Tuesday, February 4, 2014

कवितेसाठी जपलेली ओल- ‘आवानओल’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 4 फेब्रुवारी 2014

कोकणची लालमाती तशी भलतीच कलासक्त. म्हणूनच इथे गायक, कलाकार, नट, कवी जन्मले आणि त्यांची कदरही झाली. अगदी आजच्या काळातही अजय कांडर सारखा मराठीतील एक महत्त्वाचा कवी वसंत सावंत या कविच्या नावाने  पुरस्कार देतो आणि तोही परत कविच्याच हाताने. ज्या प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम होतो त्याचे नाव आहे ‘आवानओल’. कोकणात भातपेरणीच्यावेळी भरपुर पाऊस आवश्यक असतो. त्यात रोपं लावली जातात. मग ती उचलून दुसरीकडे पेरणी केली जाते. जर पुरेसा पाऊस आला नाही तर ही रोपं जमेल तेवढ्या पाण्यात कसंही करून जगवली जातात. अशी अपुर्‍या पाण्यावरची रोपं जगवण्याला ‘आवान’ असा शब्द आहे. कवी मित्र अजय कांडर याने यापासून 'आवानओल' असा शब्द तयार केला. त्याच्या कवितासंग्रहालाही हेच नाव आहे. आणि याच नावाचे प्रतिष्ठानही आहे.
‘आवानओल’ हा शब्द अगदी सार्थ ठरावा अशीच धडपड अजय कांडर आणि त्याच्या सहकार्‍यांची कवितेसाठी कोकणात चालू आहे. या वर्षी हा पुरस्कार अभय दाणी या कवीला ‘एरवी हा जाळ’ या कवितासंग्रहासाठी देण्यात आला. हा पुरस्कार कवी वीरधवल परब याच्या हस्ते देण्यात आला. एरवी कुठलाही साहित्यीक पुरस्कार म्हणजे गावातला एखादा राजकारणी पकडणे. त्याची संस्था असतेच. अंबाजोगाईच्या श्रीरंगनाना मोरे यांनी ठेवलेल्या ज्ञानश्री पुरस्कारावर लिहीताना याबद्दल लिहीले होतेच.
'आवानओल' प्रतिष्ठानचा हा पुरस्कार मात्र याला अपवाद आहे. काही साहित्यीक कवी कलाकार मित्र मिळून अतिशय साधेपणाने हा कार्यक्रम करतात. कोकण गांधी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेले नगर वाचनालय कणकवलीला आहे. या वाचनालयाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पाहुण्यांची व्यवस्था अजय कांडर हा कविमित्र स्वत:च्या घरीच अगत्याने करतो. हे एक मोठंच वैशिष्ट्य या उपक्रमाचे आहे. त्याला साथ देणार्‍या घरच्या माऊलीचे खरंच कौतुक करायला पाहिजे.
या निमित्ताने एक विचार आता सगळ्यांनीच करायची गरज आली आहे. प्रचंड मोठ्या खर्चाची संमेलने आयोजीत केली जातात. त्यातील राजकारण्यांचा हस्तक्षेप किती आणि कसा आहे हे न बोललेलेच बरे. यातून काही निष्पन्न होते आहे असेही नाही. नुसतीच भपकेबाज जत्रा पार पडते. यावर टिका करत असताना नेहमी हा प्रश्न विचारला जातो की मग करायचे ते काय? याला उत्तर म्हणजे ‘आवानओल’ प्रतिष्ठान हे आहे.
हा उपक्रम अजय कांडर  कवी वीरधवल परब, प्रवीण बांदेकर किंवा नामानंद मोडक सारख्या चित्रकार मित्रांच्या साहाय्याने पार पाडतो यालाही एक महत्त्व आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी हे भारतभर गाण्याचे कार्यक्रम करत फिरायचे. तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी आपल्या गुरूच्या नावाने पुण्यात ‘सवाई गंधर्व महोत्सव’ सुरू केला. आज तो शास्त्रीय संगीताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मोहत्सव होऊन बसला आहे. याच पद्धतीनं स्वत: साहित्यीकांनी पुढाकार घेवून वाङ्मयीन उपक्रम आपआपल्या गावी निष्ठेने पार पाडायला पाहिजेत. त्यांची प्रतिष्ठा जपायला पाहिजे. त्यांचे गांभिर्य लोकांना जाणवून द्यायला पाहिजे. साहित्यीकांनी चालविलेल्या अशा उपक्रमांना सर्वोच्च प्रतिष्ठा मिळायला हवी.
हा उपक्रम एका वाचनालयात होतो हेही महत्त्वाचे आहे. अन्यथा आजकाल होतं असं की साहित्यीक कार्यक्रम आणि पुस्तके एकमेकांशी फटकूनच असतात. एखादा मोठा कवी गावात येवून जातो, त्याची जोरदार कविता लोक ऐकतात आणि निघून जातात. त्याच्या कवितेचे पुस्तक कुठे मिळेल का? कोणी ते वाचले का? याचे कोणालाच काही गांभिर्य नसते. एखादा मोठा व्याख्याता चांगले भाषण करून जातो. पण त्याचे पुस्तक त्या गावात उपलब्ध असण्याची शक्यता फारच कमी. मग असे उपक्रम वाङ्मयीन दृष्ट्या अपुरे ठरतात. त्यांचा अपेक्षीत परिणाम साधल्या जात नाही.
परभणीला, नाशिकला, औरंगाबादला, बुलढाण्याला, वाशिमला असे काही प्रयोग वाचनालयांनी केले आहेत.
हा उपक्रम करणारे अजय कांडर सगट त्याचे सगळे सहकारी हे सर्वसामान्य घरातले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बेतास बात आहे. केवळ कवितेच्याप्रेमापोटी पदराला खार लावून ते हा उपक्रम साजरा करतात. ज्या अभय दाणी या कविला हा पुरस्कार यावर्षी दिला त्यानेच एका कवितेत लिहून ठेवले आहे,

केस सावरलेला
अलिशान कपड्यांमधला
गरम खिशाचा कवी अजून जन्माला यायचाय

कोकणातील लोकांना खरंच कलेची कदर आहे. नामानंद मोडक या चित्रकार मित्राने आपला छोटासा कलात्मक स्टुडीओ कणकवली सारख्या छोट्या गावात थाटला आहे. महाराष्ट्रातल्या कितीतरी मोठमोठ्या शहरांत अजूनही असा स्टुडीओ आढळणार नाही. तबला वादक वसंतराव आचरेकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची मोठी संस्था इथे चालविली जाते. पं. जितेंद्र अभिषेकींच्या नावाने त्यांचे शिष्य दरवर्षी इथे संगीत महोत्सव भरवितात. समीर दुबळे हा अभिषेकी बुवांचा शिष्य आणि आजचा आघाडीचा शास्त्रीय गायक योगायोगाने त्याच दिवशी मला कणकवलीत संगीत कार्यशाळेच्या निमित्ताने भेटला.
इथली मालवणी बोली तर काय सांगावी. सोबतच्या विनायक सापळे या मित्राची गोड मालवणी मी एखादं गाणं ऐकावं तशी लक्ष देऊन ऐकत होतो.
बोरकरांसारख्या कवीने गोवा आणि कोकण परिसराला आपल्या कवितेतून जिवंत केले. त्यांच्या कविता बहुतेक मराठी वाचकांना माहित आहेत. पण विजय चिंदरकर नावाचा 1936 ला जन्मलेला जेमतेम 26 वर्षे जगलेला कवी फारसा कुणाला माहित नाही. त्याची एक कविता अजय कांडरकडून माझ्या हाती लागली. कवितेला पुरस्कार देताना जुन्या कवीला त्याच्या कवितेला जपुन ठेवण्याची ओल या अजय सारख्या कवी मित्राने दाखवून दिली.

पानावरती भात हवा पण
हवाच उकडा कठिण तांबडा
सोबतिला अन् हवा भाजुनी
दरवळलेला सुका बांगडा

गडग्यापाशिल फणसाची अन्
हवीच भाजी गोडुस पिवळी
हवी आणखी तिखट तांबडी
चटणी थोडी भाजीजवळी

हा सारा हा थाट हवा अन्
हवीच सगळी अंवतीभंवती
सोलकढीची हवी भैरवी
तृप्तीच्या त्या तानेवरती

खूप दिसांनी भूक शमावी
त्या प्रेमाच्या शब्दावरती
आईने अन् चिडून जावे
माझ्या थोड्या खाण्यावरती
सासवडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मुं.शिंदे यांची एक सुरेख ओळ आहे (ते आपल्या चांगल्या ओळी सोडून नको त्याच म्हणतात हीच तर तक्रार आहे)

देश म्हणजे
नुसता भुगोल
की माणसा माणसांतील ओल

कोकणात कणकवलीला कवितेसाठी ओल जपणारी माणसं सापडली. अशी माणसं जगात जिथे जिथे मराठी बोलली जाते, जिथे जिथे मराठीवर प्रेम केले जाते तिथे तिथे सापडो हीच पसायदान आपण मागुयात.
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment