दिले. )


फोन टॅपिंगचा । करूनी बहाणा ।
घालती धिंगाणा । संसदेत ॥
संसद नव्हे ही । बाजार भरला ।
फाडूनी फेकला । कायदाच ॥
ऍम्नेस्टी संस्थेने । झटकला पल्ला ।
विरोधाचा कल्ला । वाया जाई ॥
आत हा धिंगाणा । बाहेर गोंधळ ।
कृषी चळवळ । भरकटे ॥
कृषी आंदोलन । झाले छु मंतर ।
जंतर मंतर । बसुनिया ॥
‘कनुन वापसी’ । अडकली सुई ।
शुद्ध वेडापायी । टिकैतच्या ॥
कांत विरोधक । शक्तीने हो क्षीण ।
विचाराने हीन । सांप्रतला ॥
(23 जूलै 2021)

उसंतवाणी- 120

(संसदेमध्ये गोंधळ घातला जातो आहे तो जाणीवपूर्वकच आहे. कारण या मुळे लोकशाहीलाच धोका उत्तन्न झाला आहे. पाश्चिमात्य देशांतून भारतातील लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हे कारस्थान असावे अशी शंका येवू लागली आहे. वारंवार विविध मुद्दे पुढे करून गोंधळ निर्माण केला जातो. न्यायालयात खटले दाखल करून अडथळा आणला जातो.)

गोंधळाच्या डोही । गोंधळ तरंगे ।
विरोधाची अंगे । प्रकटली ॥
आरोपा आरोपी । जुना खेळ पुन्हा ।
न घडला गुन्हा । रंगवीती ॥
निरर्थक प्रश्‍न । मागती उत्तरे ।
संसदी लक्तरे । मिरवती ॥
पाश्चात्य माध्यमे । लिहिती द्वेषात ।
उचले जोशात । पुरोगामी ॥
केल्या आरोपाचा । मागता पुरावा ।
नुस्ता गवगवा । करताती ॥
आरोपांचा फक्त । उडावा धुराळा ।
याहुनी निराळा । हेतु नसे ॥
विरोधकांपाशी । उरले ना मुद्दे ।
म्हणून हे गुद्दे । कांत म्हणे ॥
(24 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Monday, July 19, 2021

उसंतवाणी - भाग ३८

 

उरूस, 18 जूलै  2021 

उसंतवाणी- 112

 (कॉंग्रेस एक जून्या इमारतीसारखी चाळी सारखी झाली आहे. रिडेव्हलपर बोलावून दुरूस्त करावी तसे प्रशांत किशोरला बोलावल्या गेले आहे. भाउ तोरसेकरांची ही उपमा मला खुप आवडली. त्यावरच ही उसंतवाणी लिहिली. राहूल-सोनिया-प्रियांका यांची एकत्र 2 तास भेट जी की कॉंग्रेसी नेत्यांनाही दूर्मिळ ती प्रशांत किशोरला भेटली. )

कॉंग्रेस बिल्डींग । खुप झाली जूनी ।
डेव्हल्पर कुणी । बोलवो हो ॥
धावला त्वरेने । प्रशांत किशोर ।
मनी नाचे मोर । कॉंग्रेसच्या ॥
सोनिया राहूल । प्रियंकाही खास।
देती दोन तास । बैठकीला ॥
विरोधी आघाडी । कोण हो जॉईन ।
कॉन्ट्रक्ट साईन । झाले जणू ॥
नव्या इमारती । कोरा मिळो फ्लॅट ।
कॉंग्रेसी सपाट । स्वप्नामध्ये ॥
आयतं बसून । वाजविती टाळ ।
गळ्यामध्ये माळ । घाला कुणी ॥
कांत ढासळती । कॉंग्रेसची गढी ।
माती हो उघडी । बुरूजाची ॥
(16 जूलै 2021)

उसंतवाणी- 113

(मुंबई विमानतळ चालविण्यासाठी विकासासाठी अदानी ग्रुपला देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकारने घेतला. याच आघाडीत कॉंग्रेस सामील आहे. दिल्लीत राज राहूल गांधी उठसुट अदानी अंबानी यांच्या नावाने खडे फोडत असतात. पण मुंबईत मात्र त्यांच्याच सरकारने हा निर्णय घेतला.)

विमानतळाचा । ताबा घे अदाणी ।
उद्धव करणी । महाराष्ट्री ॥
उद्योजकांसाठी । लाल पायघडी ।
सर्कार आघाडी । पसरते ॥
दिल्लीत राहूल । वाजवी पिपाणी ।
अंबानी अदाणी । नावे रोज ॥
संताजी धनाजी । जैसे मोगलांशी ।
राहूल गांधीशी । तैसे दोघे ॥
दिल्लीत गोंधळ । गल्लीत मुजरा ।
ऐसा निलाजरा । खेळ चालू ॥
लायसन कोटा । परमिट चांदी ।
रूजे स्वार्थ फांदी । कॉंग्रेसची ॥
कांत भांडवली । विरोधाचे ढोंग ।
कॉंग्रेसचे सोंग । कळो आले ॥
(17 जूलै 2021)

उसंतवाणी- 114

(पुलित्झर पुरस्कार विजेता जम्मु कश्मिरचा छायाचित्रकार पत्रकार दानीश सिद्दीकी याची तालिबान्यांनी हत्या केली. पण कुणीही पुरोगामी तालिबान्यांचा निषेध करायला तयार नाही. रवीश कुमार यांनी तर दानीश सिद्दीकीची ज्या गोळीने हत्या केली तिचा निषेध केला आहे. पण तालिबान्यांबद्दल चकार शब्द काढला नाही.)

दानीश सिद्दीकी । छायाचित्रकार ।
त्यासी पुरस्कार । पुलित्झर ॥
जळत्या प्रेतांचे । काढतो जो फोटो ।
देशद्रोही मोटो । चालवतो ॥
तालिबानी क्रुर । घेती त्याचा बळी ।
गप्प आळिमिळी । पुरोगामी ॥
मारतो मरतो । इस्लामचा बंदा ।
निषेधाचा वांधा । होतो इथे ॥
निषेध करीती । बंदुकी गोळीचा ।
नाहीच टोळीचा । तालिबानी ॥
आतंकवादाला । नाही म्हणे धर्म ।
सांगा मग वर्म । इस्लामचे ॥
कांत तालिबानी । बेभान सगळे ।
पुरोगामी गळे । कापताती ॥
(18 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Thursday, July 15, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ३७



उरूस, 15 जूलै  2021 

उसंतवाणी- 109

 (कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बारामती मध्ये जावून असं बोलले की शत्रूला घरात घुसून मारले पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी पटोले लहान आहेत असं सांगितलं. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी प्रतिक्रिया दिली असती.)

बारामती मध्ये । ऐकून गर्जना ।
छोटा आहे नाना । म्हणे काका ॥
समकक्ष माझ्या । लागेल बोलाया ।
जैसे की सोनिया । कॉंग्रेसात ॥
‘बाळू’‘बाबा’‘भाई’। चिंटू पिंटू‘नाना’।
करू दे ठणाणा । वायफळ ॥
पटोले पवार । कोण छोटे मोठे ।
दोघे धुती गोठे । दिल्लीचेच ॥
बेडुक फुगुन । होईल का बैल ।
जीभ जरी सैल । सुटलेली ॥
कांत नव्हे नेता । स्टॅडप कॉमेडी ।
जनता न वेडी । मत द्याया ॥
(13 जूलै 2021)

उसंतवाणी- 110

(कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य विश्वबंधू रॉय यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून दिग्विजय सिंह यांना हिंदू विरोधी मतांसाठी आवरा असं कळवलं आहे. अशा मतप्रदर्शनामुळे हिंदू मते पक्षापासून दूर जात आहेत असा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे.  )

हिंदू विरोधात । बोले डिग्गी राजा ।
वाजवतो बाजा । कॉंग्रेसचा ॥
कार्यकर्ता लिही । पत्र सोनियाला ।
आवरा नेत्याला । बोलभांड ॥
यांच्यामुळे होतो । पक्ष पराभुत ।
नको ऐसे भूत । पक्षामध्ये ॥
हिंदूंची नाराजी । टाके संकटात ।
नाही पदरात । सत्ताफळ ॥
तुष्टीकरणाची । चुकलेली नीती ।
अँटोनी समिती । हेच सांगे ॥
कॉंग्रसी गणित । झाले उफराटे ।
वोट बँक फुटे । मुस्लीमांची ॥
कांत जाती धर्म । अस्मिता कहर ।
लोकशाहीवर । डाग जाणा ॥
(14 जूलै 2021)

उसंतवाणी- 111

(शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार विरोधी पक्षांकडून केले जाणार अशा बातम्या उठवायला सुरवात झाली आहे. पवारांनी तातडीने यांचे खंडन केले. पण प्रशांत किशोर हे नाव पुढे करून विरोधी एकजूट बनवत आहेत असे एक चित्र समोर येते आहे. ज्यांची काहीच राजकीय ताकद नाही त्या छोट्या मोठ्या पक्षांना धेवून भाजपचा पराभव कसा घडवून आणणार? याचे आकड्यांत उत्तर कांहीच मिळत नाही. पण माध्यमांना तेवढाच चेव चढला आहे.)

नविन स्वप्नात । गुंग बारामती ।
भावी राष्ट्रपती । पवारच ॥
बुडाला बेडूक । उडाला तो पक्षी ।
राजकीय नक्षी । काकांची ही ॥
काका तातडीने । करीती खंडन ।
नको हे भांडण । नेतृत्वाचे ॥
मोदी विरोधात । जाहला अशांत ।
किशोर प्रशांत । स्ट्रॅटजीस्ट ॥
पवार नावाचा । उठवू धूरळा ।
मेळवू सगळा । विरोधक ॥
पंतप्रधानाच्या । स्पर्धेतून बाद ।
जाईल ही ब्याद । हेच मनी ॥
कांत दरबारी । ऐसे उठवळ ।
राजकीय बळ । शुन्य जाणा ॥
(15 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Monday, July 12, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ३६



उरूस, 12 जूलै  2021 

उसंतवाणी- 106

 (समान नागरी कायद्याचा आग्रह दिल्ली उच्च न्यायालयाने धरला आहे. या पूर्वीच सर्वौच्च न्यायालयाने 1985 मध्ये या साठी आग्रही विचारणा केंद्र सरकारकडे केली होती. पण तथाकथित पुरोगामी याला विरोध करत आहेत.  )

समान नागरी । चर्चा कायद्याची ।
नसे फायद्याची । कट्टरांना ॥
बोलण्यापुरते । सगळे समान ।
लाचार कमान । कुणापुढे ॥
मुस्लीमांच्यापुढे । टाकतात नांगी ।
सांगतात वांगी । कुराणाची ॥
जगी इतरत्र । एका कायद्याने ।
इथे शरियाने । कशासाठी ॥
उच्च न्यायालय । देतसे दणका ।
तुटतो मणका । पुरोगामी ॥
सुप्रिम कोर्टाने । झापले कधीचे ।
निर्णय आधीचे । पहा जरा ॥
कांत कायदा हा । समान नागरी ।
चढतो पायरी । समतेची ॥
(10 जूलै 2021)

उसंतवाणी- 107

(केंद्रात मंत्रीपद मिळाले नाही म्हणून प्रितम मुंढे नाराज आहेत असे पत्रकारांनी उठवून दिले. मुळात केंद्रीय मंत्रीमंडळात कुणाला घेणार कुणाला काढणार काहीच आतापता पत्रकारांना आधी लागला नाही. युपीए काळात बरखा दत्त सारखे कसे ढवळाढवळ करत होते यादी तयार करताना हे सगळ्यांनी बघितलं आहे. )

मंत्रीपदासाठी । नाराज भगिनी ।
लिहिते लेखणी । पत्रकारी ॥
खोट्या बातमीला । कल्पनेचे बळ ।
वास्तवाचा मेळ । कदापि ना ॥
युपीए काळात । यांची असे चांदी ।
हाती मंत्री यादी । आधी असे ॥
बरखा राडिया । करायाच्या फोन ।
मंत्रीपदी कोण । ठरवाया ॥
ल्युटन्स दिल्लीचा । उठला बाजार ।
म्हणून बेजार । पत्रकार ॥
लागेना हातात । बातमीचा धागा ।
‘ब्रेकिंगचा’ फुगा । फुटलेला ॥
पत्रकारितेची । कांत गेली लाज ।
सत्तास्पर्श माज । उतरला ॥
(11 जूलै 2021)

उसंतवाणी- 108

(मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई जगताप यांनी इंधन दरवाढी विरोधात बैलगाडी मोर्चा काढला. नेत्यांची इतकी गर्दी झाली की बैलगाडी मोडली. )

इंधन वाढीच्या । विरोधात मोर्चा ।
कॉंग्रेसची चर्चा । मुंबईत ॥
भाई जगताप । हाती घे कासरा ।
मिडिया आसरा । कॉंग्रेसला ॥
नेत्यांच्या ओझ्याने । मोडे बैलगाडी ।
मोर्च्याची बिघाडी । क्षणार्धात ॥
राजकारण ते । असो किंवा बैल ।
कासरा हो सैल । कॉंग्रेसचा ॥
चिन्ह बैलजोडी । गाय नी वासरू ।
माय नी लेकरू । आता फक्त ॥
दिल्लीच्या गोठ्यात । बसुन रवंथ ।
संपविती संथ । पक्ष जूना ॥
कांत जो न जाणे । जनतेची नाडी ।
चालणार गाडी । त्याची कशी ॥
(12 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Saturday, July 10, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ३५




उरूस, 10 जूलै  2021 

उसंतवाणी- 103

(महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांत उरकण्यात आले. 12 भाजप आमदरांचे निलंबन करण्यात आले.  कृषी विधेयक मांडले पण त्यात केंद्राच्या कायद्यांपेक्षा वेगळे काहीच नाही. )

अधिवेशनाची । ऐसी झाली गती ।
जणू गणपती । दो दिसांचा ॥
सत्ताधार्‍यांसाठी । एक उपचार ।
टाकी बहिष्कार । विरोधक ॥
कृषी विधेयक । मांडे कसे बसे ।
स्वत:चेच हसे । करविती ॥
स्वप्नील मरण । नव्हे आत्महत्या ।
सरकारी हत्या । धोरणाची ॥
सर्कारी फाईल । जागोजाग अडे ।
जनलोक रडे । कामासाठी ॥
दोन तृतिअंश । वाटा करी फस्त ।
नेता-बाबू मस्त । बांडगुळे ॥
कांत सरकार । स्वत:च समस्या ।
निष्फळ तपस्या । लोकशाही ॥
(7 जूलै 2021)

उसंतवाणी- 104

(केंद्रिय मंत्रीमंडळात फेर बदल करण्यात आले. महाराष्ट्राच्या वाट्याला नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड हे चार मंत्री नव्याने मिळाले. तर पूर्वीचे प्रकाश जावडेकर कमी झाले. पियुष गोयल यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेण्यात आले.)

मंत्रीमंडळाला । तारूण्य झळाळी ।
वृद्धांची गळाली । नावे कांही ॥
‘प्रकाश’ मावळे । येई ‘नारायण’ ।
घालाया वेसण । सेने मुखी ॥
‘गोयल’ हटले । रूळावरतूनी ।
चाललो आतुनी । खेळ कांही ॥
‘कपिल’ ‘भारती’। नविन चेहरे ।
आहेत उपरे । भाजपात ॥
जलील खैरेंना । देण्यास टक्कर ।
‘कराड’ चक्कर । चालविली ॥
देवेंद्र जाण्याच्या । जे आशेवरती ।
बंद हो बोलती । त्यांची आधी ॥
कांत सह्याद्रीने । गाजवावी दिल्ली ।
आपुलीच गल्ली । सोडा आता ॥
(8 जूलै 2021)

उसंतवाणी- 105

(अर्बन नक्षली फादर स्टेन सामी याचा तुरूंगात असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यावर मोठे काहूर पुरोगाम्यांकडून उठवले जात आहे.)

लिब्रांडु अवघे । बुडाले शोकात ।
मेला तुरूंगात । स्टेन सामी ॥
देश विरोधाचे । बक्कळ पुरावे ।
तरी का गोडवे । गातात हे ॥
अर्बन नक्षल । पेटवी विखार ।
बुद्धिची शिकार । करिती हे ॥
भीमा कोरेगांव । दंगलीचा कट ।
चाले खटपट । शस्त्रांस्त्रांची ॥
कायदा आपुले । करितसे काम ।
फुटतो का घाम । लिब्रांडूंना ॥
युपीए काळात । सुरू कारवाई ।
आता का आवई । अन्यायाची ॥
कांत विषवल्ली । उपटा समुळ ।
नक्षल्यांचे कुळ । नष्ट होवो ॥
(9 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Tuesday, July 6, 2021

उसंतवाणी - शतक महोत्सव



उरूस, 6 जूलै  2021
 
उसंतवाणी- 100

(रोज एक अभंग असे सलग 100 दिवस लिहिले. उसंतवाणीचा आज शतक महोत्सव. )

‘उसंतवाणी’ने । गाठले शतक ।
मी नतमस्तक । तूम्हापुढे ॥
केलेत कौतुक । देवोनिया दाद ।
तोची हा प्रसाद । माझ्यासाठी ॥
संतांनी रचले । रसाळ अभंग ।
माझा शब्द ढंग । साधासाच ॥
चालु घटनांना । दिले शब्द रूप ।
त्याचेच अप्रुप । वाचकांना ॥
लोकगंगेमध्ये । अभंग सोडले ।
तरले बुडले । तुम्हा हाती ॥
उतणार नाही । मातणार नाही ।
टाकणार नाही । शब्द वसा ॥
शब्द सहाय्याने । वेचु जरा काटे ।
प्रबोधन वाटे । कांत म्हणे ॥
(4 जूलै 2021)

उसंतवाणी- 101

(ज्ञानेश्वर माउली पादुका पालखीचे आळंदीहून काल प्रस्थान झाले पंढरपुरसाठी. कोरोना निर्बंधामुळे वारी प्रतिकात्मक करण्यात आली.)

आळंदीवरून । निघाल्या पालख्या ।
गर्दिला पारख्या । कोरोनात ॥
संकटावरती । करोनिया मात ।
छोट्या स्वरूपात । वारी चाले ॥
रोहिण्या मृगाचा । पडता पाऊस ।
कुणब्याची हौस । पेरणीची ॥
तैसेची हो वारी । भक्तीचे कारणी ।
करिते पेरणी । काळजात ॥
कोरोनात सारे । उलट पालट ।
श्रद्धा ही चिवट । टिकलेली ॥
जो तो आपुल्याच । बसुन अंगणी ।
विठ्ठल चरणी । धावे मन ॥
कांत संकटात । एकेक क्षणाला ।
लागते पणाला । खरी श्रद्धा ॥
(5 जूलै 2021)

उसंतवाणी- 102

(महाराष्ट्र विधी मंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन 5 जूलैला सुरू झाले. पहिल्याच दिवशी भाजपचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबीत करून एक खेळी सत्ताधार्‍यांची केली. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती लांबली त्याचा असा हिशोब चुकता केला. )

निलंबीत केले । आमदार बारा ।
केला चोख पुरा । हिशोब हा ॥
गल्लीत पोरांची । चालतसे कुस्ती ।
तैसी दिसे मस्ती । सभागृही ॥
तोडला माईक । केली शिवीगाळ ।
सगळा गचाळ । कारभार ॥
लोकप्रतिनिधी । यांना का म्हणावे ।
जोड्याने हाणावे । रस्त्यावर ॥
विधानसभा का । कुस्तीचा आखाडा ।
सत्तेचा झगडा । उठवळ ॥
दोनातील एक । नासवला दिस ।
पुढे काय कीस । पाडणार ॥
कांत लोकशाही । नेते सारे शाही ।
बोटालाच शाई । सामान्यांच्या ॥
(6 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Saturday, July 3, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ३३

 

उरूस, 3 जूलै  2021 

उसंतवाणी- 97

(उपमुख्यमंत्रीपद मुस्लीमांसाठी राखीव ठेवा अशी अजब मागणी ओवैसींच्या पक्षाने केली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा मुद्दाम सुरू करून दिलेली दिसत आहे. )

मुस्लीम बनवा । उपमुख्यमंत्री ।
वाजते वाजंत्री । युपी मध्ये ॥
ओवैसींचा पक्ष । मागतसे खुर्ची ।
लागतसे मिर्ची । लिब्रांडूंना ॥
सपा नी बसपा । कॉंग्रेस इतर ।
करीती वापर । मुस्लीमांचा ॥
वोट बँकेचे हे । झाले गुत्तेदार ।
पंक्चर भंगार । मस्लीम हा ॥
दावूनिया त्याला । भाजपाची भिती ।
मते वळविती । स्वत:कडे ॥
मोदींमुळे सारी । वोट बँक फुटे ।
सत्तास्वप्न तुटे । दलालांचे ॥
कांत धर्माधारी । नको सत्तापद ।
घटना विरोध । त्यात वसे ॥
(1 जूलै 2021)

उसंतवाणी- 98

(विधीमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन 5 व 6 जूलैला होत आहे. विधानसभेत सभापतीची निवड झालेली नाही. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याने जागा रिकामी आहे. ती आधी भरा अशी सुचना राज्यपालांनी केली आहे. )

विधानसभेला । नाही सभापती ।
मागे साडेसाती । आघाडीच्या ॥
आधी भरा पद । सांगे राज्यपाल ।
करू नका हाल । प्रक्रियेचे ॥
दोन दिवसांत । उरकू सेशन ।
आधीच टेंशन । चौकशीचे ॥
अनिल जात्यात । परब सुपात ।
ईडीच्या मापात । सापडती ॥
आरक्षणापायी । पेटली रे लंका ।
स्वबळाचा डंका । वाजतो हा ॥
पटोलेंच्या जागी । आणु पृथ्वीबाबा ।
घेतील ते ताबा । हाऊसचा ॥
कांत आघाडीचे । हरवले सुत्र ।
प्रत्येक स्वतंत्र । वागु लागे ॥
(2 जूलै 2021)

उसंतवाणी- 99

(जरंडेश्वर साखर करखाना विक्रि प्रकरणांत अजीत पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावे आली आहेत. त्यांच्याशी संबंधीत कंपनीला हा लिलावात काढलेला कारखाना विकल्या गेला. त्या निमित्ताने ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. )

साखर घोटाळा । ये अडचणीत ।
पवार अजीत । चौकशीत ॥
ऊस-दूध-पत । सारा सहकार ।
केला स्वाहाकार । सत्तेपायी ॥
कारखाना स्वस्त । काढू लिलावात ।
आपुल्या घशात । घालू मग ॥
सत्ता शिडी केली । गाठले ‘शिखर’ ।
अवघी साखर । कडू केली ॥
उसाचे नव्हे हे । शेतीचे गाळप ।
करूनी कळप । नासविती ॥
शेती विरोधाचे । धोरण सगळे ।
बापाचेच गळे । कापताती ॥
कांत सहकार । भ्रष्टतेचे मुळ ।
उपटा समुळ । ताकदिने ॥
(3 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575