Wednesday, November 11, 2020

नै.रा.द.गो.ब्रा.राहूल गांधींचा नैतिक विजय


 उरूस, 11 नोव्हेंबर 2020 

 नैतिक राजश्री दत्त गोत्री ब्राह्मण (नैरादगोब्रा) मा. राहूल गांधी यांचा प्रचंड नैतिक विजय झाला आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात 10 नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे (‘सोन्याच्या अक्षरांत लिहीवा’ असे लिहीणार होतो पण काही क्षुद्र खर्‍या विजयाने या नैतिक विजयाला डाग लावला आहे). 

नै.रा.द.गो.ब्रा. मा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वात पुरोगाम्यांनी बिहार निवडणुक आणि भारतातील इतर राज्यांतील पोट निवडणुका लढवल्या. त्यात अपेक्षेप्रमाणे आपले नैतिक नेतृत्व राहूल गांधी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. 

बिहार मध्ये 2015 मध्ये 40 जागा लढवित 27 जागी खरा विजय तर 13 जागी नैतिक विजय त्यांनी मिळवला होता. या वर्षी 70 जागा लढवित 19 जागी खरा क्षुद्र विजय तर 51 जागी दणदणीत नैतिक विजय मिळवून आपली नैंतिक विजयाची घोडदौड पुढे चालू ठेवली आहे. पुढच्या निवडणुकांत 100 जागा लढवून 10 जागी क्षुद्र खरा विजय आणि 90 जागी लखलखीत नैतिक विजय असे ध्येय ठरवले आहे.  

खरी कसोटी तर मध्यप्रदेश मध्ये लागली होती. 2018 च्या निवडणुकांत क्षुद्र खर्‍या विजयाच्या मागे लागून तेथील कार्यकर्त्यांनी सत्ता खेचून आणली. राहूल गांधी यांनी आधी कर्नाटक आणि मग मध्यप्रदेश मध्ये जोरदार प्रयत्न करून आपल्या आमदारांना राजीनामा देण्यास भाग पाडले. खर्‍या विजयाच्या क्षुद्र मोहातून त्यांना बाहेर काढण्याचा खुप प्रयत्न केला. पण ते सर्व पापी पामर भाजपच्या सत्ता मोहात अडकून परत निवडणुका लढवून आमदार बनले. पण मध्यप्रदेशांत 28 पैकी 19 जागी दणदणीत नैतिक यश पक्षाने मिळवले. 8 जागी सत्ता मोहात कार्यकर्ते निवडुन आले ही एक खंत राहूलजींना आहेच. 

उत्तर प्रदेश (8) गुजरात (8) कर्नाटक (2) तेलंगणा (1) मणिपुर (1) या जागी मात्र राहूल गांधी यांचे नैतिक नेतृत्व पूर्ण झळाळून उठले. पक्षाला 100 % नैतिक विजय त्यांनी मिळवून दिला. भाजप सारख्या पक्षाला क्ष्ाुद्र विजयाच्या मोहात पाडून आपला पक्ष संपूर्णत: नैतिक मार्गावर नेण्याचा आपला संकल्प दृढ केला. 

राहूल गांधी यांच्या या नैतिक विजयाचे पुरोगाम्यांनी आणि भाजपनेही मोठ्या मनाने अभिनंदन केले आहे. उत्तर प्रदेशातील अखिलेश प्रमाणेच राहूल गांधी यांनी तेजस्वी यादवांना नैतिक विजयाचे महत्त्व खुप समजावून सांगितले. पण तेजस्वी ऐकतच नव्हते. बरोबर सभा करू म्हणूनही सांगितले. त्या प्रमाणे 243 जागांसाठी प्रचंड अशा 9 सभा पाच दिवसांत घेवून मोठी मेहनत घेतली. त्यानंतर नैतिक तपश्‍चर्येसाठी आपल्यासोबत ‘दूर’ चलण्याचा खुप आग्रह धरला. पण तेजस्वी अजूनही खर्‍या यशाच्या सत्तेच्या मोहात दलदलीत अडकून पडले आहेत. त्यामुळे ते बिहारात प्रचार करत राहिले. केवळ आणि केवळ राहूल गांधी यांचेच नैतिक बळ होते म्हणून सत्तेचा मोहापासून ते तेजस्वी यांना दूर ठेवू शकले. अन्यथा तेजस्वी जवळपास त्यात अडकले होतेच. 

छत्तीसगढ येथील पोटनिवडणुकीत भुपेश बघेल या मुख्यमंत्र्याने क्ष्ाुद्रपणा करून एका जागी खरा विजय मिळवत नैतिक विजयाला काळे फासले आहे. झारखंड मध्येही अशीच एक जागा जिंकून कॉंग्रेस कार्यकर्ते सत्तेच्या दलदलीत अडकले आहेत. राहूल गांधी यांनी या प्रकरणांची गांभिर्याने दखल घेतली असून पुढच्या वेळी नैतिक विजय मिळवून चूक दुरूस्त  केली जाईल असे ठरविल्याचे कळते आहे. 

एक काळ असा होता की पोटनिवडणुका सत्ताधारी हरत असत. पण राहूल गांधी यांनी आपल्या नैतिक बळाच्या ताकदीने यात बदल घडवून आणला आहे. सत्ताधार्‍यांना अजून सत्तेच्या मोहात अडकवत त्याच दलदलीत रूतून बसण्याची चाल राहूल गांधी यांनी खेळली आहे. 

राहूल गांधी यांच्या नैतिक  घोडदौडीच्या विजय मार्गात पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ हे मोठे अडथळे आहेत. कर्नाटक आणि मध्यप्रदेश प्रमाणेच राजस्थानात त्यांनी खुप प्रयत्न केले. पण सचिन पालयट हा कच्चा खेळाडू निघाला व सत्ता मोहात अडकून पडला. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या सत्ता लालसेमुळे महाराष्ट्र, झारखंड येथे महागठबंधनात रहावे लागते आहे. हा क्ष्ाुद्र सत्ता मोह जावून कार्यकर्त्यांना नैतिक विजयाचे खरे मोल कळून येईल यासाठी काय करावे लागेल? याचे चिंतन करण्यासाठी राहूल गांधी बँकॉंग थायलंड पट्टाया का आणखी कुठल्या अनोळख्या जागी तपश्चर्येला गेले असल्याचे आतल्या गोटातून सांगण्यात आले आहे. 

लोकसभेचे अधिवेशन चालू असताना देशाबाहेर जावून तपश्चर्येची आपली प्रा‘चीन’ परंपरा राहूल गांधी यांनी पाळली. तेजस्वी आणि अखिलेश यांना अजून राहूल गांधी यांच्या नैतिकतेचे महत्त्व तेवढे कळलेले नाही. पण शरद पवारांसारख्या वयोवृद्ध जाणत्या नेत्याला या नैतिक विजयाचे महत्त्व कळले आहे. उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांना वचन दिले होते. त्यांनीही बिहारात नैतिक विज़य मिळवत ते पाळले आहे. या दोघांनीही राहूल गांधी यांच्याही एक पाउल पुढे टाकले आहे. विविध आपत्तीत सर्व देश सापडलेला आहे. अशावेळी सरकारी निधी अपुरा पडतो. त्या निधील दान देण्याची नैतिकता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जपली. बिहार निवडणुकीत त्यांच्या सर्व उमेदवारांनी उदार मनाने आपली सर्व अनामत रक्कम शासनाला दिली.

राहूल गांधी यांच्या नैतिक विजयाचे कौतुक पुरोगामी रवीश कुमार, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, गिरीश कुबेर, विनोद दुआ, सबा नकवी, अरफा खानूम शेरवानी हे पत्रकार नेहमीच करत असतात. 

फक्त अडचण एकच आहे की कुमार केतकर म्हणतात तसा मोदी निवडुन येण्याचा आंतरराष्ट्रीय कट जो काही आहे तो मात्र यशस्वी होतो आहे. खरं तर आता सर्वांनी मिळून कुमार केतकरांना समजावून सांगायला पाहिजे एम.एस.ए.बी. (मोदी-संघ-अमित शहा-भाजप) यांना सत्तेच्या मोहात अडकवून टाकणे हाच खरा आपला उलटा नैतिक कट आहे. तो आपण छुपे पणाने यशस्वी करत आहोतच. तूम्ही त्यावर बोलू नका. अमेरिकेतही ट्रंप तात्यांना असेच अडकवायचे होते. पण बीडेन बापूंनी ऐकले नाही. आणि त्यांना सत्तेचा क्ष्ाुद्र मोह पडला. 

असो नैरादगोब्रा (नैतिक राजश्री दत्त गोत्री ब्राह्मण) मा. राहूल गांधी यांचे नैतिक विजयासाठी मन:पूर्वक अभिनंदन. असाच विजय त्यांना मिळत राहो. 

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Tuesday, November 10, 2020

‘बुडाला ट्रंपूल्या पापी’। कुबेरी बुद्धी गेली झोपी ॥

    


उरूस, 10 नोव्हेंबर 2020 

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल समोर आला. त्यावर अग्रलेख लिहीताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी भरपूर गरळ ओकले आहे. समर्थ रामदासांनी औरंगजेबाच्या मृत्यूवर ‘बुडाल्या औरंग्या पापी’ असं लिहीलं होतं. त्याची आठवण करत कुबेर असं लिहीतात ‘बुडाला ट्रंपुल्या पापी’. आता लोकशाहीच्या मार्गाने आधी निवडून आलेल्या आणि आता लोकशाहीच्याच मार्गाने पराभूत झालेल्या ट्रंप यांच्यासाठी अशी भाषा कशी काय वापरत येईल? 

‘लोकसत्तासहीत जगभरचे विवेकवादी ट्रंप यांचा तिरस्कार का करतात हे समजून घेतलं पाहिजे.’ असे एक वाक्य कुबेर यांच्या अग्रलेखात आहे. आता जर कुबेर स्वत:ला ‘विवेकवादी’ म्हणवून घेणार असतील तर ते मग कुणाचा तिरस्कार कसा काय करू शकतात? एक प्रतिष्ठित प्रस्थापित मोठी परंपरा असलेल्या वृत्तपत्राचा संपादक किंवा ते वृत्तपत्र यांनी कुणाचा तिरस्कार करून कसे काय चालेल? वैचारिक विरोध, कडाडून टिका समजू शकतो. पण तिरस्काराला वैचारिक क्षेत्रात कशी काय जागा असू शकते? 

पण इतके भान स्वत:ला विवेकवादी म्हणवून घेताना कुबेरांना शिल्लक राहिलेले दिसत नाही. हा अग्रलेख वर वर पाहता ट्रंप यांच्या विरोधात दिसू शकतो. तसा तो आहेही. पण त्या अनुषंगाने कुबेरांना भाजप आणि विशेषत: मोदी अमित शहा यांना चार लाथा घालायच्या आहेत. 

ट्रंप यांच्या भारत भेटीच्या कार्यक्रमावर ताशेरे कुबेर यांनी ओढले आहेत. समजा हिलरी क्लिंटन जर राष्ट्राध्यक्ष असल्या असत्या तर त्यांच्याही सन्मानार्थ असाच भव्य कार्यक्रम भारतात आखला गेला असता. बिल क्लिंटन आले तेंव्हा त्यांचेही स्वागत उत्साहातच झाले होते. तेंव्हा काही मोदी पंतप्रधान नव्हते. एकूणच भारतीय मानस उत्सवी आहे. मग ही टीका का? आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे नाक कापले गेले असं लिहीताना ‘चीनच्या प्रश्‍नावर आपले हसे होते.’ असे वाक्य कुबेर यांनी या अग्रलेखात लिहीले आहे. आता याला आधार काय? गलवान खोर्‍यातील चकमकीपासून भारत कसा आणि किती चढाईखोर झाला आहे याचे रडगाणे खुद्द ग्लोबल टाईम्स ही चीनी सरकारी वृत्तसंस्थासच देत आहे. आणि इथे लोकसत्ताकरांना मात्र चीनप्रश्‍नी भारताचे हसे झाल्याचे दिवस्वप्न पडत आहे. 

अमेरिकेतील बहुसंख्य ‘अविचारी’ जनतेस ट्रंप यांच्यासारखा आक्रमक नेता नेमस्तांपेक्षा जास्त आकर्षून घेतो असं  म्हणत कुबेर पुुढे लिहीतात, ‘.. अशा आगलाव्या नेत्यांचे काही काळ फावते. अशावेळी समाजातील समंजसांनी विचारींच्या मागे आपली ताकद उभी करायची असते.’ 

आता आपण याचा भारतातील संदर्भ तपासू. 2014 ला मोदींच्या आगलाव्या नेतृत्वाकडे भारत आकर्षित झाला असं कुबेरांना सुचवायचं आहे. मग हा ‘काही काळ’ जो 5 वर्षांचा होता तो संपून परत 2019 मध्ये दुसर्‍या 5 वर्षांच्या ‘काही काळा’साठी भारतियांनी या आगलाव्या नेतृत्वाला परत का निवडून दिले? आताही हा लेख लिहीताना बिहारचे निकाल येउ लागले आहेत. त्यातही भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून बिहारमध्ये पहिल्यांदाच निवडून येतो आहे. याचा अर्थ गिरीश कुबेर काय लावणार? 

मोदी-अमित शहा या आगलाव्या नेतृत्वाच्या विरोधात समंजस माणसांनी कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं? राहूल गांधींच्या? मोदींचे 2014 च्या निवडणुकी आधीपासूनचे कुठलेही भाषण, कुठलीही मुलाखत काढून तपासा त्यात त्यांची भाषा किती आगलावी आहे हे सिद्ध करून दाखवा. मोदींनी अगदी राम मंदिरासारखा मुद्दाही आपल्या भाषणात किती आणि कसा मांडला हे पहावे. आत्ता बिहारच्या निवडणुकांच्या काळात जी भाषणं झाली ती पण कशी आहेत हे तपासावे.

ट्रंप आणि त्यांचा पक्ष आणि अमेरिकेतील मतदार यांचा विचार जरा बाजूला ठेवू. कुबेर ज्या हुकूमशाही प्रवृत्तीवर एकाधिकारशाहीवर टिका करू पहात आहेत त्याला भारतीय मतदारांनी कधी थारा दिला आहे? भारतीय जनता पक्षावर कुणाला काय टिका करायची ती करावी. नेतृत्वाच्य मर्यादा दाखवून द्याव्यात. पण 1980 ला पक्ष स्थापन झाल्यापासून त्यांनी भारतीय संविधानीक चौकटीत राजकीय पक्षांसाठी जी आचारसंहिता नेमून दिली आहे त्याचा कधी आणि कसा भंग केला ते सप्रमाण सिद्ध करावे. भाजपच्या नियमित निवडणुका झाल्या आहेत. उलट कुबेर ज्यांच्या मागे जायला सुचवत आहेत त्या कॉंग्रेसच्याच निवडणुका प्रलंबित आहेत.  2014 पासून म्हणजे मोदी अमित शहा यांच्याकडे पक्षाची सुत्रे आली तेंव्हा पासून भाजप शासित कुठल्या राज्यात निवडणुका टाळून अवैध रित्या सत्ता टिकवल्या गेली? 

अमेरिकेत मोदींनी रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यास हजर राहून ‘अगली बार ट्रंप सरकार’ ही केविलवाणी हाक दिली असं कुबेर म्हणतात. एखाद्या उत्सवी प्रसंगी असे शब्दप्रयोग कुणीही करत असतं. त्याला ‘केविलवाणी’ म्हणणारी कुबेरांची लेखणीच बापुडवाणी वाटत आहे. आता नविन अध्यक्ष यांच्यासाठी ‘आवा जो जो’ असा कार्यक्रम करावा लागेल असं कुबेर लिहीतात. खरंच कुठल्या निमित्ताने जो भारतात आले आणि तेंव्हा मोदी सरकारने भव्य कार्यक्रम आखलाच तर कुबेर काय करतील? अमेरिके सारख्या बलाढ्या राष्ट्राचा अध्यक्ष जेंव्हा कुठल्याही देशात जातो तेंव्हा त्याचे स्वागत भव्यच होत असते. मग तो कुठलाही कितीही का छोटा देश असेना. 

आताही चीनविरोधी जागतिक पातळीवर एखादे धोरण अमेरिकेच्या पुढाकाराचे ठरले आणि त्यात भारताचा सहभाग जो बायडेन यांनी मागितला तर कुबेर काय लेखनसंन्यास घेतील? अमेरिकेचा कुठलाही अध्यक्ष पहिले अमेरिकेचे हित पाहणारा असतो.  आपल्या देशात राहून चीनसारख्या देशाचे गुणगान गाण्याची प्रवृत्ती अमेरिकेत नाही. अमेरिकेतील ज्या माध्यमांना चीनमधून पैसा आला तो त्यांना जाहिर करावा लागलेला आहे. आपल्यासारखे चीनचे समर्थन करत छुपे फायदे उकळण्याची वृत्ती तिथल्या माध्यमांची नाही.    

ट्रंप तर हारले आणि 4 वर्षांत पदावरून दूर गेले पण मोदी हारले नाहीतच मात्र अजून जास्त बहुमताने जिंकले याची विलक्षण खंतच त्यांच्या शब्दांतून उमटत आहे. ‘नॉट माय प्रेसिडेंट’ सारखी चळवळ भारतात उभी राहिली नाही याचे दु:ख कुबेरांना वाटत आहे का? 

ट्रंपच्या निमित्ताने लिहीताना कुबेरांचीच विवेक बुद्धी झोपी गेल्याचे दिसून येते आहे.     


         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, November 9, 2020

मूती मालिका -५


भक्ताची भव्य मूर्ती (औंढा नागनाथ, जि.हिंगोली)

देवदेवतांच्या कलात्मक आणि भव्य मूर्ती आपण पाहतो पण सामान्य भक्ताची मूर्ती आणि तिही इतकी भव्य? हे आश्चर्य औंढा नागनाथ येथील मंदिरावर आढळून येतं. मूर्तीची भव्यता लक्षात यावी म्हणून मी हा पाठभिंतीचा पूर्णच फोटो मुद्दाम दिला आहे. दोन्ही हात जोडलेले, पद्मासनात बसलेली, चेहर्यावर शांत भाव असलेली, कुठलेच अलंकरण नसलेली ही मानवी मूर्ती लक्ष वेधून घेते. औंढ्याचं मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याबद्दल सांगताना संत नामदेवांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही, मग त्यांनी आपल्या भक्तीच्या शक्तीने देवालाच बदलण्यास भाग पाडले, आणि मंदिर फिरून पश्चिमेला आले. यातला खरेखोटेपणा माहित नाही कारण ही दंतकथा आहे. पण पूर्वेला एका भक्ताची भव्य मूर्ती मंदिरावर कोरून भक्तीची महती किती याचा पुरावाच इथे आढळतो.
गर्भगृहाच्या पाठभिंतीवर ही मूर्ती पूर्वेला तोंड करून विराजमान आहे. अशाच अजून दोन मूर्ती दक्षिण आणि उत्तरेला गाभार्याच्या बाह्यांगावर आहेत. दीड मिटर बाय दीड मिटर इतक्या भव्य कोनाड्यात या मूर्ती आहेत. मुर्तीच्या बाजूला छत्रचामर धारिणी आहेत. मुर्तीच्या माथ्यावर साधी टोपी आहे. त्यावर चंद्रासारखी आकृती कोरलेली आहे.
मंदिराला प्रदक्षिणा घालून आपण मागे या मूर्तीच्या समोर दगडी पायर्यांवर बसूलो तर एक वेगळाच अनुभव येतो. भक्तीतून येणारी शांत समाधानाची भावना मनात जागी येते. आपण मूर्तीसमोर हात जोडतो पण इथे मूर्तीच आपल्या समोर हात जोडते आहे, आपल्यातले पावित्र्य देवत्व जागवते आहे असे काही विलक्षण जाणवते. देवदर्शन करून घाईघाईत निघून जाणार्या अंधभक्तांचे काही सांगता येत नाही पण खरा भक्त, रसिक, शिल्पप्रेमी या मूर्तीच्या प्रेमात पडून समोरच्या दगडी पायर्यांवर बसून राहतो हे निश्चित.
तज्ज्ञांनी यावर अजूनही सविस्तर कुठे काही लिहीलं नाही (three huge sculptures probably of devotee इतकाच उल्लेख गो.ब. देगलुरकरांच्या पुस्तकात आहे). या प्राचीन भव्य मंदिरावर सर्वात मोठ्या आकारात या मानवी मूर्ती कशासाठी कोरल्या गेल्या आहेत? का हा कुणा देवतेचाच प्रकार आहे? कुणाला याची माहिती असल्यास खुलासा करावा.
Vincent Pasmo
या फ्रेंच मित्राला या मूर्तीने फारच आकर्षीत केले. हा फोटो त्यानेच काढला आहे.

(ह्या मूर्तीबद्दल तज्ञ चर्चा करत आहेत. अजून ह्याचा खुलासा झाला नाही.)



लोलितपाद नटराज (लेणी क्र. २१, वेरूळ)
नटराजाची प्रतिमा जी आपल्या सतत डोळ्या समोर येते ती एक पाय वर उचललेली व एका पायावर शरिराचा सगळा भार तोलून धरणारी अशी असते. ही प्रतिमा तंजावरच्या मंदिरातली आहे. दहाव्या शतकातील. पण त्याच्या जवळपास ३०० वर्षे आधी नटराजाची प्रतिमा कोरल्या गेली आहे वेरूळला. २१ क्रमांकाची ही लेणी "रामेश्वर लेणी" नावाने ओळखली जाते. नटराजाचे हे सर्वात पुरातन कलात्मक आणि भव्य असे शिल्प आहे. या नटराजाला "लोलितपाद नटराज" म्हणतात. शिवाने व्याघ्रचर्म कटीस परिधान केले आहे. दोन्ही बाजूला वादक दिसून येतात. अंतराळात ब्रह्मा, विष्णु, इंद्र यांची शिल्पे आहेत. एक परिपूर्ण कलात्मक दृश्य अशी या शिल्पपटाची ओळख आहे. १४ व्या क्रमांकाच्या लेणीतही नटराज शिवाचे अप्रतिम शिल्प आहे.
गायन वादन नृत्य यांचे सगळ्यात जूने संदर्भ औरंगाबाद परिसरांतील लेण्यांत सापडतात हा पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आम्रपालीचे एक विलक्षण शिल्प औरंगाबाद लेण्यात याही पूर्वीच्या काळात कोरलेले आहे.
महाराष्ट्राची सांगितिक कलात्मक अस्मिता या शिल्पाला मानले पाहिजे कारण हे तंजावरच्या आधीचे आहे अशी आग्रही भुमिका
Mahagami Gurukul
गुरूकुलाच्या संचालिका विख्यात ओडिसी/कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता या मांडत असतात. वेरूळ लेण्यात नृत्य विषयक भरपुर मुद्रा आढळून येतात.
शार्ङगदेवाचा संगीत रत्नाकर हा ग्रंथही याच परिसरात देवगिरी किल्ल्यावर रचला गेला. तेव्हा ही भुमी कलेची भुमी आहे हे निश्चित. मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर बाह्य भागात वादन, नृत्य करणारी सुरसुंदरींची शिल्पे अधिक आहेत. होट्टल येथे नृत्य गणेश आहे. जामखेडच्या (जि. जालना) खडकेश्वर महादेव मंदिरात लहान आकारात गायन वादन नृत्य करणार्या स्त्रीयांचे स्तंभ शिल्प आहे.
नटराज शिवाच्या विविध मुद्रा मराठवाड्यातील औंढा, उमरगा, माणकेश्वर, निलंगा येथील मंदिरांवर आहेत.
(हे शिल्प नटराज शिवाचे नसून नटेश शिवाचे आहे आसे तज्ञ सांगत आहेत. शिवाय हा लोलीत पद शिव नाही. यावर अजून प्रकाश पडला पाहिजे.)

(फोटो सौजन्य
Akvin Tourism sustainable travel in India
)



विजय विठ्ठल (हंपी, कर्नाटक)
कर्नाटकातील ही छोटी विठ्ठल मुर्ती मराठी माणसासाठी अस्मितेचे मोठे प्रतिक आहे. विजय नगरहून भानुदास महाराज (एकनाथांचे पणजोबा) यांनी विठ्ठल मुर्ती पंढरपुरला आणली अशी दंतकथा आहे. पण कर्नाटकांत हंपी येथे प्रचंड मोठे असे जे विजय विठ्ठल मंदिर आहे तिथे मात्र आता कुठलीच मुर्ती नाही. या मंदिर परिसरात जो अतिशय सुंदर दगडी रथ आहे त्यावर ही विठ्ठल मुर्ती कोरलेली मला आढळली. विठ्ठलाचा हा एक पुरावा. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे खाली जी चाकं दिसत आहेत ती संपूर्ण फिरत होती. लोक सारखं फिरवून नुकसान करायला लागले म्हणून दगड लावून चाकांना स्थिर केले आहे. विठ्ठल भोळ्या भक्तांचा साधाभोळा देव आहे असं म्हणतात. पण इथे मंदिराचे प्रचंड मोठे आवार पाहून विठ्ठलाची "श्रीमंती" डोळ्यात भरते. मराठी माणसांनी पंढरपुर सोबत हंपीच्या विठ्ठल मंदिराची यात्रा केली पाहिजे. आपल्या विठ्ठलाचे ऐश्वर्य डोळे भरून बघितलं पाहिजे. साध्या पालखीतून आपण दिंड्या घेवून पंढरपुरला जातो पण याच आपल्या विठ्ठलाचा रथ किती राजेशाही होता हे बघितलं पाहिजे.
पंचेवीस तीस फुटीं उंच सलग असे दगडी खांब आणि तसलेच आडवे बीम वापरून जी भव्यता हंपीच्या मंदिरांना आलेली आहे ती विलक्षण आहे. अन्यथा इतक्या लांबीचे दगड कुठल्या जुन्या मंदिरामध्ये वापरलेले आढळत नाहीत. मंदिरातला गरूड खांब, हा भव्य रथ विठ्ठल विष्णुचाच अवतार समजला जातो याचा पुरावा दाखवतो. रथयात्रा ही प्रामुख्याने वैष्णव देवतांची निघते. महाराष्ट्राने पालखी हा रथाला शोधलेला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण पर्याय आहे का? याचाही शोध घेतला पाहिजे. विठ्ठल हे दैवतच मुळात सनातन धर्मातील एक क्रांती आहे असं जाणवतं. या दैवतेला वाहन नाही, हीच्या हातात शस्त्र नाही, ही दैवता कोप पावून कुणाला शाप देत नाही की वरदान देत नाही. पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर कटीवर हात ठेवून उभी आहे. त्यामुळे भजनात रमलेला तुळशी माळ घातलेल्या वारकर्याच्या भोळ्या भक्तीत बुडालेला विठ्ठलच आपल्याला जवळचा वाटतो. विजयनगरचा विजय विठ्ठल अंतराने आणि रूपानेही दूरचा भासतो. आपल्याला काळ्या पाषाणातील विठ्ठलाचे "सावळे सुंदर" रूप पहायची सवय. त्यामुळे हा विठ्ठल वेगळा वाटतो. कुठे संगमरवरी दगडांत कुणी विठ्ठलाची मुर्ती घडवली तर मला नाही वाटत ती मराठी माणसाला आपलिशी वाटेल म्हणून. बहिणाबाईंनी त्यामुळेच लिहून ठेवलंय
सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्याचा विठोबा
पाना फुलांतच राजी
रा.चिं. ढेरे सारख्या अभ्यासकाने मांडले की पुरीचा जग्गनाथ, तिरूपतीचा बालाजी आणि पंढरपुरचा विठोबा ही मुळची लोकदैवतं नंतर विष्णुचे अवतार म्हणून स्विकारली गेली. जग्गनाथ "अन्नब्रह्म", बालाजी "कांचनब्रह्म" तर विठ्ठल "नादब्रह्म" मानल्या जातो. तुळशीमाळ गळ्यात घातलेला विठ्ठल आर्तपणे आळवलेल्या भजनानेच संतुष्ट होतो.

श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

Friday, November 6, 2020

मुर्ती मालिका -४


अनंतशयन विष्णु

पैठणच्या नृसिंह मंदिरातील ही देखणी मुर्ती. शेषशय्येवर विष्णु पहूडले आहेत. झोपले हा शब्द आपण चुकीने वापरतो, उजवा वरचा हात माने खाली घेतल्याने मान उंचावली आहे. ही अगदी नैसर्गिक सहज अशी अवस्था शिल्पकाराने रेखली आहे. नाभीतून निघालेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. लक्ष्मी उजवा पाय चेपत आहे. डावा पाय घडी करून कासवाच्या पाठीवर टेकवला आहे. मुर्तीच्या पाठशिळेवर नक्षीत दहा अवतार कोरलेले आहे. शेषाचा फणा बरोबर चेहर्याला मध्यभागी कल्पुन समतोल साधत शिल्पांकीत केलेला दिसतो.
ही मुद्रा विश्वनिर्मितीचे प्रतिक मानली जाते. आपल्यातून सर्व विश्व निर्माण करून त्याकडे कौतूकभरल्या नजरेने भगवान पहात आहेत. पद्मनाभ विष्णुची जी शक्ती आहे तीला श्रद्धा म्हणतात. जगाची निर्मिती ही श्रद्धेतून झाली असंही मानलं जातं. लक्ष्मीच्या बाजूला हात जोडल्या अवस्थेत गरूड आहे.
सप्त फण्यांच्या शेषाच्या ९ वेटोळ्यांवर भगवान पहूडले आहेत. या सर्पाची त्वचा हूबेहूब खालच्या वेटोळ्यांवर दाखवत शिल्पकाराने कमाल केली आहे. (फोटो सौजन्य सुधीर महाजन)



वेळापुरची अप्रतिम हर गौरी मुर्ती (शिवपार्वती)
शिवाची पूजा मुर्ती रूपात कुठेच केली जात नाही. पण वेळापुर (ता. माळशिरस, जि. सोलापुर) हे एकमेव मंदिर आहे जिथे शिव मुर्तीरूपात पार्वती सोबत पुजला जातो. स्थानिक चुकीने या मुर्तीला अर्धनारी नटेश्वर या नावाने संबोधतात. प्रत्यक्षात ही एक मुर्ती नसून उमा महेश्वराची संयुक्त मुर्ती आहे.
यादवांच्या काळातील १३ व्या शतकातील हे प्राचीन मंदिर. महादेवाच्या शाळुंकेवर पिंड असावी तशी ही मुर्ती शिल्पांकित केली आहे.
शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालचा हात वरद मुद्रेत असून हातात अक्षयमाला आहे. डाव्या वरच्या हातात नागफणा असून हा हात पार्वतीच्या केसांच्या पाठीमागे आहे. खालचा डावा हात पार्वतीच्या कंबरेवर आहे. शिवाच्या जटामुकूटावर चंद्र सुर्य कोरलेले आहेत.
पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे. दूसर्या हातात फासा आहे.
शिवाचा जटामुकूट तर पार्वतीचा मराठमोळा शोभणारा अंबाडा प्रभावळी सारखा डोक्या मागे कोरलेला आहे. अंबाजोगाई, निलंगा येथील उमा महेश्वर मुर्तीत पार्वतीचा केशसंभार असाच दर्शविला आहे. पार्वतीच्या उजव्या पायाची बोटं दूमडलेली दिसत असून बोटात जोडवं घातलेलं दिसून यावं इतकी बारीक कलाकुसर आहे. याच पायाच्या तळव्यावर चक्र कोरलेलं आहे. पार्वतीच्या खाली गणेश असून शिवाच्या बाजूने खाली नंदी आहे.
मागची प्रभावळ अतिशय कोरीव असून त्यावर अष्ट दिकपाल कोरलेले आहेत. (आठ दिशांच्या आठ देवता असतात. पूर्व-इंद्र, पश्चिम-वरूण, दक्षिण-यम, उत्तर-कुबेर, आग्नेय-अग्नी, नैऋत्य-निऋती, वायव्य-वायु, ईशान्य-ईशान) विष्णु आणि ब्रह्मदेवाच्या मुर्तीही प्रभावळीवर आहेत. मध्यभागी किर्तीमुख आहे.
एकप्रकारे पंचमहाभुतांसह सर्व प्रमुख देवता कोरून सगळे विश्वच मुर्ती रूपात मांडले आहे. याचीही वेगळी दखल घ्यावी लागेल.
उमा महेश्वर मुर्तीत पार्वतीही शिवाच्या खांद्यावर हात ठेवलेली दाखली जाते हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. खांद्यावरचा हात बरोबरीचे मैत्रिचे नाते सुचवतो.
Shrikant Borwankar
ने फार छान शिर्षक सुचवले "ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा". आरतीमधील या ओळी याच मुर्तीकडे पाहून लिहिल्या गेल्या असाव्यात.
Ashutosh Bapat
सर तूमच्यामुळे आज या मुर्तीवर लिहिलं. पार्वतीच्या पायाशी घोरपड तसल्याने तिला गौरी असे संबोधतात. असा खुलासा सायली पलांडे दातार यांनी केला आहे.
Saili Palande-Datar
(फोटो सौजन्य अर्धनारी नटेश्वर संस्थान, वेळापुर).
या अप्रतिम दूर्मिळ अशा मुर्तीला मंदिराला जरूर भेट द्या.



हम्पी येथील भव्य योग नरसिंह
हम्पी या पुरातन राजधानीची खुण दाखवणार्या दोन मुख्य गोष्टी आहेत. एक आहे विजय विठ्ठल मंदिर आणि दूसरी आहे ही अति भव्य नरसिंह मुर्ती. नॅशनल बुक ट्रस्टनी विजय नगरवर जे पुस्तक प्रकाशीत केलं त्याच्या मुखपृष्ठावर हाच नरसिंह आहे.
विजयनगर साम्राज्यातील या दोन्ही देवता महाराष्ट्रासाठी आस्थेचा विषय आहेत.
या नरसिंह मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची भव्यता. प्रत्यक्ष मुर्ती इतकी भव्य तर ते मंदिर केवढे असेल? एकसंध दगडात मुर्ती सोबतच मागचा भव्य शेषही कोरलेला आहे. खालच्या आसना सगट या मुर्तीची उंची २५ फुट इतकी आहे. योग मुद्रेतील या नरसिंहाच्या पायात योगपट्टा आहे. याच्या डाव्या मांडीवर लक्ष्मीचीही अतिशय देखणी मुर्ती होती. पण ती आता नाही. मुर्तीचे हातही खंडित झाले आहेत. शेषशायी विष्णुच्या माथ्यावर जसा ७ फण्याचा नाग असतो तो तसा इथेही दिसतो आहे. माथ्यावरचा मुकूट विजयनगर साम्राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारा आहे. नरसिंहाची ही सगळ्यात भव्य अशी मुर्ती समजली जाते.
याचं एक अतिशय वेगळेपण म्हणजे समोर उभं राहून चेहर्याकडे आपण बघत राहिलो तर हळु हळु इतर सर्व गोष्टी दिसेनाश्या होतात. हे उग्र सिंहमुख किंचित हसून आपल्याकडे मायाळुपणे पाहते आहे असा भास होतो. दूष्ट शक्तींचा नाश करणारा मी सज्जनांच्या पाठिशी आहे आहे असा विश्वास हा नरसिंह आपल्याला देतो. मुर्तीकडे पाठ फिरवून आपण परतत असताना एकदा तरी मागे वळून पाहण्याचा मोह होतोच. मागे वळल्यावर मुर्ती परत आपल्याला बोलावते आहे असे जाणवते.
सध्या मुर्ती भोवतीची जी दगडी रचना आहे ती बाजूला करून मुर्ती खुली केल्यास तिची भव्यता अजून जाणवेल. (फोटो मी स्वत: काढलेला आहे. विजय नगर साम्राज्या बद्दल भरपुर माहिती उपलब्ध आहे. त्यावर परत वेगळं लिहित नाही.)
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद. 9422878575

Thursday, November 5, 2020

मुर्ती मालिका -३


१४ हातांचा विदारण नरसिंह

नरसिंह रूपातील विविध मुर्ती प्रचलीत आहेत. त्यातील विदारण्य म्हणजेच उग्र नरसिंह मुर्तीला चार, सहा, आठ हात दाखवले जातात. पण पैठण येथील ही मुर्ती सगळ्यांत वेगळी यासाठी आहे की तिला सगळ्यात जास्त म्हणजे १४ हात दाखवले आहेत. उजव्या बाजूला खङग, अंकुश, पद्म, बाण, चक्र दिसून येतात. तर डाव्या बाजूला खेटक (ढाल), फासा, गदा, खङग, शंख दिसून येतात. दोन हात हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोकं धरून ठेवत आहेत. तर दोन हात त्याचे पोट फाडत आहेत.
ज्या आसनात नरसिंह बसलेला आहे त्याला वामललितासन म्हणतात. (उजवा पाय वर घेतलेला, डावा पाय जमिनीवर)
या मुर्तीकारापुढे आवाहन होते ते १४ हातांचा तोल राखत मुर्ती प्रमाणबद्ध ठेवणे. शिवाय विविध आयुधे स्पष्टपणे शिल्पांकीत करणे. चार फुटाच्या या मुर्तीत ही किमया कलात्मक रित्या साधल्या गेली आहे. हिरण्य कश्यपुच्या हातातही शस्त्र आहेत. तोही राजा असल्याने त्याला मुकुट दाखवला आहे. नरसिंहाची आयाळही दागिन्या सारखी गळ्याभोवती शोभून दिसते आहे. कलात्मक दृष्ट्या या मुर्तीचे मोल खुप मोठे आहे.
(फोटो सौजन्य
Sudhir Mahajan
, मुर्तीची माहिती सचिन देव या अभियांत्रिकीच्या मित्राने पुरवली. या मुर्तीचे पुजारीपण त्याच्या घराण्यात आहे. डाॅ. गो.ब. देगलूरकरांनी या मुर्तीचे सविस्तर सुरेख विश्लेषण आपल्या पुस्तकात केले आहे)



हरी—हर जूळ्या मुर्ती (वडगल्ली, परभणी)
विविध मुर्तींवर लिहीतो आहे. पण माझ्या अगदी घराजवळ (नानलपेठ, परभणी) माझ्या आजोळच्या वडगल्लीत इतकी अप्रतिम शिल्पं आहेत याची जाणीवच झाली नाही. या मुर्तींजवळ आम्ही नियमित खेळलो आहोत. बहुतांश भाविक गाभार्यातील महादेवाच्या पिंडीला आणि हनुमानाला फुलं वहायचे. या मुर्ती बिचार्या एकट्याच आहेत म्हणून त्यांना मी आवर्जून फुल वहायचो. विविध तज्ज्ञांची पुस्तकं चाळताना आता लक्षात येतंय या मुर्तींचे महत्व आणि वैशिष्ट्य.
फोटोत उजव्या बाजूची मुर्ती केशव विष्णुची आहे. औंढ्याच्या अशाच मुर्तीवर याच सदरात लिहिले आहे. डावीकडची मुर्ती "केवल शिव" या नावाने ओळखली जाते. या शिवाच्या वरच्या उजव्या हातात त्रिशुळ आहे. त्याचा दंडच शिल्लक आहे. खालचा उजवा हात वरद मुद्रेत आहे. त्या हातात अक्षय माला आहे. वरच्या डाव्या हातात सर्प आहे. खालच्या डाव्या हातात बीजपुरक आहे. जास्त बीज असलेलं फळासारखं दिसणारं हे सृजनाचे प्रतिक मानलं जातं. संहारक मानल्या जाणार्या शिवाच्या हातात सृजनाचे प्रतिक हे वेगळेपण आहे. समभंग अवस्थेत उभ्या शिवाच्या चेहर्यावर शांत भाव आहेत. औंढा नागनाथ मंदिरावर अशा सहा मुर्ती बाह्य भागात कोरलेल्या आहेत. मुर्तीच्या पायाशी नंदी आहे पण त्याचे मुख तुटले आहे. माणकेश्वर मंदिरावर पण केवल शिवाचे सुरेख शिल्प आहे.
जबरेश्वर महादेव मंदिरात नंदीच्या पाठीमागे या दोन मुर्ती कोनाड्यात ठेवलेल्या आहेत. मंदिर संपूर्ण नविन झालं आहे. पूर्वी मंदिरा समोर बारव होती ती आता बुजवल्या गेली. या दोन मुर्ती मुळ मुख्य मंदिरात कुठे बसवलेल्या असतील हे आता कळत नाही पण त्यांच्या एकसारख्या शैलीमुळे अगदी आजूबाजूला असतील हे सहज लक्षात येतं. जी महादेवाची पिंड आता गाभार्यात आहे ती स्वयंभु असून मंदिराची दूरूस्ती ६० वर्षांपूर्वी झाली तेंव्हा पिंड काढताच आली नाही. प्रचंड मोठ्या शिळेचा ती भाग होती. मग तिच्यावर आच्छादन टाकुनच दूरुस्ती केल्या गेली अशी लहानपणीची आठवण आई सांगते (आईचा जन्म १९४९). गाभार्यात हनुमानाची स्थापना भिंतीवर केली आहे. पण ही मुळ मुर्ती नसणार. मुळात हे जबरेश्वर (शिव) आणि जगदीश्वर (विष्णु) असे मंदिर असेल का? कारण या मुर्ती मंदिराच्या बाह्य भागातील वाटत नाही.


अप्रतिम अतुलनीय अर्धनारीश्वर (राजापुर, जि. हिंगोली)
औंढा नागनाथ जवळ राजापुर येथे तीन मुर्ती आहेत. यातील सरस्वती आणि योग नरसिंह यावर याच मालिकेत लिहीलं आहे. तिसरी अप्रतिम मुर्ती आहे अर्धनारीश्वराची. शिव पार्वतीची संयुक्त मुर्ती. उजव्या बाजुला शिव आहे आणि डावीकडे पार्वती. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते म्हणूनच वामांगी असा शब्द आला आहे.
या शिल्पकाराचे कसब अगदी एक एक जागी आढळते. पार्वतीचा मुकुट सजलेला (करंडमुकुट) आणि शिवाचा मुकुट जटांचा. तिच्या कानात सुंदर नाजूक कुंडले तर शिवाच्या कानात सर्पाकार कुंडले. पार्वतीला हातभर काकणं, तोडे. बाजुबंद, खालच्या हातात नाजुकपणे धरलेला कमंडलू. कमरेला मेखला. कमाल म्हणजे तिच्या वस्त्रांवरची नक्षीही दाखवलेली आहे. पायात तोडे तर आहेतच पण अंगठ्या जवळच्या बोटात जोडवे पण आहेत. वरच्या हातात आरसा आहे.
शिवाच्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालच्या हातात अक्षयमाळा आहे. बाजुबंद सर्पाकार राकट आहे. पायात रूंडमाळा दिसतात, पण हीच माळ पार्वतीच्या बाजूने नाजूक दागिना बनते. गळ्यातील माळेचेही असेच. शिवाच्या बाजूने सरळ ठाशीव दिसणारी माळ पार्वतीच्या स्तनांवरून वळण घेत कलात्मक डौलदार बनते. तिचे वार्यावर उडणारे वस्त्र आणि शिवाचे जाडे भरडे वस्त्र.
खाली शिवाचे वाहन नंदी आहे आणि पार्वतीचे सिंह न दाखवता लोध (मुंगुस किंवा घोरपड) दाखवले आहे.
महाराष्ट्रात अर्धनारीश्वराच्या मुर्ती फार थोड्या आहेत. ज्या आहेत त्या मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल्या आढळून येतात. मुख्य मुर्ती म्हणून कोरलेवी हाच एकमेव अप्रतिम नमुना. (फोटो सौजन्य विजय कांबळे हिंगोली राजापुर)

Wednesday, November 4, 2020

भाज्यांच्या हमीभावाची केरळी थट्टा


 म.टा. 3 नोव्हेंबर 2020 संपादकीय पानावरील लेख 

कृषी विधेयकांतील धान्यांच्या किमान हमी भावा (मिनिमम सपोर्ट प्राईज, एम.एस.पी.) वरून प्रचंड गदारोळ पंजाब आणि हरियाणात माजवला गेला. पंजाब विधानसभेने वेगळा कायदा राज्यासाठी मंजूर करून घेतला. हे वादळ शमत नाही तोच आता केरळने भाज्यांसाठी किमान हमी भावाचे धोरण जाहिर करून शेतमालाच्या बाजारात हस्तक्षेप करण्याचा मनसुबा  अंमलात आणण्याचे ठरवले आहे. 

कुठल्याही कारणाने शेतमालाची बाजारपेठ नियंत्रित करून शेती आणि शेतकरी हिताचा बळी देण्याचे धोरण डाव्या सरकारांनी नेहमीच राबवले आहे. शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण ही घोषणा शेतकरी चळवळीत त्यामुळेच रूजली. 

ज्यांची साठवणूक करणे शक्य आहे, वाहतुकही सोयीची आहे अशा धान्यांच्या बाबतही एम.एस.पी. धोरण आत्तापर्यंत कुठल्याच सरकारांना नीट राबवता आलेले नाही. धान्यांतही फक्त गहु आणि तांदूळ यांचीच खरेदी आणि तीही परत फक्त काही प्रदेशांत (पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचे विदर्भातील पाच जिल्हे) एम.एस.पी. प्रमाणे केली जाते. या शिवाय संपूर्ण भारतात कुठल्याही शेतमालाची एम.एस.पी. प्रमाणे खरेदी सरकारी पातळीवर केली जात नाही. तशी यंत्रणाही सरकारकडे नाही. 

मग असे असताना केरळात नाशवंत असलेल्या भाज्यांच्या बाबत हमीभावाची घोषणा का केल्या गेली? 

यातील काही त्रुटी तर अगदी लगेच लक्षात याव्यात अशा आहेत. एक तर संपूर्ण केरळात कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे कृषी उत्पन बाजार समित्यां सारखी सरकारी शेतमाल खरेदी बाजारपेठ नाही. परिणामी सरकार खरेदी करणार कसे? याचे कुठलेच संयुक्तीक उत्तर केरळ सरकारने दिलेले नाही. 

दुसरी गोष्ट यात नमुद केली आहे की खुल्या बाजारात भाज्यांचे भाव हमी भावापेक्षा पडले तरच सरकार हस्तक्षेप करणार. म्हणजे काय? जर भाव जास्त असतील तर सरकार तसेही निर्यात बंदीेचे शस्त्र हाताळून भाव पाडत आले आहेच.

असं समजू की सरकारने जाहिर केलेल्या हमीभावा पेक्षा भाजीचे भाव जास्तीचे आहेत. साहजिकच व्यापारी या खरेदीपासून लांब रहातील.  सरकारी यंत्रणेला खरेदी करण्यास भाग पाडतील आणि त्यांच्याकडून त्या कमी भावाने खरेदी करून व्यापार करतील. किंवा आपण स्वत: चढ्या भावाने खरेदी न करता जो हमी भाव आहे त्यापेक्षा जरा कमी किंवा त्याच्या आसपासच खरेदी करतील. म्हणजे हा हमीभाव हा शेतकर्‍याच्या माथ्यावर ठोकलेला खिळाच बनेल. ज्याच्या वर किंमती कधीही चढणार नाहीतच. 

आता सरकारी हमी भावापेक्षा भाज्यांच्या किंमती पडलेल्याा आहेत ही परिस्थिती लक्षात घेवू. अशावेळी सगळी गर्दी सरकारी खरेदीकडे होईल. इतकेच नाही तर शेजारच्या तामिळनाडू आणि कर्नाटकांतून भाजीपाला केरळात येईल. हा सगळा भार सरकारी यंत्रणेला पेलणे अशक्य होवून बसेल. आणि सगळी यंत्रणाच कोलमडून पडेल.

कापूस आणि उसाच्या बाबतीत महाराष्ट्राने हे अनुभवले आहे. शेजारच्या तेलंगणात (तेंव्हाचा आंध्र प्रदेश) कापसाचे भाव चढले की महाराष्ट्रातला कापूस तिकडे जायचा. आणि सीमारेषांवर काळाबाजार पोलीसांचे हप्ते यांना ऊत यायचा. तसेच दक्षिण महाराष्ट्रातला ऊस कर्नाटकांत जायचा. आंध्रातला स्वस्त तांदूळ चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात यायचा. उत्तर महाराष्ट्रातला कापूस जिनिंग साठी गुजरातेत जायचा. 

भाव कोसळले तर हमी भावाने खरेदी करावी म्हणून प्रचंड शेतमाल केरळात येऊ शकतो. अशावेळी सरकारी यंत्रणा काय करणार? कमी भावाने भाज्या खरेदी करून ती सरकारी यंत्रणेच्या माथी मारण्याचा उद्योग जोरात चालेल. महाराष्ट्रात डाळींच्या बाबतीत हे घडले आहे. शेतकर्‍यांची डाळ अतिशय कमी भावाने खरेदी करून सरकारी यंत्रणेत ती चढ्या भावाने विकून अधिकारी राजकीय नेते व्यापारी दलाल या यंत्रणेने केलेला मोठा भ्रष्टाचार सर्वांना माहित आहे. 

भाज्यांच्या बाबतीत सगळ्यात त्रासाचा जिकीरीचा आणि कटकटीचा मुद्दा आहे तो साठवणूकीचा, वाहतुकीचा. सरकारी यंत्रणेने हा भाजीपाला खरेदी केला तर तो साठवणार कसा? कारण घावूक भाजी बाजार हा जेमतेत तीन चार तासांचा उद्योग असतो. पहाटे अगदी अंधारात सुर्य उगवण्याच्या आत शेतकर्‍यांनी भाजीपाला विकायला आणलेला असतो. त्याचे लिलाव होतात.  आणि किरकोळ भाजीवाले ही भाजी घेवून विकायला निघून जातात. म्हणजे सकाळी 6 वाजता सुरू झालेला हा व्यवहार 9 वाजता सगळं संपून जिकडे तिकडे झालेले असते. 

आता केरळातील सरकारी यंत्रणा इतक्या तातडीने काम करू शकते का? केरळच नव्हे तर आख्ख्या भारतातील कुठली सरकारी यंत्रणा अशी तातडीने बाजारपेठेच्या बाबतीत कार्यक्षम राहू शकते? भाजी बाजारात थोडा जरी उशीर झाला तर भाजी खराब होवून जाते. एका ठिकाणची भाजी दुसर्‍या ठिकाणी नेण्याची काय व्यवस्था सरकार कडे आहे? सध्या शेतकरी आपणहून भाजी मोंढ्यात घेवून येतो. आणि किरकोळ व्यपारी आप आपल्या गांड्यांतून हातगाड्यांतून ती त्या जागेवरून घेवून जातो. हे सगळे एका विशिष्ट शिस्तीत सोयीने चालू असते.  मग यात सरकारने हस्तक्षेप करून हा सगळा अव्यापारेषू व्यापार करण्याची आवश्यकताच काय आहे? 

केवळ केरळच नव्हे तर कुठल्याही सरकारला भाजी बाजारात काही सकारात्मक चांगले करायचे असेल तर आधी भाज्यांच्या साठवणुकीसाठी मोठी यंत्रणा उभारण्यास उद्योजकांना मदत करावी. त्यासाठी अग्रक्रमाने कर्ज मंजूर करावे. जागा उपलब्ध करून द्याव्यात. (केळ पिकविण्यासाठी आमच्या एका उद्योजक मित्राला कृषी उत्पन्न बाजार समितीने इतका त्रास दिला की शेवटी त्याने ते रायपनिंग चेंबर गावाबाहेर दूर जवळच्या खेड्यात शेतजमिनीवर उभे केले). भाज्यांची वाहतूक ही पण मोठी जिकीरीची समस्या आहे. त्यासाठी कोल्ड स्टोरेज व्हॅन हव्या आहेत. तसेच भाज्यांवर प्रक्रिया करणार्‍या यंत्रणा सक्षम हव्या आहेत. हे सगळं करण्यासाठी आधी शेतमाल बाजार मोकळा केला पाहिजे. तरच त्यात गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. 

एकदा का हमी भावाचा म्हणजेच कमी भावाचा खिळा शेतकर्‍याच्या माथी ठोकून टाकला की मग तिथे गुंतवणुक करण्यास कुणी तयार होत नाही. भाव चढले तर हमी भावाच्या पातळीवर आपोआप येवून कोसळणार आणि उतरले तर मात्र सगळेच वार्‍यावर सोडून देणार असाच नेहमी अनुभव राहिला आहे. 

केरळ मधील डाव्या सरकारने ही शेतकर्‍यांची उडवलेली थट्टा आहे. ‘जेणे राजा व्यापारी तेणे प्रजा भिखारी’ अशी म्हण गुजरातीत आहे. केरळात सरकार भाजी बाजारात उतरणार असेल तर त्यातून शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. 1 नोव्हेंबर पासून हे धोरण राबविण्याचे केरळ सरकारने घोषीत केले आहे. 

नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या चार महिन्यांच सगळ्यांत चांगला आणि मुबलक प्रमाणात भाजीपाला बाजारात येतो. हेच चार महिने ज्याच्याकडे जरा पाणी आहे तो शेतकरी भाजीपाला घेवून चार दोन पैसे गाठीला बांधून आपला तोटा भरून काढण्याचे स्वप्न पाहतो. नेमका त्याच स्वप्नाचा चक्काचुर केरळाचे डावे सरकार करत आहे.

  

    श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575   

      


Tuesday, November 3, 2020

बर्दापूरकर बोरकर आणि बरवा हिरवा

  


उरूस, 3 नोव्हेंबर 2020 

 ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर सरांच्या ब्लॉगवर सामाजिक राजकीय लिखाणासोबतच ललित लेखनही आढळून येते. मला हे लेख विशेष भावतात. ‘अजूगपणातल्या नोंदी’ या मालिकेत गेली काही दिवस ते लेख टाकत आहेत. 16 वी नोंद  (ता. 2 नोव्हेंबर 2020)  वाचत असताना त्यातील हिरव्या रंगाच्या उल्लेखाने माझ्या मेंदूत काही तरी चमकले. बोरकरांच्या ‘निळा’ या कवितेची आठवण झाली. बर्दापूर आणि बोरकर यांनी माझ्या मेंदूचा पुरता ताबाच घेतला. कामाला निघायची गडबड विसरून मी आधी हाती कागद पेन घेवून बसलो. झरझर कविता लिहून काढली. बर्दापूरकर सरांना तातडीने प्रतिक्रिया म्हणून व्हाटसअप वर पाठवली. मग दुपारी तिच्यात जराशी दुरूस्ती. रात्री लक्षात आलं अनुष्टूभ म्हणजे केवळ आठ आठ अक्षरं एका ओळीत हवी इतकं सोपं नाही. पहिला शब्द दोनच अक्षरांचा असावा. बाकी तीन तीन चे दोन असावे लागतात.  मग परत किरकोळ दुरूस्ती केली. तरी ‘लोभस’ शब्दपाशी अडलोच. तो काही बदलता आला नाही. बोरकरांच्या निळा कवितेच्या शैलीतील हिरव्या रंगावरची ही कविता ‘बरवा हिरवा’


निळ्या आभाळ मंडपी

खाली गालीचा हिरवा

सदा सुखवी जीवाला

रंग हिरवा बरवा ॥


एक कुणी हटखोर

एक असे समंजस

एका अत्तराचा गंध

त्याला म्हणतात खस ॥


एक जरठ दिसतो

दूजा भासतो कोवळा

राठ कुणी नी कुणाचा

लोभस हा तोंडवळा ॥


एक पाहतो रोखून

आहे हिरवा उद्धट 

एक झुकवितो डोळे

भासे जरासा लाघट ॥


महा-वृक्षाचा हिरवा

वाटे गुढ आत्ममग्न 

चिंब चिंब भिजूनिया

वेली हिरव्याशा नग्न ॥


सांज सोनेरी उन्हात

एक झाकोळ हिरवा

जरा कातर कातर

कानी घुमतो मारवा ॥


फेर धरून नाचतो

असा भवती हिरवा

डोळे भरून जातात

मनी दाटतो गारवा ॥


     

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575