Thursday, February 20, 2014

माध्यमांनी केले भाषेचे वाट्टोळे

मासिक "लोकराज्य" फेब्रुवारी २०१४  मधील लेख

मराठी भाषेची मोठ्या प्रमाणात मोडतोड माध्यमांतून केली जाते असा आरोप केला तर काही जणांना आश्चर्य वाटेल. ज्यांनी भाषा सांभाळायची तेच कसे काय भाषेचे नुकसान करणार? म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले असं होणार नाही का? पण हे खरे आहे. याचे साधे सरळ कारण म्हणजे माध्यमांना म्हणजे वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे यांना भाषेचे जे बलस्थान आहे तेच उमगत नाही. ज्यांना भाषेचे सामर्थ्य कळत होते ते लोक सध्या माध्यमांतून हद्दपार झाले आहेत.
बातमीचे जाऊ द्या पण जिथे प्रचंड पैसा ओतला जातो त्या जाहिरातींमधील वाक्य पहा, ‘‘माझ्या यशात सर्वांच्या वाटा...’’ वर्तमानपत्राच्या  पूर्ण पान रंगीत जाहिराती मध्ये  असलेले  हे वाक्य आहे. याचा अर्थ काय होतो? 'सगळ्यांच्या वाटा' म्हणजे रस्ते माझ्या यशात आहेत. मी तसे संपादकाला विचारले की हे कसे? त्याला काहीच सांगता येईना. सुदैवाने त्याला चुक काय झाली ते कळाले होते. "माझ्या यशात सर्वांचा वाटा" असं हे वाक्य हवं होतं. यामुळे वाटा याचा अर्थ रस्ता असा नसून हिस्सा असा होतो. व्याकरणाची ही मोडतोड कशामुळे? आणि असं केल्याने काम सोपं होणार आहे का अवघड होणार आहे?
दुसरा विषय नेहमी चर्चेचा असतो आणि तो म्हणजे दुसर्‍या भाषेतील शब्द वापरायचे नाहीत का? आणि वापरले तर काय होते. आपल्या भाषेत पुरेसे शब्द नसतील तर दुसर्‍या भाषेतील शब्द जरूर वापरले पाहिजेत. किंवा आपल्या भाषेतील शब्द सोपे नसतील तरी दुसर्‍या भाषेतील सोपे शब्द वापरले पाहिजेत. खरं तर लोक असेच शब्द वापरत असतात. पण असे शब्द वापरण्याने जर आशयच बदलत असेल तर ते कसे काय वापरता येतील? एक साधा शब्द आहे ‘व्यस्त’. हा शब्द हिंदी मध्ये कामात व्यग्र असण्यासाठी वापरला जातो. मराठीत त्याचा अर्थ सम च्या विरूद्ध असा तो व्यस्त असा आहे. म्हणजे ‘मी कामात फार व्यस्त आहे’ असा उपयोग मराठीत करता येत नाही. पण असाच उपयोग वर्तमानपत्रात हमखास केला जातो. आता याला काय म्हणणार? काही वेळा दुसर्‍या भाषेतला शब्द योग्य वापरला जातो पण त्याचे व्याकरण मात्र त्याच भाषेतले ठेवले तर पंचाईत होते. मध्ये एका वाहिनीवर "त्याचा लाईफ अतिशय धावपळीचा बनला आहे" असे वाक्य निवेदिकेने वापरले. आता अडचण अशी आहे की जीवनला लाईफ हा शब्द तूम्ही वापरा पण त्याचे व्याकरण बदलण्याचे काय कारण? म्हणजे हे वाक्य ‘त्याचे लाईफ अतिशय धावपळीचे बनले आहे’ असे होईल.
एका भाषेत दुसर्‍या भाषेतून शब्द येतच असतात. शिवाय काही न वापरातले शब्द बादही होत जातात. पण भाषेचे म्हणून जे व्याकरण असते ते बदलत नाही. भाषेची खरी ओळख ही त्या भाषेचे व्याकरण असते. त्या भाषेतील शब्दालंकार, म्हणी, वाक्प्रचार यातून भाषा समृद्ध होते. त्यावर आघात घातला तर कसे होणार?
एक नेहमी वाद घातला जातो की बहुजन समाजाची भाषा दुय्यम समजली जाते. तीचा अपमान केला जातो. अशी भाषा आम्ही वापरली तर काय बिघडले? खरं तर बहुजन समाज भाषेचा अतिशय सुक्ष्म आणि चांगला वापर करत असतो. विशेषत: बायका तर भाषेचा वापर अप्रतिम करतात. यात कुठेही व्याकरणाची मोडतोड केलेली नसते. उलट बहुजन समाजाने आणि तथाकथित खालच्या समजल्या जाणार्‍या जातींनी आणि त्यातही परत स्त्रीयांनी भाषा अतिशय समृद्ध केली आहे. हे समजून न घेता आजची माध्यमे ओरड करतात. ते जी मोडतोड आज करत आहेत त्याचा बहुजन समाजाच्या भाषेशी काहीही संबंध नाही. माध्यमांमधली भाषेची मोडतोड ही त्यांच्या अज्ञानातून आळसातून विचार न करण्याचे वृत्तीतून आली आहे. त्यांना भाषा समजून घ्यायची नाही.
जात्यावर ओव्या म्हणताना भाषेची, कलेची अप्रतिम जाण बायकांनी व्यक्त केली आहे. शिवाय त्यात काव्यही ठासून भरलेले आहे. हे सगळे बहुजन समाजातील बायकांनी केले आहे हे विशेष- 
दाण्याच्या जोडीने जीण्याचा रगडा । 
गाण्याच्या ओढीने तूला ओढीते दगडा ॥ 
आता अशी संपृक्त भाषा आज माध्यमं वापरतात का? स्त्री जन्माचे दु:ख जनाबाईने आपल्या अभंगातून मांडले आहे. याच जनाबाईच्या काळात आणि त्याच परिसरात (गंगाखेड जि. परभणी) जात्यावरच्या ओव्यांत मांडताना ही अज्ञात बाई म्हणते,
गायीवर गोन्या लादल्या ग लमान्याने। 
सवतीवर लेक  दिली कोन्या ग बेमान्याने ॥
ही भाषेची संपृक्तता, अप्रतिम लय आजची बहुजनांसाठी म्हणवून घेणारी माध्यमं वापरतात का?
बहुजन समाज भाषेचा वापर त्यांच्या अभिव्यक्तीसाठी करतो कारण भाषा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. भिंतीत वस्तू ठेवण्याच्या एकाच बाबीसाठी कोनाडा, देवळी, फडताळ अशा तिन शब्दांचा वापर केला जातो. कारण त्यांचे उपयोग वेगवेगळे आहेत. फुलपात्र, गडु, तांब्या, पेला, चंबु, कलश, ग्लास हे इतके सगळे शब्द केवळ पाणी पिण्याच्या भांड्यासाठी आहेत. कारण त्यांचा वापर वेगवेगळा आहे.  इतकंच काय तर पुष्कळ या एकाच अर्थाचे मायंदळ, गज, ढीग, बखळ, लई, फार, मोप, बहुत, उमोप, गडगंज, सुरवाड, बंबाड, दन्ना, रेटून, ठेस, मस आणि पुष्कळ असे 16 शब्द डॉ. ना.गो.नांदापुरकर यांनी लोकभाषा व बोलीच्या अभ्यासात नोंदवले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सर्व शब्द बहुजनांच्या वापरातले आहेत. आजची माध्यमं हे समजून घेणार आहेत का?
मराठी भाषा ही कशी विकसित होत गेली याचे सुंदर वर्णन डॉ. नांदापुरकरांनी मायबोलीची कहाणी या गद्य कवितेत केले आहे. 
धरणीमातेने साज केला. आभाळाने मांडव घातला. क्षितिजाने त्याला झालर लावली. वार्‍याने दवंडी पिटवली ‘मराठी आली’,  ‘मराठी आली’. गावच्या गावकर्‍यांना आनंद झाला. पाटलांनी चावडीवर रामराम घेतले. पांड्यांनी देशाचा पट्टा करून दिला. वेसकराने खुळखुळा वाजविला. जोशाने पत्रिका लिहीली. वाण्याने साखरपाने वाटली. जनलोक म्हणून लागला, ‘आमची मराठी आली‘, ‘आमची मराठी आली.’
नव्या मनूची पहाट झाली. नव्या दमाने दमकत आली. महाराष्ट्रीने दोरा भरला. प्राकृताची अंगी ल्याली. अपभृंशाची कुंची घाली. कानडीचे कसे केले. तेलंगीचे गोंडे लावले. संस्कृताचे बाळसे अंगावर खेळते. संस्कृतीचे वारे मनात घोळते. दिवसामासा वाढू लागली. एकेक गुण काढू लागली. लोकांचे मन ओढू लागली. पोर आता उफाड्याची दिसू लागली. सार्‍या महाराष्ट्राची हिने अंगण ओसरी केली. चहूकडे हिची फेरी होऊ लागली. देशाचे दळण दळू लागली. दळता दळता गाऊ लागली; गाता गाता कांडू लागली. वैर्‍याशी भांडण भांडू लागली.

ग्रंथिक भाषा ही संस्कृत होती. तिच्यापासून वेगळं होवून बोली भाषेत तेंव्हाचे तत्त्वज्ञान लिहीण्यास चक्रधर, संत ज्ञानेश्वर यांनी कष्ट केले. आजच्या माध्यमांचेही हेच काम आहे. उलट तेच जेंव्हा भाषेच्या बाबतीत गंभीर बनत नाहीत तेंव्हा खरी समस्या निर्माण होते. प्रस्थापित संस्कृत पंडितांची यथेच्छ टिंगल नांदापुरकरांनी उडवली आहे.

पंडितांनी मराठीचा तिरस्कार केला; पण मराठीने उलट त्यांचा सत्कार केला. तिने पंडितांचे पाणी जोखून पाहिजे. पंडितांचे घाव हसून साहिले. पंडितांच्या वर्तनावरून तिने ओळखले की वठला वासा वांकता वाकत नाही, किरणाचा दोर कातता कात नाही. पंडितांचे गाणे जुने नाणे, हाटांत काही विकत नाही, कामात काही टिकत नाही. पंडितांची वाणी मोत्याचे पाणी, पण त्याने भांडे काही भरत नाही, तहान काही हरत नाही. पंडितपोरे पिकली बोरे, पण त्यांना किड लागण्याचा संभव होता. मराठी मावली सगळ्यांची सांवली. अवघ्यांच्या सुखाची तिने सोय लावली.

मराठीला सोपे करण्याचे काम संतांनी केले. आज भाषा लोकांपर्यंत पोचवण्याचे मोठे काम माध्यमं करीत आहेत. जोपर्यंत लेखी स्वरूपात भाषा फारशी नव्हती तोपर्यंत तिचे दोष जास्त पसरत नसत. आता जेंव्हा पासून लेखी स्वरूपात भाषा उपलब्ध होते आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी रेकॉर्डिंग करून ठेवायची मोठी सोय करून ठेवली आहे. मग आता तर उलट जबाबदारी वाढली आहे.
नविन भाषा जी मोबाईलवर विशेष: एसएमएस ची भाषा म्हणून ओळखली जाते तिचाही वापर वर्तमानपत्रांमध्ये दिसून येतो आहे. पण यातील अडचण हीच आहे की ही भाषा सार्वत्रिक आहे का? काही जणांनी वापरली म्हणून ती सगळ्यांची भाषा होत नसते. शिवाय नविन शब्दांनाही काही एक नियम असावेच लागतात. त्यालाही व्याकरणात बसवावेच लागते. पण हे करताना कोणी दिसत नाही.
व्याकरणाचे नियम सगळ्यांना डोकेदुखी वाटते. खरं तर हे नियम सगळ्यांना सोयीचे व्हावे म्हणूनच करण्यात आले आहेत. भाषेचा वापर सोपा व्हावा, सर्वांना सारखा समजून यावा यासाठी हे नियम करण्यात आले. आणि म्हणूनच ते आचरणातही येत गेले. माध्यमांमध्ये नेहमीच आवाज उठतो की हे नियम आम्ही पाळणार नाही. मग  दुसरा प्रश्न असा आपोआपच निर्माण होतो की मग तूम्ही भाषा जी काही वापरणार आहात ती इतरांना नाही समजली तर काय करणार? एकीकडे जागतिकीकरणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरीकडे भाषेच्या बाबतीत मात्र संकुचित होत जायचे हे मोठे विचित्र आहे.
भाषा, व्याकरण तिचे नियम आणि मग त्या विरूद्ध बंडखोरी हे सगळे कशामुळे होते? याचे साधे कारण म्हणजे अमेरिकेत जी भाषा बोलली जाते तिने इंग्लंड मधल्या इंग्रजीविरूद्ध बंडखोरी केली. जुन्या इंग्रजीची मिजास उतरवली. हे सगळं पाहिलं की आपल्यालाही वाटायला लागलं की आपणही भाषेच्या नियमांविरूद्ध बंडखोरी करू. पण खरी गोष्ट ही आहे की इंग्लंड आणि युरोपात राजशिष्टाचाराची जी भाषा होती तिच्या विरोधात बंडखोरी करून साधी सोपी वापरायला उपयुक्त अशा बोली इंग्रजीकडे अमेरिकेतील जनतेचा कल निर्माण झाला. मराठीच्या बाबतीत उलट परिस्थिती आहे. शिवाजी महाराजांपर्यंत कोणीच आपली राजभाषा म्हणून मराठी वापरली नव्हती. मुळात संस्कृत, फारसी , उर्दू आणि शेवटी इंग्रजी अशा राजभाषांना तोंड देत देतच आमची मराठी वाढली.
मराठ्यांचा भाला सरळ घुसतो । मराठीचा बोल सरळ असतो ॥ 
असे त्यामुळेच म्हटले गेले आहे. खर्‍या अर्थाने व्यापक पातळीवर 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर बेळगांव वगळता सर्व मराठी प्रदेशाची कारभाराची भाषा ही मराठी झाली. म्हणजे मुळात राजभाषांच्या विरोधातील बंड म्हणजेच मराठी. आणि आता परत तिच्याच विरूद्ध बंड करण्याची नियम न पाळण्याची आरडा ओरड करणारी भाषा कोण काढतो आहे?
माध्यमांमधील भाषेच्या वापरासंबंधी अनास्था संपली तर फार मोठी अडचण दुर होईल. नविन व्यवस्थापन शास्त्रात इतकी मोठ मोठी पदे निर्माण केली जातात, दर्जाच्या बाबतीत जागरूकता दाखवली जाते मग भाषेच्या बाबतीत दर्जा राखण्याची काळजी का नाही घेतली जात? यासाठी का नाही पदे निर्माण केली जात? माणसे नेमली जात?

Tuesday, February 18, 2014

फँड्री-रोखठोक ओवी । देते व्यवस्थेला शिवी ॥


दैनिक पुण्य- नगरी "उरूस" १८ -२-१४

जात्यावरच्या ओव्या हा मराठीतील एक मोठा लक्षणीय असा सांस्कृतिक ठेवा आहे. या  ओव्यांमधून स्त्री मनाचा हळवेपणा जसा प्रकट होतो तसा रोखठोक ठावही समोर येतो. रामाची पूजा करणारी बाई ओवीत सहज लिहून जाते

राम म्हणून राम नाही सीतेच्या तोलाचा ।
सीतामाई हिरकणी राम हलक्या दिलाचा ॥

गंगाखेडच्या परिसरात जनाबाईवर भरपूर ओव्या सापडतात. विठ्ठलाचे जनीवरचे प्रेम पाहुन रूक्मिण विठ्ठलाला थेट विचारते

रूक्मिन म्हणे देवा तुम्हा लाज थोडी ।
गादी फुलाची सोडून वाकळाची काय गोडी ॥

हा रोखठोकपणा जनाबाईने उचलला आणि आपल्या रचनांमधुन देवाला म्हणजेच व्यवस्थेला शिव्या घातल्या.

जनी म्हणे देवा मी झाले वेसवा । रिघाले केशवा घर तुझे ॥

हा रोखठोकपणा नागराज मंजुळे सारख्या तरूण दिग्दर्शकाला भावला असावा. म्हणूनच त्यानं फँड्री या आपल्या अप्रतिम चित्रपटातून व्यवस्थेला फँड्री म्हणून शिवी घातली आहे.
जब्या नावाचा सातवीतला छोटा पोरगा. त्याचा पिर्‍या म्हणून जिवलग दोस्त. ते विकत असलेल्या पेप्सी गारेगारच्या रंगीबेरंगी कांड्यासारखीच त्याची छोटी रंगीत स्वप्ने असतात. त्याची पेप्सीचा डबा असलेली सायकल ज्या मोठ्या गाडीला टेकून उभी असते ती गाडी मागे सरकते आणि याच्या पेप्सीच्या कांड्यांचा, सायकलचा चुराडा होतो. जब्याच्या छोट्याशा स्वप्नांचाही असाच चुराडा समाज करू पाहतो. जब्या सारं सहन करत जातो. पण जेंव्हा त्याच्या विधवा बहिणीला गावातील टारगट तरूण टोमणे मारतात मग मात्र जब्या भलामोठा दगड त्यांच्यावर भिरकावतो. बस्स इतकी छोटीशी या चित्रपटाची कहाणी आहे.
नागराज मंजुळेच्या चित्रपटावर भरपूर लिहिलं जाईल. या चित्रपटाला फार मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे. याचं साधं कारण म्हणजे नागराजने मातीतला चित्रपट बनवला आहे. आपण चित्रपट पाहतो आहे असं वाटतच नाही. आपण त्या अकोळनेर गावात कॅमेर्‍याच्या पाठीमागे उभे आहोत आणि कॅमेरा नव्हे तर आपला डोळाच सारे टिपत चालला आहे. 
शाळेची वेळ झाली आहे. सगळी पोर/पोरीं अंघोळी करून गणवेश घालून शाळेत चालली आहेत आणि जब्या त्याची आई, दोन बहिणी, बाप यांच्या सोबत डुक्कर पकडण्याच्या मोहिमेवर उकिरडे धुंडाळतो आहे. एक तर प्रसंग अगदी अंगावर येतो. डुक्कर जवळ आलं आहे. त्याला पकडणार की इतक्यात शाळेत राष्ट्रगीत  सुरू होते. जब्याचा बाप, जब्याची  आई सगळेच ताठ उभे राहतात. डुक्कर आरामात त्यांच्यासमोरून निघून जाते. 
दुष्यंतकुमार या हिंदी कवीची मोठी सुंदर कविता आहे

कल नुमाईश मे मिला वो चिथडे पहने हुए ।
मैने पुछा नाम तो बोला के हिंदुस्थान है ॥
 

खाने को कुछ नही है फटेहाल है मगर ।
झोले मे उसके पास कोई संविधान है ॥ 
 

व्यवस्थेवर इतकं अप्रतिम भाष्य आणि तेही केवळ दृश्यातून. कोणताही संवाद या ठिकाणी नाही. हे दिग्दर्शकाचे यश आहे. 
मुळात नागराज मंजुळे याने सोमनाथ अवघडे या मुलाला निवडूनच प्रेक्षकांना जिंकले आहे. या लहान मुलाने जब्याची भूमिका अप्रतिम साकारली आहे. त्याची मुलाखत पाहत असताना असे जाणवले की नागराजला हा जब्या 100 % या मुलात दिसला  म्हणून त्याच्या तीन महिने मागे लागून त्याने त्याला चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले. त्याच्या दोस्ताची भूमिका सुरज पवार या मुलानेही अप्रतिम केली आहे. या मुलाने नागराजच्या ‘पिस्तुल्या’ नावाच्या माहितीपटात यापूर्वी काम केले आहे. खरं तर नागराजने स्वत:च या मुलात आपली स्वप्नं पाहिली आहेत. प्रेमात हरलेला व्यवस्थेने नाकारलेला चक्या नावाचा वाया गेलेला तरूण जब्या या मुलाच्या स्वप्नात रंग भरायचा प्रयत्न करतो. त्याला उर्जा पुरवतो हे फार कलात्मक पद्धतीने आलेलं आहे.  
देवाच्या जत्रेत पालखी मिरवताना जब्या मोठ्या उत्साहाने नाचतो आहे. त्याला चक्या खांद्यावर घेवो. जब्याची मैत्रीण शालू पाहते म्हणून जब्याला जोर चढतो. पण त्याचा बाप कचरू- जी भूमिका   किशोर कदम याने अतिशय अप्रतिम साकारली आहे- बोलावतो. नंतरचे दृश्य तर केवळ अप्रतिम. डोक्यावरची बत्ती दिसत राहते. वरतून कॅमेरा खाली खाली येतो आणि शेवटी ती बत्ती धरणारा चेहरा दिसतो. तो असतो जब्याचा. नाचणार्‍या जब्याच्या डोक्यावर बत्ती धरायचे काम येते व त्याच्या बरोबरचे मित्र त्याच्यासमोर खुन्नसने नाचतात. जब्याचे डोळे नुसते वाहत राहतात. असे कित्येक प्रसंग कुठल्याही संवादाशिवाय पडद्यावर जिवंत होतात. उदा. बाजारात वेताच्या टोपल्या विकत बसलेला जब्या शालू दिसताच एका टोपलीच्या खालीच लपतो. किंवा जत्रेत जब्याला त्याचा बाप एक शर्ट विकत घेऊन देतो आणि तो शर्ट घालून तो फिरतो. पेप्सी विकताना जब्याला व्हॅन हुसेनच्या जाहिरातीतील तरूणाच्या सरळ नाकाचा हेवा वाटतो. तो घरी आल्यावर रात्री अभ्यास करताना आपल्या नाकाला कपड्यांचा चिमटा लावतो.
चित्रपटातील व्यक्तीरेखा ओळखीच्या चेहर्‍यांना न घेता सामान्य लोकांना घेवून साकारल्यामुळे सहज आणि स्वाभाविक झाल्या आहेत. आज मराठी चित्रपटांची एक वेगळी वाट श्‍वास, हरिश्‍चंद्राची फॅक्टरी, देऊळ, विहीर, गाभ्रीचा पाऊस, तुकाराम यांनी तयार केली आहे. हे चित्रपट काहीतरी अस्सल काहीतरी वेगळं मराठी मातीतील देऊ  पाहात आहे. 
चित्रपटात नसलेले पण  थिम म्हणून यु ट्यूबवर गाजत असेलेले गाणे अस्सल मराठी मातीतले आहे. या गाण्याला हलगी जब्याने म्हणजेच सोमनाथ अवघडे यानेच वाजविली आहे. दलित-सवर्ण असा संघर्ष साहित्यात चित्रपटात रंगविल्या जातो. पण कैकाड्यांसारख्या भटक्या जमातीची वेदना नागराजने या चित्रपटातून दाखवून दिली. 
‘उन्हाच्या कटाविरूद्ध’ या कवितासंग्रहात नागराजने लिहून ठेवले होते-

माझ्या हाती
नसती लेखणी
तर...
तर असती छिन्नी सतार बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला

त्यावेळी कदाचित नागराजच्या हाता कॅमेरा नसेल. कारण लेखणी, छिन्नी, सतार, बासरी, कुंचला हे काहीच हाती न घेता कॅमेर्‍याच्या साहाय्याने फँड्रीमधून नागराज मंजुळेने आपल्या मनातला कोलाहल उपसलेला आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Tuesday, February 11, 2014

हैदराबादी फुलांचा मराठी सुगंध

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 11 फेब्रुवारी 2014 

एक 75 वर्षांची म्हातारी सायकल  रिक्शात
(हैदराबादच्या भाषेत सैकील) बसून गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर, गर्दीने ओसंडून वाहणार्‍या किराणा दुकानाच्या मालकाला शुद्ध मराठीत ‘‘जरा पोहे दाखव रे’’ म्हणत आहे. दुकानदाराचा नोकर तिच्या रिक्शाजवळ येऊन  ‘‘अम्मा ! अटकुलू मंची उंटूनदी. (अम्मा हे पोहे चांगले आहेत)’’ सांगतो आहे आणि ही पंच्चाहत्तर वर्षांची अम्मा रिक्शातच बसून, ‘‘हे नको रे! पातळ आहेत. जरा जाड दे की.’’ त्याला व्यवस्थित मराठी कळतं आणि हिलाही व्यवस्थित तेलगू कळतं. पण दोघंही बोलताहेत आपापल्याच भाषेत. हा काही काल्पनिक प्रसंग नाही.  हैदराबादच्या सुलतान बाजारसारख्या सर्वात गजबजलेल्या भागातील भर रस्त्यावरील किराणा दुकानातील खराखुरा प्रसंग आहे. दहा वर्षांपूर्वी माझ्या पंच्याहत्तर वर्षांच्या आत्याच्या बाबतीत घडलेला !  
हैदराबाद (हैदराबाद असाच शब्द आहे. ‘हैद्राबाद’नाही. हैदरअलीने आबाद केलेले म्हणून हैदराबाद) या शहराचे एक वैशिष्ट्य आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर सर्वात जास्त मराठी माणसे असलेले हे शहर. पाच लाख लोकसंख्या असेल तर त्या शहरात महानगरपालिका बनवली जाते. हैदराबादमध्ये मराठी माणसांची लोकसंख्या 9 लाख इतकी प्रचंड आहे. म्हणजे मराठी माणसांचीच एक महानगरपालिका हैदराबाद शहरात तयार करता येईल.
मुंबईवर बाहेरच्यांनी आक्रमण केलं म्हणून आक्रमक रूप धारण करत आपण पक्ष काढले, अस्मितेचे राजकारण केले, खळ्ळ खट्ट्याक केले. पण याच मराठी माणसाला हैदराबादने मोठ्या सन्मानाने आपल्यात सामावून घेतले. काचीगुडा, सुलतान बाजार, बरकतपुरा, नल्लाकुंटा, नारायणगुडा, शालीबंडा या भागात आजही मराठी माणसांची मोठमोठी घरं आहेत. बर्‍याच दुकानदारांना मराठी बर्‍यापैकी समजतं. सुलतान बाजारच्या मुख्य चौकात गजानन निमकर या मराठी माणसाचे भले मोठे कापडाचे दुकान आहे. महेश्वरी-परमेश्वरी या प्रसिद्ध सिनेमागृहाच्या चौकात सावरकरांचा पुतळा आहे. पुतळ्याच्या मागच्या रस्त्यावर भर चौकात महाराष्ट्र मंडळाची इमारत उभी आहे. त्या रस्त्याला लोकमान्य टिळकांचे नाव आहे. टिळकांचा पुतळा कोठीच्या मुख्य चौकात आहे. याच चौकात मराठी साहित्य परिषदेची भलीमोठी तीन मजली इमारत आहे. हरिद्वार हे इडलीसाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल मराठी माणसाचे आहे. अशा कितीतरी गोष्टी हैदराबादला सहज आढळतात. नुकतेच स्वामी रामानंद तीर्थांच्या पुतळ्याचेही उद्घाटन करण्यात आले. हैदराबादला मराठवाड्यातील मराठी, कर्नाटकातून आलेले मराठी आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील मराठी अशा तीन मराठी भाषिकांची मोठी सुंदर सरमिसळ झालेली आहे.
हैदराबाद शहर 1591-92 मध्ये उभारले गेले. चारमिनार ही जगप्रसिद्ध इमारत व भोवतालची वस्ती या काळातील आहे. गुलबर्ग्याच्या राजवटीत सुभेदार असलेल्या सुलतान कुली कुतुबशहाने कुतुबशाही राजवटीचा प्रारंभ केला. त्याचा मुलगा मोहंमद कुतुबशहा याला अंतर्गत कलहामुळे विजयनगरच्या हिंदू राजाचा आश्रय घ्यावा लागला. त्याच्यावर बालपणीचे सर्व संस्कार विजयनगरच्या राजवटीत झाले.  याच राजाने पुढे दखनी भाषेत आपली काव्य रचना केली. त्यात लोकभाषा आणि लोकसंस्कृतीचे मोठे लोभस दर्शन घडते. ‘गर्ज्या मिरग खुशियोंसे सिंगारे आव सकियॉं‘ (मृग गरजला, आनंदाने शृंगार करूया सख्यांनो) ही त्याची कविता मोठी सुंदर तर आहेच. पण मराठीशी नाते जोडणारी आहे. हैदराबादची म्हणून जी भाषा आहे ती उर्दू नसून ‘दखनी’ आहे. तिचे व्याकरण मराठीप्रमाणे चालते असे श्रीधरराव कुलकर्णी यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या हैदराबादची चित्तरकथा या पुस्तकात हैदराबादी संस्कृतीबद्दल मोठं सुंदर लिहून ठेवलं आहे.
हैदराबाद मुक्तिचा लढा या संस्थानातील तेलगू, कानडी आणि मराठी माणसांनी स्वामी रामानंद तीर्थ या कर्नाटकात जन्मलेल्या मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली लढला. हैदराबादचे पहिले गृहमंत्री दिगंबरराव बिंदू हे नांदेडमधील भोकरचे. पहिले शिक्षणमंत्री केशवराव कोरटकर, पहिले विधानसभा अध्यक्ष काशीनाथराव वैद्य, देवीसिंह चौहान, फुलचंद गांधी अशी कितीतरी मराठी माणसं हैदराबादच्या राजकारणात हिरीरीने पुढे होती.
केवळ इतिहासातच नाही तर आजही मराठी माणसे हैदराबादच्या संस्कृतीत मिसळून गेलेली दिसतात. सध्या हैदराबादमध्ये सर्वत्र मेट्रो रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते उखडलेले, अतिक्रमणं पाडलेली दिसत आहेत. वाहतुकीला होणार्‍या प्रचंड त्रासाला वैतागणार्‍या लोकांच्या डोळ्यात मात्र मेट्रोचे सुंदर स्वप्न चमकत आहे. हे स्वप्न साकारणारा विवेक गाडगीळ एक मराठी माणूस आहे. औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेला हा अभियंता हैदराबादच्या गळ्यात मेट्रोचा दागिना घालण्यासाठी धडपडतो आहे.
नुकतेच हैदराबादला ‘युवा कला व साहित्य संमेलन’ घेण्यात आले. ज्या शिक्षण संस्थेच्या परिसरात हे संमेलन घेण्यात आले ती ‘केशव मेमोरिअल ट्रस्ट’ ही संस्था न्यायमूर्ती केशवराव कोरटकर या मराठी माणसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य स्थापन करण्यात आली आहे. याच संस्थेच्या परिसरात नील गोगटे या मराठी माणसाने अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे.
शाळकरी पोरं ‘मराठी बाणा’ गाण्यावर नाच करताना बघून खरंच फार आनंद होत होता. इथल्या मराठी माणसांना आपल्या मुलांनी मराठीची जोपासना करावी असं मनापासून वाटतं आणि ते त्यासाठी धडपडतात हे कौतुकास्पद आहे. या साठी पुढाकार घेणार्‍या विद्या देवधर आणि सरोज घरीपुरीकर या दोन महिलाच असाव्यात हेही अभिमानास्पदच आहे.
आपल्या स्त्रियांच्या पाठीशी इथले मराठी पुरुष ठामपणे उभे राहतात. हैदराबादमधील सर्वात प्रसिद्ध महिलांचा दवाखाना ‘शांताबाई नर्सिंग होम’ हा शांताबाई किर्लोस्कर या मराठी स्त्रीचा आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मालिनी राजूकर याही हैदराबादच्याच. वसंतराव राजूरकरांनी त्यांना केवळ शिकवलंच असं नाही तर ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
हैदराबादच्या मराठी माणसांनी स्थानिक लोकांमध्ये मिसळून संस्कृती संवर्धनाचे मोठेच काम केले आहे आणि आजही करताहेत. परदेशात गेलेली माझी भाची नंदिनी कल्लापूर मुलं शाळेत घालायची वेळ आली की हैदराबादला परतली. आपल्या मुलांना मराठी यावे या सोबतच त्यांना स्थानिकही भाषा यावी हा ध्यास तिनं बाळगला. तिचा मुलगा अनिष तेलगू शिकू पाहतो, बोलतो याचा मोठा अभिमान तिला वाटतो. हे इथल्या मराठी माणसांचे वैशिष्ट्य आहे. वैद्यकीय व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात मोठ्या प्रमाणात मराठी माणसं हैदराबादमध्ये काम करत आहेत.
फक्त हैदराबादच नव्हे तर तेलंगणातील निजामाबाद-बोधन, अदिलाबाद या परिसरातही मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत. नांदेड ते चंद्रपूर या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना जोडणारी वाट (रेल्वेची आणि रस्त्याचीही) अदिलाबादवरून जाते.  इतकंच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा  विदर्भातील एकमेव तालुका असा आहे की, मराठवाड्यासोबत पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा भाग होता. विदर्भात केवळ या एका तालुक्यात 17 सप्टेंबरला सुटी असते आणि झेंडावंदन होते. चंद्रपूर ते किनवट या पट्ट्यातील अदिलाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं आहेत. त्यांच्या संस्था आहेत. ते तिथल्या समाजजीवनात सक्रिय आहेत.
हैदराबादचा निर्माता मोहंमद कुलीशहाच्या कबरीच्या मध्यघुमटाचा आकार व त्याखाली पना-पाकळ्यांची आरास पाहिली की मराठी माणसे पूजेच्या कलशाभोवती पानाची आरास करतात त्याचीच आठवण येते हे धनंजय कुलकर्णी यांचे निरीक्षण फारच बोलके आहे. मोहंमद कुली कुतुबशहानं या शहराची स्थापना करताना ‘मेरा शहर लोगा सूं मामूर कर। रखमां जूं तूं दर्या मे मीन ।’ (हे अल्ला, नदीतील माशांप्रमाणं माझं शहरही असंख्य प्रकारांच्या माणसांनी भरून जाऊ दे) अशी अल्लाकडे प्रार्थन करतो आणि हैदराबाद असे आहेही. यामुळेच या शहराला ‘छोटा भारत’ असं पं. नेहरूंनी म्हटलं होतं.
एक युवा कला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हैदराबादचं नव मराठमोळं रूप बघायला मिळालं. मराठी कवितेचा कार्यक्रम सादर करताना नेमकी संध्याकाळ झाली होती. हैदराबादला शिकलेले बी. रघुनाथ यांच्या
‘गाऊलीच्या पावलात सांज घरा आली ।
तुंबलेल्या आचळांत सांज भरा आली ।’

या ओळी त्या वातावरणात जास्तच जिवंत वाटत होत्या. हैदराबादचे महान साहित्यिक डॉ. ना.गो.नांदापूकरांचे शब्द 
‘माझी मराठी मराठाच मीही ।
हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे ।
गोडी न राही सुधेमाजी आता ।
पळाली सुधा स्वर्गलोकांकडे॥

येथील मराठी तरुणांच्या कोवळ्या ओठांवर आहेत हे किती आश्वासक चित्र आहे!!
हैदराबाद शहराला फुलांचे आतोनात वेड आहे. गल्लीच्या टोकाटोकावर फुलवाल्या बसलेल्या दिसतात. पांढर्‍या, अबोली, पिवळ्या फुलांच्या आणि हिन्याच्या गडद हिरव्या पानाच्या गंधात मराठी माणसाने आपलाही गंध मिसळून टाकला आहे.     
         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Tuesday, February 4, 2014

कवितेसाठी जपलेली ओल- ‘आवानओल’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 4 फेब्रुवारी 2014

कोकणची लालमाती तशी भलतीच कलासक्त. म्हणूनच इथे गायक, कलाकार, नट, कवी जन्मले आणि त्यांची कदरही झाली. अगदी आजच्या काळातही अजय कांडर सारखा मराठीतील एक महत्त्वाचा कवी वसंत सावंत या कविच्या नावाने  पुरस्कार देतो आणि तोही परत कविच्याच हाताने. ज्या प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम होतो त्याचे नाव आहे ‘आवानओल’. कोकणात भातपेरणीच्यावेळी भरपुर पाऊस आवश्यक असतो. त्यात रोपं लावली जातात. मग ती उचलून दुसरीकडे पेरणी केली जाते. जर पुरेसा पाऊस आला नाही तर ही रोपं जमेल तेवढ्या पाण्यात कसंही करून जगवली जातात. अशी अपुर्‍या पाण्यावरची रोपं जगवण्याला ‘आवान’ असा शब्द आहे. कवी मित्र अजय कांडर याने यापासून 'आवानओल' असा शब्द तयार केला. त्याच्या कवितासंग्रहालाही हेच नाव आहे. आणि याच नावाचे प्रतिष्ठानही आहे.
‘आवानओल’ हा शब्द अगदी सार्थ ठरावा अशीच धडपड अजय कांडर आणि त्याच्या सहकार्‍यांची कवितेसाठी कोकणात चालू आहे. या वर्षी हा पुरस्कार अभय दाणी या कवीला ‘एरवी हा जाळ’ या कवितासंग्रहासाठी देण्यात आला. हा पुरस्कार कवी वीरधवल परब याच्या हस्ते देण्यात आला. एरवी कुठलाही साहित्यीक पुरस्कार म्हणजे गावातला एखादा राजकारणी पकडणे. त्याची संस्था असतेच. अंबाजोगाईच्या श्रीरंगनाना मोरे यांनी ठेवलेल्या ज्ञानश्री पुरस्कारावर लिहीताना याबद्दल लिहीले होतेच.
'आवानओल' प्रतिष्ठानचा हा पुरस्कार मात्र याला अपवाद आहे. काही साहित्यीक कवी कलाकार मित्र मिळून अतिशय साधेपणाने हा कार्यक्रम करतात. कोकण गांधी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेले नगर वाचनालय कणकवलीला आहे. या वाचनालयाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पाहुण्यांची व्यवस्था अजय कांडर हा कविमित्र स्वत:च्या घरीच अगत्याने करतो. हे एक मोठंच वैशिष्ट्य या उपक्रमाचे आहे. त्याला साथ देणार्‍या घरच्या माऊलीचे खरंच कौतुक करायला पाहिजे.
या निमित्ताने एक विचार आता सगळ्यांनीच करायची गरज आली आहे. प्रचंड मोठ्या खर्चाची संमेलने आयोजीत केली जातात. त्यातील राजकारण्यांचा हस्तक्षेप किती आणि कसा आहे हे न बोललेलेच बरे. यातून काही निष्पन्न होते आहे असेही नाही. नुसतीच भपकेबाज जत्रा पार पडते. यावर टिका करत असताना नेहमी हा प्रश्न विचारला जातो की मग करायचे ते काय? याला उत्तर म्हणजे ‘आवानओल’ प्रतिष्ठान हे आहे.
हा उपक्रम अजय कांडर  कवी वीरधवल परब, प्रवीण बांदेकर किंवा नामानंद मोडक सारख्या चित्रकार मित्रांच्या साहाय्याने पार पाडतो यालाही एक महत्त्व आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी हे भारतभर गाण्याचे कार्यक्रम करत फिरायचे. तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी आपल्या गुरूच्या नावाने पुण्यात ‘सवाई गंधर्व महोत्सव’ सुरू केला. आज तो शास्त्रीय संगीताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मोहत्सव होऊन बसला आहे. याच पद्धतीनं स्वत: साहित्यीकांनी पुढाकार घेवून वाङ्मयीन उपक्रम आपआपल्या गावी निष्ठेने पार पाडायला पाहिजेत. त्यांची प्रतिष्ठा जपायला पाहिजे. त्यांचे गांभिर्य लोकांना जाणवून द्यायला पाहिजे. साहित्यीकांनी चालविलेल्या अशा उपक्रमांना सर्वोच्च प्रतिष्ठा मिळायला हवी.
हा उपक्रम एका वाचनालयात होतो हेही महत्त्वाचे आहे. अन्यथा आजकाल होतं असं की साहित्यीक कार्यक्रम आणि पुस्तके एकमेकांशी फटकूनच असतात. एखादा मोठा कवी गावात येवून जातो, त्याची जोरदार कविता लोक ऐकतात आणि निघून जातात. त्याच्या कवितेचे पुस्तक कुठे मिळेल का? कोणी ते वाचले का? याचे कोणालाच काही गांभिर्य नसते. एखादा मोठा व्याख्याता चांगले भाषण करून जातो. पण त्याचे पुस्तक त्या गावात उपलब्ध असण्याची शक्यता फारच कमी. मग असे उपक्रम वाङ्मयीन दृष्ट्या अपुरे ठरतात. त्यांचा अपेक्षीत परिणाम साधल्या जात नाही.
परभणीला, नाशिकला, औरंगाबादला, बुलढाण्याला, वाशिमला असे काही प्रयोग वाचनालयांनी केले आहेत.
हा उपक्रम करणारे अजय कांडर सगट त्याचे सगळे सहकारी हे सर्वसामान्य घरातले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बेतास बात आहे. केवळ कवितेच्याप्रेमापोटी पदराला खार लावून ते हा उपक्रम साजरा करतात. ज्या अभय दाणी या कविला हा पुरस्कार यावर्षी दिला त्यानेच एका कवितेत लिहून ठेवले आहे,

केस सावरलेला
अलिशान कपड्यांमधला
गरम खिशाचा कवी अजून जन्माला यायचाय

कोकणातील लोकांना खरंच कलेची कदर आहे. नामानंद मोडक या चित्रकार मित्राने आपला छोटासा कलात्मक स्टुडीओ कणकवली सारख्या छोट्या गावात थाटला आहे. महाराष्ट्रातल्या कितीतरी मोठमोठ्या शहरांत अजूनही असा स्टुडीओ आढळणार नाही. तबला वादक वसंतराव आचरेकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची मोठी संस्था इथे चालविली जाते. पं. जितेंद्र अभिषेकींच्या नावाने त्यांचे शिष्य दरवर्षी इथे संगीत महोत्सव भरवितात. समीर दुबळे हा अभिषेकी बुवांचा शिष्य आणि आजचा आघाडीचा शास्त्रीय गायक योगायोगाने त्याच दिवशी मला कणकवलीत संगीत कार्यशाळेच्या निमित्ताने भेटला.
इथली मालवणी बोली तर काय सांगावी. सोबतच्या विनायक सापळे या मित्राची गोड मालवणी मी एखादं गाणं ऐकावं तशी लक्ष देऊन ऐकत होतो.
बोरकरांसारख्या कवीने गोवा आणि कोकण परिसराला आपल्या कवितेतून जिवंत केले. त्यांच्या कविता बहुतेक मराठी वाचकांना माहित आहेत. पण विजय चिंदरकर नावाचा 1936 ला जन्मलेला जेमतेम 26 वर्षे जगलेला कवी फारसा कुणाला माहित नाही. त्याची एक कविता अजय कांडरकडून माझ्या हाती लागली. कवितेला पुरस्कार देताना जुन्या कवीला त्याच्या कवितेला जपुन ठेवण्याची ओल या अजय सारख्या कवी मित्राने दाखवून दिली.

पानावरती भात हवा पण
हवाच उकडा कठिण तांबडा
सोबतिला अन् हवा भाजुनी
दरवळलेला सुका बांगडा

गडग्यापाशिल फणसाची अन्
हवीच भाजी गोडुस पिवळी
हवी आणखी तिखट तांबडी
चटणी थोडी भाजीजवळी

हा सारा हा थाट हवा अन्
हवीच सगळी अंवतीभंवती
सोलकढीची हवी भैरवी
तृप्तीच्या त्या तानेवरती

खूप दिसांनी भूक शमावी
त्या प्रेमाच्या शब्दावरती
आईने अन् चिडून जावे
माझ्या थोड्या खाण्यावरती
सासवडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मुं.शिंदे यांची एक सुरेख ओळ आहे (ते आपल्या चांगल्या ओळी सोडून नको त्याच म्हणतात हीच तर तक्रार आहे)

देश म्हणजे
नुसता भुगोल
की माणसा माणसांतील ओल

कोकणात कणकवलीला कवितेसाठी ओल जपणारी माणसं सापडली. अशी माणसं जगात जिथे जिथे मराठी बोलली जाते, जिथे जिथे मराठीवर प्रेम केले जाते तिथे तिथे सापडो हीच पसायदान आपण मागुयात.
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Wednesday, January 29, 2014

कश्यासाठी पाडगांवकरांना महाराष्ट्र भुषण द्यायचं?

दैनिक कृषीवल दि. २९ मार्च २०१२
कवी मंगेश पाडगांवकर यांना नुकतेच एका आघाडिच्या वृत्तपत्राने महाराष्ट्र भुषण हा सन्मान देऊन गौरविले. आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे कुणालाच याबाबत काही शंका उपस्थित करावी वाटली नाही. गेली वीस वर्षे पाडगांवकरांनी एकही चांगली कविता लिहीली नाही. कविताच कश्याला एक धड ओळही लिहीली नाही. ज्या पाडगांवकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, ते तुमचं नी सेम असतं’ असल्या टूकार कविता लिहून वाचकांची अभिरूची बिघडवली, त्या पाडगांवकरांना महाराष्ट्र भुषण कश्यासाठी? अखिल भारतीय साहित्य संमेलनाची निवडणुक पाडगांवकरांनी कधी लढवली नाही. आणि याचंच भांडवल करून जेंव्हा त्यांच्याकडे विश्र्व संमेलनाचे अध्यक्षपद चालत आलं ते मात्र त्यांनी चटकन स्विकारलं. इतकंच नाही तर आपल्याला मानधन किती देता, व्यवस्था कशी करणार, ‘इतर’ सगळ्या सोयी आहेत ना हे सगळं व्यवहारिक पातळीवर पक्कं ठरवून घेतलं. असे पाडगांवकर ‘महाराष्ट्र भुषण’ कसे?
पाडगांवकर, बापट, करंदीकर यांनी बघे निर्माण केले असा आरोप दिलीप चित्र्यांनी केला होता. अजूनही हा आरोप पाडगांवकरांना खोडता आला नाही. जागोजागी पाडगांवकरांचे कार्यक्रम व्हायचे. (आता वयोमानानुसार होत नाहीत. नसता पाडगांवकर तयार असतातच.) मग पाडगांवकरांच्या कविता संग्रहांच्या किती आवृत्त्या निघाल्या? अलिकडच्या काळातील त्यांच्या कविता तर इतक्या सामान्य आहेत. की त्या पाडगांवकर हे नांव आणि मौज हे प्रकाशन या दोघांच्याही प्रतिमेला बट्टा लावणार्‍या आहेत. पण त्याचं पाडगांवकरांना आणि त्यांचं वाट्टेल ते छापणार्‍या मौज सारख्या दर्जेदार प्रकाशकांनाही काही वाटत नाही.
सन्मान आणि पुरस्कारांचा सध्या महाराष्ट्रात पुर आला आहे. याची सुरवात महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री असताना 93-94 सालात झाली. तेंव्हा त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित अश्या 100 लोकांना एक लाख रूपये, सन्मानिचिन्ह देऊन गौरविले होते. (संख्या अजून जास्त असावी मला नेमकं आठवत नाही) पावारांच्या या कृतीवर गोविंद तळवलकरांनी महाराष्ट्र टाईम्स मधून ‘पवारांचा रमणा’ असा अग्रलेख लिहून सणसणीत टिका केली होती. त्यावरून महाराष्ट्राने काय बोध घेतला माहित नाही पण खुद्द त्या वृत्तपत्रानेच काही बोध घेतला नाही हे स्पष्ट आहे. कारण त्यांनीच पाडगांवकरांना हा पुरस्कार देऊन सन्मानिले आहे. 
पुरस्कार देणार्‍यांचं एक मोठं बरं असतं. त्यांना साहित्य संस्कृति क्षेत्रात काही भरीव करण्यापेक्षा आपण काहीतरी केलं असं दाखवण्यातच मोठा रस असतो. मग यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे या क्षेत्रात काम करणार्‍यांचा गौरव करायचा. प्रत्यक्ष त्या क्षेत्रासाठी काही करायची गरज नाही. कारण तसं करणं फार अवघड आणि किचकट काम असतं. त्याला वेळ लागतो. दमानं ही कामं करावी लागतात. त्यापेक्षा पुरस्कार देऊन टाकायचा. ‘तूमच्यासारख्याची देशाला, या क्षेत्राला गरज आहे’ अशी गुळगुळीत भाषा वापरायची. ‘आपले योगदान खुप मोठे आहे’ असं म्हणत त्या व्यक्तीला  भारावून टाकायचं. कार्यक्रम संपला की मग कुणीच त्या व्यक्तीकडे किंव त्याच्या क्षेत्राकडेही ढूंकूनही पहात नाही.
साहित्यीक कविता महाजन यांनी त्यांच्या ग्राफिटी वॉल या पुस्तकात पुरस्काराचा एक किस्सा सांगितला आहे. ‘‘समारंभ सुरू झाला. भाषणं झाली. छायाचित्रं घेतली गेली. समारंभ संपला. सगळं पांगले. हातातल्या पिशवीत पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मानपत्र, फुलांचा गुच्छ, श्रीफळ आणि शाल घेऊन मी जिना उतरले. दुसरा पुरस्कार मिळालेले लेखक आपल्या कुटुंबीयांसह गाड्यांमध्ये बसून निघून गेले. पाठोपाठ आयोजकांच्या गाड्या गेल्या. समारंभ पुण्यातला असल्यानं आयोजकांनी ‘कुठे येणार, कुठे राहणार, जेवणाचं काय?’ अशी विचारपूस करणं अपेक्षित नव्हतंच.’’  खरं तर पुणंच काय बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये अशीच औपचारिकता उरलेली आहे.
आयोजकांच्या मानसिकतेवर काय बोलणार? पण पुरस्कार, सन्मान यांच्याबाबत स्वत: साहित्यीकांनी जागरूक रहायला नको का? पुरस्कार स्विकारून नेमकी कोणती संस्कृती आपण रूजवू पहात आहोत? आणि जर आपणाला पुरस्कार मिळाला आहे तर आपली जबाबदारी वाढली असं नाही का वाटत? 
पाडगांवकरांसारख्यांनी ‘बघे’ निर्माण केले हे त्यामूळेच पटते. कारण यांनी स्वत: वाङ्‌मयीन प्रांतात इतके सन्मान प्राप्त झाल्यानंतरही भरीव कामगिरी केली नाही. ही कामगिरी म्हणजे पुस्तकं लिहीणे असं नाही. कारण पुस्तकांच्या संख्येवरून साहित्यीकाचा दर्जा ठरत नाही. ‘बोरकरांची कविता’ असं एक अप्रतिम संकलन मौज प्रकाशनाने बोरकरांच्या  वयाला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून प्रसिद्ध केलं. त्या संग्रहात बोरकरांची अतिशय उत्कृष्ठ अशी मुलाखत पाडगांवकरांनी घेतली आहे. मग हे पाडगांवकर गेली वीस पंचेवीस वर्षे गेले कुठे? 
पाडगांवकरांनी शेक्सपइरच्या तीन नाटकांचे मुळाबरहुकूम अनुवाद केले तसेच बायबलचेही मराठी रूपांतर सिद्ध केलं. ही महत्त्वाची कामं पाडगांवकर अजूनही करू शकतात किंवा करून घेऊ शकतात. ज्या वृत्तपत्राने त्यांना पुरस्कार दिला त्यालाही ते ठणकावून सांगू शकले असते की ‘आजकाल तूमचा पेपर वाचकांसाठी उरला नसून बघ्यांसाठी उरला आहे.’ पण पाडगांवकर काय सांगणार? कारण तेच या ‘बघ्ये’ बनविणार्‍यांच्या टोळीत सामिल झाले आहेत.
एक अतिशय उथळ अशी ‘पुरस्कार’ संस्कृती आपण रूजवू पहात आहोत. देणार्‍यांना कसलीच बांधिलकी नाही. त्यांना आपले सार्वजनिक चारित्र्य प्रतिभावंतांना उपकृत करून स्वच्छ करून घ्यायचे आहे. भल्या भल्या प्रतिभावंतांनाही ही मोहिनी पडलेली आहे. त्या निमित्तानं आपला फोटो येतो, आजूबाजूचे लोक ओळखतात आणि आपण मोठे झाल्याचा साक्षात्कार होतो. 
विशेषत: वृत्तपत्रांमुळे एक मोठी घातक गोष्ट झाली आहे. त्यातील बातम्या लेख वाचून आणि फोटो पाहूनच समाजातला एक वर्ग आपले मत ठरवू लागला आहे. मी ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकलो त्या महाविद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांचे एक स्नेह संमेलन मागील वर्षी 26 जानेवारीला पार पडले. वीस वर्षांनंतर भेटलेला एक मित्र मला म्हणाला, ‘‘उमर्‍या, साल्या तू तर मोठा माणूस झाला. तूझा फोटो बघतो मी पेपरात बर्‍याचदा.’’ माझा फोटो कश्यासाठी आला होता, मी कुठल्या क्षेत्रात काम करतोय, मी अश्यात काय लिहीलंय हे त्या मित्राला काहीच माहित नव्हतं. वाईट याचंच की त्याला ते समजून घ्यायचंही नव्हतं. अगदी त्यानं जो फोटो बघितला तो कुठल्या कार्यक्रमातला होता हेही त्याला आठवत नाही. मी जर साहित्यीक म्हणवून घेतो तर माझी कविता वाचून, लेख वाचून जो कोणी प्रतिक्रिया देईल ते मला महत्त्वाचं वाटायला पाहिजे. माझा फोटो पाहून नाही.
पाडगांवकर हे एक जबाबदार प्रतिष्ठित साहित्यीक आहेत. त्यांना मान सन्मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता सगळं मिळालं आहे. मग आता त्यांच्यासारख्यांकडून अपेक्षा आहे त्यांनी अश्या उठवळ ‘पुरस्कार’ संस्कृतीपासून लांब रहावं. आणि ते जर राहणार नसतील तर मी संयोजकांनाही विचारतो अश्यांना सन्मान करून तूम्ही काय मिळवता अहात? जर पाडगांवकरांचं कतृत्व वाङ्‌मयात असेल आणि जर लोक वाङ्‌मय वाचत नसतील तर काय करायचं?
काही जण असं लंगडं समर्थन करू शकतात की उतारवयात पाडगांवकरांनी आता काय करावं? त्यांच्यापाशी चालत आलेले सन्मान त्यांनी स्वीकारावेत यात गैर ते काय? खरं तर याच काळात त्यांच्या वयोगटातील नेमाडे सारखे प्रतिभावंत अजूनही वाङ्‌मयीन दृष्ट्या कार्यरत आहेत. हिंदू सारखी प्रचंड मोठ्या आवाक्याची श्रेष्ठ कादंबरी त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे. इतकंच नाही तर पुढील तीन कादंबर्‍यांचा खर्डा लिहून काढला आहे. मग हे पाडगांवकर आणि त्यांच्या झिलकर्‍यांना दिसत नाही का? 
आणि जर हे समजत नसेल तर पुढचा पुरस्कार मग ‘लव्ह लेटर म्हणजे, लव्ह लेटर म्हणजे’ लिहीणार्‍या संदीप खरेलाच द्यायला पाहिजे. कारण पाडगांवकर ते संदीप खरे यांच्यामध्ये कोणी ‘तश्या’ दर्जाचा कवी नाहीच ना!

Tuesday, January 28, 2014

भालचंद्र नेमाड्यांची सुवर्णमहोत्सवी ‘मगरूरी’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 जानेवारी 2014


भालचंद्र नेमाडे हे मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार. त्यांच्या गाजलेल्या आणि गाजवलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला 50 वर्षे पुर्ण झाली म्हणून एक विशेष आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली. त्या निमित्ताने लिहीताना नेमाडे यांनी या कादंबरीच्या पहिल्या प्रकाशकाचा रा.ज.देशमुख यांचा उल्लेख ‘मगरूर’ प्रकाशक असा केला. सध्याचे देशमुख आणि कंपनी चे संचालक रवींद्र गोडबोले आणि संपादक सल्लागार विनय हर्डीकर यांना ही बाब खटकली. नेमाडेंच्या विधानाचा खरपुस समाचार घेत त्यांनी नेमाडेंचा देशमुखांशी असलेला पत्रव्यवहारच वाचकांसाठी खुला केला.
इतरांच्या टोप्या उडविणारे नेमाडे, आधीच्या पिढीच्या लेखक समीक्षकांना झोडपून काढणारे नेमाडे, आपली वादग्रस्त मते तलवारीसारखी सपासप चालवून समोरच्याला घायाळ करणारे नेमाडे हे विसरून गेले की आपलीही टोपी कोणी उडवू शकतो. साहित्यातील अड्ड्यांबद्दल नेमाडे यांचा आक्षेप असा होता, ‘अड्ड्यांची पहिली शपथ म्हणजे मिळून एकमेकांना ‘वर’ चढवणे किंवा मिळून एखाद्याच्या उथळपणाबद्दल मौन पाळणे.... एकमेकांच्या मोठेपणाचा प्रचार करणे, मानमान्यता मिळवून देणे इ. होत.’ आता हा लेख नेमाडे यांनी 1968 मध्ये लिहीला आहे. तोपर्यंत नेमाडे यांची कोसला प्रकाशित झाली होती.  आणि याच वेळी नेमाडे देशमुखांना पत्रात लिहीतात, ‘दावतरांना पत्र टाकले आहे. प्रत पाठवावी (कोसलाची). मीहि आता गेल्यावर ओलोचनेकरिता बी कवींच्या चांफ्यावर लिहून पाहिजे ना? मग कोसल्यावर लगेच छापा असं सांगतोच.’
म्हणजे नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर परिक्षण वसंत दावतर ‘आलोचने’मध्ये छापणार असतील तर नेमाडे त्यांना बी. कवींच्या कवितेवर लेख लिहून देणार आहेत. आपल्या पुस्तकावर इतरांनी लिहावे या वृत्तीचा नेमाडेंनी नेहमीच उपहास केला आहे. असे नेमाडे रा.श्री. जोग यांच्या सारख्या ज्येष्ठ समीक्षकाबद्दल रा.ज.देशमुख यांना पत्रात लिहीतात, ‘जोगांना लिहिलेय तूम्हाला लवकरच प्रत मिळेल. आमची इच्छा आहे परंतु तुमचीहि असल्यास कुठेतरी कोसल्यावर लिहा.’ आता इतरांवर टिका करणारे नेमाडे रा.श्री.जोग यांना आपल्या कादंबरीवर लिहावे अशी गळ का घालत आहेत? आजचा एखादा नवा लेखक आपल्या पुस्तकाची प्रत मोठ्या लेखक समीक्षकांना आशेने पाठवतो आणि त्यांनी त्यावर लिहावे अशी अपेक्षा धरतो. यात आणि नेमाड्यांत काय फरक आहे?
 आर्थिक व्यवहारांत नेमाडे असे सर्वत्र पसरवत राहिले की देशमुखांनी त्यांना गंडवले. खरी परिस्थिती अशी आहे की 1963 ला पुस्तक प्रकाशित केल्यापासुन 1970 पर्यंत त्याचे कित्येक छापील फॉर्म्स बांधणी न करता देशमुखांच्या गोदामात तसेच पडून होते. शिल्लक सर्व प्रती, सुटे फॉर्म्स हे सर्व नेमाड्यांनी खरेदी केले. विक्री झालेल्या प्रतींचा रॉयल्टीचा हिशोब केला. मधल्या काळात नेमाड्यांना देशमुखांनी उसने पैसेही दिले होते. तसे सविस्तर पत्रच आहे.  हा सगळा हिशोब मिटवून 870 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट नेमाड्यांनी देशमुखांना दिला. पुस्तकाच्या प्रती व छापील फॉर्म्स ताब्यात घेतले.
नेमाड्यांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी होती आणि देशमुखांनी त्याचा फायदा करून घेतला असे काही वातावरण नव्हते. नेमाड्यांची कादंबरी सात वर्षे पडून होती. इतकेच नाही तर खुद्द नेमाडे यांनाही मराठी प्रकाशन व्यवसायाबद्दल कल्पना असावी. कारण ‘दुसर्‍या बाजीरावावर एक नाटक पुढच्या वर्षी मूड आल्यास लिहायचा विचार आहे. ते वाचून पाहून खपण्यासारखे असल्यास तुम्ही प्रकाशित करालच. परंतु खपण्यासारखे नसल्यास प्रकाशित कराल काय हे कळवा. नुसते बाड घेऊन प्रकाशकांची दारे हिंडणे बरे नव्हे. म्हणून लिहिण्याआधी प्रकाशक गाठावा हे बरे.’ जर काही शंका असतील तर नेमाडे यांनी दुसरा प्रकाशक गाठावा असे देशमुखांनी स्पष्टपणे लिहीले आहे. त्यावरही परत नेमाडे अहमदनगर येथून 1964 साली आपल्या पत्रात लिहीतात, ‘मी दुसर्‍या कोण्या प्रकाशकासाठी लिहावे असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तो बरोबर नाही. आम्ही इतर प्रकाशकांशी गेल्या वर्षभर किती फटकून वागलो याच्या गोष्टी तुमच्या कानी आल्या असतील.’
नेमाड्यांना दोन पत्रे देशमुखांनी लिहीली. त्यातील एका जास्त सविस्तर आहे. त्याला कारणही तसेच घडले. नेमाड्यांनी देशमुखांकडून उसने पैसे घेतले होते. त्यासाठी स्टँपवर सही द्यावी असा आग्रह देशमुखांनी केल्यावर नेमाडे यांना राग आला. नेमाडे 1965 मध्ये म्हणजे कादंबरी प्रकाशित झाल्यावर दोन वर्षांनी तक्रार करतात, ‘कॉन्ट्रॅक्ट न करता लेखकाजवळून कादंबरी घेणे व स्नेही म्हणून पैसे देऊन स्टॅपवर सही घेऊन अन्नदात्याबद्दल अविश्वास दाखवणे, ह्याचा अर्थ काय?’
आता मात्र देशमुखांमधला ‘देशमुख’ जागा झाला. लेखकांच्या पुस्तकांवर प्रकाशक जगतो. लेखक त्याचे अन्नदाते आहेत हे खरे आहे. पण नेमाड्यांसारखा नवा लेखक आणि ज्याच्या पुस्तकाचा खप अजून फारसा सुरू झाला नाही तो देशमुखांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की लगेच वेगळ्या भाषेत बोलायला लागतो हे देशमुखांना खटकणारच. कुणालाही ते खटकेल.
रा.ज.देशमुखांकडे वि.स.खांडेकर, रणजित देसाई, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, चि.वि.जोशी, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे ‘खपाऊ’ लेखक होते. शिवाय पाठ्यपुस्तकांचा मोठा व्यवसाय त्यांच्या हाताशी होता. यांपैकी कुणी असा शब्द वापरला तर देशमुखांनी एैकून घेतला असता. यांच्यापुढे आर्थिक दृष्ट्या नेमाड्यांच्या कादंबरीचा काय पाड? आजही इतक्या वर्षांनी ‘कोसला’ च्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत? तर पन्नास वर्षांत जेमतेम 25 आवृत्त्या. एक आवृत्ती हजार किंवा दोन हजारांची. नेमाड्यांच्या पुस्तकांची वाङ्मयीन गुणवत्ता इथे अभिप्रेत नाही. नेमाड्यांनीच मुद्दा ‘अन्नदाता’ असा शब्द वापरून आर्थिक दिशेने नेला आहे.
यानंतर म्हणजे 1965 ते 1970 देशमुख आणि नेमाडे हे संबंध ताणाताणीचे राहिले. आणि शेवटी हा व्यवहार नेमाड्यांनी 1970 मध्ये पूर्ण केला. पुस्तकांची दुसरी आवृत्ती स्वत: काढायला नेमाडे तयार झाल्यावर अगदी पंधरा दिवसांत देशमुखांनी हा व्यवहार संपवला. या आवृत्तीत नेमाडे पुरते आत आले हा भाग परत वेगळाच.
ह्याच नेमाड्यांनी दुसरी कादंबरी ‘बिढार’ लिहीली. त्यात देशमुख पती पत्नींचे व्यक्तीचित्र ‘कुलकर्णी प्रकाशक पती पत्नी’ असं विरूप करून रंगवले आहे. नविन पुस्तकाचे कौतुक करण्यासाठी देशमुख पती पत्नी गाडी करून औरंगाबादला आले. नेमाडे पती पत्नीला कपड्यांचा आहेर शिवाय मुलांसाठी खेळणी, फळांच्या करंड्या असा सगळा जामानिमा घेऊनच देशमुख आले होते. त्यांनी नेमाड्यांना (इतकं सगळं होवूनही) नविन कादंबरी छापण्यासाठी मागितली.  नेमाड्यांनी ती दिली नाही. नागपुरच्या अमेय प्रकाशनाला ती दिली. ते प्रकाशनही गुंडाळल्या गेले. मग नंतरची नेमाड्यांची सगळी पुस्तके भटकळांच्या पॉप्युलरकडे मुंबईला आली. कदाचित भटकळांना नेमाडे ‘मी तूमचा अन्नदाता’ असे म्हणू शकतात.
दुसर्‍यांच्या टोप्या उडवणार्‍या नेमाड्यांनी देशमुखांच्या बाबतीत संकुचितपणा दाखवत आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले. सरस्वती भुवन संस्थेत नौकरी लावून द्या म्हणून देशमुखांकडे आग्रह धरणे, नंतर त्याच संस्थेवर टिका करणारी कादंबरी लिहीणे, आपल्याला लेखक म्हणून उभं करणार्‍या देशमुख पती पत्नीचे कादंबरीत व्यंगचित्र रेखाटणे या सगळ्याला काय म्हणावे? आता हर्डीकर/गोडबोले यांनी हा पत्रव्यवहाराद्वारे नेमाडेंची सुवर्णमहोत्सवी मगरूरी उघड केली आहे.
इतरांना शहाणपण शिकविणारे नेमाडे सगळे नियम वाकवून दुसर्‍यांदा साहित्य अकादमीचे अध्यक्षपद पटकावतात, व्यवस्थेला शिव्या देत साहित्य अकादमी पारितोषिक स्विकारतात, पद्मश्री स्वीकारतात. पद्मश्रीसाठी शिफारस महाराष्ट्रातून नाही तर हिमाचल प्रदेशातून झालेली असते आणि हे सगळं होताना नेमाड्यांच्याच जळगांवच्या जून्या स्नेही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून दिल्लीत बसलेल्या असतात. सिमल्याचे राष्ट्रपती भवन नेमाड्यांना मुक्तहस्ते वापरायला भेटते. हे सगळं म्हणजेच समृद्ध अडगळ असं सुजाण वाचकांनी समजून घ्यावे.  (ज्यांना नेमाडे-देशमुख पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी विनय हर्डीकर vinay.freedom@gmail.com व रवींद्र गोडबोले ravindragodbole@aquariustech.ne या मेलवर संपर्क करावा)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, January 21, 2014

मराठी कवितेचे ‘रसाळ’ निरूपण

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 21 जानेवारी 2014 

प्रसिद्ध समिक्षक प्रा.डॉ. सुधीर रसाळ यांना परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा ‘शब्द सह्याद्री साहित्य सन्मान’ ज्येष्ठ कथाकार प्रा.तु.शं.कुलकर्णी यांच्या हस्ते 14 जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला. मराठी कवितेसाठी व्रतस्तपणे काम करणार्‍या एका ऋषीतूल्य व्यक्तिमत्वाचा गौरव या निमित्ताने झाला. निरलस अशा व्यक्तीमत्त्वाचा गौरव करण्याचे सुचले त्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचेही कौतुक करायला हवे. 

‘संथ वाहते कृष्णामाई’ हे ग.दि.माडगुळकरांचे गाणे ऐकले की मला हमखास रसाळ सरांच्या संथ बोलण्याची आठवण येते. पुरस्कार स्विकारतानाही सरांनी आपल्या संथ लयीत कवितेवरील अप्रतिम भाषणांने श्रोत्यांना मुग्ध केले. सुधीर फडक्यांनी गायलेल्या या गाण्यासोबतच मला आठवण येते ती उस्ताद अमीर खॉं यांच्या संथ लयीतल्या ख्याल गायनाची. संथ लयीत शांतपणे सर एखादा विषय मांडत जातात. त्यांच्या उजव्या हाताची तर्जनी जरा वर येते आणि बाकीची बोटे अंगठ्याकडे झुकतात. ऐकणार्‍यावर त्यांच्या बोलण्याचा, देहबोलीचा असा काही प्रभाव पडतो की या शांत प्रवाहात आपण कधी वाहून गेलो हे कळतच नाही.

प्रत्यक्ष त्यांच्या वर्गातील इंद्रजित भालेराव, दासू वैद्य हे विद्यार्थी असो की वर्गाबाहेरील मी, रेणू पाचपोर, धनंजय चिंचोलीकर, श्याम देशपांडे -या सगळ्यांना कमी अधीक प्रमाणात हाच अनुभव आलेला आहे. सरांच्या बोलण्यावरून, त्यांच्या शांत शैलीवरून लगेच लक्षात येत नाही पण संपर्कात आल्यावर काही दिवसातच उमगत जाते की सर अतिशय ठामपणे आपली मतं मांडत असतात. 

त्यांचे ‘कविता आणि प्रतिमा’ हे पीएच.डी.च्या संशोधनाचे जाडजुड पुस्तक माझ्या हाती आले तेंव्हा माझी छाती दडपुनच गेली होती. हे पुस्तक आत्तापर्यंत फक्त तीन लोकांनी पूर्ण वाचले आहे एक रसाळ सर स्वत:, दुसरे प्रकाशक श्री.पु.भागवत व तिसरे या पुस्तकाचे मुद्रीत शोधन करणारे असं आम्ही विनोदाने म्हणायचो. पण त्यांचे दुसरे पुस्तक ‘काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली’ हाती आले आणि माझा गैरसमज पार धुवून गेला. हे पुस्तक माझे अतिशय आवडते आहे. 

आपली मतं स्पष्टपणे मांडणे हे एक सरांचे वैशिष्ट्य. अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेबाबत तीस वर्षांपूर्वी सरांनी लिहून ठेवले होते, ‘‘विशाखात ज्या जातीचा प्रत्यय त्यांची कविता देत होती, त्या जातीचा प्रत्यय नंतरच्या काळातील त्यांच्या कवितेने क्वचितच दिला. विशाखा नंतर त्यांच्या कवितांचा विकास थांबला.’’ किंवा नारायण सुर्व्यांवर लिहीताना, ‘‘सुर्व्यांजवळ सांगण्यासारखे खुप आहे. पण हे सांगण्यासारखे सतत गुदमरून जात आहे हे जाणवते.’’

मराठीच्या प्रांतात मोठ्या लेखकांनी स्वत:ला साहित्यीक संस्थांपासून कायम दूर ठेवलेले मोठ्या प्रमाणात आढळते. रसाळ सर मात्र याला अपवाद आहेत. थोडी थोडकी नाही तर जवळपास 50 वर्षे सरांनी मराठवाडा साहित्य परिषद व तिचे मुखपत्र प्रतिष्ठान यासाठी खर्ची घातली आहेत. संपादनापासून ते साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भुषविण्यापर्यंत त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या निभावली आहे. 

आजही एखाद्या पुस्तकाला प्रस्तावना तर सोडाच पण पाठराखण म्हणून मलपृष्ठावर छोटा मजकूर लिहायचा म्हटले तरी सर ते सगळे पुस्तक वाचून त्यावर सांगोपांग विचार करून मगच लिहून देतात.

आपल्यापेक्षा मोठ्यांशी गप्पा मारताना बहुतांश वेळा नाळ जूळतच नाही. पण रसाळ सरांचे तसे नाही. आम्ही कोणी साहित्यप्रेमी त्यांच्या कडे गेलो तर सर दिलखुलास गप्पा मारतात, घरात इतर कोणी नसेल तर आपल्या हाताने चहा करून पाजतात. समोरचा कितीही लहान असो त्याला ‘आहो जाहो’ करून संबोधतात. सरांचा कवितेवरचा अभ्यास पाहून बर्‍याचजणांना असे वाटते की ते फक्त कविताच वाचतात की काय. सरांचे वाचन मराठी, इंग्रजी अगदी अद्यायावत आहे हे त्यांच्या निकटवर्तीयांखेरीज फारसे कुणाला माहित नाही. विशेषत: सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचे आकलन तर अतिशय उच्च दर्जाचे आहे. मागील वर्षी बब्रुवान रूद्रकंठावार यांना बी.रघुनाथ पुरस्कार सरांच्या हस्ते देण्यात आला. सामाजिक उपरोध लिहीणार्‍या बब्रुवानच्या पुस्तकावर सर काय बोलतात याची आम्हाला खुप उत्सुकता होती. ज्वलंत विषयावर राजकीय भाष्य करण्याची बब्रुवानची नेमकी ताकद हेरून सरांनी मोजक्या शब्दांत अशी काही मांडणी केली की सगळे सभागृह भारावून गेले. त्यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘गांधी विरूद्ध गांधी’ लिहीणारे प्रतिभावंत नाटककार अजीत दळवी नंतर आम्हाला म्हणाले, ‘‘सामाजिक प्रश्नांबाबत सरांची मांडणी फार महत्त्वाची आहे. सरांनी या विषयांवर लिहीलं पाहिजे.’’

समिक्षा लिहीणार्‍या सरांनी ललित लेखनही फार मोजके पण अप्रतिम केले आहे. त्यांची व्यक्तिचित्रे एकत्र करून एक पुस्तक तयार करावे यासाठी फार दिवसांपासून मी त्यांच्या मागे आहे. अनंत भालेराव यांच्या ‘मांदियाळी’ या पुस्तकाला सरांनी लिहीलेली प्रस्तावना याची साक्ष आहे. आपल्या वडिलांचे तसेच गुरू वा.ल.कुलकर्णी यांचे त्यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्रही फारच उत्कट आहे. सरांचे वडिल न.मा.कुलकर्णी हे उत्कृष्ठ शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या शिकविण्याच्या कामासोबतच साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रकाशन संस्था काढून मोलाचे काम त्या काळी केले. वा.रा.कांतांचा रूद्रवीणा हा पहिला कवितासंग्रह सरांच्या वडिलांनी स्वत: प्रकाशित केला होता. 

त्यांच्या अशातच प्रसिद्ध झालेल्या ‘वाङ्मयीन संस्कृती’ या महत्त्वाच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळायला हवा होता अशी भावना कित्येक रसिकांची आहे. बा.सी.मर्ढेकर यांच्या कविता व कादंबर्‍यांवर त्यांनी विस्तृत लिखाण केले आहे. जवळपास 900 पानांचा हा मजकूर आता तीन पुस्तकांच्या मधून प्रकाशित होतो आहे. 

वैयक्तिक संबंधांबाबत सरांचे वागणे मोठे अकृत्रिम व सच्च्या माणुसकीला जागणारे आहे. नरेंद्र चपळगांवकर हे त्यांचे जवळचे मित्र. चपळगांवकरांच्या मुलीच्या लग्नात सकाळी पाहुण्यांना नाष्टा द्यायचा होता. काम करणारे लोक येईपर्यंत त्यांनी वाट न पाहता रसाळ सरांनी भरा भर उपम्याच्या ताटल्या भरून पाहुण्यांना द्यायला सुरवात केली होती. कोणीतरी ते पाहून त्यांना थांबवले आणि ते काम आपल्या हाती घेतले. आपल्या पदाचा तेंव्हा सर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते कोणताही दबाव सरांनी स्वत:वर येवू दिला नव्हता. 

आपल्या लेखणीने समिक्षेचे नवे मापदंड निर्माण करणारे आणि कृतीने साहित्यीक संस्थांच्या व्यवस्थापनाचा आदर्श समोर उभे करणारे सरांसारखे लोक आज फार दुर्मिळ झाले आहेत. साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती देवून सन्मानिले, त्यांच्या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार मिळाले, आज हा शब्द सह्याद्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे पण या कशाचाच सरांवर परिणाम होत नाही. आजही ते शांतपणे सकाळी बागेत झाडांना पाणी देणे असो, स्वत:चा चहा स्वत: करून घेणे असो सोडत नाहीत. आपल्या लिखीत मजकूराचे वाट्टोळे डि.टी.पी.करताना होते हे पाहून सर स्वत: उतरत्या वयात डि.टी.पी. शिकले. आज सर स्वत:चे सगळे लिखाण स्वत:च संगणकावर टाईप करतात. पार्श्वभूमीवर किशोरी आमोणकरांचा एखादा राग चालू असतो. आणि सरांची बोटे की बोर्डवर लयीत चालत असतात.

मला खात्री आहे हा लेख वाचल्यावर, प्रत्यक्ष भेटीत सर मजेदार हसून फक्त एवढंच म्हणतील, ‘‘चांगला लिहीलात लेख...’’

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575