Tuesday, February 11, 2014

हैदराबादी फुलांचा मराठी सुगंध

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 11 फेब्रुवारी 2014 

एक 75 वर्षांची म्हातारी सायकल  रिक्शात
(हैदराबादच्या भाषेत सैकील) बसून गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर, गर्दीने ओसंडून वाहणार्‍या किराणा दुकानाच्या मालकाला शुद्ध मराठीत ‘‘जरा पोहे दाखव रे’’ म्हणत आहे. दुकानदाराचा नोकर तिच्या रिक्शाजवळ येऊन  ‘‘अम्मा ! अटकुलू मंची उंटूनदी. (अम्मा हे पोहे चांगले आहेत)’’ सांगतो आहे आणि ही पंच्चाहत्तर वर्षांची अम्मा रिक्शातच बसून, ‘‘हे नको रे! पातळ आहेत. जरा जाड दे की.’’ त्याला व्यवस्थित मराठी कळतं आणि हिलाही व्यवस्थित तेलगू कळतं. पण दोघंही बोलताहेत आपापल्याच भाषेत. हा काही काल्पनिक प्रसंग नाही.  हैदराबादच्या सुलतान बाजारसारख्या सर्वात गजबजलेल्या भागातील भर रस्त्यावरील किराणा दुकानातील खराखुरा प्रसंग आहे. दहा वर्षांपूर्वी माझ्या पंच्याहत्तर वर्षांच्या आत्याच्या बाबतीत घडलेला !  
हैदराबाद (हैदराबाद असाच शब्द आहे. ‘हैद्राबाद’नाही. हैदरअलीने आबाद केलेले म्हणून हैदराबाद) या शहराचे एक वैशिष्ट्य आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर सर्वात जास्त मराठी माणसे असलेले हे शहर. पाच लाख लोकसंख्या असेल तर त्या शहरात महानगरपालिका बनवली जाते. हैदराबादमध्ये मराठी माणसांची लोकसंख्या 9 लाख इतकी प्रचंड आहे. म्हणजे मराठी माणसांचीच एक महानगरपालिका हैदराबाद शहरात तयार करता येईल.
मुंबईवर बाहेरच्यांनी आक्रमण केलं म्हणून आक्रमक रूप धारण करत आपण पक्ष काढले, अस्मितेचे राजकारण केले, खळ्ळ खट्ट्याक केले. पण याच मराठी माणसाला हैदराबादने मोठ्या सन्मानाने आपल्यात सामावून घेतले. काचीगुडा, सुलतान बाजार, बरकतपुरा, नल्लाकुंटा, नारायणगुडा, शालीबंडा या भागात आजही मराठी माणसांची मोठमोठी घरं आहेत. बर्‍याच दुकानदारांना मराठी बर्‍यापैकी समजतं. सुलतान बाजारच्या मुख्य चौकात गजानन निमकर या मराठी माणसाचे भले मोठे कापडाचे दुकान आहे. महेश्वरी-परमेश्वरी या प्रसिद्ध सिनेमागृहाच्या चौकात सावरकरांचा पुतळा आहे. पुतळ्याच्या मागच्या रस्त्यावर भर चौकात महाराष्ट्र मंडळाची इमारत उभी आहे. त्या रस्त्याला लोकमान्य टिळकांचे नाव आहे. टिळकांचा पुतळा कोठीच्या मुख्य चौकात आहे. याच चौकात मराठी साहित्य परिषदेची भलीमोठी तीन मजली इमारत आहे. हरिद्वार हे इडलीसाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल मराठी माणसाचे आहे. अशा कितीतरी गोष्टी हैदराबादला सहज आढळतात. नुकतेच स्वामी रामानंद तीर्थांच्या पुतळ्याचेही उद्घाटन करण्यात आले. हैदराबादला मराठवाड्यातील मराठी, कर्नाटकातून आलेले मराठी आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील मराठी अशा तीन मराठी भाषिकांची मोठी सुंदर सरमिसळ झालेली आहे.
हैदराबाद शहर 1591-92 मध्ये उभारले गेले. चारमिनार ही जगप्रसिद्ध इमारत व भोवतालची वस्ती या काळातील आहे. गुलबर्ग्याच्या राजवटीत सुभेदार असलेल्या सुलतान कुली कुतुबशहाने कुतुबशाही राजवटीचा प्रारंभ केला. त्याचा मुलगा मोहंमद कुतुबशहा याला अंतर्गत कलहामुळे विजयनगरच्या हिंदू राजाचा आश्रय घ्यावा लागला. त्याच्यावर बालपणीचे सर्व संस्कार विजयनगरच्या राजवटीत झाले.  याच राजाने पुढे दखनी भाषेत आपली काव्य रचना केली. त्यात लोकभाषा आणि लोकसंस्कृतीचे मोठे लोभस दर्शन घडते. ‘गर्ज्या मिरग खुशियोंसे सिंगारे आव सकियॉं‘ (मृग गरजला, आनंदाने शृंगार करूया सख्यांनो) ही त्याची कविता मोठी सुंदर तर आहेच. पण मराठीशी नाते जोडणारी आहे. हैदराबादची म्हणून जी भाषा आहे ती उर्दू नसून ‘दखनी’ आहे. तिचे व्याकरण मराठीप्रमाणे चालते असे श्रीधरराव कुलकर्णी यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या हैदराबादची चित्तरकथा या पुस्तकात हैदराबादी संस्कृतीबद्दल मोठं सुंदर लिहून ठेवलं आहे.
हैदराबाद मुक्तिचा लढा या संस्थानातील तेलगू, कानडी आणि मराठी माणसांनी स्वामी रामानंद तीर्थ या कर्नाटकात जन्मलेल्या मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली लढला. हैदराबादचे पहिले गृहमंत्री दिगंबरराव बिंदू हे नांदेडमधील भोकरचे. पहिले शिक्षणमंत्री केशवराव कोरटकर, पहिले विधानसभा अध्यक्ष काशीनाथराव वैद्य, देवीसिंह चौहान, फुलचंद गांधी अशी कितीतरी मराठी माणसं हैदराबादच्या राजकारणात हिरीरीने पुढे होती.
केवळ इतिहासातच नाही तर आजही मराठी माणसे हैदराबादच्या संस्कृतीत मिसळून गेलेली दिसतात. सध्या हैदराबादमध्ये सर्वत्र मेट्रो रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते उखडलेले, अतिक्रमणं पाडलेली दिसत आहेत. वाहतुकीला होणार्‍या प्रचंड त्रासाला वैतागणार्‍या लोकांच्या डोळ्यात मात्र मेट्रोचे सुंदर स्वप्न चमकत आहे. हे स्वप्न साकारणारा विवेक गाडगीळ एक मराठी माणूस आहे. औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेला हा अभियंता हैदराबादच्या गळ्यात मेट्रोचा दागिना घालण्यासाठी धडपडतो आहे.
नुकतेच हैदराबादला ‘युवा कला व साहित्य संमेलन’ घेण्यात आले. ज्या शिक्षण संस्थेच्या परिसरात हे संमेलन घेण्यात आले ती ‘केशव मेमोरिअल ट्रस्ट’ ही संस्था न्यायमूर्ती केशवराव कोरटकर या मराठी माणसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य स्थापन करण्यात आली आहे. याच संस्थेच्या परिसरात नील गोगटे या मराठी माणसाने अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे.
शाळकरी पोरं ‘मराठी बाणा’ गाण्यावर नाच करताना बघून खरंच फार आनंद होत होता. इथल्या मराठी माणसांना आपल्या मुलांनी मराठीची जोपासना करावी असं मनापासून वाटतं आणि ते त्यासाठी धडपडतात हे कौतुकास्पद आहे. या साठी पुढाकार घेणार्‍या विद्या देवधर आणि सरोज घरीपुरीकर या दोन महिलाच असाव्यात हेही अभिमानास्पदच आहे.
आपल्या स्त्रियांच्या पाठीशी इथले मराठी पुरुष ठामपणे उभे राहतात. हैदराबादमधील सर्वात प्रसिद्ध महिलांचा दवाखाना ‘शांताबाई नर्सिंग होम’ हा शांताबाई किर्लोस्कर या मराठी स्त्रीचा आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मालिनी राजूकर याही हैदराबादच्याच. वसंतराव राजूरकरांनी त्यांना केवळ शिकवलंच असं नाही तर ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
हैदराबादच्या मराठी माणसांनी स्थानिक लोकांमध्ये मिसळून संस्कृती संवर्धनाचे मोठेच काम केले आहे आणि आजही करताहेत. परदेशात गेलेली माझी भाची नंदिनी कल्लापूर मुलं शाळेत घालायची वेळ आली की हैदराबादला परतली. आपल्या मुलांना मराठी यावे या सोबतच त्यांना स्थानिकही भाषा यावी हा ध्यास तिनं बाळगला. तिचा मुलगा अनिष तेलगू शिकू पाहतो, बोलतो याचा मोठा अभिमान तिला वाटतो. हे इथल्या मराठी माणसांचे वैशिष्ट्य आहे. वैद्यकीय व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात मोठ्या प्रमाणात मराठी माणसं हैदराबादमध्ये काम करत आहेत.
फक्त हैदराबादच नव्हे तर तेलंगणातील निजामाबाद-बोधन, अदिलाबाद या परिसरातही मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत. नांदेड ते चंद्रपूर या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना जोडणारी वाट (रेल्वेची आणि रस्त्याचीही) अदिलाबादवरून जाते.  इतकंच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा  विदर्भातील एकमेव तालुका असा आहे की, मराठवाड्यासोबत पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा भाग होता. विदर्भात केवळ या एका तालुक्यात 17 सप्टेंबरला सुटी असते आणि झेंडावंदन होते. चंद्रपूर ते किनवट या पट्ट्यातील अदिलाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं आहेत. त्यांच्या संस्था आहेत. ते तिथल्या समाजजीवनात सक्रिय आहेत.
हैदराबादचा निर्माता मोहंमद कुलीशहाच्या कबरीच्या मध्यघुमटाचा आकार व त्याखाली पना-पाकळ्यांची आरास पाहिली की मराठी माणसे पूजेच्या कलशाभोवती पानाची आरास करतात त्याचीच आठवण येते हे धनंजय कुलकर्णी यांचे निरीक्षण फारच बोलके आहे. मोहंमद कुली कुतुबशहानं या शहराची स्थापना करताना ‘मेरा शहर लोगा सूं मामूर कर। रखमां जूं तूं दर्या मे मीन ।’ (हे अल्ला, नदीतील माशांप्रमाणं माझं शहरही असंख्य प्रकारांच्या माणसांनी भरून जाऊ दे) अशी अल्लाकडे प्रार्थन करतो आणि हैदराबाद असे आहेही. यामुळेच या शहराला ‘छोटा भारत’ असं पं. नेहरूंनी म्हटलं होतं.
एक युवा कला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हैदराबादचं नव मराठमोळं रूप बघायला मिळालं. मराठी कवितेचा कार्यक्रम सादर करताना नेमकी संध्याकाळ झाली होती. हैदराबादला शिकलेले बी. रघुनाथ यांच्या
‘गाऊलीच्या पावलात सांज घरा आली ।
तुंबलेल्या आचळांत सांज भरा आली ।’

या ओळी त्या वातावरणात जास्तच जिवंत वाटत होत्या. हैदराबादचे महान साहित्यिक डॉ. ना.गो.नांदापूकरांचे शब्द 
‘माझी मराठी मराठाच मीही ।
हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे ।
गोडी न राही सुधेमाजी आता ।
पळाली सुधा स्वर्गलोकांकडे॥

येथील मराठी तरुणांच्या कोवळ्या ओठांवर आहेत हे किती आश्वासक चित्र आहे!!
हैदराबाद शहराला फुलांचे आतोनात वेड आहे. गल्लीच्या टोकाटोकावर फुलवाल्या बसलेल्या दिसतात. पांढर्‍या, अबोली, पिवळ्या फुलांच्या आणि हिन्याच्या गडद हिरव्या पानाच्या गंधात मराठी माणसाने आपलाही गंध मिसळून टाकला आहे.     
         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

1 comment:

  1. छान लेख!

    मराठवाड्यातील माणूस "मनमाड काचिगुडा" या रेल्वेनेही कधीचा हैदराबादशी जोडला गेलेला आहे.
    या गाडीतले हैदराबादी हिंदी, मराठी आणि तेलगू यांतले संमिश्र संभाषण हा एक श्रवणीय अनुभव असायचा.

    ‘माझी मराठी मराठाच मीही ।
    हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे ।
    गोडी न राही सुधेमाजी आता ।
    पळाली सुधा स्वर्गलोकांकडे॥
    मस्त!
    बाबांकडून ही कविता कितीदा ऎकली आहे.

    ReplyDelete