Tuesday, January 21, 2014

मराठी कवितेचे ‘रसाळ’ निरूपण

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 21 जानेवारी 2014 

प्रसिद्ध समिक्षक प्रा.डॉ. सुधीर रसाळ यांना परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा ‘शब्द सह्याद्री साहित्य सन्मान’ ज्येष्ठ कथाकार प्रा.तु.शं.कुलकर्णी यांच्या हस्ते 14 जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला. मराठी कवितेसाठी व्रतस्तपणे काम करणार्‍या एका ऋषीतूल्य व्यक्तिमत्वाचा गौरव या निमित्ताने झाला. निरलस अशा व्यक्तीमत्त्वाचा गौरव करण्याचे सुचले त्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचेही कौतुक करायला हवे. 

‘संथ वाहते कृष्णामाई’ हे ग.दि.माडगुळकरांचे गाणे ऐकले की मला हमखास रसाळ सरांच्या संथ बोलण्याची आठवण येते. पुरस्कार स्विकारतानाही सरांनी आपल्या संथ लयीत कवितेवरील अप्रतिम भाषणांने श्रोत्यांना मुग्ध केले. सुधीर फडक्यांनी गायलेल्या या गाण्यासोबतच मला आठवण येते ती उस्ताद अमीर खॉं यांच्या संथ लयीतल्या ख्याल गायनाची. संथ लयीत शांतपणे सर एखादा विषय मांडत जातात. त्यांच्या उजव्या हाताची तर्जनी जरा वर येते आणि बाकीची बोटे अंगठ्याकडे झुकतात. ऐकणार्‍यावर त्यांच्या बोलण्याचा, देहबोलीचा असा काही प्रभाव पडतो की या शांत प्रवाहात आपण कधी वाहून गेलो हे कळतच नाही.

प्रत्यक्ष त्यांच्या वर्गातील इंद्रजित भालेराव, दासू वैद्य हे विद्यार्थी असो की वर्गाबाहेरील मी, रेणू पाचपोर, धनंजय चिंचोलीकर, श्याम देशपांडे -या सगळ्यांना कमी अधीक प्रमाणात हाच अनुभव आलेला आहे. सरांच्या बोलण्यावरून, त्यांच्या शांत शैलीवरून लगेच लक्षात येत नाही पण संपर्कात आल्यावर काही दिवसातच उमगत जाते की सर अतिशय ठामपणे आपली मतं मांडत असतात. 

त्यांचे ‘कविता आणि प्रतिमा’ हे पीएच.डी.च्या संशोधनाचे जाडजुड पुस्तक माझ्या हाती आले तेंव्हा माझी छाती दडपुनच गेली होती. हे पुस्तक आत्तापर्यंत फक्त तीन लोकांनी पूर्ण वाचले आहे एक रसाळ सर स्वत:, दुसरे प्रकाशक श्री.पु.भागवत व तिसरे या पुस्तकाचे मुद्रीत शोधन करणारे असं आम्ही विनोदाने म्हणायचो. पण त्यांचे दुसरे पुस्तक ‘काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली’ हाती आले आणि माझा गैरसमज पार धुवून गेला. हे पुस्तक माझे अतिशय आवडते आहे. 

आपली मतं स्पष्टपणे मांडणे हे एक सरांचे वैशिष्ट्य. अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेबाबत तीस वर्षांपूर्वी सरांनी लिहून ठेवले होते, ‘‘विशाखात ज्या जातीचा प्रत्यय त्यांची कविता देत होती, त्या जातीचा प्रत्यय नंतरच्या काळातील त्यांच्या कवितेने क्वचितच दिला. विशाखा नंतर त्यांच्या कवितांचा विकास थांबला.’’ किंवा नारायण सुर्व्यांवर लिहीताना, ‘‘सुर्व्यांजवळ सांगण्यासारखे खुप आहे. पण हे सांगण्यासारखे सतत गुदमरून जात आहे हे जाणवते.’’

मराठीच्या प्रांतात मोठ्या लेखकांनी स्वत:ला साहित्यीक संस्थांपासून कायम दूर ठेवलेले मोठ्या प्रमाणात आढळते. रसाळ सर मात्र याला अपवाद आहेत. थोडी थोडकी नाही तर जवळपास 50 वर्षे सरांनी मराठवाडा साहित्य परिषद व तिचे मुखपत्र प्रतिष्ठान यासाठी खर्ची घातली आहेत. संपादनापासून ते साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भुषविण्यापर्यंत त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या निभावली आहे. 

आजही एखाद्या पुस्तकाला प्रस्तावना तर सोडाच पण पाठराखण म्हणून मलपृष्ठावर छोटा मजकूर लिहायचा म्हटले तरी सर ते सगळे पुस्तक वाचून त्यावर सांगोपांग विचार करून मगच लिहून देतात.

आपल्यापेक्षा मोठ्यांशी गप्पा मारताना बहुतांश वेळा नाळ जूळतच नाही. पण रसाळ सरांचे तसे नाही. आम्ही कोणी साहित्यप्रेमी त्यांच्या कडे गेलो तर सर दिलखुलास गप्पा मारतात, घरात इतर कोणी नसेल तर आपल्या हाताने चहा करून पाजतात. समोरचा कितीही लहान असो त्याला ‘आहो जाहो’ करून संबोधतात. सरांचा कवितेवरचा अभ्यास पाहून बर्‍याचजणांना असे वाटते की ते फक्त कविताच वाचतात की काय. सरांचे वाचन मराठी, इंग्रजी अगदी अद्यायावत आहे हे त्यांच्या निकटवर्तीयांखेरीज फारसे कुणाला माहित नाही. विशेषत: सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचे आकलन तर अतिशय उच्च दर्जाचे आहे. मागील वर्षी बब्रुवान रूद्रकंठावार यांना बी.रघुनाथ पुरस्कार सरांच्या हस्ते देण्यात आला. सामाजिक उपरोध लिहीणार्‍या बब्रुवानच्या पुस्तकावर सर काय बोलतात याची आम्हाला खुप उत्सुकता होती. ज्वलंत विषयावर राजकीय भाष्य करण्याची बब्रुवानची नेमकी ताकद हेरून सरांनी मोजक्या शब्दांत अशी काही मांडणी केली की सगळे सभागृह भारावून गेले. त्यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘गांधी विरूद्ध गांधी’ लिहीणारे प्रतिभावंत नाटककार अजीत दळवी नंतर आम्हाला म्हणाले, ‘‘सामाजिक प्रश्नांबाबत सरांची मांडणी फार महत्त्वाची आहे. सरांनी या विषयांवर लिहीलं पाहिजे.’’

समिक्षा लिहीणार्‍या सरांनी ललित लेखनही फार मोजके पण अप्रतिम केले आहे. त्यांची व्यक्तिचित्रे एकत्र करून एक पुस्तक तयार करावे यासाठी फार दिवसांपासून मी त्यांच्या मागे आहे. अनंत भालेराव यांच्या ‘मांदियाळी’ या पुस्तकाला सरांनी लिहीलेली प्रस्तावना याची साक्ष आहे. आपल्या वडिलांचे तसेच गुरू वा.ल.कुलकर्णी यांचे त्यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्रही फारच उत्कट आहे. सरांचे वडिल न.मा.कुलकर्णी हे उत्कृष्ठ शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या शिकविण्याच्या कामासोबतच साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रकाशन संस्था काढून मोलाचे काम त्या काळी केले. वा.रा.कांतांचा रूद्रवीणा हा पहिला कवितासंग्रह सरांच्या वडिलांनी स्वत: प्रकाशित केला होता. 

त्यांच्या अशातच प्रसिद्ध झालेल्या ‘वाङ्मयीन संस्कृती’ या महत्त्वाच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळायला हवा होता अशी भावना कित्येक रसिकांची आहे. बा.सी.मर्ढेकर यांच्या कविता व कादंबर्‍यांवर त्यांनी विस्तृत लिखाण केले आहे. जवळपास 900 पानांचा हा मजकूर आता तीन पुस्तकांच्या मधून प्रकाशित होतो आहे. 

वैयक्तिक संबंधांबाबत सरांचे वागणे मोठे अकृत्रिम व सच्च्या माणुसकीला जागणारे आहे. नरेंद्र चपळगांवकर हे त्यांचे जवळचे मित्र. चपळगांवकरांच्या मुलीच्या लग्नात सकाळी पाहुण्यांना नाष्टा द्यायचा होता. काम करणारे लोक येईपर्यंत त्यांनी वाट न पाहता रसाळ सरांनी भरा भर उपम्याच्या ताटल्या भरून पाहुण्यांना द्यायला सुरवात केली होती. कोणीतरी ते पाहून त्यांना थांबवले आणि ते काम आपल्या हाती घेतले. आपल्या पदाचा तेंव्हा सर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते कोणताही दबाव सरांनी स्वत:वर येवू दिला नव्हता. 

आपल्या लेखणीने समिक्षेचे नवे मापदंड निर्माण करणारे आणि कृतीने साहित्यीक संस्थांच्या व्यवस्थापनाचा आदर्श समोर उभे करणारे सरांसारखे लोक आज फार दुर्मिळ झाले आहेत. साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती देवून सन्मानिले, त्यांच्या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार मिळाले, आज हा शब्द सह्याद्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे पण या कशाचाच सरांवर परिणाम होत नाही. आजही ते शांतपणे सकाळी बागेत झाडांना पाणी देणे असो, स्वत:चा चहा स्वत: करून घेणे असो सोडत नाहीत. आपल्या लिखीत मजकूराचे वाट्टोळे डि.टी.पी.करताना होते हे पाहून सर स्वत: उतरत्या वयात डि.टी.पी. शिकले. आज सर स्वत:चे सगळे लिखाण स्वत:च संगणकावर टाईप करतात. पार्श्वभूमीवर किशोरी आमोणकरांचा एखादा राग चालू असतो. आणि सरांची बोटे की बोर्डवर लयीत चालत असतात.

मला खात्री आहे हा लेख वाचल्यावर, प्रत्यक्ष भेटीत सर मजेदार हसून फक्त एवढंच म्हणतील, ‘‘चांगला लिहीलात लेख...’’

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

1 comment: